“विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते” ती सुनबाईला म्हणाली.
“कुठे जाता ?आज एकादशीची गर्दी असेल. “
“अग पंढरपूरला जायचं नशिबात नाही. ईथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते.. देऊळ जवळ तर आहे”
“आजे मी येणार….. “
बारका नातु मागे लागला.
“अरे तुला कुठे गर्दीत सांभाळू… “
तस नातवानं भोकाडच पसरलं…
“मला पण विठ्ठलाला यायचयं “
तशी सुनबाई म्हणाली,
“एवढं रडतयं तर न्या की…
हे घ्या अकरा रुपये ठेवा देवाला… या दोघं दर्शन करून”
पोरगं खुष झालं खीदळायला लागल.
देवळात ही गर्दी होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदलं होत. नाचत होत. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तस पोरग मात्र थोड्या वेळा नंतर कंटाळलं……
“आजे कधी दिसणार तुझा विठ्ठल?”
“आता थोड्या वेळानं दिसेल हं… जवळ आलो.. लगेच दर्शन होईल.. “
तिनी नातवाची समजुत काढली.
जरा वेळानं पोरगं म्हणालं,
“आजे गोष्ट सांग ना “
“अरे इथे कुठे ? घरी गेल्यावर सांगते”
“इथच सांग “
पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं… म्हणून तीनी जनी दळण दळताना दमते… मग विठुराया येऊन तिला दळायला मदत करायचा ती छोटी गोष्ट सांगितली…
“आजे तुला दिसला का कधी तुझा विठ्ठल ? “
“माझं कुठलं बाबा एवढा भाग्य.. मला कुठला दिसायला विठ्ठल.. ” ती म्हणाली,
ईतक्यात पोराचं लक्ष गोळ्या विकणाऱ्या मुलाकडे गेलं. लगेच म्हणाला..
“आजे मला गोळ्या घे की…. “
“गप रे… पैशे नाहीत”
“ए आजे घे की.. “
पोरग ऐकेच ना.. हट्टच करायला लागलं…
देवाचे पैसे… अकरा रूपये तेवढे होते.
दुसऱे आणलेच नव्हते… पण पोरगं हट्टानं आलय खरं.. जाऊ दे.. लहान लेकरू आहे….
म्हणून… दहा रुपयाच गोळ्यांच पाकीट तीनी घेतलं. पोरगं जरा रमलं… पुढच्या दोन चार बारक्या पोरींनाही त्यानी गोळ्या दिल्या…
तसं त्या पोरीपण खुषं झाल्या..
“आजे तुला घे की गोळ्या…. “
“नको रे… “
आजीचं लक्ष विठ्ठलाकडे…
बऱ्याच वेळानी नंबर जवळ आला. तसं आजीनी पोराला कडेवर घेतलं.
“हा घे रुपया जवळ गेलं की त्या पेटीत टाक…. “
“आज दुसरं काहीच आणल नाही देवा… परत येईन तेव्हा आणीन रे… ”
हात जोडून तिने विनवणी केली.
समोर विठ्ठलाला पाहिलं तस तिला कृतकृत्य झालो असं वाटलं.. आज ईथे का होईना.. त्याच दर्शन तर झालं….
☆ माझी दुर्गा, माझी अष्टभुजा… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
आमची सोळा वर्षाची लेक मृण्मयी, कन्या-लक्ष्मी आहे. असंच समजा नां, आमच्या घरातली दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणजेच देवीच्या अनेक रूपातली ती एक अंश आहे. धोक्याच्या वयातही ती कधीच चुकीचे पाऊल उचलणार नाही, उलट इतरांना धोक्यातून वाचवते.
खडकवासला धरणाचं पाणी सोडल्याचा तो काळाकुट्ट दिवस, आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. खडकवासला धरणातून सुटलेले पाणी थेट आमच्या घरांत शिरल होत. सन सिटी रोड वरच्या, उतारावरच्या, एकता नगर, निंबज नगर सोसायटी, धोक्यात असल्याच्या बातम्या टी. व्ही. वर झळकल्या. बऱ्याच जणांची घरे धुवून निघाली. पाणी आमच्याही घरांत शिरल. आम्ही गांगरलो. बायको माहेरी गेली होती. माझी वयस्कर आई तर मटकन् खालीच बसली. प्रसंगावधान राखून मृण्मयीने पदर बांधला आणि ती अष्टभुजा झाली. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे, कपडे तिने साडीच्या गाठोड्यात बांधल्या. आजीच्या पोथ्या आणि मुख्य म्हणजे तिची औषधे गोळ्यांची पुरचुंडी आजीच्या ताब्यात देतांना नातीनें बजावल, ” आजी ही तुझी इस्टेट नीट सांभाळ”.
थोडी आवराआवर झाल्यावर तिने माझ्याकडे मोर्चा वळवला, ” बाबा आता इकडचं आणि आजीचं मी बघते. तुम्ही आता आपल्या दुकानाकडे बघा. ”
“अरेच्चा ! खरंच की ! दुकानांत पण पाणी शिरलं असेल. बापरे! मी विसरलोच होतो. वास्तवाचं भान मला आल आणि कापरंच भरलं. अगदी कालच मी दुकानात लोखंडी सामानाचा 80 हजाराचा माल भरला होता. वाटेतला चिखल तुडवत मी दुकान गाठल. तर खालचा कप्पा पूर्ण पाण्यात होता. मी हताश झालो, डोळ्यात जमा झालेले अश्रू ओघळले. आणि पाण्यात मिसळले. दिलाश्याची थाप पाठीवर पडली. आणि लेकीचा आवाज कानावर पडला, ” बाबा दुकानात शिरलेल्या पाण्यात तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची भर कशाला ? ऐका ना! शेजाऱ्यापाजाऱ्यांची, मुलाबाळांची, आजीची व्यवस्था करून आमची टीम आता आपल्या दुकानाकडे वळली आहे. ” इतक्यात उत्साही मुला-मुलींच्या मेळाव्यातून पुढे येत यशपाल हसत म्हणाला, ” काका शांत व्हा. इथे आरामात खुर्चीवर बसा बरं! आणि हे खडकवासल्याहूनच आलेलं पण शुद्ध, आणि घरचं पाणी प्या. आता सगळं आमच्यावर सोपवायचंय. आणि हो! अहो काका, सकारात्मक विचार करायला तुम्हीच तर शिकवलंत ना आम्हाला ?अर्धा पेला रिकामा झाला तरी अर्धा भरलेला आहे, ते बघायचं असत. असं तुमच्याकडूनच शिकलोय आम्ही हो ना? ” घोळक्यातली एक मैना चिंवचिंवली, “अय्या खरंच की! दुकानातला अर्धा माल पाण्यात आहे पण वरचा कप्पा अगदी कोरडा ठणठणीत आहे. काका बघा तर खरं! आपलं खूप नुकसान नाही झालं ” असं म्हणत उड्या मारत ती वानरसेना पुढे सरसावली. इतर कामांचा फडशा पाडून आबाल वृद्धांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था लावून ही ‘गॅंग’ आता आमच्या मदतीसाठी पुढे धावली होती.
पाणी ओसरल. बोल बोलता भिजलेल्या मशीनचे भाग सुट्टे झाले. पुसायला कोरडी फडकी मिळेनात. एक दोघांनी तर मशिन पुसायला अंगातला शर्ट काढला, आणि मशीन्स साफ केली. काही तासातच ओला कारभार कोरडा झाला. आता लोखंडी मालाला गंज चढण्याची भीती नव्हती. नुकसान टळलं होतं, ते वेळीच धाऊन आलेल्या या समाजसेवक तरुणांमुळे, हे मान्य करावेच लागेल. पाण्यामुळे मशीनचा काही भाग निकामी झाला होता, तो मित्रांच्या मदतीने, माझ्या कन्येने गाडीवर घालून जुन्या बाजारात विकला. तिजोरीच्या गल्ल्यात भर पडली. काही दिवसातच दुकान पहिल्यासारखं चकचकीत झालं. आता आलं नवरात्र, नंतरच्या दसऱ्यादिवाळीला मृण्मयी दुकान सजवणार आहे. ती म्हणाली, “बाबा आपण यावेळी फुलांच्या माळा सजावटीसाठी नको आणायला” वर्धमान ओरडला, “अगं मार्केट यार्ड मधून आणूया की आपण फुलं, स्वस्त आणि मस्त मिळतील. ” त्या तरुणाईत इतका सळसळता उत्साह संचारला होता की, मला वाटलं, हा आत्ताच मार्केट यार्ड गाठतोय की काय, त्याला खाली बसवत मृण्मयी म्हणाली, ” ऐक ना वर्धमान! आपण यावेळी लोकरीचेच तोरण आणि माळा आणूया. फुलं काय लवकर सुकतात. आणि कचऱ्यात जमा होऊन डासांची भरती होते. फुलं कुजल्यावर प्रदूषणही वाढतं त्यापेक्षा लोकरीच्या माळा टिकतातही हो कीनाही? आणि अरे आपली संस्कृती, आपली पारंपारिक कलाकुसर, काळा आड लोप पावतीय ना!तिला उजाळा तरी मिळेल. आणि हो लोकरीच्या माळा धुताही येतात. शिवाय प्रत्येक टाक्यात जिव्हाळा असतोच असतो, पण करणारीच्या हाताची उबही त्यात सामावलेली असते आणि निर्मितीचा आनंद असतो तो वेगळाच. ”
तिचा बोलण्याचा धबधबा आवरतांना, मिस्किल संकेतला चेष्टेची लहर आली तो म्हणाला, ” बरं राहयलं! नाही आणत आम्ही फुलं आणि कागदाच्या माळा सुद्धा नाही आणत. मी बापडा तुळशीबागेतून लोकर आणि सुयांचे बंडलच आणतो. मग आमची मृण्मयी विणकाम शिकेल नंतर मग सावकाश विणत बसेल, आणि मग थोड्या दिवसांवर आलेल्या दसरा दिवाळीसाठी विणकामाच्या सुयांशी लढाई करत करत, माळा विणेल. क्या बात है” l त्याच्या चेष्टेच्या सुरात सगळ्यांचा सूर मिसळला आणि मग काय!हास्याची कारंजी उसळली. मी हा सगळा गंमतीचा मामला कान देऊन ऐकत होतो. नाकाचा शेंडा उडवत गाल फुगवून संकेतला चापट मारत, आमचं कन्यारत्न काहीतरी बोलणार इतक्यात छोटया गजुनी मुक्ताफळ उधळली,
” झाssल! मृण्मयी ताई लोकरीच्या माळा विणायला बसल्यावर, मग काय! पुढच्या वर्षीचाच दसरा दिवाळी उगवेल. “आणि मग पुन्हा हास्याची कारंजी उसळली.
काही वेळापूर्वी निराश झालेला मी खळखळून हंसलो. मित्र-मैत्रिणींना दटावत बाईसाहेब उत्तरल्या, ” ऐका ना बाबा! शेजारच्या सोसायटीतल्या वझे काकू लोकरीच्या माळा खूप छान करतात. त्यांच्या घरातही पाणी शिरलं होतं पण त्यांच्या तयार माळा वरच्या कप्प्यात असल्यामुळे वाचल्या. बाकी इतर नुकसान खूप झालंय त्यांच. त्यामुळे बाबा खूप निराश झाल्यात हो त्या. आपण मदत म्हणून त्यांच्याकडूनच माळा घेऊयात का हो बाबा ?त्यांची थोडीशी नुकसान भरपाई पण होईल आणि नर्व्हस झालेल्या वझे काकू खुशही होतील. बघा पटतंय का तुम्हाला सगळ्यांना? मी डोळे विस्फारून मृण्मयी कडे बघतच राहयलो कालपर्यंत शाळकरी असलेली माझी ही साळुंकी, मनानी, विचारांनी मोठी कधी झाली?ह्या सुखद प्रश्नचिन्हातच मी अडकलो, काही तासांपूर्वी निराशेच्या काळोखात अडकलेल्या माझ्या मनानी, खुशीनें होकार भरला. खडकवासला धरणाच्या पुराच्या पाण्याबरोबर माझी निराशा वाहून गेली. आणि हो! हे सगळं माझ्या लाडक्या लेकीमुळे आणि तिच्या चिरउत्साही चिरतरुण अशा मित्रमैत्रिणीमुळेच घडलं होत. प्रत्येक घराघरांत जाऊन ही ‘गॅंग ‘आशेचा दिवा लावते आणि अंधाराला पळवते. आता दसरा दिवाळी सगळेजण उत्साहाने साजरी करतील. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. पुराच्या पाण्याने चिखलमय झालेला मार्ग त्यांनी त्यांच्या कृतीने सुकर केला होता. आता नव्या उमेदीने आम्ही दसरा दिवाळी आणि पुढील येणाऱ्या वर्षांची वाट पाहत आहोत. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आणि त्याबरोबर धन्यवाद.
चौकशी केली तर कळलं म्हातारा पंचवीस तीस किलोमीटर चालत आलाय.. आला, तसा झाडाबुडी चवड्यावर बसला.. घटाटा पाणी प्याला.. मला त्याची कीव वाटतेली..
” पाळलेलं कुत्रं तुमच्या मागं कसं आलं ?” मी त्याला विचारलं..
तो सांगू लागला…..
” लगट.. मालक लगट वं… लय वंगाळ..
मेंढराच्या कातडीचा वास कुत्र्याच्या नाकात बसला की भली भली धुंदावत्याती.. शेळीचं दूध प्याला दिलं की त्याची चटक लागती…. माणूस काय आन् जनावर काय, सारखीच की… मग आपसूक मागंमागं येतंय.. हाकाललं तरी मेंढरा मागं वड करतं.. मेंढरा मागं मेंढरू हुतं… अशी अंगचटी बघा.. “
म्हाताऱ्याचा हा अनुभव मला नवाच होता…
शाल्याला दोन दिवस बांधून ठेवला.. मग मोकळा सोडला..
पुढं आसक्ती चं वर्णन करताना धनगराच्या त्या ओळी कवितेत आबदार उतरल्या..
भरारा माझ्या डोळ्यासमोर सगळी चित्रं दिसू लागलेली..
पुढं काही वर्षात शाल्याला खरूज लागली.. सगळ्या अंगभर जखमा झाल्या.. त्याच्या अंगावरची केसं पुंजक्या पुंजक्यानं झडू लागली.. रात्रभर वेदनेनं व्हिवळायचा… स्वतःचं अंग, पाय कचाचा चावायचा.. जोरजोरात डोकं झिंजाडायचा.. त्याला वेदना सहन होत नव्हत्या.. आम्हाला बघवत नव्हतं.. उपचार केले.. पण फरक नाही…
खंगत गेला हाडाचा नुसता सापळा उरला.. डॉक्टर म्हणाले घरात ठेवू नका..
रात्री घराबाहेर काढलं की दार खराखरा वाजवायचा.. हाक मारल्यासारखा आवाज द्यायचा.. आम्ही डिस्टर्ब झालेलो.. काहीच कळत नव्हतं… ठरवलं, कुठंतरी याला दूर सोडून यावं….
रात्री दहाची वेळ..
काळजावर दगड ठेवला.. ” चल शाल्या.. ” म्हणालो आणि सायकलवरून निघालो.. आज्ञाधारकपणे तो शब्दाला मान देऊन माझ्या मागं धावत येतेला..
मी वळून वळून पाहायचो… तो जीवाच्या आकांतानं शक्ती एकवटून मागं येत होता.. घरापासून दूर धामणी रस्त्याला माझा मित्र अरुण थांबलेला… एमएटी गाडी घेऊन… आदल्या दिवशी तस ठरलं होतं.. मी सायकल बाजूला लावली.. खिशातलं बिस्किट त्याच्यासमोर धरलं.. त्यानं ते मान वर करून फक्त हुंगलं.. खाल्लं नाही…..
काळीज फाटल्यागत झालं.. त्याला डोळे भरून पाहिलं.. मेलेल्या डोळ्यांनं तो माझ्याकडं पहात होता.. निर्विकार….
मला भडभडून आलेलं… गाडीवर मागं बसलो. अरुणनं गाडी भन्नाट पळवली… त्याला कुठंतरी आड बाजूला चुकवायचं होतं.. शक्ती नसलेला शाल्या मागं उर फुटंस्तोवर धावत होता.. आडवी तिडवी गाडी मारत गल्लीबोळातनं उलट सुलट फेऱ्या मारल्या.. शाल्या मागं पडलेला पाहून गाडीचा वेग वाढवला.. गाडी लिमये मळ्यातल्या उसातल्या पायवाटेवर घातली.. तिथून बाहेर पडून धामणीच्या मूळ रस्त्याला बगल देत वाट फुटेल तशी गाडी पळवली… अर्धा पाऊण तास धड उडाल्यासारखं आम्ही बेभान झालेलो.. तिथून उदगाव.. शाल्या कुठं मागं राहिला ते कळलंच नाही.. घरापासून जवळ जवळ वीस-पंचवीस किलोमीटरवर आम्ही त्याला चकवा दिलेला…
कुठं असेल तो ?
काय करत असेल ?
प्रचंड अपराधीपण उराशी घेऊन घरी आलो.. मध्यरात्रीचे बारा वाजून गेलेले– पोटातली भूक मेलेली.. दिवा मालवला..
अंधारात टक्क जागा राहिलो…
उशिरा कधीतरी झोप लागलेली….
सकाळी उठून बाहेर आलो.. पाहतो तर बाहेरच्या वाटेवर शाल्या पाय पसरून पडलेला.. भकाळी गेलेलं पोट भात्यासारखं हापसत होतं.. जीव बाहेर लाळेचे थेंब भुईवर साडतेले.. शाल्या भुईसपाट झालेला…
रात्रीत कसा आला असेल हा ?
इतक्या दूरवरून त्याला घर तरी कसं सापडलं असेल ? किती वणवणला असेल ?
अंधारात वाटेतल्या असंख्य कुत्र्यांनी त्याला कसा फाडला असेल ?
दिशा तरी कशी कळली असेल त्याला ?
आणि का म्हणून तो आमच्याकडे आला असेल ? आम्ही असं वागूनसुध्दा ??
चूक झाली.. माफी कर..
आता कसाही राहूदे.. जे व्हायचं ते इथंच डोळ्यासमोर होऊदे.. आम्ही ठरवलं…..
पुढं एक-दीड महिन्यात तो खंगत खंगत गेला… त्याच्यासाठी बाहेर पोतं टाकलेलं असायचं.. रोज त्यावरच झोपायचा… गेला त्या दिवशी नारळाच्या. झाडाच्या आळ्यात जाऊन झोपला… कायमचा…
जणू जागाच दाखवली त्यांनं…..
रात्रभर खुळ्यासारखा पाऊस कोसळंत होता….
तिथंच खड्डा खोदला… आणि दृष्टी आड केला..
खत झालं त्याचं….
आणि आज असा उठून समोर उभाय.. कवितेतल्या ओळीमागनं…..
☆ त्याग… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील☆
डॉ हंसा दीप
(मी हे कदापि सहन करु शकलो नसतो…. की आज तिच्या जाण्यान जे दुःख मी सहन करतोय ते दुःख, ती तळमळ माझ्या जाण्याने तिला सहन करावी लागली असती.) – इथून पुढे —
मी एकटक आश्चर्याने पप्पांकडे पहात बसलो…. जस की कुठल्यातरी रहस्यावरचा पडदा हटवावा. पप्पांचे शब्द कानावर पडत होते…. ” मी तिला माझ्या पश्चात सुद्धा दुःखी पाहू शकत नव्हतो. माझ्या जाण्याने ती रडून रडून अर्धमेली झाली असती, आणि हे मी सहन करू शकलो नसतो. कमीतकमी तिच अस पहिल्यांदी निघून जाण्याने ती ह्या एकटेपणाच्या दुःखातून तरी वाचली. तिच्या ह्या आनंदात मी सहभागी होऊ इच्छित आहे. ते बोलत जात होते…. आणि माझ्या आत जी पप्पांची पाषाणाची मूर्ती होती ती बर्फासारखी वितळत माझ्या डोळ्यावाटे अश्रुंच्या रूपाने वाढत निघाली होती.
तुला माहित आहे, तुझ्या आईसोबत माझा दीर्घ प्रवास
राहिला. कितीतरी पहाट आम्ही आमच्या एकत्रित डोळ्यांनी पाहिल्या. ; अगणित संध्याकाळी आम्ही एकत्र फिरलो. आज निवांतपणे एकांतात जेव्हा गतकाळातील आठवणींना वाकून बघतो, कधी भविष्यातील योजना बनवत सुंदर भविष्य रंगवत. ह्या लांब टप्प्याच्या प्रवासात आम्ही कित्येक घर बदलली, देश बदलले. न जाणो कित्येक वेळा सोबत आम्ही पॅकिंग व अनपॅकिंग केली. प्रत्येक नवीन घराला अशाप्रकारे आम्ही सजवत राहिलो जस की हे घर आता आमच आयुष्यभराच सोबती असेल. जेव्हा नवीन घरात गेलो की त्या घराला ही मन लावून सजवायचो, पण तरीही मागच्या घराला मनापासून आठवत रहायचो. प्रत्येक नव्या घरासोबत आमचा एक टप्पा नावासहित जोडला जायचा.
भारतापासून न्युयॉर्क, आणि न्युयॉर्क पासून टोरंटो चे बदलणारे जग, बदलणारे लोक पण आम्हाला व आमच्या एकसंध विचारांना ही बदलू शकले नाहीत. आम्ही दोघ ठेठ झाबुआई ला राहिलो, जराही बदललो नाही. आमच राहण -खाण नक्कीच बदलल. वर्षानुवर्षे एकत्र रहात, भांडत -झगडत, प्रेम करायचो, खायचो -प्यायचो, आयुष्याचा लेखा -जोखा नमूद होत राहिला की कोणी कितीवेळ काम केल, आराम केला. सगळी पसरलेली काम विकून -सावरून मुलासाठी कमीतकमी झझंट ठेवून त्याच्या संगोपनाची योजना आखली होती. वृद्धापकाळात चिंतेची गरज नव्हती, सरकारी सोय होती. जर चिंता होती ती फक्त एकच की, कोण पहिल जाईल, जो पाठीमागे रहाणार, त्याच्यासाठी आपल्या आयुष्यातील उरलेले दिवस व्यतीत करण कठिण होणार.
सहज व स्पष्ट स्वरात पप्पा आज बोलत होते व मी ऐकत होतो. कोणत्या उपदेशापलीकडची दोन लोकांची जीवनगाथा होती ही. मी पप्पांचा वाढीस लागलेला मुलगा हा विचार करत होतो की ह्या सगळ्यात कुठेतरी विषयवासना किंवा फक्त सेक्शुअल डिजायर ची झलक तर दिसत नाही. इथे फक्त दिसत आहे तर तो आहे…. दोन व्यक्तींचा आपापसातील ताळमेळ, कटिबद्धता. ही एकप्रकारे पाहता दोन व्यक्तींची कंपनी होती. एक घरंदाज -खानदानी कार्पोरेशन सारख, जिचा जिवनकाल सतत पुढे सरकत राहिला. मध्ये अडथळा आणण्यासाठी कोणी नव्हतं. परिवार आणि समाज निश्चितच त्या बंधनात होते, पण त्या दोघांमध्ये कोणी नव्हतं.
पप्पांनी माझी अव्यक्त भाषा समजली…. “एका स्त्री सोबत पंचावन्न वर्ष आयुष्याची भागिदारी करण काय असत, ह्याची आपण फक्त जाणीव करू शकतो. शरीराच्या गरजा तर क्षणिक असतात पण त्याव्यतिरिक्त प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक वर्षाचा, हिशेब शब्दात कसा काय व्यक्त होऊ शकतो. विनारक्ताची नाती कशी जुळली होती, त्या हजारो क्षणांची गहनता समजण्यासाठी हजारो ग्रंथाची गरज लागेल. “
पप्पा दोन मिनिटे थांबले होते. आपल्या कपाळावर दरदरून आलेल दोन थेंब हाताने पुसत सांगू लागले, ” खूप साऱ्या संकटात आम्ही एकत्र राहिलो. मंदिरात एकत्र प्रार्थना केली, एकाचवेळी एका टेबलावर कित्येक वेळा जेवतो… ब्रेकफास्ट, लंच, डिनर. ती माझ्या सोबत माझ्या कामात बरोबरीची भागिदार होती, आनंदात व दुःखात ही. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट होती की मला जाळण्याची जीवघेणी पीडा तिला सहन करावी लागली नाही. मी तिला एकट सोडू शकलो नसतो. आता जेव्हा पण मी ह्या जगातून जाईन तेव्हा मनात कुठली चिंता न बाळगता जाईन. आणि तेव्हा तिच्या सोबत घालवलेले, तिच्या शिवाय जगलेल्या क्षणांची आठवण माझ्या सोबत राहणार. उद्या, आज आणि काल च्या बाबतीत हा विचार करणच माझ्यासाठी दिलासा देणार आहे. तिच जाण ह्यासाठी एक चांगला दिवस होता. खरच मी खूप आनंदी आहे की मी तिला माझ्या हातून स्वर्गापर्यंत पोहचवल. तिच्या शिवाय फक्त मीच अपूर्ण नाही तर ह्या घरातील प्रत्येक वस्तू अपूर्ण आहे. ह्या अपूर्णतेसोबत मी जगेन, परंतु कदाचित ती जगू शकली नसती. “
अस बोलत ते दोन क्षण तिथे बसले, भोळ्याभाबड्या मुलासारख तसच हास्य चेहऱ्यावर लेवून जो आपल वचन पूर्ण करून आनंदी होतो.
मी आज त्या पतीला बघत होतो, त्याच्या आनंदाला, आनंदाच्या पाठीमागे लपलेल्या त्या दुःखाच्या गडद छायेला. त्या वडिलांना ही अपुर्णतेची जाणिव असूनही एक संपूर्णतेने परिपूर्ण होते. दुःखातून बाहेर आल्यानंतर एखाद्या पाषाण मूर्ती समान शांतता. कदाचित पप्पा आपल्या मनातील व्यथा -व दुःखाच बलिदान देऊन मुर्ता कडून अमुर्ताच्या प्रवासाकडे निघाले होते. त्यांच हे मौन आता माझ्या आत खोलवर कुठेतरी वर्णित होत होत.
पप्पा उभे राहिले. फुले हातातून खाली पडली. स्मारकावर आईचा चेहरा हसताना परावर्तित होत होता. तिचा चेहरा म्हणजे दोन किनाऱ्याचे अंतर एकजूट करणारा सेतू. घरी परतताना मी पप्पांचा हात पकडला, कदाचित आता त्यांना माझ्या सहाऱ्याची, सोबतीची खऱ्या अर्थाने गरज होती.
♥♥♥♥
मूळ हिंदी कथा : उत्सर्जन
मूळ हिंदी लेखिका : डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील
अणुशक्ती नगर मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ त्याग… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील☆
डॉ हंसा दीप
माझ्या पप्पांना जेव्हा -जेव्हा मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा -तेव्हा त्यांच्यापासून मी खूप लांब गेल्याच जाणवल. इतक्या दूर, जिथपर्यंत माझी पोच कधी पोचू शकत नाही. जेवढ मी माझ्या आईच्या जवळ होतो, तेवढच वडिलांपासून लांब. एक अभेद्य अशी लक्ष्मणरेषा होती, जी कधीच आम्ही दोघांनी पार करण्याचा विचार केला नाही. आई आईस ब्रेकींग चा प्रयत्न करायची. परंतु… ना कधी माझ्याकडून, व ना पप्पांच्या कडून असा उत्साह पहायला मिळाला की आमच नात सहजासहजी साकार होऊन नात्याआड येणाऱ्या भिंती तोडल्या जावू शकत.
मी हे देखील ओळखून होतो, समजून होतो, की पप्पा माझी खूप काळजी घेतात. त्यांनी आईला ताकीद देऊन ठेवली होती की माझा प्रत्येक हट्ट अथवा गरज पूर्ण कर. ह्यात पैशांची कमतरता कधीच आड आली नाही पाहिजे. माझे छंद, माझ्या प्रत्येक गरजेच्या वस्तू माझ्या जवळ असाव्यात. रोज रात्री जेव्हा मी झोपायला जाई तेव्हा कोणी तरी आल्याचा हलकासा भास होई. दरवाजाच्या बाहेरून म्हणजे उंबरठ्यावरूनच कोणीतरी आत वाकून बघून तिथूनच परत जात असे. त्या अज्ञात सावलीला मी ओळखत असे. पण ते मौन मला बोचत असे. पण बरोबर त्यानंतर आई आत येऊन माझी गादी व्यवस्थित करी, गुड नाईट बोलायची… आणि मग रात्रीच्या गडद अंधारात पुर्ण घर झोपून जायच. माझ्या सगळ्या गरजा, खाण्या-पिण्यापासून ते भावनात्मक सपोर्ट ही मला माझ्या आईकडूनच मिळत असे. म्हणूनच कदाचित ह्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर ही मी कधी महत्व दिल नाही. तस पण आता मी युनिव्हर्सिटी मध्ये जात होतो. कुटंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आई तर होतीच.
पण, आता जेव्हा आई निघून गेली तेव्हा मी त्या व्यक्तीच्या बाबतीत सखोल विचार करण्यास मजबूर झालो जे माझे वडील होते. त्यांच्या व्यतिरिक्त ह्या घरात दुसर अस कोणी नव्हतं ज्याच्या सोबत मी बोलू शकत होतो. त्यांनी मला एकट वाऱ्यावर सोडून दिल होत. मी आईला आठवताना आसव गळायची आणि मी जाणूनबुजून दुर्लक्ष करायचो. अस वाटायच, जणू आई आता येईल, माझी गादी ठीक करेल आणि मी झोपून जाईन. पप्पांच घरात असण म्हणजे माझ्यासाठी घरात नसण्यासमान होत. सिमेंट आणि वाळूने बनलेल घर एक अस घर बनल होत, जिथे हसण -ओरडण तर दूर, साधे दोन-चार शब्दांच आदान प्रदान ही होण कठिण होत. मृत्यूच्या छायेत बुडालेल घर एवढ शांत होत की बाहेरून साय साय करत वाहणारी हवा भिंतींच्या सीमारेषांना, विनाकारण दरवाजे व खिडक्यांच्या हालचालींना ही रोखठोक करत होती.
मी पप्पांना वाद विवाद घालताना जरूर पाहिल पण भांडताना बघितल नव्हत. आई मला कधी -कधी जरूर सांगायची…. ” तुझ्या पप्पांना प्रेम दाखवता येत नाही. ” मी समजू शकत नव्हतो, की माझ बोट पकडून मला चालवणारा, मला खांद्यावर बसवून फिरवणारा मनुष्य, हळूहळू माझ्याशी बोलायला कचरायला का लागला? काहीतरी बोलताना नेहमी उपदेश देण्याची पप्पांची सवय मला त्यांची उपेक्षा करण्यास मजबूर करत होती. आमच्या दोघांमधील नात हळूहळू जुन्या कापडासारख फाटत दूर होत गेल.
त्या दिवशी जेव्हा आईने शेवटचे श्वास घेतले, मी धायमोकलून रडलो होतो. जवळपासच्या लोकांनी तेव्हा मला खूप धीर देण्याचा प्रयत्न केला परंतु पप्पा तेव्हा देखील माझ्या जवळ आले नाहीत. एक दीर्घ श्वास घेऊन ते निघून गेले होते. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू देखील ओघळला नव्हता. आणि इकडे आईच्या जाण्याने माझ्या दुःखाला पारावार उरला नव्हता. खर सांगू, मी आतल्या आत खदखदत होतो. क्रोधाच्या अग्नित जळत होतो. ते क्षण आज देखील मला टोचणी देत राहतात. सगळ क्रिया -कर्म एकदम शांततेत झाल. मी त्यांना उदास झालेल पाहू इच्छित होतो. अस वाटत होत की हा मनुष्य खोटनाट का होईना एकदा तरी खोटखोट रडू दे. दोन -चार आसव तरी आईच्या प्रेतावर झाकलेल्या त्या कोरड्या कापडावर पडू देत. ती दुसरी -तिसरी कोण नव्हे तर ती त्यांची पत्नी होती, रात्रं- दिवस ती त्यांची सतत सेवा करायची. आईसाठी नको रडू देत, कमीतकमी एकट्याने आता आयुष्य घालवाव लागणार ह्या दुःखापोटी तरी रडू देत. त्यांच हे अस गप्प राहण्याचा मी कितीतरी वेगळे अर्थ लावले होते. वाईट विचांरानी तर डोक्यात गर्दी केली होती.
आमच्या दोघांमध्ये पसरलेली जीवघेणी शांतता आणखीन गडद होत निघाली होती. जेवण -खाण सगळ अशा रितीने होत होत जशी दोन मशीन विनाआवाजाची घरात चालत आहेत. काळानुसार मी जुळवून घेतल. आईच्या इच्छेनुसार मी माझ सगळ लक्ष शिक्षणात घालू लागलो.
एक महिना यंत्रवत संपून गेला. आजच्याच दिवशी आई आम्हाला सोडून गेली होती. आईच्या आठवणीत दुःखी व आळसावलेली पहाट उजाडली. पहाटे – पहाटेच एक गंभीर आवाज ऐकू आला… ” आईच्या स्मारकावर फुल वाहण्यासाठी तू माझ्या सोबत येणार का?”
“हो”
“नाही” अस म्हणू शकलो नाही. जायच काय ते तर मी एकटा ही जाऊ शकलो असतो. परंतु आईला दाखविण्यासाठी पप्पां सोबत जायच होत. बाप व मुलगा सोबत तिच्या जवळ आलीत की तिला खूप आनंद होईल. आणि आज जेव्हा आईच्या स्मारकावर फूल वाहत होते तर ते हसत होते. ते पाहून माझ मन अगदी व्याकूळ झाल. इतक्या दिवसांपासून आत साचलेला राग एकदम उफाळून बाहेर आला…. “पप्पा तुम्ही आईच्या जाण्यान आनंदी आहात!”
“हो, बाळा मी खूप आनंदी आहे. “
मी तिरस्काराने त्यांना पाहू लागलो. नाकपुड्या आपोआप फुलून आल्या. त्यांच्या ह्या वक्तव्यावर माझ्या शरीरातला प्रत्यांग क्रोधाग्निने पेटून उठला. त्यांना ते समजल आणि म्हणाले,…. ” मी ह्यासाठी आनंदी आहे कारण मी तुझ्या आईवर जीवापाड प्रेम करायचो आणि मी हे कदापि सहन करु शकलो नसतो…. की आज तिच्या जाण्यान जे दुःख मी सहन करतोय ते दुःख, ती तळमळ माझ्या जाण्याने तिला सहन करावी लागली असती.
– क्रमशः भाग पहिला.
मूळ हिंदी कथा : उत्सर्जन
मूळ हिंदी लेखिका : डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील
अणुशक्ती नगर मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पहिली नोकरी लागली, ती पुण्यात. सरकारी नोकरी. नवा गाव. रहायची जागा नव्हती.
बाबांचे एक मित्र होते… आप्पा कुळकर्णी. नारायण पेठेत, त्यांचा भलामोठा वाडा होता.
बाबांनी चिठ्ठी दिली. मी बॅग घेवून आप्पांच्या घरी. शब्दाला किंमत असायची तेव्हा.
आप्पांनी चिठ्ठी वाचली. प्रसन्न हसले.
“वेळेवर आलास. कालच डोईफोड्यांची जागा रिकामी झालीय. तीन खोल्या आहेत ऐसपैस.
रहा निवांत. बापुसास सांग तुझ्या, आप्पाने आठवण काढलीय म्हणोन. “
जगी सर्व सुखी.. मीच होतो. सहज जागा मिळाली. सोन्यासारखी जागा. सोन्यासारखी माणसं.
भरपूर जागा. वाड्यात सहज रूळलो. प्रत्येक घराची दारे उघडी. साधी माणसं… आपली माणसं.
मनात घर करून राहणारी…
वाड्यात तीन चार बिऱ्हाडं होती. आणि मालक… मालक, मालकांसारखे वागलेच नाहीत कधी.
सगळं एक कुटुंब. वाड्याला भला मोठ्ठा दरवाजा. डाव्या बाजूला तीन बिऱ्हाडं… उजव्या बाजूला मालक आणि आणखीन एक. दरवाज्यासमोर एक छोटंसं मंदिर. राधाकृष्णाचं. दरवाजातून थेट दिसायचं.
मंदिराशेजारी प्राजक्त आणि सोनचाफा… मध्यभागी भलं मोठ्ठं आंगण.
देव हसला. खरंच. मला तरी तसंच वाटलं. वाटलं, देव पाठीशी आहे. सगळं व्यवस्थित होणार.
मी निघालो.
“अहो देवा… प्रसाद तरी घेवून जावा. अंगारा लावा कपाळी. “
कृष्णाशी माझी पहिली भेट.
…. वाड्यातल्या मूळ पुरूषानं स्थापिलेला हा देव. कृष्णा या मंदिराचा पुजारी.
मूळ कोकणातला. मालकांनी येथे आणलेला. साधारण माझ्याच वयाचा. मंदिराशेजारीच दोन खोल्यांची जागा दिलेली त्याला. लहान वयात सरकारी नोकरी लागली, म्हणून वाड्याला माझं फार कौतुक. कृष्णालाही तितकंच..
कृष्णा पळतपळत मंदिराबाहेर आला. प्रसाद दिला. कपाळी अंगारा लावला. मनापासून आशीर्वाद दिला.
खूप छान वाटलं….. पहिला दिवस आनंदात गेला.
हळूहळू नोकरीत रमलो. ऑफीसमधून घरी आलो की, फारसं काम नसायचं. वाड्यातल्या पोरांना गोळा करायचो. मंदिराच्या छोट्या गाभाऱ्यात बसायचो. अभ्यास घ्यायचो. अगदी स्कॉलरशीपचाही. कविता पाठ करून घ्यायचो. इंग्लिश पेपर वाचून घ्यायचो. कृष्णाबरोबर शुभंकरोती… शेजारती… प्रसाद.
खरं तर खाणावळ लावलेली. सकाळी तिथंच जेवून, ऑफीसला जायचो. रात्री तिथं जेवायचा कंटाळा यायचा. तशी वेळही फार यायची नाही. कुठल्या तरी बिऱ्हाडातनं बोलावणं यायचंच.
“आज रात्री, आमच्याकडे जेवायला यायचं बरं का !”.
मला तेच हवं असायचं. वार लावल्यासारखा, वाड्यात प्रत्येक बिऱ्हाडी जेवायचो.
कधी कधी कृष्णाकडेही. कृष्णाकडचा मेनू एकच… मु. डा. खि… लोणचं, पापड आणि ताक.
पण अमृताची चव. जोडीला कृष्णाच्या गप्पा. मन आणि पोट भरून जायचं.
कृष्णाला माझं फार कौतुक वाटायचं. माझं ‘कौस्तुभ’ नाव त्याला जड वाटायचं. तो मला कौतुक म्हणायचा.
सगळ्या पोरांचा मी कौतुकदादा झालेलो. मला आवडायचं.
हळू हळू कृष्णाविषयी समजत गेलं. लहानपणी आई गेलेली. भिक्षुकाचं घराणं… पंधराव्या वर्षी वडिलही गेले… तोवर पोटापुरती पूजा सांगता यायची. पंचांग पहाता यायचं. मूहूर्त काढून देता यायचा. मालकांच्या नात्यातला. मालकांनी येथे आणला. मंदिराला पुजारी मिळाला. रहायला जागा. पुरेसा पगार.
कृष्णा सुखात होता. सुखातच राहिला… पुढे मागे कोणी नाही. तरीही सगळ्या वाड्यासाठी, कृष्णा देवाईतकाच मोठा होता. देवाकडे जायचा रस्ता व्हाया कृष्णा जायचा.
मला बढती मिळाली. कृष्णाकरवी देवाला अभिषेक करविला. कृष्णा मनापासून खूष.
जांभळ्या रंगाचे कद… खांद्यावर उपरणे… गळ्यात जानवं… कानात भिकबाळी. पाठ आणि पोट एकत्र आलेले. तरीही काटक… तोंडी हरिनाम….. कृष्णा देव आणि आमच्यामधला दुवा वाटायचा.
परीक्षेचा सीझन… कृष्णाची विशेष पूजा. सगळ्या पोरांना धो धो मार्क. पोरं अभ्यासू खरी.
पण कृपा, आशीर्वादाचं डिपार्टमेंट, कृष्णा सांभाळायचा.
मालकांचा तन्मय… त्याला झालेला ऍक्सीडेन्ट. तो सिरीयस.. आय. सी. यू. मध्ये.
कृष्णाच्या डोळ्याला डोळा नाही. दोन दिवस मंदिरात कोंडून घेतलं स्वतःला. तो शुद्धीवर आला.
मालक धावत धावत मंदिरात आले. कृष्णाला मिठी मारली. कृष्णा अश्रूंच्या घनडोहात बुडाला.
मला बढत्या मिळत गेल्या. क्वार्टर्स मिळाले. वाडा सोडणार होतो. सगळ्यांना भेटलो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी. निरोप घेताना गलबललो. तरीही वाड्यात चक्कर व्हायची.
माझ्या लग्नाचा मुहूर्त, कृष्णानेच काढून दिला. पत्रिका त्यानेच बघितल्या… हिची आणि माझीही.
आमचं छान चाललंय. कृष्णाची कृपा.. राधेकृष्णाचीही.
नुकताच रिटायर्ड झालो. मुलगाही नोकरीत आहे. मोठ्ठा बंगला बांधलाय सहकारनगरात.
एकदम कृष्णाची आठवण झाली. तडक वाड्यात गेलो. कृष्णा आता थकत चाललाय. मंदिरात जाताना सुद्धा पाय थरथरतात. मंदिरात गेलो. कृष्णा बाहेर आला. गाभाऱ्यात बसलो.
कृष्णाशी गप्पा झाल्या… निवांत … खूप दिवसांनी.
कृष्णाला म्हणलं. “बास झालं. आता रिटायर्ड हो. कुणीतरी नवीन पोरगा आणू. तुझ्याच्यानं होत नाही आता. “
कृष्णाचा चेहरा एकदम उतरला. काय बोलावं कळेना. डोळे भरून आले त्याचे. मला कसंसंच झालं.
“तू आता तिथं राहू नकोस. नव्या पोराला लागेल ती जागा. तू माझ्याकडे ये. नातू लहान आहे माझा.
त्याला अथर्वशीर्ष शिकवायचंय. तुलाच शिकवावं लागेल. “
कृष्णा गळ्यात पडून रडायलाच लागला. “नक्की शिकवेन. थकलो की नक्की तुझ्याकडेच येईन.
माझी वाट बघणारं कुणीतरी आहे, हे ऐकलं… नवं बळ मिळालं जगायला. आता हातपाय थरथरणार नाहीत माझे. “
☆ हार्मोनल फेन्सिंग… (अनुवादित कथा) हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ. रसबाला कोड्यात पडल्या होत्या. त्यांच्या एकवीस वर्षाच्या करियरमध्ये अशी एकही केस आली नव्हती. ना भारतात, ना जमैकामध्ये. त्यांच्या पतीचा पोस्टिंग जमैकामध्ये झाल्यानंतर त्याही तिथे राहिल्या होता आणि जवळ जवळ सात वर्षे त्यांनी तिथे प्रॅक्टीस केली होती. कुठल्याही पेशंटशी बोलताना आत्तापर्यंत त्यांनी पावणे चार तासांपेक्षा कधीही जास्त वेळ घेतला नव्हता. आणि आता या देखण्या युवकाबरोबर चार तास बोलल्यानंतर त्या गोंधळात पडल्या होत्या, की याला पेशंट म्हणावं की न म्हणावं.. नो ही इज नॉट ए पेशंट. ही कांट बी. या पेशंटबरोबर चाललेल्या चार तास चौकशीच्या दरम्यान, त्यांनी नऊ वेळा तरी डॉ. सनालीला फोन केला होता. डॉ. सनाली त्यांची बॅचमेट होती आणि प्रत्यक्षात तीनेच ही केस रिफर केली होती. सनालीने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रसबालाकडे या युवकाला पाठवण्यापूर्वी चार-पाच वेळा स्वत:च या युवकाची तपासणी केली होती.
युवकाला असं वाटू नये, की डॉक्टरांचं एखादं रॅकेट पैसे उकळण्यासाठी त्याच्या भावनांशी खेळतय, या भीतीने सनालीने त्याच्याकडून फक्त एकाच वेळचे पैसे घेतले होते. नंतर तिच्या मनात असंही आलं की एकदा घेतलेली फीदेखील परत द्यावी. पण यामुळेदेखील त्याच्या मनात संदेह निर्माण झाला असता, म्हणून तिने सगळ्या गोष्टी रसबालाला सांगून त्याला तिचाकडे पाठवले.
त्या युवकाचा नाव सौरभ होतं. डॉ. सनालीकडे येण्यापूर्वी जवळ जवळ दोन महीने तो जिममध्ये जात होता. ही जीम सनालीच्या नर्सिंग होमच्या परिसरात होती आणि तिचे पतीच ती चालवत होते.
सौरभने जेव्हा ती जीम जॉइन केली, तेव्हा पहिले दोन आठवडे सगळं ठीक ठाक चाललं. या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच सौरभनेदेखील तिथे ठेवलेल्या उपकरणांची माहिती घेतली आणि प्रॅक्टीस सुरू केली. पण हळू हळू जीमचे संचालक, जे कोचही होते, त्यांनी नोट केलं, की सौरभ इतर मुलांप्रमाणे एक्सरसाईज करत नाहीये. त्याचे लक्ष केवळ आपली छाती फुगवण्याच्या एक्सरसाईजवर केन्द्रित झालेलं आहे.
सौरभ एका कंपनीत नोकरी करत होता. विवाहित होता. आपल्या ऑफीसनंतर बाईकवरून जिमला येत होता. वय होतं जवळ जवळ चोवीस. कोचाला वाटलं, याला बहुतेक सैन्यात किंवा पोलीसमध्ये नोकरी करायची असावी. म्हणून चेस्ट इम्प्रुमेंव्हेंटसाठी प्रयत्न करतोय. कोचने एकदा त्याला सांगितलं, ‘पळण्यासाठी मजबूत पिंढर्या आणि स्नायुंची मजबुती आवश्यक आहे. इकडेही लक्ष दे, नाहीतर असंतुलीत ग्रोथ होईल.
सौरभने यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो आपल्या आभ्यासाला लागला. एक दिवस मसाज करणारा मुलगा संचालकांना म्हणाला की हा सौरभ लेडीज क्रीमने मसाज करण्यावर जोर देतोय. तेव्हा त्यांचं डोकं ठणकलं. त्यांना नंतर असंही कळलं, की महिलांसाठीची ही महाग क्रीम सौरभ स्वत:च विकत आणून देतो. संचालकांनी एकदा सौरभला आपली डॉक्टर पत्नी सनालीला भेटायला सांगितलं. तिने सौरभची इच्छा जाणून त्याला हार्मोन ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. तिने सौरभला सांगितले, की कधी कधी मुलांच्या शरिरात हार्मोन्सच्या असुंतलनामुळे मुलींसारखा लुक आणि इच्छा दिसू लागतात. त्यामुळे त्याला औषधे आणि इंजक्शन्स घेऊन आपले शरीर पुष्ट करायला हवे. पण तिला जेव्हा कळले, की सौरभ स्वत:च आपली छाती महिलांप्रमाणे वाढवू इच्छितो, तेव्हा ती थक्क झाली.
तिने सौरभला वक्ष वाढवणारी औषधे आणि इंजक्शन्स दिले, मात्र तिच्या मनाला ही गोष्ट पटली नाही. अखेर ती डॉक्टर होती. तिला वाटलं आपल्या पेशाची जबाबदारी यापेक्षा किती तरी मोठी आहे. एका रोग्याला एका रोगातून बाहेर काढून दुसर्या रोगाकडे जाणून बुजून ढकलण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही. त्यांनी सौरभला समजावलं की त्याने आपल्या व्यक्तिमत्वाशी असे खेळ करू नयेत. तो चांगल्या उंचीचा – बांध्याचा, चांगल्या परिवारातला स्वस्थ युवक आहे. तो का आपली छाती बायकांप्रमाणे वाढवू इच्छितो? मुलं जेव्हा छाती वाढवतात, तेव्हा सार्या शरीराची मजबुती आणि स्वास्थ्य इकडे लक्ष देतात कारण त्यांना सेना, पोलीस यासारख्या सुरक्षेसंबंधीच्या सेवाकार्यात जायचे असते. छत्तीस इंच छाती पुरुषोचित पद्धतीने वाढलेलीच चांगली दिसते. त्याबरोबर पुरं शरीर तंदुरुस्त वाटू लागतं.
डॉक्टर सनाली म्हणाली, ‘आपल्याला माहीत आहे शरीरातील हार्मोनल गडबडीमुळे ज्या युवकांची छाती आशा पद्धतीने वाढते, त्यांना किती शरम वाटते. घट्ट कपडे घालून ते ती लपवण्याचा प्रयत्न करतात. ’
सौरभ काहीच बोलला नाही, पण त्याने असाही संकेतही दिला नाही की डोक्टरांचं बोलणं त्याला समजलय आणि तो त्याच्याशी सहमत आहे. डॉक्टरांनी ही गोष्ट निसर्गाचा प्रकोप आहे, असं मानलं. तिला आठवलं मागे एकदा एक पोलीस अधिकारी बघता बघता स्त्रीची वेशभूषा धारण करून तिच्याप्रमाणे वागू लागला होता. शरिराची ही विचित्र माया कुणाला कळणार? त्यांनी सौरभला अनुभवी मनोचिकित्सक डॉ. रसबालाकडे पाठवलं. एका युवकाला जाणून बुजून आजारी मानसिकतेच्या रस्त्याने जाऊ दिलं, या अपराधबोधाचं ओझं ती वागवू इच्छित नव्हती.
डॉ. रसबालाला हे ऐकून आश्चर्य वाटलं, की तो आई – वडलांच्या बरोबर रहातोय आणि त्याला एक दीड वर्षाची मुलगी आहे. त्याच्या पत्नीबद्दल विचारताच तो एकाएकी गप्प बसला. त्याचे डोळे भिजलेल्या हिर्याप्रमाणे चमकून सजल होऊ लागले.
‘इज शी नो मोअर…. ’ डॉटरांनी विचारले.
…………..
‘हं… बोला ‘
‘गेल्या वर्षी एका दुर्घटनेत ती गेली. माझे आई-वडील माझा दूसरा विवाह करू इच्छितात. पण मी माझ्या मुलीचं पालन पोषण करू इच्छितो. ’ सौरभ म्हणाला.
‘मग आई-वडीलांचं ऐका. ते बरोबर बोलताहेत. ’
‘पण मी माझ्या मुलीला काहीच नकली किंवा दुय्यम दर्जाचं दिलेलं नाही. जर मी तिला योग्य आई देऊ शकलो नाही, तर माझी दिवंगत पत्नी मला मुळीच माफ करणार नाही. ’
डॉ. रसबाला म्हणाली, पण यासाठी आणखीही मार्ग आहेत. तुम्ही विवाह करू नका. मुलीचं पालन पोषण करा. तिला शिकवा, पण तुम्ही आपली पर्सनॅलिटी का बादलू इच्छिता?… इट्स स्ट्रेंज… ’
‘आपल्याला माहीत नाही डॉक्टर, रात्री माझी मुलगी माझ्याजवळ झोपते. झोपेत प्रेमाने ती आपला हात माझ्या छातीवर ठेवते. त्यावेळी मला स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण…. ’
‘पण काय?’ डॉ. रसबालाने विचारलं.
‘पण कधी कधी ती झोपेत अतिशय घाबरते. माझ्या छातीवर हात ठेवताच कधी कधी तिला याची जाणीव होते की तिची आई तिच्याबरोबर नाही. ती घाबरते आणि झोपेत ती माझ्यापासून दूर जाते. मी तिच्या भावी जीवनासाठी तिच्या मनात एक हार्मोनल फेंसिंग बनवू देऊ इच्छितो. एक कुंपण, जिच्या आत ती स्वत:ला सुरक्षित समजेल……
डॉ. रसबाला आपल्या सीटवरून उठली आणि तिने सौरभला हृदयाशी धरले आणि दुसरीकडे तोंड फिरवून रुमालाने आपले डोळे टिपले.
सौरभ जेव्हा केबीनचं दार उघडून वेगाने बाहेर पडला, तेव्हा बाहेर बसलेला सहाय्यक हे पाहून आश्चर्याने थक्क झाला, की चार तास डॉक्टरांकडून इलाज करून घेऊन, पैसे न देताच हा माणूस निघून जातोय आणि डॉक्टरांनी निळा दिवा लावला नाही, जो डॉक्टर नेहमी फी घेण्यासाठी संकेताच्या स्वरुपात लावतात.
☆☆☆☆☆
मूळ हिन्दी कथा – ’हार्मोनल फेंसिंग‘
मूळ लेखक – श्री प्रबोध कुमार गोविल
मो. 9414028938
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
बाल्कनीत उभा राहून मी रस्त्यावरची मिरवणूक पहात होतो. नवरात्र चालू होतं. दररोजच रात्री अशा छोट्या मोठ्या मिरवणुकीने लोक टेकडीवरच्या देवीच्या दर्शनाला जातात.
आज का कोण जाणे, पण हा देवीचा जयजयकार ऐकून, मला आमच्या शाखेतल्या श्री. मानमोडे साहेबांची एकदम आठवण झाली. काहीही कारण नसताना.
अगदीच काही कारण नाही असंही म्हणता येणार नाही म्हणा. त्याचं काय आहे की, हे आमचे मानमोडे साहेब, वय ५४ वर्षे ७ महिने, हे आमच्या शाखेतले एक जबाबदार अधिकारी. अतिशय साधे, शांत, सज्जन, पापभिरू, आनंदी गृहस्थ. गेली ३१ वर्षे, अगदी मनापासून नोकरी करत आलेले.. काळाच्या ओघात मिळत गेली ती प्रमोशन्स स्वीकारत आता डेप्युटी मॅनेजर पदापर्यंत पोहोचलेले…
दर गुरुवारी बँकेतल्या दत्ताच्या फोटोला, चतुर्थीला गणपतीच्या फोटोला हार आणि नैवेद्याला नारळ मानमोडे साहेबांचाच, हा जणू Book of Instructions मधला भाग, एवढे हे देवभक्त. अगदी टेबलाच्या ड्रॉवरमध्येही देवादिकांचे छोटे फोटो कायम ठेवलेले, अगदी सहज दिसतील असे. त्या देवाच्या कृपेनेच आत्तापर्यंत सर्व आलबेल आहे ही त्यांची गाढ श्रध्दा.
असं सगळं अगदी व्यवस्थित शांतपणे चालू होतं. आणि अचानक बँकेत एक झंझावात आला. V. R. S. नावाचा… अधिकाऱ्यांसाठी वय वर्षे ५५ च्या पुढे असण्याची अट होती. त्याचे फायदे, तोटे, घरच्या गरजा, सर्वांचा आपापल्या परीने सारासार विचार करून अनेकांनी त्यासाठी अर्ज केले. मानमोडेसाहेबही त्यात होते.
सर्वांची सहनशक्ती पुरेशी ताणून झाल्यावर, बँकेने retire होणा-या लोकांची यादी जाहीर केली. पण इथे मात्र देवाने मानमोड्यांची प्रार्थना कबूल केली नाही. जन्मायला काही महिने उशीर केल्याचे कारण देवून त्यांचा अर्ज reject झाला. आणि ते retire होऊ शकले नाहीत.
आणि इथूनच बँकेतल्या वातावरणाला, प्रत्येकाच्या कामाला, कामाच्या ताणाला वेगळंच परिमाण मिळालं. आमच्या शाखेतले ११ पैकी ७ अधिकारी V. R. S. मध्ये निवृत्त झाले. सुखाने-आनंदाने- बरंच मोठं डबोलं घेऊन घरी गेले. आणि कामाचं डबोलं मात्र इतरांच्या डोक्यावर अलगद ठेवून गेले. आधी एक नवीन आव्हान म्हणून.. किंवा खरं तर दुसरा काही पर्यायच नाही म्हणून, राहिलेल्यांना काम करणं भागच होतं. काळ हेच सर्वांवर औषध या नियमाने, राहिलेल्या लोकांमध्येच कामकाजाची घडी बसवावीच लागत होती. हळूहळू सगळेच जण या बदलालाही सरावले. इतके की, काही बदललंय हेही विस्मरणात जावं लागलं.
पण आमचे मानमोडे मात्र हळूहळू जणू आमूलाग्र बदलू लागले. शारीरिक कुवतीपेक्षा खूपच जास्त काम करावं लागत होतं त्यांना. त्यांच्या आवडत्या देव-देवतांसाठीही त्यांना पुरेसा वेळ देता येईनासा झाला त्यांना. ते सतत अस्वस्थ वाटू लागले. हळूहळू शरीरही त्रास देऊ लागले. सर्व अवयव आपले महत्त्व पटवून देऊ लागले. मानदुखी, पाठदुखी, बी. पी. आणि काय काय… रोज नवीन नवीन भेटीगाठी होऊ लागल्या. डॉक्टरांकडचे हेलपाटे वाढले.
आणि काही दिवसातच, V. R. S. मुळे झालेल्या बदलानेही तोंडात बोट घालावे असा एक आश्चर्यकारक बदल आमच्या मानमोडेसाहेबांमध्ये झालेला दिसू लागला. ड्रॉवरमधल्या देवांच्या फोटोंवर हळूहळू गोळ्यांच्या स्ट्रिप्स साठत होत्या. वाढत होत्या. आता देव पूर्ण झाकले गेले. मानमोडे वारंवार सगळ्या गोळ्या, मलमं जागेवर आहेत की नाही पाहू लागले. जणू नाही पाहिलं तर अचानक लुप्त होतील ती. हळूहळू तर, पूर्वी देवाला करायचे, तसा त्या औषधांनाच येता-जाता नमस्कार करू लागले ते. इकडे देवांच्या फोटोंचे हार पार वाळून वाळून गेले. प्रसाद-बिसाद तर लांबच. मानमोड्यांच्या डोक्यावर काही परिणाम वगैर तर झाला नाही ना अशी कुशंका भेडसावू लागली आम्हाला ! नाही म्हटलं तरी, आम्हा सर्वांचा, आमच्याही नकळत जीव होता ना त्यांच्यावर !
शेवटी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंच की त्यांच्याशी बोलायचं. त्यांना मन मोकळं करायला लावायचंच. आणि एका शनिवारी आम्ही ३-४ जण काही ना काही निमित्त काढून त्यांच्या टेबलाशी जमलो. काम उरकत आणल्याने मानमोडेही जरा relaxed वाटत होते.
आणि आम्ही बोलता बोलता विषय काढला. आमची काळजी बोलून दाखवली. विचारू लागलो की ते एवढे बदललेत कसे? का? त्यांची देवभक्ती गेली कुठे? देवांची जागा औषधांनी घेऊन सुध्दा, ते परत पूर्वीसारखे शांत कसे वाटायला लागलेत हल्ली? ते मनाने तर खचले नाहीत ना? देवावरचा त्यांचा विश्वास तर उडला नाही ना? तसं असेल तर हे सगळं कशामुळे? V. R. S. मध्ये नाव नाही म्हणून? की दुप्पट तिप्पट काम पडतंय ते झेपत नाहीये म्हणून? की अनेक शारीरिक व्याधी साथीला आल्यात म्हणून?
आम्ही आमची खंत बोलून दाखविली मात्र, मानमोडे जोरजोरात हसायलाच लागले. आम्ही नुसतेच एकमेकांकडे बघत राहिलो. हसणं थांबल्यावर साहेब शांतपणे पण आत्मविश्वासपूर्ण बोलू लागले…
‘‘अरे, तुम्हाला माझी इतकी काळजी वाटते हे पाहून माझं मन अगदी भरून आलंय. आता मला सांगावंच लागेल तुम्हाला सगळं…” आम्ही जिवाचे कान करून ऐकू लागलो.
‘‘काही दिवसांपूर्वी मला साक्षात्कार झाला. असे दचकू नका. स्वप्नात येऊन देव बोलला माझ्याशी स्वत:! अहो खरंच. आमच्या बोलण्याचा सारांश सांगू का तुम्हाला? ऐका. आपण पूर्वीपासून ऐकत आलोय ना की देव वेगळ्यावेगळ्या रूपात आपल्या भक्तांच्या हाकेला धावतो ते. एकनाथांसाठी तो श्रीखंड्या झाला. जनीबरोबर दळणं दळली त्याने. कबिराचे शेले विणले. अरे पण या कलियुगात भक्तांच्या हाका इतक्या वाढल्या की देव जरी झाला तरी किती रुपं घेणार तो? नाही का! सांगा की. मग त्यानं अशी वेगवेगळी रुपं घ्यायचं आणि माणूस म्हणून भक्तांना मदत करण्याचं थांबवलंच आहे आताशा. निदान क्षुल्लक गोष्टींसाठी कुणी धावा करत असेल तर तो स्वत: नाहीच धावून येऊ शकणार यापुढे. अरे, असं आSSS वासून काय पहाताय माझ्याकडे? खरंच सांगतोय मी. आता माझंच उदाहरण घ्या ना. मी पूर्वीसारखा देवभक्त राहिलो नाही असं वाटतंय ना तुम्हाला? पण तसं काही नाहीये रे! मी पूर्वीचाच आहे. तसाच देवभक्तही आहे. फक्त देवाचं रूप बदललंय हे माझ्या लक्षात आलंय आणि तुम्हाला वाटतंय की मी बदललोय. ”
आता मात्र आम्ही पारच बुचकळ्यात पडलो. मानमोड्यांना भ्रम तर झाला नाही ना ही आमच्या मनातली शंका बहुदा आमच्या चेहे-यावर दिसत असावी. कारण आम्हालाच समजावत मानमोडे साहेब पुढे बोलू लागले… ‘‘अरे खरंच सांगतो मी नाही बदललो. पण माझ्या देवाचं रूप मात्र बदललंय ! या नव्या रूपात देव क्षणोक्षणी माझ्या हाकेला धावून येतोय. म्हणून मी निश्चिंत आहे आता. नाही ना कळत? अरे असे घाबरू नका. मी पूर्ण शुध्दीवर आहे म्हटलं. थांबा, आता मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो सविस्तर…”
आता साहेब जरासे सावरून बसले आणि आम्हालाच भांबावल्यासारखं वाटायला लागलं. आम्ही ऐकू लागलो…
‘‘असं पहा, गेल्या ५-६ महिन्यांपासून, माझं मानमोडे नाव सार्थ व्हावं या सद्हेतूने, खरंच माझी मान मोडेपर्यंत बँक मला कामाला लावतीये! पण माझी त्याबद्दल तक्रार नाही. हल्ली वरचेवर पाठ, कंबर दुखते. पण तरीही माझी तक्रार नाही. इतकंच काय, अहो तीन तीन assignments सांभाळता सांभाळता माझं बी. पी. ही वाढू लागलंय, रोज डोकंही दुखतंय. पण तरी मी चिंता करत नाही. अधूनमधून साखर वाढते, छातीचे ठोके अनियमित होतात पण तरीही मी.. माझं मन शांत रहातं ! का? कारण मला साक्षात्कार झालाय ना! अहो कसला काय? थोडं डोकं चालवा कधी तरी! अरे आता माणसांमध्ये देव शोधण्याचे दिवस नाही राहिले पूर्वीचे. आता देव निर्जीव वस्तूंच्या रूपानेही भेटतो म्हटलं ! सतत, आणि पूर्वीपेक्षा जास्त वेळा भेटतो मला तर तो. कुठे? अहो कुठे काय? त्याची किती रूपं गच्च भरलीयेत माझ्या ड्रॉवरमध्ये….. या गोळ्यांच्या, मलमांच्या रूपात ! आता तरी आलं की नाही काही ध्यानात?”
ड्रॉवर पुढे ओढून मानमोड्यांनी आतल्या देवदेवतांना एक उडता नमस्कार केला आणि ते पुढे बोलू लागले…
‘‘अहो, इतके महिने, काय वाट्टेल ते झालं तरी हा कामाचा गाडा मी ओढू शकतोय तो कोणाच्या जीवावर! आं! सांगा ना, या माझ्या कलियुगीन देव-देवतांचा तर धावाही नाही करावा लागत. उलट माझ्या दिमतीलाच जणू ते तयारच आहेत माझ्या ड्रॉवरमध्ये. या औषधांच्या रूपात! मग आता मला कसली काळजी? आता आणखी परत V. R. S. येऊ दे, परत त्यात मी reject होऊ दे. काही problem नाही. काम सहापट वाढू दे. No problem at all, कितीही काम पडू दे, कितीही दुखणी येऊ देत. चिंता नाही. माझा हा देव माझ्या मदतीला already धावून आलेलाच आहे. आणि सर्व संचारी आहे ना तो! माझ्या ड्रॉवरमध्ये राहतोय, माझ्या बॅगेत रहातोय. घरातल्या औषधाच्या पेटीत तर रहातोयच – अगदी ‘घरजमाई’ असल्यासारखा. आणि हो, माझ्या original देवात आणि माझ्यात आणखी एक गुपीत आहे बरं का! पण आता सांगूनच टाकतो तुम्हाला…
त्या देवाने मला promise केलंय, की जेव्हा मी त्याच्या या वर्तमानरूपांना कंटाळेन ना तेव्हा तो स्वत: येऊन, अगदी गुपचुप मला त्याच्या घरी घेऊन जाईल. मी जेथे असेन तेथून, अगदी on duty असलो तरीही. आणि अगदी या कानाचं त्या कानालाही कळू न देता… तेव्हा आता बोला. आणखी काय पाहिजे मला. तेव्हा हे पहा, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी पूर्वीसारखाच आता शांत आहे, आनंदी आहे आणि हो, देवभक्तही आहे. पटली ना खात्री?”
हे इतकं सगळं ऐकून बहुधा आम्हालाही जाणवलं की, अरेच्चा, असं असेल, तर मग आपल्यालाही भेटतोच आहे की देव अधून मधून, या नव्या रूपात !
आमच्या चेहे-यावरचे झरझर बदलणारे भाव आणि नकळत ‘हो-हो’ म्हणणारी आमची हलती मान पाहून मानमोडे खूष झाले. त्यांच्या या देवाला आणखी भक्त मिळाले, मिळतच रहाणार याची खात्री वाटण्यासारखीच परिस्थिती होती ना !
आमच्या या असल्या अवस्थेत, मग हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवून, मानमोडे साहेबांनी जणू order च सोडली. हं, आता म्हणा माझ्या बरोबर…
मान दुखतेय? जय moov… जय Voreran
डोकं दुखतंय? जय जय झंडू बाम… जय डिस्प्रिन…
पाठ दुखतेय? जय ब्रूफेन
ताप आलाय? जय क्रोसीन
बी. पी. वाढतंय? जय जय स्टॅमलो… जय कार्डोज
साखर वाढली? जय इन्सुलिन, जय जय Glynase
पित्त वाढलं? जय जय जेल्युसिल, जय भोले सूतशेखर
कंबरदुखी? जय जय लम्ब्रील
आणि हो… विसरू नका…
देवाची ही इतकी रूपं एकाचवेळी अनुभवण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल…
दत्तुला मी पहिल्यांदा पाहिलं ते कसारा लोकल मध्ये. ढगळ पॅंट.. कधीकाळी ती चॉकलेटी रंगाची असावी.. पण आता विटलेली.. पांढरा मळका शर्ट.. पायात चपला.. उंच.. शिडशिडीत अंगयष्टी.. तांबुस गोरा रंग.. दोन तीन दिवसाची दाढी वाढलेली.. दरवाज्याशीच उभा होता तो. पाठीवर सॅक.. पायाशी दोन तीन पिशव्या.
संध्याकाळची वेळ होती, साहजिकच ट्रेन गच्च भरली होती. मी मुंबईहून येत होतो. आसनगाव स्टेशन जवळ आलं.. उतरणारे दरवाजा पाशी गोळा झाले. त्या गर्दीत दत्तु होता.. अर्थात त्या वेळी मी त्याला ओळखत नव्हतो. दत्तु जवळ खुप सामान होतं. त्या गर्दीतून सामानासकट बाहेर पडणं म्हणजे तसं कठीणच. त्याच्या त्या सामाना मुळे बाकीचे प्रवासी चिडचिड करत होते.. त्याला शिव्या घालत होते.. पण दत्तुला त्याची सवय असावी. त्याचं त्या लोकांकडे लक्षच नव्हतं.
स्टेशन आलं. प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर दत्तुही बाहेर प्लॅटफॉर्मवर फेकला गेला.. त्याच्या सामानासकट. पण एक पिशवी आतच राहीली.. तो गाडीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, पण लोकल सुटली. ती पिशवी आतच राहीली.
नंतर कधीतरी असंच मुंबईहून येताना तो दिसला. त्या दिवशीच्या घटनेनं तो लक्षात राहीला होता. आणि आज तर तो शेजारीच होता. तश्याच पिशव्या घेऊन. त्याला मी विचारलं.. त्या दिवशी लोकलमध्ये राहीलेल्या पिशव्या मिळाल्या का?
तर नाही.. असं होतं म्हणे कधी कधी. ती गोष्ट त्याने हसण्यावारी नेली. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. दत्तुचं छोटंसं किराणा दुकान होतं आसनगावात. दत्तु पाच वर्षाचा असतांनाच त्यांचे वडील गेले. आई आणि दत्तु उघड्यावर पडले. चार घरचे धुणे भांडी करुन आई बिचारी संसाराचा गाडा ओढत राहीली.
दत्तु शाळेत जात होता, पण अभ्यासात जेमतेमच. दहा बारा वर्षाचा असतांनाच शाळा सुटली. एका किराणा दुकानात काम करायला लागला. झुंबरशेठचं हे किराणा दुकान स्टेशन रोडवरच होतं. सकाळी आठ पासुनच उघडायचं.. ते रात्री नऊ पर्यंत. एवढा पुर्ण वेळ दत्तु त्या दुकानात असायचा. सकाळी साफसफाई करण्यापासून त्याचं काम सुरु व्हायचं.
गेली चाळीस वर्षे दत्तु त्या दुकानात काम करत होता. तसा आता तो दुकानाचा मालकच झाला होता. कारण झुंबरशेठला मुलंबाळं नव्हती. चार पाच वर्षांपूर्वी झुंबरशेठ गेले, आणि दत्तु दुकानाचा मालक झाला. त्या दिवशी ट्रेनमध्ये आमची ओळख झाली. मग ट्रेनमध्येच वरचेवर भेटी होत गेल्या.
तो नेहमी त्याच्या दुकानात बोलवायचा. पण मी टाळायचो. आसनगावला उतरायचं.. त्याच्या दुकानात जायचं.. पुन्हा कसारा लोकल पकडायची.. हे नकोसं होतं.
पण किती वेळा टाळणार ना! एकदा आसनगावला उतरलो, आणि त्याच्या दुकानात गेलो. दुकान छोटंसं होतं, पण गिर्हाइकं चांगली होती. दत्तुला बोलायला फारसा वेळ मिळाला नाही.
तेवढ्या वेळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली. कितीतरी किरकोळ गिर्हाइकं उधारीवर माल नेत होते.
“मांडुन ठेवा दत्तु भाऊ”
असं म्हणून सामान घेऊन जात होती. पण दत्तु ती उधारी कुठेच लिहुन ठेवत नव्हता. मला आश्चर्य वाटलं. मधुन जेव्हा त्याला उसंत मिळाली, तेव्हा मी त्याला विचारलंच.
“दत्तु.. तु उधारी कुठेच लिहून ठेवली नाही.. हे सगळं लक्षात बरं रहातं तुझ्या. “
“देतात हो आणुन लोकं. आणि जरी नाही आणुन दिली उधारी.. बुडवले माझे पैसे.. मला काही वाटत नाही”
“असं कसं?”
“काय होतं माझ्याजवळ एकेकाळी? दिले.. दिले.. नाही दिले.. नाही दिले. मी नाही विचार करत. जे राहील ते आपलं. “
दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हाच दत्तुचा स्वभाव होता. वास्तविक त्यालाही संसार होता.. बायको होती, एक मुलगा होता. पण दत्तु म्हणायचा..
“पोटापुरतं मिळतंय ना ! बस्स.. “
तेवढ्यात एकजण बारीक तोंड करून दत्तुच्या दुकानात आला.
“दत्तु भाऊ.. पोराच्या उलट्या थांबतच नाही ओ.. “
“मीठ पाणी द्यायला सांगितलं ना तुला?
“दिलं वं.. सगळं केलं.. “
दत्तुने आतल्या खोलीत डोकावून बायकोला हाक मारली..
“सुमे.. जरा वेळ बस.. आलोच मी.. “
आणि घाईघाईत तो त्या माणसासोबत निघून गेला. त्याची बायको दुकानात आली. मी तिला विचारलं..
“आता हा दत्तु तिथं जाऊन काय करणार?”
“हे असंच असतं त्यांचं.. दुकानात बुड काही ठरत नाही.. आता ते त्या पोराला दवाखान्यात घेऊन जातील.. सलाईन बिलाईन.. औषधं.. सगळं मार्गी लावतील.. आणि मगच दुकान आठवेल त्यांना. “
दत्तुला यायला बराच वेळ लागणार.. म्हणून मग मी त्याच्या बायकोचा निरोप घेऊन निघालो.
दुकानातील माल आणण्यासाठी दत्तु वरचेवर मुंबईला जायचा. अनेकांची मुंबईत कामं असायची. ते लोक बेलाशक दत्तुला सांगायचे.. दत्तु, येताना हे आणि.. ते आण.. आणि दत्तूही त्यांची ती कामं करायचा.
दत्तुचा माझा परीचय वाढला.. त्याला भेटलं की मला पु. लं. चा परोपकारी गंपु आठवायचा. गंपु जसा उठसूठ याला त्याला सल्ले द्यायचा.. तसंच दत्तुचं. मुंबईला तो वरचेवर जायचा. त्यामुळे साहजिकच एक जाणतेपण त्याच्याकडे आलं होतं. गावात कुणाकडे लग्न निघालं की दत्तुची धावपळ बघावी.
मंगल कार्यालयाच्या बुकिंग पासुन दत्तुचं मार्गदर्शन सुरु व्हायचं. केटरर कोणता निवडावा.. आदल्या दिवशी काय मेनु निवडायचा.. लग्नाच्या दिवशी ताटात कोणते पदार्थ असावेत हे दत्तुचं ठरवायचा.
साड्या घ्यायच्या ना.. हं ते कल्याणचा रूपसंगम आहे ना.. तिथुनच घ्या…. शालुची खरेदी? ती मात्र दादरला करा….. असं सुचवणं चालू व्हायचं.
बरं हे सगळं निरपेक्ष वृत्तीने. दुकान सोडून तास तास दुसऱ्यासाठी भटकायचा.. पण या सगळ्यात एक रुपयाची अपेक्षा त्यानं कधी ठेवली नाही. उलट आपल्या माणसाचे पैसे कसे वाचतील हीच त्याला चिंता.
आणि अशा या चिरतरुण दत्तुची पन्नाशी आली हे मला कधी कळलं.. तर त्याच्या बायकोचा फोन आल्यावर. गावातल्या लोकांनी आपल्या दत्तुचा पन्नासावा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. दत्तुला याची अजिबात कल्पना दिली नव्हती. त्याच्या बायकोला आणि मुलाला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम ठरवला होता. मला फोनवरून आमंत्रण आले.. जाणं आवश्यक होतं..
त्या दिवशी मी दत्तुची खरी श्रीमंती पाहीली. गावातले सगळ्या थरातले लोक घरचा कार्यक्रम असल्यासारखे जमले होते. स्टेजवर मोठं होर्डिंग.. त्यावर दत्तुचा फोटो.. त्याखाली गावातील कोणत्या तरी कवीने अभिष्टचिंतनाच्या चार ओळी लिहिल्या होत्या. स्पीकरवर सनई चालु होती.. मध्यमागी असलेल्या गुबगुबीत सोफ्यावर दत्तु आणि त्याच्या बायकोला बसवलं होतं. दोघांच्याही गळ्यात फुलांचे जाडजूड हार होते. दोघं बिचारे बुजुन गेले होते. लोक येत होते.. शुभेच्छा देत होते.. कोणी भेटवस्तू देत होते.. कोणी पाकिट देत होतं.. बुफेसाठी लागलेली रांग कमी होत नव्हती.. सगळीकडे आनंदीआनंद होता.