मराठी साहित्य – विविधा ☆ विदारक तरीही ?? ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ विदारक तरीही ?? ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

परंपरा या नावाखाली आपण बऱ्याचदा सारासार विवेकबुद्धी हरवतो आणि भले -बुरे याचा विचार न करताच परंपरेशी बुद्धी गहाण ठेऊन एकनिष्ठ रहातो, मनाला न पटले तरी मनाचा दगड करतो, ज्या समाजात फुले, आगरकर, कर्वे यांच्यासारखे समाजसुधारक आयुष्याची होळी करून गेले असले तरी !

परवा एका नातेवाईकांच्या घरी माती सावरणेच्या प्रसंगाला गेल्यावर मन पेटून उठवणारा पण हतबलता लक्षात येऊन मन विषण्ण झाले तो प्रसंग असा..नवरा कावीळ ने गेला लग्न होऊन अवघे दोन वर्षे झालेले, लग्न जोडीदार याचा अर्थ कळायच्या आतच मुलीवर हा प्रसंग, त्यातच मुलगी शामळू, भित्री, नुकतेच कॉलेजचे शिक्षण संपवून हात पिवळे झाले, हळदीचा रंग अजून फिकट व्हायचा होता तोपर्यन्त तिच्यावर आलेला हा प्रसंग ती कोलमडली या अनपेक्षित धक्क्याने, मानसिक अवस्था बिकट झाली, ती नुसतं रडतच होती … विधिलिखित  कुणी बदलू शकत नाही, हेच खरे !तिसरा दिवस …नातेवाईक गोळा झाले, नैवेद्य भरला अन …अन तो प्रसंग आला कुणाही स्त्रीच्या आयुष्यात येऊ नये असा …तिचं अहेव लेण उतरून नैवेद्यावर ठेवण्याची घाई ..कुणी जायचे मंगळ सूत्र तोडायला ? कुजबुज वाढली ..”आवरा …”पुरुषमंडळी बाहेरून ओरडत होती …इतक्यात एक विधवा वृद्धा धीर धरून पुढे आली …खरेच किती विदारक हे …पहिले मंगळसूत्र ….ती मुलगी तोंड लपवून हुंदके दाबत होती तिचा श्वास घुसमटला …ते चित्र मला पाहवेना ..मी उठले न जमलेल्या सर्व जमावाला उद्देशून म्हणले, ” खरेच याची गरज आहे का ?? आपण सगळे सुशिक्षित आहात मग का अश्या पद्धतीने मंगळसूत्र तोडत आहात ? मुलीची मानसिक अवस्था तर पहा ! “

क्षणभर एकदम स्तब्धता पसरली माझं बोलणं अनपेक्षित होतं …कुजबुज सुरु झाली …”ही कोण ?काय करते ?” बऱ्याच स्त्रियांना विचित्र वाटले त्या विचित्र नजरेने पाहू लागल्या, पण मला फिकीर नव्हती .”ठीक तुमची मर्जी … ” एक पुरुष बोलला पण मंगळसूत्र तोडलेच, जोडवी उतरली, बांगडी फोडली अन नैवेद्य असा सजून गेला .गर्दीतली एक बाई उठली अन माझ्या गळ्यात पडून रडत म्हणाली, “बाई माझे …मनातलं गं बोललीस …लाखातलं एक …”अन ती धाड धाड रडू लागली जणू त्यांच्या ठसठसत्या वेदना मी आज मुक्त वाहू दिल्या होत्या !

पण माझं विचारी मन अस्वस्थ झालेय, राहून राहून प्रश्न पडतो, की आपण आज शिकलो, प्रगत झालो, पण अश्या परंपरेच्या मानसिक गुलामीतून का मुक्त होऊ शकत नाही ? का अजूनही स्त्रीला जबरदस्तीने अहेव लेण उतरून ठेवायला लावले जाते ? का नवऱ्याच्या आत्म्यालाही या सगळ्यांची आवश्यकता असते ?? बऱ्याचदा ग्रामीण  भागात असे चित्र दिसते, शेतकरी कामकरी महिलांची पायांची बोटे कष्टाच्या कामाने रापतात जोडवी करकचून फिट्ट झालेली असते, आणि ती सहजा सहजी निघत नाहीत, अशात ज्या महिलेवर असा प्रसंग ओढवलेला असतो तिला हा प्रसंग नको, ते लेण उतरवायला नको असे वाटत असते, ती अंग चोरते, तोंड लपवते आणि जोडवी हिसकावून काढताना जखमा होतात किती विचित्र ! कोणतीही स्त्री परंपरेच्या विरुद्ध सहजासहजी जात नाही मग तिला जेव्हा ते उतरावे वाटेल तेव्हा ते उतरून द्यायची मुभा का नसावी ? समाजातील हे चित्र आता तरुणानीच बदलायला हवे , (कारण स्त्रिया दुःखामुळे पतीवरील प्रेमामुळे असा निर्णय नाही घेऊ शकत )

चंद्रकोर कपाळी मिरवून शिवबाचे पाईक आहोत हे दाखवण्यापेक्षा विचारांचे जरूर पाईक व्हावे, आठवा, शिवरायांनी आपल्या मातेला सती जाऊ दिले नव्हते ! प्रत्येकाने आपल्या नातेवाईक महिलांवर असे प्रसंग आले तर अश्या निरर्थक प्रथेला विरोध करायला हवा, पहिला दगड कुणीतरी उचलल्याशिवाय समाजाला आत्मबल आणि आत्मभान येणार नाही होय ना ??

आठवावे, मंगळसूत्र घालतानाचा विधी किती पवित्र, शुभ मुहूर्त पाहून केला जातो ! मग ते काढताना इतका विदारकपणा अन अमानुष पणा अन भयानकता का ?? कोल्हापूर जिल्ह्यातील एका थोर विचारवंताने आपल्या पत्नीला सांगून ठेवले होते की ‘त्यांच्या माघारी पत्नीच्या आचरणात कोणताच बदल न व्हावा अन अहेव लेणी, कुंकू  तसेच ठेवावे ‘

माणूस किती शिकला याला महत्त्व नाही तर त्याचे आचरणात किती शिक्षितपणा आहे हेच महत्वाचे नाही का ??

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆ 

दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.

15 ऑगस्ट 2015 ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता, अंगावरची झूल काढली होती. मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी ! 

आज बरोबर या गोष्टीला सहा वर्षे पूर्ण झाली, म्हणून साधारण सहा वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे——

वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली व्हायची,  म्हणून भीक मागणा-या  समूहासाठी मी काम करायचं ठरवलं. 

ते तर गेले… पण त्यांच्यासारखे अजून खूप आहेत—त्यांतल्या एखाद्याला हात देवू, या विचारांतुन—-! 

या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून मग मी रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.  

सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती. मी भीक मागणाऱ्यांमध्ये  मिसळायचा प्रयत्न करु लागलो. 

सुरूवातीला लाज वाटायची…!  डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.  

मुखवटा लावला होता… ! 

पण मला भीक मागणा-या  लोकांनी त्यांच्यात सुरुवातीला येवू दिलं नाही.  त्यांना वाटायचं, हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन … ! (कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं )

किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा …!– डाॕक्टर आहे हा xxx—गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल, रक्त विकेल, अजून काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल— यांत आपण मरुन जाऊ—-या डॉक्टरचा भरवसा काय ? 

किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल,  फसवुन “धंद्याला” लावेल.  (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो— शरीर विक्रय करणा-या  या ताईंमध्ये माझी उठबस होती. काही लोकांना वाटायचं, हा माझा “धंदा” आहे, आणि मी मधला दलाल ! भीक मागणाऱ्या समुहामध्ये हाच गैरसमज पसरला होता)—-

या सर्व गैरसमजापोटी, या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातली, धमक्या दिल्या, शिव्याही दिल्या. खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले, काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे…! मी त्यांच्यात येवुच नये, यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे ! 

मी पूर्णपणे निराश झालो होतो. या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं…

मी पूर्णपणे निराश झालो ! 

धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली. कुत्रं तरी बरं, त्याला कुणीतरी हाड् म्हणत  का होईना, तुकडा तरी टाकतं… मला ते ही मिळेना ! 

एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणून नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते– नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो… ! 

या काळात भिक्षेक-यांपेक्षा  वाईट अवस्था झाली माझी ! मी खरोखरचा बेरोजगार, बेनाम  झालो होतो… 

14 आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेऊन आदरानं भेटायला यायचे —– 

15 आॕगस्ट नंतर भिक्षेकरी पण मला हाकलून द्यायचे… माझ्यावर थुंकायचे ! 

किती विरोधाभास !

लाखोंचा पगार थांबल्यामुळे, माझं घर डबघाईला आलं—- कालचा साहेब, आज भिकारी झाला !

एका रात्रीत रावाचा रंक होतो… आणि रंकाचा रावही होवू शकतो… ही म्हण मला माहीत होती… ! 

मी रावाचा रंक झालो होतो.  त्या काळात, एका भिका-याचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं … !

—अशा परिस्थितीत, डॉक्टर मनीषा धावून आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तिनं निभावलं !

 तिने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला… 

—आई-वडील डॉक्टर पी. डी. सोनवणे आणि सौ भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला. 

—माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला…!

—-पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो… ! आर्थिक आणि मानसिक !  

त्यातही मी रस्त्यांवर फिरायचो — भिक्षेक-यांत…. 

आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे—- 

“ काय हो, महाराष्ट्र प्रमुख, आज रस्त्यावर कसे काय तुम्ही…?”  खी.खी.. खी… हसत  लोक टोमणा मारायचे… !

“ एसी हाफीसात बसणारे तुमी… आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा … आरारारा…. वाईट वाटतं बुवा तुमचं… खी..खी… खी…! “ 

“काय वो सर… आज भिका-यांत बसले तुम्ही…? काय पाळी आली राव तुमच्यावर…  खी..खी… खी…!”  

“ कशाचा सर रे तो …? खी..खी… खी…”

——ही   खी… खी… खी… मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही !!!

मात्र या खी… खी… खी…ने माझे इरादे अजू न मजबूत केले ! 

क्रमशः….. 

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आडस —  माझी रत्नागिरी.. – श्री प्रशांत शेलटकर ☆ संग्राहक – श्री विद्याधर फाटक

⭐ विविधा ⭐

⭐ आडस —  माझी रत्नागिरी.. – श्री प्रशांत शेलटकर ⭐ संग्राहक – श्री विद्याधर फाटक  ⭐

??

आज  एका मित्राबरोबर फोनवर बोलताना सहज बोलून गेलो..’ काय आडस’ आहे रे ! त्याने मला विचारलं.. काय म्हणालास.? मी म्हटलं..काही नाही..काही नाही.

फोन झाला..आणि डोक्यात या अफलातून शब्दांची डिक्शनरी चालू झाली. हे काही खास शब्दप्रयोग रत्नागिरीचे. आडस्’ म्हणजे झकास,उत्तम. ‘वड्स’ म्हणजे एकदम मस्त.  ‘गडगा’ म्हणजे कंपाऊंड वॉल. एखाद्याला ‘रेटवला’ म्हणजे पराभूत केला. मिसळ ‘रेटवली’ म्हणजे यथेच्छ खाल्ली. पाऊस ‘रेमटवून’ पडला म्हणजे धो धो पडला. ‘आयझो’ म्हणजे ‘ओ माय गॉड’. ट्रॅफिकमध्ये ‘फुगलो’ म्हणजे अडकलो. ‘किचाट’ म्हणजे गडबड, गोंधळ, गोंगाट. एखादा ‘सरबरीत’ असणे म्हणजे डोकं कमी असणे. एखादा ‘सोरट’ असतो म्हणजे डॅम्बीस असतो.

असं म्हणतात दर दहा मैलांवर भाषा बदलत असते. आपली मराठी भाषा तर इतकी उत्तुंग आणि अचाट आहे की तिला व्याकरणाच्या चौकटीत बसवणं अशक्यप्राय गोष्ट आहे. आपल्या भाषेचा लहेजा औरच आहे. कोंकणातच चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कुडाळ इथे भाषेचा बाज वेगळा असतो. मालवणी भाषा हा अजून वेगळा प्रकार. एक प्रकारचा हेल कोंकणात भाषेला असतो. एखाद्याला काही सांगितलं आणि तो आश्चर्यचकित झाला की नुसतं ‘हल्’ असं डोळे मोठे करून बोलेल, किंवा प्रेमाने ‘मेलास तू’ असं म्हणेल. तुला ना चांगला चोप दिला पाहिजे असं नं म्हणता ‘ तुला फोकटवला पाहिजे’ असं म्हणतात!

हे व असे अनंत शब्दप्रयोग नियमित वापरले जातात. यांची कुठल्याही डिक्शनरीमध्ये नोंद नसावी. भाषा ही संवादाचे माध्यम जरी असली, तरी भावना उत्कटपणे या हृदयातून त्या हृदयात पोहोचणं महत्वाचं असतं आणि लेखी भाषेपेक्षा बोलीभाषा हे काम प्रभावीपणे करत असते. आणि असे शब्द हे काम ‘आडस्’  करत असतात, नाही का?

??#आडसमाझीरत्नागिरी❤️

साभार फेसबुक वाल – मुळ लेखक श्री प्रशांत शेलटकर, रत्नागिरी

संग्राहक – श्री विद्याधर फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग १ ☆ 

15 ऑगस्ट !!!  ही नुसती तारीख नव्हे, आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस ! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता… आणि एकेवर्षी मी सुद्धा ! भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच ! 

सुरुवातीला एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो. महिन्याचं उत्पन्न … 4-5 लाख ! 

पण यांतही समाधानी नव्हतो ! —-भरपूर पैसे कमावणे, वर …वर… वर जाणे …आणखी वरचे पद मिळवणे—–घर गाडी बंगला घेणे—-आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे—– जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे—-जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी !–फरक इतकाच, तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी…  गाढवावर !—– 

हे गाढवही  मीच होतो आणि गाढवावर बसलेला दीडशहाणाही  मीच !

एके दिवशी, आयुष्याच्या वाटेत भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी दीडशहाण्या सिकंदराची नशा उतरवली—-!—-माणूस म्हणून जगण्याचं  सूत्र सांगितलं—-! 

ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॕचरोपॕथी आणि इतर कुठल्याही पॕथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह अनुभुती या पॕथी वापरणं,  हे माणूस असल्याचं लक्षण असतं—- हे  त्यांनी माझ्यावर ठसवलं—-! 

वेद शिकण्यापेक्षा एखाद्याची वेदना समजून घेणं, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण—हे  त्यांनीच मनावर  बिंबवलं ! 

डोंगरावर चढणार्‍या माणसाचे पाय ओढून त्याला पाडण्यापेक्षा,  जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो—-पुरुषार्थाची ही व्याख्या त्यांनी मला नव्यानं सांगितली—!

ते खरंतर भिक्षेकरी नव्हते, ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधून मधुर रस चावून चावून ओरबाडून घेऊन, उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं !

बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात उतरल्या होत्या… पण मनात नाही… ! 

मी धावत होतो शर्यतीत—!शर्यतीची नशा होती —!! 

पैसे… पद… प्रतिष्ठा … मी एकेक गड जिंकत चाललो होतो… पण मन भरत नव्हतं !

हे सगळं कमावून झाल्यावर, एके दिवशी भेटायला गेलो त्यांना… आणि समजलं, की मला मुलगा समजणारे “ते” बाबा बेवारस म्हणून रस्त्यावर “मेले”——! 

हो–मेले —स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं,  आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी …! 

——“मेला” हा शब्द प्रतिष्ठा नसणाऱ्यांसाठीच  ठेवणीत ठेवलाय !

ते मरुन गेले… आणि जातांना भिका-यांच्या डाॕक्टरला जन्माला घालुन गेले—–! 

मी त्यांचा मुलगा म्हणून जिवंत असूनही ते बेवारस म्हणून गेले—-!

मी अंतर्मुख झालो !——

ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्या लोकांत आणि माझ्यात फरक काय ?

पूर्वी ऐकलेले  त्यांचे विचार आता कानातून मनात उतरायला लागले—- Heart पासून हृदयात यायला लागले… ! 

त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत—- ! — 

आणि या दीड शहाण्या सिकंदराची नशा पूर्ण उतरली !

जग जिंकण्यापेक्षा, जगातला “माणूस” जिंकावा,  किंवा माणुसकीचं “जग” जिंकावं…! 

—उतरलेल्या नशेनं हेच शिकवलं ! 

आणि, हा दीड शहाणा सिकंदर त्या गाढवावरून उतरला, आणि 14 ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला. 

आणि—- 15 ऑगस्ट 2015 ला “ भिकाऱ्यांचा डॉक्टर “ म्हणून तो रस्त्यावर आला… !

स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला… !

मीच स्वतः स्वीकारलेल्या ‘पद-पैसा-प्रतिष्ठा ‘ या शर्यतीतून मी स्वतंत्र झालो तो दिवस होता 

 15 आॕगस्ट 2015 —— म्हणुन  हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन… !

—–या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असूनही “दीन” होते—- 15 आॕगस्ट 2015 नंतर ते पैसा नसुनही “दिन” झाले !

जवळचे लोक म्हणतात… हरलास तू आभ्या !—- 

नाही! अजिबात नाही —–

शर्यतीत किती धावायचं ? कसं धावायचं ? यापेक्षा कुठं थांबायचं … ? हे कळणं जास्त महत्वाचं !

योग्य ठिकाणी हरावंच लागतं… !

कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो !—-

कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही… की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही.  

एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघूनही आपल्याला आनंद झाला तर समजावं—-आपण आत्ता खरे “मोठे” झालो—-बाकी वय बीय सारं झुठ !!! 

वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं—–जेव्हा ते मन शुभ्र करेल—तेव्हा त्याची किंमत—-! 

नाहीतर नुसताच तो गणितातला एक फालतू आकडा !!

क्रमशः….. 

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अलिप्त… ☆ श्री विद्याधर फाटक

⭐ विविधा ⭐

⭐ अलिप्त…  ⭐ श्री विद्याधर फाटक  ⭐

अलिप्त होणे, Disconnect with somebody…..

धक्का बसला नं मित्रांनो, पण खरं आहे…..

पटणार नाही काहींना, आयुष्यात वेळ आली की Detach होणचं  योग्य……..

असं म्हणतात, साठी नंतर ही प्रक्रिया सुरु करावी. अलिप्त म्हणजे separation नाही, aloof नाही, कुठलीही गोष्ट मनाला लावून नं घेणे….. ज्या गोष्टी जशा आहेत, त्याचा स्वीकार करणे, खोटी आशा बाळगू नये……

एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलत नाही, स्वभावाला औषध नाही, खरं आहे…..

त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा, ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये…… Detach….

मुलगा /मुलगी परदेशी आहेत…. हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही, प्रत्यक्ष होणं शक्य नाही, हे मनाला सांगणे….. अलिप्त……

आपली स्थावार जंगम Property, खूप  कष्टाने उभी केलेली, मान्य….. पण आता उपभोग घेण्याची शक्ती नाही, आसक्ती नाही, त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे…. Disconnect

आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात, कधी Marketing tricks मुळे तर कधी पत्नीचा, मुलांचा आग्रह… खरं सांगा आशा कित्येक वस्तू आपल्या घरात असतात, खरं आहे नं…. आपण वापरत  नाही पण जपून ठेवतो, May be emotional attachment…..

भांडी असंख्य, Dinner sets, काचेचे वेगवेगळे glasses, Mugs, अगणित वाट्या, पेले इत्यादी….

कल्पना करा, लग्नानंतर छोट्या घरात संसार झाला नं, आता घर मोठं आहे, खूप साधने आहेत, पण माणसं दोन… काय करायचं… अशा वेळी Detach होणं चं महत्वाचं….

हे झालं निर्जीव वस्तूंबद्दल.. आता सजीव माणसं चेक करू या…….

काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे, स्वाभाविक होतं, कारण व्यक्ती वेगळ्या होत्या, सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशा सारखं होतं…. आज परिस्थिती बदलली आहे मित्रांनो, विचार share होतं नाही, कोणी सल्ला मागत नाही, काही नं पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाही…. Detach….

रिक्त होण्यात सुख आहे मित्रांनो, दुःखाला delete करायला यायला पाहिजे, खूप कठीण आहे, मान्य, मग पूढे नाही जाऊ शकत…….

अशा वेळी कृष्णा चे चिंतन करावे…

त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही…. कधी वाटलं नसेल का कृष्णाला कि देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे…?

कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या, मनसोक्त बासरी च्या मंद आवाजात सगळं विसरून जावं……..

मान्य आहे, कृष्ण परम परमेश्वर होता ??… आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्य… आयुष्यात जर कधी अलिप्त  व्हायचं असेल तर कृष्ण आठवा…. तो स्फूर्ती देईल……..

मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात… काय गैर आहे, काही नाही, ते जर त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतील तर तक्रारीला जागा नसावी…. पण माझं ऐकावं हा हट्ट बरा नाही… निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते, मान्य, पण जबरदस्ती नको….. लागू द्या ठेचं… शिकेल मुलगा,/मुलगी…

लहानपणी आई म्हणायची, तुला कळणार नाही आता, एकदा बाप झाला की कळेल….. किती साध्या भाषेत एवढं मोठं तत्वज्ञान आईच सांगू शकते…..

अलिप्त होण्यात सुख आहे…. पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशा  सारखं मन स्वच्छ होईल मित्रांनो……

वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वछंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल…

मनात प्रेम, सहानुभूती राहणार, पण गुंतणे नाही….

जिथे व्यक्ती गुंतते, तिथे  राग, लोभ, येणार….हे मळभ दूर झाले की सर्व छान, स्वच्छ, निर्मळ……….

बघा प्रयत्न करून, जमलं तर ठीक….

नुकसान मात्र नाही…..

 

© श्री विद्याधर फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्टार्च… ☆ सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

⭐ विविधा ⭐

⭐ स्टार्च…. ⭐  सौ.अस्मिता इनामदार ⭐

आपलं मन एक अजब रसायन आहे. इंद्रीय म्हणावं तर दिसत नाही, पण त्याशिवाय आपण जगूही शकत नाही. किती विचित्र गोष्ट आहे ना ? विचार करणारं, विचाराला चालना देणारं आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलं तरच आपले जीवन सुसह्य होते. अर्थात ते विचारही सुसंगत हवेत. सध्याची परिस्थिती बघता हे कितपत जमेल हे कळत नाही. रोज कोरोनाच्या विपरीत बातम्या, ओळखीच्या-अनोळखीच्या लोकांच्या मृत्युंच्या बातम्या कळून आपण भयकंपित होतो. आपले विचारही त्याच मार्गावर जातात. प्रत्येकजण मरणाच्या भीतीने घाबरलेला आहे. निराधार, असुरक्षित वाटतंय. या सर्वातून बाहेर पडायला काहीतरी उपाय करायलाच हवा ना.

एक साधं उदाहरण घेऊयात. कपडे धुतल्यावर त्याला इस्त्री करतो. का तर त्यावरच्या सुरकुत्या जाऊन कपडा कडक, साफसुतरा व नीटनेटका दिसावा म्हणून. अहो आपलं मनही तसंच आहे. कोरोनाच्या, मरणाच्या भीतीच्या सुरकुत्याच आपल्या मनावर पडल्यात. आता त्या काढायच्या तर मनालाही, पर्यायाने विचारांनाही इस्त्री करायलाच हवी. तुम्ही विचाराल हे कसं करणार ? अहो सोप्पं नाहीच ते. मनातले विचार सकारात्मक करणे फार अवघड आहे. त्याला तसाच कडक स्टार्च केला तर या धकाधकीत आपण सुरक्षित राहू. आता स्टार्च म्हणजे आपले विचार बदलायचे.

आपलं मन हट्टी असतं हे सगळ्यांना माहीत आहे. जी गोष्ट करायची नाही असं ठरवलं तरी तीच गोष्ट करण्याकडे मन धावत राहतं. जे विचार मनात आणायचे नाहीत असं आपण ठरवतो नेमके तेच विचार आपला पिच्छा पुरवतात. ज्याचं मन संयमी असतं त्याला ते सहज जमतं. पण सर्व सामान्य माणूस त्याच्या आहारी जातो. अशा वेळेस त्याने स्वत्वाचा विचार करावा. मग त्यांने अध्यात्म, योगशास्त्र, मनो:ध्यान याचा आधार घ्यायला हवा. मन:शांतीने विचारात ठामपणा येतो. मन एकाग्र करता येते. एखादी श्रध्दा कामी येते. सांगोपांग विचार करून आपण आपलं वागणं बदलू शकतो. भीती, असुरक्षितता, निराधार असल्याची भावना निग्रहाने दूर करू शकतो. या सगळ्या क्रिया म्हणजेच आपल्या विचारांना केलेला ” स्टार्च ” !.

या स्टार्चने आपले विचार स्पष्ट, साफ, सकारात्मकतेने भरलेले होतात. आणि असं झाल्यावर कुठल्याच विचारांनी भ्यायचे कारणच उरत नाही ना.

मग काय, करणार ना तुम्ही ही स्टार्च तुमच्या विचारांना ?

            नका बाळगू भीती कशाची

            नकोच थारा उगा वेदनांना

            एकच मंत्र मनात जागवा

            स्टार्च हवा फक्त विचारांना…

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रं ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

 

?? विविधा ??

⭐ रं ग ! ⭐  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“रंग ओला आहे !”

असं स्वतःचा रंग कोरडाठाक असलेली पाटी, कुठल्या तरी भिंतीवर, दुसऱ्या कुणीतरी तिला लावलेला गळफास घेत,  मूकपणे ओरडून ज्या वस्तूकडे अंगुलीदर्शन करत असते, त्या वस्तूला, तिथून येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांपैकी नव्वद टक्के लोकं बोटं लावून, खोटं ठरवायचा का प्रयत्न करतात, हा एक संशोधनाचा विषय नक्कीच होईल ! हुश्श !!!!

वरील पल्लेदार (का रंगतदार ?) वाक्य मराठीत असलं तरी, आपण त्याचा अर्थ नीट कळण्यासाठी परत एकदा वाचावं, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे ! आणि आपण जर वरील वाक्य एका दमात वाचलं असेल तर, आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडाला असण्याची शक्यता आहे ! म्हणजे आता मजा बघा कशी आहे, एखाद्याची चोरी पकडल्यावरच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, असंच काही नाही ! या माझ्या विधानाशी आपण अ-सहमत होऊन उगाच रंगाचा बेरंग करणार नाही, असं मी माझ्या चेहऱ्यावरचा रंग न उडवता म्हणतोय !  आता, तो खरंच उडालाय का नाही याची सत्यता, असत्यता आपणास करायची असेल तर (स्व खर्चाने) सध्या मी रहात असलेल्या सिंगापूरी येऊनच करावी लागेल, त्याला माझा नाईलाज आहे ! आता सिंगापूरचा विषय निघालाच आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो, जसे आपण आपल्या बंगलोरला (का बेंगलूरू ?) “गार्डन सिटी” म्हणतो, तसंच इथले लोकं सिंगापूरला “सिटी ईन द गार्डन” असं अभिमानाने म्हणतात ! या सार्थ नावांतच, किती अर्थ आणि हिरवाई भरलेली आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे !

सांगायचा मुद्दा काय, तर रंगांच आकर्षण, सांनां पासून थोरां पर्यंत सगळ्यांनाच असतं.  ढोबळ मानाने जगनमान्य असलेल्या सप्त रंगांपैकी, या नां त्या कारणाने प्रत्येकाचा एखादा रंग जास्त आवडता, जवळचा असतो किंवा फार फार तर त्याच्या खालोखाल आवडणारा दुसरा एखादा रंग पण असू शकतो !

दर वर्ष सहा महिन्यांनी (स्वतःच्या) बायको बरोबर  साडी खरेदीला जाण्याचा योग, माझी रंगांची चॉईस चांगली असल्यामुळे येतो ! असंच एकदा शहाड्यांच्या का आठवल्यांच्या दुकानात, नक्की आठवत नाही, साडी खरेदीला गेलो असतांना (माझ्या सारख्या रिटायर्ड माणसाच्या बायकोच्या साडी खरेदीची उडी, याच दुकानाशी संपते !  “रूप संगम” “पानेरी” “पल्लरी” वगैरे डिझायनर साड्या विकणाऱ्या दुकानात आम्ही बाहेरूनच विंडो शॉपिंग करण्यात धन्यता मानतो !) सौ ने तिथल्या सेल्समनकडे “लहरी रंगाच्या साडया आहेत का ?” अशी विचारणा केली. तिचा तो प्रश्न ऐकून माझ्या चेहऱ्यावरचा रंग थोडासा उडाला, पण त्या सेल्समनने स्वतःच्या चेहऱ्याचा रंग न बदलता अगदी हसत हसत “आहेत ना, कालच नवीन स्टॉक आलाय !” अशी लोणकढी मारून आमच्या समोर त्या लहरी रंगांच्या साड्यांचा ढीग ठेवला, आता बोला ! त्या सेल्समनचे ते वागणे बघून माझ्या चेहऱ्याचा रंग आणखी उतरला ! कारण त्या वेळे पर्यंत लोकांच्या फक्त लहरी स्वभावाच्या रंग दर्शनाचा अनुभवच फक्त माझ्या गाठीला होता ! असो !

एखादा रंग दुसऱ्यावर खुलून दिसतो म्हणून, आपल्या रंग रूपाचा विचार न करता, त्याच रंगाचा शर्ट किंवा साडी नेसून स्वतःच हस करून घेण्यात काय हशील ! पण म्हणतात ना, पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना, हेच खरं ! आणि किती झालं तरी आपले दुसरे कुठले अंगभूत रंग उधळून, लोकांना त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या आवडीचे रंग परिधान करणे, हे केव्हाही सगळ्यांच्या दृष्टीने श्रेयस्करच, नाही का ?

सामान्यपणे सात रंगात जरी जगातल्या रंगांची वर्गवारी झाली असली, तरी काही नव नवीन रंगांचा शोध स्वतःला रंगारी म्हणवणारे लोकं, नित्य नेमाने लावत असतात ! हे रंगारी एवढ्यावरच न थांबता,  त्याला स्वतःच्या बुद्धिमत्ते प्रमाणे नांव देवून (का ठेवून?) मोकळे पण होतात ! जसं, आपल्या स्वतःच्या उपवर मुलीचे स्थळ सुचवतांना, मुलीचे आई वडील, तिचे वर्णन “नाकी डोळी निट्स, रंग – निमगोरा किंवा गव्हाळ किंवा सावळी” असा करतात. आता निमगोरा किंवा गव्हाळ असे रंग (ऑफिशियली) अस्तित्वात आहेत का नाही, हे मला खरंच ठाऊक नाही ! पण या दोन रंगांची उत्पती त्यांच्या नावासकट अशाच कुठल्या तरी उपवर मुलीच्या मातेकडून किंवा पित्याकडून फार वर्षां पूर्वीच झाली असण्याची दाट शक्यता आहे ! आता आपल्या सारखी चाणाक्ष माणसं, अशा तऱ्हेच्या रंगांच्या वर्णनातली मेख बरोब्बर ओळखतात, हे मी काय वेगळे सांगायला का हवे !

काही काही रंगांचा वापर हा साऱ्या दुनियेत ठराविक कारणासाठीच केला जातो, हे आपल्याला ठाऊक आहेच !

उदाहरणार्थ, लाल रंग धोक्याची सूचना देण्यासाठी किंवा हिरवा रंग धोका (तात्पुरता) नाही आहे हे कळण्यासाठी ! तसंच पांढरा रंग हा शरणगताचा मानला जातो ! काळा रंग काही जणांचा आवडता असला, तरी सर्व सामान्यपणे तो अशुभ मानतात ! हे रंगांचे ठोकताळे कोणा रंगाऱ्याच्या डोक्यातून आले, हा सुद्धा दुसरा  संशोधनाचा विषय होऊ शकतो !

पूर्वी माझ्या पिढीत, प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी मंडळी नेहमी गुलाबी रंगाचा वापर करीत असत ! पण हल्ली या गुलाबी रंगाची जागा, लाल रंगाच्या गुलाबाने सुद्धा घेतल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेने ताडले आहे !  बहुदा सांप्रतकाळी, अशा प्रेमात पुढे मिळणाऱ्या/होणाऱ्या धोक्याची जाणीव आधीच झाल्यामुळे, हा रंग बदल झाला असावा, अशी मी माझ्या मनाची सध्या तरी समजूत करून घेतली आहे  ! आजकाल प्रेमाच्या रंगात आकंठ रंगलेली प्रेमी मंडळीच ही माझी समजूत खरी का खोटी, यावर जास्त प्रकाश टाकू शकतील !

रोजच्या आयुष्यात वेग वेगळ्या रंगांचे किती महत्व आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही ! पण आपल्या रोजच्या जीवनातील एक साध उदाहरण द्यायच झालं तर, पूर्वी असलेला कृष्ण धवल दूरदर्शन संच आता कधीच कालबाह्य होऊन त्याची जागा, रंगीत दूरदर्शन संचाने नुसतीच घेतली नाही, तर त्याने आपल्या मनाचा पण पूर्ण ताबा घेवून, इथे ठाण मांडल्याचे आपण सध्या अनुभवत आहोतच ! फक्त त्याच्या आकारमांनात (खिशाला परवडण्याच्या प्रमाणात, आपल्या हॉलची साईज लक्षात न घेता ) बदल झाला आहे इतकंच !

“रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा” असं, या गीताचा आधार घेवून कोणी म्हणत असेल तर म्हणू दे ! त्यांना त्यांचा रंग लखलाभ ! पण आपण मला विचाराल, तर साऱ्या दुनियेचा रंगारी, जो हातात अदृश्य कुंचला घेवून वर बसला आहे त्याला आपण कदापि विसरून चालणार नाही ! त्याच्या मनांत येते तेव्हाच तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याला हवे तेच रंग, नित्यानेमाने भरत असतो आणि काढून घेत असतो ! एखादा रंग आपल्याला जास्त आवडतो म्हणून त्याने तो सतत आपल्याला द्यावा, असं आपल्या मनांत कितीही असलं  तरी, तो रंग कधी आणि किती  द्यायचा हे त्याचा तो अदृश्य कुंचलाच ठरवतो ! आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की आपल्या हातात फक्त आपल्या घराचा रंग जुना झाल्यावर तो बदलायचा, एव्हढेच असते ! आणि त्या वरच्या रंगाऱ्याने त्याच्या मर्जी नुसार आपल्या आयुष्यात बहाल केलेल्या रंगातच कायम समाधान मानायचं असते !

शेवटी, फक्त प्रार्थना करणेच माझ्या हातात असल्यामुळे, आपल्या सगळ्यांवरच, आपापल्या आवडणाऱ्या रंगांची कायम उधळण कर, हीच माझी त्या वरच्या रंगाऱ्याला हात जोडून विनंती !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१५-०८-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोपरा … ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ विविधा ☆ कोपरा … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

कोपरा ..प्रत्येकाच्या घरातला ,अंगणातला ,समाजातला मंदिरातला  आणि देशातलासुद्धा ! प्रत्येक कोपऱ्याला त्याचं त्याचं  स्वतःचं असं एक स्थान अन कामही असतं .बघा , घराच्या एका कोपऱ्यात चूल असायची अन तिथं जळणासाठीचा कोपरा असायचा ,कोपऱ्यातील जळण संपलं की मग तो स्वच्छ झाडायचा अन मग दुसरा भारा तिथं रचायचा! बरेचदा घरधणीन या कोपऱ्यात भिशी पुरून ठेवायची व पै पै टाकत रहायची कारण हा कोपरा फक्त तिचाच असायचा तिथं सहजासहजी कुणी जात नसे .

पूर्वीच्या काळी म्हणजे फार नाही वीसेक वर्षांपूर्वीपर्यन्त घराच्या एका कोपऱ्यात मडक्यांची उतरंड असायची ,सर्वात मोठं मडकं खाली टेकू देऊन ठेवायचं मग त्यापेक्षा लहान लहान असं करत उतरंड रचलेली असायची . या  मडक्यात राखेत ठेवलेला बी बेवळा  ,बिबा , हळकुंड अन  असच किडुक मिडुक काही बाही ठेवलेलं असायचं ,जेव्हा नड असेल तेव्हा त्या वस्तू उतरंडीतून हळूच काढायच्या  कधी मधी मधल्या अधल्या लोटक्यात चिल्लर साठायची -पाच ,दहा ,पंचवीस ,पन्नास पैशांची !

शेतकऱ्याच्या घरात एक कोपरा असायचा अवजारांचा … जिथं कुदळ ,खोरं ,पाटी ,जनावरांची दावी ,बैलांच्या घुंगुरमाळा अन असंच काहीसं …बाजूच्या कोपऱ्यात जातं, अन उखळ मुसळ अन सूप.

एक कोपरा देवाचा  ..जिकडं जास्त वर्दळ नसेल अश्या ठिकाणी देवाचा कोपरा असायचा. फक्त घरातील देवपूजा करणारी जेष्ठ अन म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांचा तिकडं वावर असायचा .एकूण काय तर कोपऱ्यातल्या वस्तूंचं काम झालं की कोपऱ्यातच विश्रांती घेत. कितीही महत्त्वाच्या असल्या तरी घरातल्या मध्यभागी त्यांना स्थान नसते .

आधुनिक घरातले कोपरे आता शो पिस चे किंवा तत्सम वस्तूंचे असतात किंवा वास्तुशास्त्रां प्रमाणे विशिष्ट वस्तूंसाठीच म्हणजे अमुक कोपऱ्यात कमळ ठेवा तमुक कोपऱ्यात लाल दिवा लावा अश्या पद्धतीने !

मंदिराच्या कोपऱ्यात असतात खणा -नारळांचे ढीग ,हार तुऱ्यांचे ढीग आशाळभूत पणे कुणीतरी उचलून योग्य ठिकाणी ठेवण्याच्या प्रतीक्षेत !

अंगणाच्या कोपऱ्यात पूर्वी असायचे रहाट अन आड ,तुळस , न्हाणी अन कपडे -भांडी धुण्याची जागा. आता अंगणच आकसले त्यामुळे आड मुजला अन तुळस शोपिस  झाली !

समाजाचेही असे विविध कोपरे असतात …महत्वाच्या व्यक्ती ,देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या किंवा खूप काही करून साधे जीवन जगणाऱ्या समूहाचे कोपरे, दुर्लक्षित लोकजीवनाचे कोपरे , प्रवाहात नसणाऱ्या समूहाचे कोपरे ..हे लोक तिथेच जन्मतात ,वाढतात अन मरतातही ! ते मध्यभागी कधीच येत नाहीत विशिष्ट  कोपऱ्यातून !

देशाच्या कानाकोपऱ्याचेही असेच असते कुठल्या कोपऱ्यात काय काय  घडत असते पण सगळेच उजेडात  येत नसते प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी लपून राहतेच !

आपल्या मनाच्या कोपऱ्याचेही असेच आहे ना ? बघा, प्रत्येक कोपऱ्यात काही न काही नक्कीच असते ,छान छान आठवणी ,मनावर अधीराज्य करणारी माणसे ,काही दबलेली स्वप्ने ,काही पुसट झालेल्या आठवणी ,काही अपुरी स्वप्ने , राग ,द्वेष ,असूया ,भूतकाळ ,भविष्यकाळ ,सुविचार ,कुविचार ,देव अन सैतानसुद्धा !

ज्या कोपऱ्याचे प्राबल्य अधिक तो कोपरा मनावर ,शरीरावर ,जीवनावर अधिराज्य घडवतो ;म्हणजे असं ,सैतानाचा कोपरा प्रबळ असेल तर माणूस सैतानासारखा वागतो, कुविचारांचा असेल तर मनात नेहमी दुसऱ्यांच वाईटच येणार ,सुविचारांचं प्राबल्य अधिक असेल तर माणसाचे आचार विचार शुद्ध होणार अन देवाचं प्राबल्य अधिक असेल तर माणूस देवगुणी होतो .

ज्याच्या मनाचे कोपरे लखलखीत तो माणूस सदा उत्साही ,आनंदी आणि आशावादी असतो .

प्रत्येकानेच मनातली  द्वेष ,अहंकार ,असूयेचीअडगळ काढून ,चिंतेच्या जाळ्या झाडून तिथे चांगुलपणाचे दिवे लावले तर मन लक्ख उजळून मंदिर होईल ,अन जीवन उजळून जाऊन माणुसकीचे दिवे प्रत्येक कोपऱ्यात लागतील …

(लेख आवडला तर नावासह नक्की शेअर करा)

© सौ.सुचित्रा पवार

१९ मे २०१९

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(लोकनेते राजारामबापू जन्मशताब्दी निमित्त मराठी वि न परिषद इस्लामपूर यांच्यातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

१) उत्तर हिमालयीन नद्यांचा जोड  .

गंगा यमुना मेघना यांचे प्रवाह पश्चिमेकडे वळवून कालवा व जलाशय बांधावेत अशी कल्पना आहे .ब्रह्मपुत्रेचे तर आपण फक्त 25 टक्केच पाणी वापरतो. बरेचसे पाणी वाया जाते .नदी प्रवाह वळविला तर पूर नियंत्रणाबरोबर वीज निर्मिती व सिंचनवाढ होईलच .त्याच बरोबर त्याचा फायदा नेपाळ आणि बांगलादेशलाही होईल. हिमालयीन घटकांसाठी 14 अंतर दुवे योजिले आहेत .

घागरा –यमुना /सारडा- यमुना / यमुना –राजस्थान/ राजस्थान –साबरमती / कोसी– घागरा –कोसीमेची / मानस –संकोष / टिस्टा– गंगा / जोगिगोपा– टिस्टा –फरक्का / गंगा –दामोदर– सुवर्णरेखा /  सुबरनरेखा– महानदी / फरक्का –सुंदरबन/  गंडक –गंगा / सोनमधरण– गंगा जोडव्याच्या दक्षिण उपनद्या—– या योजनेपैकी बरेचसे अभ्यास पूर्ण झाले आहेत.

२) द्विपकल्प घटक.

या घटकाचे पुन्हा उपभाग केले आहेत.

अ) पहिल्या टप्प्यात गोदावरी– महानदी —कृष्णा आणि कावेरी कालव्याद्वारे जोडल्या जातील .या नद्यांच्या काठावर धरणे बांधून त्याचा उपयोग दक्षिण भागासाठी केला जाईल.

ब)  दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या उत्तर आणि तापीच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडील काही नद्या जोडल्या जातील. याचा उपयोग मुंबईला आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात सिंचनासाठी होईल.

स) तिसऱ्या टप्प्यामध्ये  केन आणि चंबळ जोड ,हा मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागासाठी उपयुक्त ठरेल.

द) चौथा टप्पा हा पश्चिम घाटातील अनेक पश्चिमवाहिनी नद्यांना, कावेरी आणि या पूर्व वाहिनी नद्याना सिंचनासाठी जोडल्या जातील .द्वीप घटकांच्या अंतर्गत आणखीही जोड विचाराधीन आहेत.

3) इन्ट्रास्टेट  घटक.

महानदी — गोदावरी हा 800 किलोमीटर लांबीचा प्रकल्प तिस्ता –महानंदा –सुवर्णरेखा नद्यांमधून भूतान कडून आंध्र मधील गोदावरी पर्यंत उद्भवणाऱ्या  संकोषा नदीला जोडेल .अलमट्टी–  पेन्नर– नागार्जुनसागर — सोमासिला जोडाचा खर्च कमी होण्यासाठी वेलीगोंडा बोगद्याने श्रीशैल्यम ते सोमासिला जलाशयात रूपांतर केले. पांबा — अंजकोविल , पार– तापी — नर्मदा– परबती –काळी, सिंध –चंबळ, पोलावरम– विजयवाडा, श्रीशैल्यम– पेन्नर हे वापरात आहेत .दमणगंगा —पिंजल ,कट्टलई– वैगाई– गंदर, केन –बेतवा ,नेत्रावती–

हेमावती ,बेटी –वरदा वगैरे जोड प्रकल्पांपैकी ,काहींचे अभ्यास पूर्ण झाले आहेत. पेन्नयार– शारंगपाणी हा इन्ट्रास्टेट नसला तरी बिहारने सहा, महाराष्ट्राने 20, गुजरात, ओरिसा, तामिळनाडू, झारखंड यांनीही जोडणी प्रकल्प प्रस्तावित केले आहेत.   बियास– सतलज तसेच पेरियार — वायगई जोड पूर्ण झाले आहेत.

अशा या महाकाय प्रचंड खर्चाच्या, पण खूप मोठ्या फायद्याच्या प्रकल्पां बद्दल अनेक टीकाकारांनी शंका व्यक्त केल्या . पूर नियंत्रणासाठी दुसरे पर्याय वापरावेत. पर्यावरणाला धोका पोहोचेल .काही भागातील जमिनीची क्षारता वाढेल. अनेक कुटुंबे विस्थापित होतील . जैवविविधतेवर परिणाम होईल. नदी शंभर वर्षांनी पात्र बदलते, मग याचा काय उपयोग ? प्रस्ताव खूप महाग आहे .त्यामुळे आरोग्य, शिक्षण ,रस्ते या क्षेत्राकडे निधी कमी होईल.

जागतिक स्तराचा विचार करता असे प्रकल्प  किती फायदेशीर झाले आहेत याची अनेक उदाहरणे  सांगता येतील. डँन्यूब कॅनॉल, उत्तर समुद्र आणि अटलांटिक महासागर– काळा समुद्र जोड, जगातील सर्वात मोठा  जिन्शा नदीपासून सहाशे किलोमीटर लांबीचा, 63 बोगद्यांसह , युनान प्रांतातला प्रकल्प,  यांगत्से –येलो जोड , स्पेन मधील  चार नद्यांची खोरी  जोड, मरे –डार्लिंग जोड ,अमेरिकेतील इलिमाँय नद्या, तलाव, आणि मिसिसिपी नदीमार्गे मेक्सिको पर्यंत 540 किलोमीटर लांब, टेनेसी –टाँबी ७३७७कि.मी. जलमार्ग , गल्फ  इंस्ट्राकोस्टल — फ्लोरिडा ते टेक्सास १७००कि.मि.चा जलमार्ग हे सर्व प्रकल्प फायदेशिर व यशस्वी झाले आहेत.नदीजोड प्रकल्प राज्यांतर्गत राबविण्याचे धोरण राज्य सरकारने यापूर्वीच स्वीकारून शिक्कामोर्तब झाले आहे .1979 पर्यंत भारताने 600 हून अधिक धरणे बांधली आहेत. उल्हास, वैतरणा ,नारपार ,दमणगंगा, खोऱ्यातील 360 अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी गोदावरी कडे वळवून ,मुंबई कोकण आणि दुष्काळी  मराठवाड्याकडे त्याचा फायदा दिला जाणार आहे.

पन्नास वर्षापूर्वी राजारामबापूंच्या कारकिर्दीत ते कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या दुष्काळी भागांसाठी खुजगाव धरणासाठी आग्रही होते. त्यावेळी शिराळा ,वाळवा तालुक्यात पाण्याचे साठे होते. त्यावर राजकारण झाले आणि ते न झाल्यामुळे राज्याचे नुकसान झाले. तेव्हा त्यांचा आग्रह मानला असता तर, त्या भागाचा पन्नास वर्षापूर्वीच विकास झाला असता. अटल बिहारी वाजपेयी, विश्वेश्वरय्या ,करुणानिधी यांनीही देशातील अनेक समस्यांवर” नदी जोड प्रकल्प “हाच उपाय असल्याचे सांगितले.

गेल्या आठ-पंधरा दिवसातील देशातील चित्र पाहिले तर अर्धा देश ,अर्धा महाराष्ट्र पुराने  व्यापला गेला. कृष्णेच्या खोऱ्यातील 12 धरणे कोल्हापूर ,सातारा ,आणि सांगली जिल्ह्यात येतात. पुरामध्ये तिन्ही जिल्ह्यांचे अपरिमित नुकसान झाले. जमिनी ,माणसे, जनावरे ,घरे पुरात वाहून गेली. याउलट काही भाग पावसाच्या प्रतीक्षेत राहिला . माणगंगेचे  पात्र कोरडे राहिले अशावेळी ‘नदीजोड प्रकल्पाची’ महती आणि गरज आपल्या लक्षात येते.

जागतिक स्तरावरील यशस्वी आणि फायदेशीर उदाहरणांचा विचार करता ,आपण त्यांचे अनुकरण ,त्यांचे तंत्रज्ञान स्वीकारायला काय हरकत आहे? हा  एक महाकाय आणि प्रचंड खर्चिक प्रकल्प आहे ,हे मान्य आहे .पण त्यासाठी केवळ ही सरकारची जबाबदारी नसून, राष्ट्र विकास डोळ्यासमोर ठेवून, प्रत्येक नागरिकानी, उद्योगपतीनी काही अंशी वाटा उचलायला काय हरकत आहे ? गंगा —कावेरीचे स्वप्न साकार झाले तर भारत याच शतकात महासत्ता होईल अशी अपेक्षा करूया——–

गंगा ,यमुना ,पद्मा ,मेघना.

कृष्णा, कोयना आणि वेण्णा.

घागरा ,तिस्ता, चंबळ, गोदा.

तापी ,माही आणि नर्मदा.

 

जेव्हा जुळतील साऱ्या भगिनी,

संपन्न होईल भारत भूमी.

सार्ऱ्यांच्या त्या होतील जननी.

सुजलाम  सुफलाम या नंदनवनी.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(लोकनेते राजारामबापू जन्मशताब्दी निमित्त मराठी वि न परिषद इस्लामपूर यांच्यातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

  गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती ।

नर्मदे,सिंधू, कावेरी जलेस्मीन संनिधिं कुरू।।

दररोज देवाची पूजा करीत असताना देवाजवळच्या तीर्थाच्या कलशात आपण सर्व नद्यांना आवाहन करतो. त्यांना त्या कलशामध्ये पाहतो. यावरूनच समजत, नद्यांना महत्व किती आहे ते. देशातील लहानमोठी प्रत्येक नदी आपली जीवनदायिनी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये नद्यांनाही देवत्व दिलं आहे. त्यांना आपण माता, मैय्या, माई असंही म्हणतो. गंगा ही तर सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक, पौराणिक, भावनिकदृष्ट्या ही तिचं महत्त्व खूप आहे, की माणसाला शेवटच्या क्षणी गंगाजल तोंडात घालतात. पवित्र जल देशाच्या दक्षिणेपर्यंत पोचल तर,  त्या तिर्था साठी, काशी हरिद्वारला जाण्याची गरज नाही. आज तंत्रज्ञानाच्या युगात तेही शक्य आहे. आणि त्यासाठी उपाय “नदी जोड प्रकल्प.”

भौगोलिकदृष्ट्या भारत हा एक खंडप्राय देश आहे. येथील भिन्नभिन्न ठिकाणी हवा, पाणी, लोकसंख्या, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. देशाचा 35 टक्के भाग दुष्काळी, 33 टक्के भाग गंभीर दुष्काळ प्रवण आणि उत्तरेकडील भाग संपन्न असल्याचे दिसून येते. एकूणच विकासाचा सारासार विचार करता हे सगळं ‘पाणी’ या एका निकषावर अवलंबून आहे. व्यावहारिकदृष्ट्या देशातील जास्तीत जास्त भाग समपातळीवर, समान विकास यावा यासाठी सर्वोत्तम उपाय “नदी जोड प्रकल्प.”

भारताच्या लोकसंख्येत दर वर्षी 15 दशलक्ष संख्येने वाढ होते. अन्नधान्याची मागणी वाढते. पाण्याचे दुर्भिक्ष वाढते. भूजल पातळी खाली जाते. ऊर्जेची मागणी वाढते. दक्षिणेकडील राज्यात बऱ्याच भागात लहरी पावसामुळे पिके अपयशी होतात. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी जलसंपत्ती व्यवस्थापन व ‘नदीजोड’ हा आश्वासक आणि खात्रीचा उपाय आहे .आणि ती या काळाची गरज आहे.

ऐतिहासिक विचार करता, एकोणिसाव्या शतकात इंग्रज इंजिनियर ऑर्थर कॉटन यांनी दक्षिण पूर्व भागातील दुष्काळ कमी व्हावा व तिकडून आयात निर्यात करण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. 1970च्या दशकात के एल राव यांनी “राष्ट्रीय जलग्रीड” प्रस्ताव मांडला. २०13 पर्यंत अनेक प्रस्ताव होऊनही सर्व थंडच राहिले. 1999 नंतर सुरेश प्रभुंनी त्याचा अभ्यास केला. आणि’ ‘नदी जोड’ विचारांचे पुनर्जीवन झाले.

“नदीजोड प्रकल्प” हा नागरी अभियांत्रिकी प्रकल्प आहे. पूरप्रवण क्षेत्रातील जास्तीचे पाणी जलाशयात साठवून, ते दुष्काळी भागातील नद्यांतून सोडावे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. देशातील 37 नद्या या ठिकाणी जोडणे, 3000 जलाशय आणि चौदाशे 90 किलोमीटर लांबीचे कालवे काढावे लागतील. त्यामुळे प्रचंड प्रमाणावरील जमीन ओलिताखाली येईल. मोठ्या प्रमाणावर (४०००मे.वँ.) इतकी वीज निर्मिती होईल. उत्तरेकडील पुराचे दुष्परिणाम सोडवून, दक्षिणेकडील पाणीटंचाई दूर होऊन, हरितक्रांती होईल. वनीकरण वाढेल. पर्यावरण संतुलन होईल. रोजगार वाढेल. स्वस्त असणारी जलवाहतूक वाढेल. सर्वत्र सुजलाम-सुफलाम होईल.                    

नदीजोड प्रकल्पचा विचार करता, त्याचे तीन भाग केले आहेत.

१) उत्तर हिमालयीन चौदा नद्यांचा जोड.

२) दक्षिण द्वीपकल्प नद्यांचा जोड.

३) इंट्रा-स्टेट सदतीस नद्यांचा जोड.

अशा आराखड्याचे व्यवस्थापन जलसंपदा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय जलविकास (N. W. D. A.). संस्थेद्वारे केले जात आहे.

क्रमशः …….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares