सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
आस…
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
या माझ्या मुले नातवंडांनो
मांडूया खेळाचा डाव जुना
या आपल्या गोजिर्या घरात
तुम्हाविण महाल हा सुना॥
*
सुना महाल सुनी मैफिल
सारे काही वाटे सुने सुने
सुना रमल्या पर देशात
आस ही दिस येतील जुने॥
*
पर लाऊन माझ्या मनाला
सदा तुमच्यापाशी मी येते
पर देश मला न सुखावे
परी ओढ तुमची असते॥
*
वाट पहाती घर झोपाळा
शेत नि तुमची वेडी आई
वाट म्हणता वाटण्या केल्या
त्याचे असेच पांग का बाई?
*
आस मन परिघाचा कसा
तुम्हा भोवताली फिरतसे
आस लागते जीवा तुमची
कळते तुम्हा न वळतसे॥
*
झुले कितीतरी आठवांचे
रोज हिंदोळती जागोजागी
झुले मन त्यासंगे भरारा
भोवळ जणू ही अंगोपांगी॥
*
सदाशिव हा एकटा जीव
पदोपदी समजवी मना
सदा शीव भावना गोधडी
तोच उबारा गं तुझ्या तना॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈