आज एक मुलगी रेल्वे स्टेशनला ५ रु. मीटरने ताजेतवाने तोरण विकत होती.
बाजूचे सगळे २०/३०रु. ला विकत होते.
मी तिला विचारलं, “सगळे २०/३० रुपयांनी विकत आहेत. तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे, म्हणून पाच रुपयांनी विकतेस का?”
ती थोडं थांबली व मला म्हणाली,
“दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुलं. बाप नाही. आई निघून गेली. आजी सांभाळते मला.
सकाळी १००/- रुपये दिले आजीने. डाळ तांदूळ आणायला. विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं.
म्हणून ट्रेन पकडून इकडे आले दुपारी ३ वाजता. फुलं, दोरा, सुई विकत घेतली. ८०/- रुपये खर्च झाले.
पहिले मी पण वीस रुपयांना विकले.
आजीने दिलेल्या १००/- रुपयांचे ३००/- रुपये केले. आता उरलेली पाच तोरणं विकली गेली, तर ठीक! नाहीतर, घराला बांधीन! पहिली कमाई म्हणून. “
मी शांतपणे खिशात हात घातला. १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हटलं, ” पोरी हे पैसे ठेव, मला तोरण नको. माझ्याकडून तुला तुझ्या मेहनतीचं गिफ्ट. घरी जा. ह्यातील एक तोरण तू दरवाजाला लाव. आणि हो. हे घे अजून ५० रुपये. जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा. “
कालच बायको म्हणत होती,
“देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू. “
आज तिची इच्छा पूर्ण झाली.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ फजान…. लेखक – डॉ. शिरीष भावे ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरचे माहितीपूर्ण लघुपट पाहणे हा माझा फावल्या वेळातला आवडता छंद. असाच एक लघुपट, थायलंडमधल्या हत्तींच्या प्रशिक्षण केंद्रावर आधारित, मी पाहत होतो. जंगली हत्तींना माणसाळावून त्यांचा वापर करणे ही एक अमानुष प्रक्रिया आहे. पर्यटकांना जंगलातून पाठीवर बसवून फिरवणे अथवा लाकडी ओंडक्यांसारख्या जड वस्तू वाहून नेणे अशा गोष्टींसाठी हत्तींचा वापर केला जातो. महाकाय आणि शक्तिशाली असलेलं हे जनावर सहजासहजी माणसाळत नाही. फासे टाकणे, खड्डा खोदून त्यात सापळा लावून त्यांना पकडणे अशा मार्गांनी त्यांना आधी बंदिस्त करावं लागतं आणि त्यानंतर सुरु होते त्यांच्यावर हुकमत गाजवण्यासाठी, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी केली जाणारी अघोरी प्रक्रिया. पकडलेल्या हत्तीला साखळदंडाने बांधून एका छोट्या लाकडी पिंजऱ्यामध्ये कोंडलं जातं. त्यानंतर उपाशी ठेवणे, भाल्यांनी टोचणे, झोपू न देणे अशा मार्गांनी त्याचा अनन्वित छळ केला जातो. इंग्रजीमध्ये याला “ब्रेकिंग द स्पिरिट ऑफ द एलिफंट” म्हणजे हत्तीची आंतरिक उर्मी आणि जिजिविषा नष्ट करणे असं म्हणतात. या सर्व क्रूर प्रक्रियेला ‘ फजान ‘ असं म्हणतात.
मी पहात असलेल्या लघुपटामध्ये त्या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख कार्यक्रमाच्या निवेदकाला माहिती देत होता. एके ठिकाणी एक प्रचंड मोठा, लांबलचक सुळे असलेला हत्ती उभा होता. निवेदकाच्या लक्षात आलं की त्याच्या पायात एक जाडजूड साखळदंड बांधलेला आहे पण तो दुसऱ्या बाजूला कुठेच बांधलेला नसूनही तो हत्ती इंचभरही जागचा हालत नाहीये. त्यानी ,”हे कसं” असं आश्चर्याने विचारलं तेव्हा केंद्रप्रमुख म्हणाला,” ती साखळी फक्त त्याच्या पायात अडकवलेली पुरेशी असते. ती दुसरीकडे बांधायची गरज नसते. ती साखळी त्याच्या पायात आहे याची नुसती जाणीव त्याला असली की तो जागच्या जागी उभा राहतो!”
लघुपट संपला आणि मी अंतर्मुख झालो. ही अशीच साखळी आपल्या विस्तृत, खंडप्राय देशाच्या पायात अडकवून इंग्रज निघून गेले. 1947 साली त्यांनी ती दुसऱ्या बाजूने सोडली तरी अजूनही आपल्या मनात ती काल्पनिक शृंखला बांधलेलीच आहे. 1835 साली लॉर्ड मेकॉलेने अतिशय धूर्तपणे या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. इंग्रजी भाषेला सर्वोच्च दर्जा दिला गेला. स्थानिक भाषांचं महत्त्व पद्धतशीरपणे छाटलं गेलं. इंग्रजी भाषेचा साखळदंड आपण अजूनही पायात दिमाखात मिरवतो. आपल्या समृद्ध स्थानिक भाषांमध्ये व्यवहार करणं आपण कमीपणाचं समजतो. भाषेबरोबर तिच्याशी निगडित संस्कृती आली आणि झालं आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं आणि क्षमतेचं खच्चीकरण. इंग्रजांनी आपला सामूहिक आत्मविश्वास इतका नष्ट केला की स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षं होऊनही बरेचसे नियम आणि अधिनियम इंग्रज राजवटीमध्ये अंमलात असलेले अजूनही आपण वापरतो. मोटार वाहन अधिनियम इंग्रजांनी 1919 साली बनवला आणि तो स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तसाच राबवला जात होता.
वैयक्तिक जीवनात अशी काल्पनिक साखळी मनात बांधून जगणारे अनेक जण आहेत. राहुलचंच उदाहरण बघा ना.
काही दिवसांपूर्वी अतिशय विष्षण मनोवस्थेमध्ये मला भेटायला आला होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची उत्तम नोकरी होती. परंतु कुठल्यातरी गूढ तणावाखाली असल्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मी विचारलं,” काय रे राहुल, इतका चिंताग्रस्त का तू?” “माझ्या बॉसला मी प्रचंड घाबरतो.आज नोकरी लागून दहा वर्ष झाली तरीसुद्धा तो मला रागवेल, वाईट साईट बोलेल अशी उगीचच भीती सतत मनात असते. खरंतर माझ्यावाचून त्याचं पान हलत नाही; पण मी मात्र निष्कारण तणावाखाली जगतो.”
मी म्हटलं,” पण तू तर त्या ऑफिसमधला एक महत्त्वाचा दुवा आहेस. तुला असं राहण्याचं कारणच काय?”
“मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा पहिल्या सहा महिन्यांमध्ये माझा बॉस माझ्यावर येता जाता उगाचच डाफरत असे. ती दहशत अजूनही माझ्या मनात खोलवर रुजलेली आहे. मी त्यातून बाहेर पडू शकत नाहीये. तो नवीन येणाऱ्या सगळ्यांनाच अशी वागणूक देतो, हे मी पाहिलंय.” “म्हणजे तुझ्या बॉसने तुझं फजान केलं तर.” असं म्हणून मी राहुलला हत्तीची गोष्ट सांगितली. “ती साखळी नाहीच आहे, खरं तुझ्या पायात. तू ज्या क्षणी ती मनाने काढून टाकशील त्या क्षणी एका मुक्त मनाचा जन्म होईल. आत्ताच्या आत्ता, या क्षणी ते तू कर राहुल”.
माझ्या नजरेला नजर देत त्यानी रोखून पाहिलं आणि फक्त ” येस्स्ssss” असं म्हणत तो निघून गेला.
योगायोग असा की त्यानंतर दोन दिवसांनी रूपालीची भेट झाली. तीसुद्धा अशाच कुठल्यातरी दबावाखाली असल्याची चिन्हं मी ओळखली.
“माझं लग्न होऊन मी सासरी आले आणि माझ्या सासूबाईंनी पहिल्या वर्षात माझा पूर्ण ताबा घेतला. मला कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं. साध्या साध्या गोष्टीत त्यांची सतत दादागिरी असे. खरंतर आज लग्नानंतर दहा वर्षांनी मी त्यांच्यावर कुठल्याच दृष्टीने अवलंबून नाही. माझं स्वतःचं करियर आहे, अस्तित्व आहे आणि आर्थिक स्वातंत्र्यही आहे. पण तरीसुद्धा माझ्या मनात भीती असते, त्या मला कशावरून तरी बोलतील. आता खरं तर त्या तशा वागतही नाहीत. पण मी ही मनातली बेडी कशी झुगारून देऊ?”
मी मनात म्हटलं ,”हे अजून एकाचं फजान. “
राहुलला जे सांगितलं तीच गोष्ट मी रुपालीला ऐकवली. “रूपाली सासूबाईंनी फजान केलं तुझं. फेकून दे ती मनातली साखळी.” अचानक साक्षात्कार व्हावा, याप्रमाणे ती दुर्दम्य आत्मविश्वास आणि दृढनिश्चय मनात घेऊन माझ्या समोरून गेली.
काही महिन्यांनी दोघेही भेटले. दोघांचेही पहिलं वाक्य तेच होतं. “काका, फजान संपलं. साखळी आता पायातही नाही आणि मनातही.”
आपल्या देशाच्या पायातीलही ती मायावी शृंखला गळून पडण्याची मी आशेने वाट पाहतोय.
लेखक : डॉ. शिरीष भावे
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भाकरी – – लेखक : डॉ. दीपक रानडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
☆
सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट. आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9. 30 ला सुरुवात केलेली केस, अखेर संध्याकाळी 5. 45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला होता. ह्या कोविड प्रकरणामुळे ऑपरेशन थिएटरच्या मजल्यावर असलेले कॉफी शॉप बंद होते.
सेकंड शिफ्टच्या मावशी आलेल्या दिसल्या. त्यांना बिनधास्त विचारलं- ” मावशी, डब्यात काय आणलंय?”
मावशीनं प्रेमाने उत्तर दिलं- “सर, आज कांद्याची भाजी आणि चटणी भाकर हाय डब्यात. भाज्या लयी महाग झाल्यात. ”
मी तिला “सर्जनस रूममध्ये डबा घेऊन ये, ” म्हणालो. भूक अनावर झाली होती.
तिने एक छोटासा स्टीलचा डबा आणि कागदाची वळकटी तिच्या पिशवीतून काढून माझ्या पुढ्यात दोन्ही मांडले.
त्या कागदाच्या वळकटीत 4 घट्ट रोल केलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या होत्या. स्टीलचा डबा उघडला, तर तिखट तांबड्या रंगाची तेलात परतलेली कांद्याची भाजी आणि एका कोपऱ्यात हिरव्या मिरचीचा ठेचा होता. त्या अन्नावर मी अक्षरशः तुटून पडलो. ती भाजी भाकरी, ठेचा अमृताहूनी गोड लागत होता. बघता बघता दीड भाकरी डीचकली, आणि मावशीने आणलेल्या गार पाण्याचा ग्लास गटागटा प्यायलो. तेव्हा कुठे पोट शांत झाले.
भाकरी!काय ताकद आहे ह्या अन्नात!
भाकरीला न तुपाचे, तेलाचे लाड. बनवताना तिला धपाटे घालुन, डायरेक्ट विस्तवावर भाजणे. कुठे पोळपाटाची शय्या नाही, की लाटण्याचे गोंजरणे नाही की तव्याचे संरक्षण नाही. भाजीचा आगाऊ हट्ट न करणारी, चटणीलासुद्धा तेवढ्याच प्रेमाने कुशीत घेऊन पोट भरणारी ही माऊली. कित्येक चुलींवर ही भाकरीच फक्त पोट भरण्याचे काम करते.
काय सामर्थ्य आहे ह्या भाकरीचे!
कष्ट करणाऱ्या मंडळींचे साधे, कष्टाळू अन्न.
कुठेतरी, रस्त्याच्या कडेला, तान्हे मूल कापडी पाळण्यात बांधून, कित्येक माऊलींच्या ममतेची ही भाकरीच पोशिंदी. ह्या भाकरीच्याच जीवावर, रस्ते, बिल्डिंगस, सोसायट्या, बंगले उभे आहेत. त्या भाकरीच्या प्रत्येक घासात, कष्टाचा सुगंध आणि गोडवा जाणवतो.
ती कांद्याची भाजी म्हणजे भुकेने व्याकुळ झालेल्या जिवाला पर्वणीच.
त्या माउलीला पोटभर आशीर्वाद दिले.
त्या भाकरीमध्ये कष्ट करणाऱ्याचेच पोट भरण्याची क्षमता असते. कष्ट करणाऱ्या हातांनाच त्या भाकरीचा घास तोडण्याची ताकद असते. त्या माउलीला तिचा डबा पुढे करण्याची उदारता त्या भाकरीनेच बहाल केली असावी. त्या भाकरीमध्ये केवळ पोट भरण्याचे सामर्थ्य नसून, कष्ट करणाऱ्या व्यक्तीमध्ये कणखरता, चिकाटी, आत्मबळ आणि सोशिकता निर्माण करण्याचे अद्भुत रसायनदेखील असते. भाकरी केवळ खाद्य पदार्थ नसून, जीवनशैलीचे, संस्कृतीचे प्रतीक आहे.
उगाच जिभेचे फाजील चोचले न करणारी, दंतपंक्तीला भक्कम करणारी, पोट भरण्याची विलक्षण संपन्नता असणारी ही भाकरी म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्णब्रह्म आहे.
मला जेव्हा जेव्हा शक्य होते, तेव्हा तेव्हा मी मावशी- मामांच्या जेवणात घुसखोरी करतोच. त्यांच्या स्वयंपाकामध्ये प्रामाणिक कष्टाची रुचकरता तर असतेच, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चार घास वाटून खाण्याची उदार भावना, प्रेम, हे खरोखर मनाला स्पर्शून जाते आणि ते दोन घास खरेच स्वर्गीय आनंद देऊन जातात. त्यांच्या डब्यातल्या भाकरीची बातच काही और आहे.
खाऊन झाल्यावर डोळ्याच्या कडा ओलावल्या. तो मेला कांदा कितीही शिजवला, तरी डोळ्यात पाणी आणतोच.
☆
लेखक :डॉ दीपक रानडे
प्रस्तुती : अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ आनंदी जीवनासाठी, लिमिटेड होतं तेच बरं होतं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी☆
☆
पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा…..
टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.
दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा-दीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.प्रवासाचा आनंद मिळायचा.
गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.
शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्ह्यायची.
बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची.
अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते.
पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !
“बाबा, तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात?”
“बेटा, काळ खूप बदलला बघ.
तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.
तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोरं दिवसभर बसून ‘कॉम्प्युटर गेम्स’ खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.
तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांच्या डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.
तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड, त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन, ते म्हणतील ते खाऊ घालतात.
तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.
तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला, तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.
मुळात काय की,
तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं
आता
बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यावरील सेमिनर्स अटेंड करावे लागतात.”
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘तटस्थता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का ? मग घडलं तर का घडलं ? आपलं काय चुकलं ? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची, ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे ? ती महत्त्वाची आहे का ? आपल्या मताची गरज आहे का ? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.
आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण? परके कोण ? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का ? किंवा मग जी होती ती आपली होती का ? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं, ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला हवी तशी माणसे वागतच नाहीत, हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझं हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होतं. हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते. त्यामुळे तटस्थता येते.
आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं. हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच, पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलेही ओझं नसतं. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही. पण अलिप्त राहून ती करू शकतो, हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो, त्या गोष्टी किती फोल होत्या, हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण केले जाते.
नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.
☆ याला म्हणतात कृतज्ञता!… लेखक : डॉ. मिलिंद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
आज एक डोळे ओलावणारा आणि कोकणी माणसाला सलाम करावासा वाटणारा प्रसंग घडला…
त्याचे झाले असे…
दुपारी 3 वाजता खारेपाटणहून डॉ. बालन उमेश यांचा मला मेसेज आला ..की तुमचा gpay नंबर बदलला आहे का?
मी या आधुनिक जगाला घाबरून असल्याने पहिला संशय आला की झाली काही तरी गडबड..
आधी balance चेक केला..तो तर ओके होता…मग उमेशजी ना फोन केला…ते म्हणाले अहो 1400 रुपये पाठवायचे होते…
आणि नंतर मी, त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून उडालोच…
आयला! या कलियुगात असले काहीतरी ऐकायला ..पाहायला..अनुभवायला मिळणे म्हणजे सॉलिड धक्काच होता..
मिथिला मनोहर राऊत. गाव बेरले…ही मुलगी डॉ. नितीन शेट्ये सरांकडे 2006 साली टायफॉइडसाठी ऍडमिट होती…ती बरी झाली आणि तिच्या वडिलांची आर्थिक स्थिती काही बरी नव्हती…सरांनी, जे काही 3 हजाराच्या जवळपास बिल होते, त्यात त्यांनी जे काही पैसे दिले ते शांतपणे स्वीकारले आणि त्यांच्या दृष्टीने तो विषय संपला…त्यानंतर आज 2024…..18 वर्षांनी ती मुलगी कमावती झाली….तिचा पहिला पगार झाला आणि तिला तिचे वडील नेहमी जे हळहळून सांगायचे की बायो त्या डॉक्टरांचे 1400 देऊचे हत…त्याची आठवण आली…बेरले खारेपाटण जवळ आहे..
ती मुलगी 1400 रुपये घेऊन तिच्या फॅमिली डॉक्टर म्हणजे बालन सरांकडे गेली आणि तुम्ही हे पैसे सरांना पोचवा म्हणाली…
18 वर्षे….एक कोकणी माणूस राहिलेले देणे, डॉक्टरांचे देणे आठवणीत ठेवतो…पहिल्या पगारातून आठवणीने पोच करतो….हा कोकणी माणूस आहे. प्रामाणिक, सच्चा,मनाचा श्रीमंत आणि जाण ठेवणारा..डॉक्टरने पोरगी बरी केली हा उपकार मानणारा कोकणी माणूस…कृतज्ञ असणारा कोकणी माणूस…
डॉक्टर म्हणजे देव असे आतून मानणारा कोकणी माणूस..आणि ती मुलगी ….खरेतर पुढच्या पिढीतील…पण तीही अस्सल कोकणी निघाली…बापाची रुखरुख लक्षात ठेवणारी..पहिल्या पगारातून 1400 रुपये बाजूला काढणारी…अस्सल कोकणी कन्या..
ती जेव्हा बालन सरांकडे गेली तेव्हा तिने तिचे आजारपण…राहून गेलेले देणे…डॉक्टरांचा मोठेपणा ..बापाची रुखरुख हे सगळे सांगितलेच…पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला…..सर..त्यावेळचे 1400 म्हणजे आत्ताचे किती होतील हो?…उमेश बालन सरांना याचे उत्तर देणे जड गेले…ते म्हणाले आजचे खूप होतील पण तुझी भावना ही त्याचे व्याज भरूनसुद्धा वरती उरेल…
मी शेट्ये सरांना हा किस्सा सांगायला फोन केला तेव्हा तेही अवाक झाले…..त्यांना आठवत नव्हते की असे कोणाचे येणे आहे..असे कोणी नंतर देतो, सांगून गेले आहे…
पण ते आतून हलले…त्यांच्यासाठी
डॉक्टर होण्याचा…पेशंट बरे करण्याचा …पैसे नसतील तर राहू देत किंवा नंतर द्या म्हणण्याच्या प्रवासाचा हा एक कृतार्थ क्षण होता….
आम्ही तिघेही अवाक होतो…..
या लाल मातीत हा प्रामाणिकपणा, कृतज्ञता,जाण,आठवण…..भाव असा रुजलेला आहे…हा खरा सुगंध या मातीला आहे…
इतक्या वर्षांनी पहिला पगार हाती आल्यावर आज ती ज्या भावनेने देणे परत द्यायला गेली…ती भावना खूप मोठी आहे…शेट्ये सर तर म्हणाले, पैसे नकोच पण तिला सलाम करणारे काहीतरी करूया…
हे लिखाण हा त्या मुलीला…तिच्या वडिलांना…त्यांच्या अस्सल कोकणी संस्कारांना….कोकणी वृत्तीला…इथल्या मातीला आणि अजून जिवंत असणाऱ्या माणुसकीला सलाम करण्यासाठी आहे….
लेखक: डॉ.मिलिंद कुलकर्णी
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
भाजीवाली रोजच्यासारखी दुपारी दारात आली आणि तिने ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”
आई आतून नेहमीसारखी ओरडली, “काय आहे भाजी?”
“गवार हाय, तंबाटी, पालक,…. ” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले. “
दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”
“रुपयाची गड्डी, ” – भाजीवाली.
“पन्नास पैशाला दे, चार घेते, ” – आई.
“नाय जमणार, मावशी, ” – भाजीवाली.
“मग राहू दे, ” – आई.
भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन, “- भाजीवाली.
“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते, ” – आई.
“नाय जमणार, ” – भाजीवाली म्हणाली
आणि पुन्हा गेली.
थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून पारखून चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले.
भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवलीस का नाही?”
“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन, मग सैपाक, मग जेवण, “- भाजीवाली.
“थांब जरा. बस इथं. मी आणते. ” म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळे दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.
मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केलीस, पण नंतर, जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिलेस. “
आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…
“व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये. “
कवी :अज्ञात
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ MESPONSIBLE– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
माझ्या आईला अनेक दिवस झोप येत नव्हती. तिला दमल्यासारखं वाटे. ती चिडखोर, चिडचिडी झाली होती.
…आणि एक दिवस अचानक ती बदलली…
त्या दिवशी माझे वडील तिला म्हणाले:
– मी तीन महिन्यांपासून नोकरी शोधत आहे आणि मला नोकरी मिळाली नाही… मी निराश आहे, आज मित्रांसह बिअर घेणार आहे.
माझ्या आईने उत्तर दिले:
-ठीक आहे… बिअरच्या बिलाचे तुम्हीच पाहा आणि रात्री उशीर झाल्यास मित्राकडेच झोपा..
माझा भाऊ तिला म्हणाला:
– आई, मी विद्यापीठात सर्व विषयांमध्ये मागे आहे.. मला माहीत नाही, माझा निकाल कसा असेल..
माझ्या आईने उत्तर दिले:
– ठीक आहे, तू अभ्यास केलास तर नक्कीच पास होशील. आणि जर तू तसे केले नाहीस तर, सेमिस्टरची पुनरावृत्ती करशीलच. पण शिकवणीची फी तुझी तूच द्यायची..
माझी बहीण तिला म्हणाली:
– आई, मी कार ठोकली..
माझ्या आईने उत्तर दिले:
– ठीक आहे बेटा, गॅरेजमध्ये घेऊन जा. आणि पैसे कसे द्यायचे, ते बघ. आणि गाडी दुरुस्त होईपर्यंत बस किंवा रेल्वेने फिर..
तिची सून तिला म्हणाली:
– आई, मी तुमच्याकडे काही महिने राहायला येते आहे.
माझ्या आईने उत्तर दिले:
– ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या पलंगावर सोय बघ आणि स्वतःसाठीचे ब्लँकेट शोध..
आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्ही सर्वजण काळजीत पडलो.
आम्हाला शंका आली, की ती डॉक्टरकडे गेली होती… कदाचित तिला त्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला असेल… त्यानंतर आम्ही आईसोबत बोलण्याचे ठरविले..
पण नंतर… तिने आम्हाला तिच्याभोवती गोळा केले आणि स्पष्ट केले:
प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे, हे समजायला मला बराच काळ लागला. माझी व्यथा, चिंता, माझे नैराश्य, माझे धैर्य, माझा निद्रानाश आणि माझा ताण, तुमच्या समस्या सोडवत नाहीत, तर माझ्या समस्या वाढवतात, हे कळायला मला अनेक वर्षे लागली.
कोणाच्याही कृतीसाठी मी जबाबदार नाही, परंतु मी त्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांसाठी मी जबाबदार आहे.
म्हणून, मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे, की माझे स्वतःचे कर्तव्य आहे की शांत राहणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सोडवायला लावणे..
मी योग, ध्यान, चमत्कार, मानवी विकास, मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचे अभ्यासक्रम घेतले आहेत आणि त्या सर्वांमध्ये मला एक समान धागा आढळला…
मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या, तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे हे आहे. परंतु तुमच्या समस्या सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही मला विचारले, तरच मी तुम्हाला माझा सल्ला देईन आणि तो पाळायचा की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयांचे चांगले किंवा वाईट परिणाम असतील आणि ते तुमचे तुम्हालाच भोगावे लागतील.
म्हणून आतापासून मी तुमच्या जबाबदाऱ्यांचे ग्रहण, तुमच्या अपराधाची पोती, तुमच्या पश्चात्तापाची धुलाई, तुमच्या चुकांची वकिली, तुमच्या विलापांची भिंत, तुमच्या कर्तव्याची निक्षेपी सोडून देत आहे…
आतापासून, मी तुम्हाला स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रौढ घोषित करत आहे.
माझ्या घरी सगळेच अवाक् झाले होते.
त्या दिवसापासून, कुटुंब अधिक चांगले कार्य करू लागले. कारण घरातील प्रत्येकाला माहीत होते की त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे.
आपल्यापैकी काहींसाठी हे कठीण आहे. कारण आपण काळजीवाहू म्हणून मोठे झालो आहोत. आपण इतरांसाठी जबाबदार असतो. आई आणि पत्नी म्हणून आम्ही सर्व गोष्टींपासून दूर राहतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे किंवा संघर्ष करावा, असे आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी आपली इच्छा असते.
परंतु, जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून काढून त्या प्रिय व्यक्तीवर टाकू, तितके चांगले. आपण त्यांना ‘MESPONSIBLE’ होण्यासाठी तयार करू…
प्रत्येकासाठी सर्व काही बनण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही… स्वतःवर जबाबदार्यांचा दबाव आणणे थांबवा…………
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
आमच्या नवरा बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..
ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालेल? अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ” तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.
आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो?” त्यावर घरातले सगळे हसायचे.
आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय, असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..
आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंत:करणाला देऊन गेली. अधूनमधून होतात आमची भांडणे, पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं, म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..
तुम्हाला एक खरं सांगू.. ?
हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी- आजोबा मुके झालेत.
परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.
आणखी एक, घरातलं लहान बाळ रडायला लागलं की आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत. ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं; पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.
नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा, असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…
“जरी या वर्तमानाला
कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या
पिढ्यांशी बोलतो आम्ही”
मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की, “भट साहेब, तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.
बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला तो फक्त बाहेर काढला..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “किस्से कोर्टातले…” – लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆
किस्से कोर्टातले…
“जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान…”
सध्या पितृपंधरवडा चालू आहे. आपल्या पितरांना / पूर्वजांना सद्गती मिळावी असा विश्वास असणारे पक्ष विधी करत असतात.
मात्र दरवर्षी पितृपंधरवडा सुरू झाला की एक जुनी केस आठवते..
आई – वडील गेल्यावर श्राद्ध पक्ष करा किंवा करू नका, पण ते जिवंत असताना तरी त्यांच्याशी नीट वागणे जास्त महत्वाचे आहे हे लक्षात येते.
आमच्याकडे एक केस होती. आई – वडिलांचा स्वतःचा बंगला होता आणि त्यात ते सुखाने राहत होते. मुलगा त्याच्या नोकरीसाठी त्याच्या कुटुंबाबरोबर परदेशी राहत होता.. मध्येच त्या मुलाला PhD करायची होती आणि त्याची फी खूप जास्त होती.. म्हणून त्याने आई वडीलांमागे टुमणे लावले की बंगला विकून त्याचा हिस्सा द्यावा. आई – वडिलांनी परोपरीने त्याला सांगितले की त्यांच्या मृत्यूनंतरच तुलाच ही मिळकत मिळेल, अशी भांडणे कशाला करतो आणि हा बंगला त्यांनी अत्यंत कष्टाने बांधला आहे, तिथे उत्तम बाग केली आहे, त्यांच्यानंतर तो त्यालाच मिळेल, पण व्यर्थ.. मुलाचे सल्लागार त्याची बायको आणि बायकोचे भाऊ..
मुलाने आम्हाला सल्ल्यासाठी फोन केला. मी म्हटले तुम्हाला आवडेल असा सल्ला देता येणार नाही, तर योग्य तो सल्लाच देईन आणि तो असा की आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये मुलांना काही हक्क नसतो..
मुलाने आई वडिलांशी संबंधच तोडून टाकले, ना फोन ना काही, आई-वडील वेड्या आशेने नातवंडांच्या फोनची वाट बघायचे..
नंतर सुमारे ७-८ महिन्यांनी वडील आजारी पडले आणि गेले आणि नंतर लगेचच आई पण गेली, पण एकाच्याही आजारपणाला किंवा अंत्यविधीला हे चिरंजीव ” कार्यबाहुल्यामुळे” येऊ शकले नाहीत !!
नंतर एक – दोन वर्षांनी गणपतीच्या सुमारास त्या मुलाचा मला फोन आला की, ” सर मी पितृपंधरवड्यामध्ये पुण्याला येतोय, मला तुम्हाला भेटायचे आहे.. ” त्या प्रमाणे तो आला आणि विचारले की आई वडिलांनी काही विल करून ठेवले आहे का? मी सांगितले माझ्याकडे तरी नाही.. पण मी विचारले की अहो, तुम्ही आता अचानक कसे काय आलात, आई वडील गेल्यावरही आला नाहीत ?
तो म्हणाला, ” अहो काय सांगू, You know I’m trying hard for PhD admission but not been able to get through for some or the other reason… आणि आता बंगल्याचे पण काहीतरी करायला हवे ना ? “
नंतर म्हणाला, “अजून एक कारण आहे.. खरे तर माझा या श्राद्ध पक्ष या गोष्टींवर काही विश्वास नाही.. पण अहो गेले काही महिने आमच्याकडे सतत आजारपणे, माझ्या नोकरीत भांडणे, PHD admission मध्ये अडचणी, असे प्रकार चालू आहेत. मग माझ्या बायकोने तिच्या आईच्या सांगण्यावरून कोणाला तरी ऑनलाईन पत्रिका दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितले की आई वडिलांचे श्राद्ध, पिंडदान केले तरच हे प्रकार थांबू शकतील, म्हणून आता बायकोच्या हट्टाखातर आलोय ” असे तो म्हणाल्यावर मी निःशब्द झालो..
मनात म्हटले, “Poetic Justice किंवा कर्माचा सिद्धांत म्हणतात तो हाच की काय ? आई वडील जिवंत असताना त्यांच्याशी भांडायचे, त्यांचे अंत्यदर्शन घ्यायलाही यायचे नाही आणि आता हे प्रकार करायचे. “जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान” ही म्हण आज प्रत्यक्षात बघितली.. असे किंवा त्यासारखे प्रकार कोर्टात घडताना दिसतात आणि नात्यापेक्षा पैशाला किंमत जास्त आहे असे दिसून येते.. पण असे करून सुख किंवा मानसिक शांतता लाभते का ?
मला तरी या प्रश्नाचे उत्तर नाही असेच वाटते… What goes around comes around हे खरे.
लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे
प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈