मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अ ल क … ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? जीवनरंग ?

☆ अ ल क … ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

०१  अलक   

     त्या भंगाराच्या दुकानात

     त्याला एक गाडी सापडली.

 

     बापाने चाके दुरूस्त करून दिली,

     आईने बॅटरी घालून दिली.

 

     आणि मग काय,

     गाडीच्या वेगाने

     त्याची कळीही खुलली.

 

०२  अलक

     “निवृत्त ती होत आहे

      आणि तणाव तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे.”

 

     “हो तर, तिची नोकरी होती

      म्हणूनच मी व्यवसाय करू शकलो.”

 

०३ – अलक

     “मला खात्री आहे, तूच मला वाचवणार”,

      शस्त्रक्रिये पूर्वी त्याचा हात हातात

      घेऊन माई म्हणाल्या.

     “तुझे बारसे जेवले आहे मी.”

 

      त्याला त्याचे बारसे आठवो ना आठवो,

      स्पर्श तेवढा विश्वास देऊन गेला.

 

०४ – अलक

     भर पावसातही

     ती छत्री तिरकी करून

     चालत होती.

 

     तिची अर्धी बाजू

     भिजताना पाहून

     तिला छत्री सरळ करायला

     सांगणार इतक्यात

     तिच्या दुसऱ्या बाजूला

     तिचा लहान मुलगा दिसला.

 

०५ – अलक

     एकेक फांदी तोडत बसण्यापेक्षा

     त्याने थेट झाडाच्या मुळावरच

     घाव घालायचे ठरवले.

 

     नकळत एक नेम चुकला आणि

     कुऱ्हाडीची आणि पायाची भेट झाली.

लेखक : म. ना. दे.

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

जुनी सांगवी.पुणे

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 5 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

” मी इथे बसलो तर चालेल ना ? “

आवाजाने मी ‘ नक्षत्रांच्या देण्यातून ‘, विचारातून भानावर आलो. आवाजाच्या रोखाने पाहिले. माझ्यापेक्षा अंदाजे पाच-सहा वर्षांनी लहान वाटणारी व्यक्ती मलाच विचारत होती, ‘मी इथे बसलो तर चालेल ना ?’

मला कितीतरी वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. मी ही कबीरबाबांना असाच प्रश्न विचारला होता.

” बसा हो.”

” धन्यवाद ! आपण ? “

” मी ? मी, सूर्य ढळलेला माणूस ! “

पूर्वीचा प्रसंग ऐकून नकळत माझ्या तोंडून मला त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तरच बाहेर पडले.

माझ्या उत्तराने ती व्यक्ती चमकली आणि माझ्या शेजारी येऊन बसत म्हणाली,

” तुम्ही बाबांना भेटला होतात ?  ओळखत होतात त्यांना ? “

” एकदा भेट झाली होती.. पण अजूनही लक्षात आहे. त्यालाही झाली असतील पंचवीसेक वर्षे.”

” पंचवीस वर्षे ? कसे शक्य आहे ? त्यांना जाऊन तर सत्तावीस वर्षे झाली. “

” वर्षांचा हिशेब आठवणीत कुठे राहतो ? आठवणीत फक्त क्षणांची गर्दी असते. काही मोजक्याच क्षणांचीच गर्दी. बाबांची भेटही तशीच. काही क्षण घडलेली. त्यांचे नावही मला ठाऊक नव्हते. मी त्यांना मनोमन कबीरबाबा असे नावही दिले होते. मी त्यांना नाव विचारले होते, नाही असे नाही  तेंव्हा त्यांनी हेच उत्तर दिले होते, ‘ सूर्य ढळलेला माणूस ! ‘

” हो. ते शब्द नेहमी त्यांच्या तोंडात असायचे. “

ते म्हणायचे नाव काहीही असले तरी आपली खरी ओळख हीच असते. उगवत्या सूर्याचे कौतुक असते. कोवळी कोवळी किरणे मनाला उल्हासित करतात, एखाद्या बालकासारखी. मध्यानीचा सूर्य आपल्या मस्तीतच तळपत असतो. आपण साऱ्या जगाला प्रकाश देतो याची त्याला जाणीव झालेली असते. कुटुंबातील कर्ता-सवरता माणूस असाच असतो… आणि सूर्य मावळतीला गेला की आपला अस्त जवळ आला असल्याची जाणीव त्याला होत असावी. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे याची कृतज्ञतापूर्वक जाणीव इतरांना असत नाही. ते फक्त मावळत्या सूर्याची शोभा पहात असतात.  त्यांना तो सूर्य क्षितीजपार झालेला, मावळलेला पहायचा असतो. त्यांच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता संपलेली असते. उगवत्या सूर्याची प्रतीक्षा त्यांच्या मनात असते.

” आयुष्यभर खस्ता काढून थकली-भागलेली माणसे अशीच…. “

” हो. फक्त अडचण ठरणारी. कुणीही उठ म्हणले की उठावे लागणारी..”

माझ्या मनात घरातील प्रसंग तरळून जाऊ लागले.

” तुम्हांला सांगतो, खूप वाईट वाटते हो , बाबांची आठवण आली की.. या वयात अपेक्षा असतात त्या काय आणि किती ? पण आम्ही त्याही पूर्ण करू शकलो नाही. प्रेमाने दोन शब्द बोलायला, विचारपूस करीत दोन क्षण जवळ बसायलाही आम्हांला वेळ मिळाला नाही.. वेळ मिळाला नाही म्हणणेही चुकीचेच आहे. आम्हांला जाणीवच झाली नाही कधी त्याची. “

” त्यावेळी तुम्ही मध्यान्ही तळपत होता ना ! हे असेच असते हो … फार वाईट वाटून घेऊ नका. ही जगराहाटीच आहे. एक विचारू ? “

” विचारा. “

” ही चुकल्याची जाणीव तुम्हांला कधी झाली ? सूर्य ढळल्यावरच ना ? “

क्षणभर विचारात पडून तो म्हणाला,

” खरं सांगायचं तर हो. “

मी हसलो. मी पहिल्यांदा इथं आलो तेंव्हा माझी आणि बाबांची भेट झाली. त्यानंतर बाबा पुन्हा इथं आलेच नाहीत. अनंताच्या प्रवासाला निघून गेले.. इथल्या प्रवासाच्या अंतिम स्टेशनवर पोहोचले.. त्यांचा इथला प्रवास संपला. सूर्य क्षितीजपार गेला.  आज तो इथं आला म्हणजे… म्हणजे माझाही हा प्रवास संपत आलाय. आता उद्यापासून इथं यायचं कारण नाही, कुणाला अडचण वाटायचे कारण नाही.. कुणाच्या टी-पार्ट्या, कुणाचं रॅप-पॉप.. कुठंच अडचण नाही.

मनाला खूप बरं वाटू लागले… मोकळं मोकळं. जणू कसले तरी ओझे उतरून बाजूला ठेवून दिल्यासारखे, डोक्यावरून  उतरल्यासारखे.  

अंतिम स्टेशन जवळ आल्याचे जाणवले तसा प्रवासाचा सारा शीण उतरून गेल्यासारखे वाटू लागले.. एकदम ताजे-तवाने. माझा सूर्य आता क्षितिजापार चाललाय.

उद्या तो माझी वाट पाहिल, परवा वाट पाहिल, काही दिवस वाट पाहिल अन  वाट पाहण्याचं पुन्हा विसरूनही जाईल.. पण तो मात्र इथं येतंच राहील.. पुन्हा कुणीतरी नवागत इथं येईल. त्याला विचारेल,

‘ इथं बसले तर चालेल का ? ‘

तो विचारणाऱ्याकडे नजर टाकून म्हणेल,

‘ बसा. कुणीही तुम्हांला, ‘ इथून उठा, ‘ म्हणणार नाही. ‘

थोड्या वेळाने तो नवागत त्याला विचारेल,

‘ आपण ? ‘

तो म्हणेल,

‘ सूर्य ढळलेला माणूस. ‘

अन् दिशांदिशांमधून प्रतिध्वनी उमटत राहतील,

‘ सूर्य ढळलेला माणूस !’

‘ सूर्य ढळलेला माणूस !! ‘

‘सूर्य ढळलेला माणूस !!! ‘

◆ समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 4 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

“बाबा, लवकर या हं ! अंधार पडायच्या आत या… आणि जाता -येता वाहनाकडे लक्ष ठेवा.. वाहने किती वाढलीत हल्ली. “

पूर्वी फ़िरायला निघालो की सुनबाई रोज म्हणायची ते आठवले.  आता ती काहीच बोलली नाही. हल्ली ती माझे सगळेच बोलणे ऐकूनही न ऐकल्यासारखे करते. जणू मी दुसऱ्या कुणाशीतरी बोललोय. मी तिचे पूर्वीचे वाक्य आठवताच हसलो.. स्वतःशीच.

अलीकडे वस्ती किती वाढलीय. पूर्वी इकडे चिटपाखरूही नसायचे. आता तर रोज नवे एखादे घर होताना दिसतेच. किती ही वाहने ? रस्त्यावरून चालायचीही भीती वाटते. कितीही पाहून रस्ता ओलांडायचा म्हणले तरी रस्ता ओलांडेपर्यंत एखादे वाहन, निदान मोटरसायकल तरी येतेच. तो अगदी जवळ येऊन करकचून ब्रेक दाबून गाडी उभी करतो. त्यावेळी नेमके गोंधळल्यासारखे होते हो. पाय ही अचानक लटपटू लागतात. तोल जातोय की काय असे वाटू लागते. येणाऱ्या वाहनाचा अंदाजही न आल्याने पावले जागीच थबकतात तीच नेमकी त्या वाहनासमोर येऊन. अपराधीपणाचा भाव मनात येऊन भीतीने त्या वाचनाकडे नजर जाते. ते थांबलेले आहे हे पाहून थोडा धीर येतो. थोडे जलद चालून रस्ता पार करावा असा विचार मनात येतो. वाहनाचा चालक काही बोलत नसतो, नुसता पहात असतो पण त्याची नजर म्हणत असते,

 ‘धड चालता येत नाही तर मरायला येतात कशाला रस्त्यावर ? काही झाले, चुकून धक्का-बिक्का लागला तर नस्ता ताप. ‘

 त्याच्याकडे पाहून ओशाळवाणे हसत रस्ता ओलांडतो तेंव्हा जरा धीर येतो. वस्ती संपून नदीजवळ पाऊलवाटेवर आले की बरे वाटते.

 आता चालायला या पाऊलवाटाच बऱ्या. पावसाळ्यात निसरड्या असतात पण पावसाळ्यात बाहेर पडायला जमतंच नाही.. बाहेर पडावे असे कितीही वाटत असले तरी.

 पाऊलवाटेच्या उतारावरून काठीचा आधार घेत हळूहळू चालत नदीकाठच्या कातळावर आलो आणि टेकलो. अलीकडेच डाव्या बाजूला रेल्वेचा पूल झालाय.. कितीतरी उंच. कधीतरी नेमकी याचवेळी एखादी मालगाडी धडधडत पुलावरून जाते. आत्ताही इंजिनच्या शिट्टीचा आवाज ऐकू आला. नजर पुलकडे गेली. मालट्रक लादलेली मालगाडी धडधडत पुलावरून जात होती. आपल्याच गतीत, जगाची फिकीर नसल्यासारखी. साऱ्यांचे तसेच असते. जो तो आपआपल्या गतीने धावत असतो, मनात एखादे स्टेशन ठरवून. तिथे पोहोचले की पुढचे स्टेशन खुणावू लागते, साद घालू लागते. मग पुन्हा त्या स्टेशनच्या ओढीने पुन्हा धावणे सुरू. जीवनातील कितीतरी स्टेशने पार केली तरी धावणे सुरूच असते. दिसणारी, हवीहवीशी वाटणारी , खुणावणारी स्टेशने संपतात.. गती मंदावते. कुणाला हवेसे वाटणारे, कुणाला नकोसे वाटणारे एकच स्टेशन उरलेले असते, जिथे सर्वांचाच प्रवास संपत असतो.. पण ते स्टेशन कधी येईल कुणालाच माहीत नसते.. आपल्याही नकळत आपले शेवटचे स्टेशन येते आणि प्रवास संपून जातो. प्रवास संपल्याचे आपल्यालाही कळत नाही. दुरून स्टेशनचे दिवे मात्र लुकलुकत असतात, खुणावत असतात. प्रवासाच्या संधिकाळाची ही वेळ असते. मनात हुरहूर दाटून आलेली असते. दिल्या-घेतल्या क्षणांच्या आठवणींचा कल्लोळ असतो. काहीतरी द्यायचे , काहीतरी घ्यायचे, काहीतरी करायचे राहून गेलेले असते.

कुठूनतरी कानात स्वर गुणगुणतात,

‘गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे..’

‘नक्षत्रांचे देणे ‘  हे शब्द कानात, मनात रुणझुणत राहतात.

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 3 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

चहा घ्यावा असे वाटू लागले पण सूनबाईची चाहूल लागत नव्हती. कदाचित तिला झोप लागली असावी. सुखी आहे. आवाजाच्या एवढया गदारोळातही झोप लागली म्हणजे खरंच सुखी आहे.

खरेच झोप लागलीय की….?

काही वेळाने सूनबाईचा तिच्या खोलीतूनच चिडका आवाज आला तसा टेप खटकन बंद झाला. टेपचा आवाज बंद झाल्यावर सारे कसे एकदम शांत शांत वाटू लागले.

कितीतरी वेळ दुखऱ्या गुडघ्यांना प्रेमाने कुरवाळत बसून राहिलो. निदान त्यांचा तरी काही असहकार नको. तो काही आता परवडण्यासारखा नाही.

” मम्मी, मला चहा…”

नातवाचा आवाज ऐकला. सूनबाईच्या स्वयंपाकघरातील वावरण्याची चाहूल लागली.

आतातरी चहा येईल म्हणून वाट पहात बसलो.

चहाचा कप जवळच्या तिपायीवर आढळून सुनबाई निमूटपणे आत गेली होती.

कपबशीतूचा चहा आणताना बशीमध्ये चहाचा थेंबही सांडलेला मला आवडत नाही. तसे झाले तर पूर्वी

‘ साधा चहाचा कपही आणता येत नाही नीट ? ‘ 

असा मी चिडायचो पण आता काहीच बोललो नाही. अलीकडे चहा असाच मिळतो, निम्मा-अर्धा बशीत सांडलेला.चहाची कपबशी उचलून मुकाट चहा प्यायला सुरवात केली. चहा पिऊन संपायचा होता तितक्यात आतून सूनबाईचा आवाज ऐकू आला. ती नातवाला ओरडून सांगत होती,

” पसारा आवरून ठेव सारा. आमच्या मंडळाची टी पार्टी आहे आपल्याकडे. आत्ता अर्ध्या – पाऊण तासात येतील साऱ्यांजणी..”

हा इशारा आपल्यालाच आहे हे कळलं. तिच्याकडे कुणी येणार असले की तिला आपण घरात नको असतो. आपली अडचण होते.

गुडघे ‘ चदरिया झिनी रे झिनी ‘ आळवत असतात. कुठेही जायची इच्छा नसते पण जायला तर हवंच…  टी पार्टी आहे ना घरात.. सूनबाईची !

‘ बाबा, थांबा ना थोडावेळ. माझ्या मैत्रिणी येणार आहेत तुमची ओळख करून घ्यायला. ‘

सूनबाईचा पूर्वीचा आग्रह आठवला. उगाचंच. मनाला अलीकडे भूतकाळात, जुन्या आठवणीत रमायचा चाळाच लागून राहिलाय.

उठायला हवे. ‘बाहेर पडेस्तोवर चांगला अर्धा तास जाईल.

आता काठी घेण्यासाठी कुणी आठवण करण्याची आवश्यकताच उरलेली नाही, पण आठवणीने घड्याळ मात्र घ्यावे लागते. अलीकडे त्याचे आणि आपले सख्य तरी फारसे कुठे उरलंय ? बऱ्याचदा त्याची आठवणच होत नाही. पूर्वी तसे नव्हते.. मिनिटामिनिटाला त्याची आठवण व्हायची, त्याच्याकडे लक्ष जायचे. त्याच्या गतीबरोबर आपली गती मिळवणे तेंव्हा जमायचं.   ते तसेच चालते.. आपली चाल मात्र मंदावलीय. आता ते कितीही धावत असले तरी आपल्याला फारसा फरक पडत नाही. फक्त फिरायला जाताना आपण आठवणीने हातात बांधतो. आठवण झाली नाही तर ते ही नाही.

” चला, राजे हो !”

मी कुरकुरणाऱ्या, कटकटणाऱ्या गुडघ्यांना म्हणालो. हो. त्यांनी सोबत द्यायलाच हवी ना ?

” सुनबाई, फिरून येतो गं ! “

चपला पायात सरकवता सरकवता जरा मोठ्याने म्हणालो.

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 2 ☆  श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 2 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

” समजेल, तुलाही समजेल ते.. खरे तर तशी वेळ येऊ नये तुझ्यावर.. पण काय नेम, उद्याचा काहीच भरवसा देता येत नाही. बहुतेकांवर ती वेळ येते. स्वतःलाच स्वतःची अडचण वाटू लागते.. आणि मग कबीर आठवतो. मग तो जागा शोधू लागतो. कुणी उठ म्हणणार नाही, उठवणार नाही अशी जागा. आधी स्वतः बांधलेल्या स्वतःच्या घरात तशी जागा शोधू लागतो. स्वतःच्या घरात जागा मिळत नाही, दारात जागा मिळत नाही. कुणाच्या मनात जागा उरत नाही.. सगळीकडूनच उठवतात रे ! मग वावटळीत पाचोळा भरकटावा तसे भरकटत रहावे लागते. हं ! एक जागा असते, तिथे सारेच घेऊन जातात. स्वतःच्या हातांनी. आपले ओझे खांद्यावर वाहवत. आपली प्रतिष्ठापना केल्यासारखे त्या जागेवर बसवतात, झोपवतात. तिथून मात्र ‘उठ’ म्हणत नाहीत कोणी. पण तो भाग्याचा क्षण प्रत्येकाला वेळेवर लाभतोच असे नाही. ज्यांना नाही लाभत ते भरकटत राहतात .., इथे .. तिथे. पण इथे या ठिकाणी तसे नाही, इथे कसे, यावे वाटले तर यावे.  बसावे. उठावे वाटले तर उठावे नाहीतर बसून राहावे. कोणाची काहीच हरकत नसते. “

” बाबा, घरी वाट पहात नाहीत का ? “

” पाहतात ना ! सूर्य ढळल्यावर सूर्य केंव्हा बुडतोय याचीच सर्वजण वाट पहात असतात. एकदा का सूर्य बुडाला की त्यांचीही अडचण सरते.. पण क्षितिजावर सूर्य किती काळ रेंगाळेल हे काही सांगता येत नाही कुणाला. आपल्या हातात थोडेच असते ते ? “

गड नदीच्या पाण्यात अंधाराच्या सावल्या न्हाऊ लागल्या तसा मी उठलो आणि त्यांना म्हणालो,

” बाबा, अंधारून आले. चला निघुया आता. उशीर झाला आणखी तर वाट दिसायची नाही. “

तो हसला.

” तू जा. तुला अजून परतीच्या वाटा दिसतायत. “

” आणि तुम्ही ? “

” येणार तर.. यायलाच हवे. “

त्याच्या स्वरांत हतबलता विसावलेली होती. नकळत त्या बोलण्याला कारुण्याची झालर चिकटली होती. त्याचे ते अगम्य बोलणे माझ्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी दडून राहिले होते.

मी कधीमधी फिरायला तिथेच जायचो.  गड नदीतील त्याच विशाल कातळावर विसावायचो.  मावळतीची शोभा न्याहाळायचो आणि अंधारून यायला लागले की परतायचो.  मला पुन्हा कधी ते बाबा दिसले नाहीत पण तिथे गेले की मला त्या बाबांची , त्या कबीरबाबांची आठवण यायचीच. हो. कबीरबाबाच. त्यांचे नावही मला ठाऊक नव्हते पण माझ्या मनाने, माझ्याही नकळत त्यांचे कबीरबाबा असे नामकरण केलेले होते.

दुपारी जरा कुठे डोळा लागतोय न लागतोय तोच नातवाने मोठ्या आवाजात टेप सुरू केला.

” अरे ss अरे, आवाज जरा कमी करा..”

मी जागेवरूनच ओरडलो पण माझा आवाज काही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. पोहोचला नाही म्हणजे तसा त्याच्या कानापर्यंत पोहोचला असणार पण मनापर्यंत पोहोचला नाही. तयार काही टेपचा आवाज कमी केला नाही.

त्या रॉक-पॉपच्या आवाजात दुपारची झोप, वामकुक्षी झालीच नाही. नुसते पडून राहावे असेही वाटेना म्हणून उठायचा प्रयत्न करू लागलो तर गुडघे कुरकुरायला लागले. अलिकडे गुडघ्यांनाही आपला भार पेलवेना झालाय वाटते.. उगाच मनात विचार आला.

पावसाची काहीही चिन्हे नसताना अचानक वळीव बरसावा तशी अचानक ओळ मनात बरसली.

‘ चदरिया झिनी रे झिनी..’

पुन्हा कबीरच.

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 1 ☆  श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 1 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

‘सूर्य ढळलेला माणूस..’

वाक्य विचित्र वाटलं ना ? मलाही ते तसंच वाटलं होते. ते वाक्य ऐकताच मी त्यांच्याकडे पाहिले होते ते अगदी चमत्कारिक नजरेने.

‘हा माणूस वेडा तर नाही ना ? ‘

माझ्या मनात त्यांचे ते वाक्य ऐकून पहिला प्रश्न निर्माण झाला होता तो हाच.

पण तो तर वेडा असल्यासारखा दिसत नव्हता. आता वेडेपण दिसता क्षणी ओळखता येते असे थोडंच आहे. दिसण्यात वेडेपणा न दिसणारे कितीतरी भेटतातच. तसाच तो असावा असें मला क्षणभर वाटून गेले, अगदी क्षणभरच. मी त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिले. डोळ्यांत कुठेही वेडेपणाची किंचितशी झाकही दिसून येत नव्हती. उलट त्याचे डोळे डोहासारखे दिसले शांत, निस्तब्ध, कोणतेही तरंग नसणारे! एखाद्या शांत, संयमी, विचारी माणसाचे डोळे असेच असतात काय ? मला ठाऊक नाही पण वेडेपणा पाहण्यासाठी मी त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिले तेंव्हा त्याच्या डोळ्यांत पाहताना का कुणास ठाऊक पण मला तो शांत, संयमी, विचारी असावा असे वाटू लागले आणि मग त्याचे  ‘ सूर्य ढळलेला माणूस ‘ या शब्दांचे मात्र गूढ वाटू लागले.

” काय म्हणालात बाबा ? ‘सूर्य ढळलेला माणूस ‘? म्हणजे ? मी काही समजलो नाही. “

तो गृहस्थ हसला. हसण्यातही गूढ असावे असे वाटावे तसा.

मी तिथे बसू नये म्हणून तर त्यांनी मला तसे उत्तर दिले नसावे ? हा विचार मनात येताच मी तिथून उठू लागलो. मी उठतोय हे पाहून तो म्हणाला,

” बस. इथून उठ असे तुला कुणीही म्हणणार नाही. “

” म्हणजे बाबा ? “

” अरे, कबिरानेच सांगितले आहे ना,

” ऐसी जगह बैठीये, कोई न कहे उठ ।’  ही तशीच जागा आहे बघ. इथून उठ असे कोणीही म्हणत नाही. “

” म्हणजे ? कोणीतरी ,कधीतरी इथून उठ असे म्हणेलच ना ? “

” नाही. कुणीच म्हणत नाही. इतकी वर्षे बसतोय मी इथे पण आजवर कुणीसुद्धा म्हणले नाही मला तसे…”

तो बोलायला लागला होता पण त्याच्या पहिल्या गूढ वाक्याबद्दलचे कुतूहल अजूनही माझ्या मनात होते. ‘ सूर्य ढळलेला माणूस.’ त्याचे नंतरचे बोलणे मात्र एखाद्या विचारवंतासारखेच वाटत होते.

” तुला इथून उठवण्यात कुणाचा काही फायदा असेल तरच ते तुला उठ म्हणतील ना ? “

तो पुढे म्हणाला. मनात विचार आला, खरेच जर एखाद्या ठिकाणी आपली अडचण होत असेल तरच आपल्याला तिथून उठवतात. इथे कुणाला आपली अडचण होणार आहे?  झालीच अडचण तर ती त्यालाच होईल.

” तुम्हांला पण माझी अडचण होणार नाही ? “

” मला ? “

तो हसला. स्वतःशीच हसल्यासारखा.

” मला आता माझीच अडचण वाटू लागलीय..  आणि स्वतःला स्वतःची अडचण वाटू लागते ना, तेंव्हा दुसऱ्या कुणाचीच अडचण वाटत नाही. “

” स्वतःला स्वतःचीच कधी अडचण वाटते का बाबा ? “

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिधि… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ परिधि… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन

यवेळी गगनने आपली मैत्रिण श्रुती हिच्याबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा ठरवला. व्हॉट्स् अॅ पवर त्याने श्रुतीला मेसेज केला, `तुझी इच्छा असेल, तर आपण आज लाँग ड्रईव्हला जाऊ.’

श्रुतीने सहर्ष मान्यता दिली. थोड्याच वेळात दोघे लाँग ड्रईव्हवर निघाले. झाडा-झुडपांमधून गेलेला शांत, निवांत रस्ता, रस्त्यावरून सरपटणारी लक्झरी कार,  रोमँटिक गाणी,  मनातही रोमान्स चरम सीमेवर… अशात श्रुती अचानक म्हणाली, `गगन चल, परत जाऊ या.’

आश्चर्याने गगनने विचारले, `का ग? अद्याप आपण अर्धा प्रवाससुद्धा केलेला नाही.’

श्रुती हळुवारपणे म्हणाली, `मला वाटत नाही,  हा प्रवास पूर्ण व्हावा.’

तिच्या कानात आईचं बोलणं गुंजत होतं. जेव्हा ती नटून-थटून घरातून बाहेर पडताना आईला म्हणाली होती,  `आई मी जातेय.’  तेव्हा आईने तिला हे विचारलं नाही की कुठे चाललीयस?  तिचे एकंदर हाव-भाव बघून एवढंच म्हणाली, `इतकीही दूर जाऊ नकोस  की जिथून परतणं मुश्कील होईल.’

मूळ हिन्दी कथा – परिधि – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विसर्जन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ विसर्जन… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी

चहाचा कप हातात दिल्यानंतर तो सांगत होता… “अरे त्या वर्षी अप्पांच्या पायाला दुखापत झाली होती आणि मीही लहान होतो ऐनवेळी गाडीही मिळेना म्हणून अगदी चुकचुकतच पहिल्या माळ्यावरच्या हमीदभाईंना ‘विसर्जन तलावापर्यंत येता का ?’ असं अप्पांनी विचारलं होतं …

माईने ‘त्याला’ कशाला विचारलंत म्हणून प्रचंड चिडचिडही केली होती… पण सुट्टीचा दिवस म्हणून घरी असलेले हमीदभाई ‘अरे बाप्पाला माझ्या गाडीतून काय तुम्ही हुकूम केलात तर माझ्या खांद्यावरूनही नेईन’  म्हणत तडक टेम्पोची चावी घेऊन आले होते… 

परत आल्यावर अप्पांनी बिदागी म्हणून दिलेलं भाडंही त्यांनी नाकारलं…

अप्पांना अवघडल्यासारखं झालं. मग माईने आग्रहाने हमीदभाईंना पुरणपोळी आणि मोदक खाऊ घातले… पुढल्या प्रत्येक वर्षी विसर्जन करून आल्यावरच्या पंगतीला हमीदभाईंचं हक्काचं ताट राहिलं…

आम्ही चाळ सोडली .. वस्ती बदलली… आमची घरं बदलली… हमीदभाईंच्या गाड्या बदलल्या, पण त्यांनी विसर्जनाचा मान सोडला नाही.. आम्हीही तो दुसऱ्या कुणाला दिला नाही… कुठेही असले तरी नेमके विसर्जनादिवशी तासभर आधी आरतीला हजर असायचे…

“अगं मोदकांसाठी येतो तो” असं अप्पा हमीदभाईंना चिडवत माईला म्हणायचे… “

तुझा बाप्पा बरकत देतो रे मला… त्याच्या निरोपाला मी नसेन, असं होणारच नाही ” …

२६ वर्षं हे अखंड चालत राहिलं … तीन वर्षांपूर्वी अप्पा गेले, तेव्हापासून ते न जेवता फक्त मोदक घेऊन जाऊ लागले… पण त्यांना भाडं विचारण्याची माझी हिंमत आणि तेवढी ऐपत अजून झाली नाही…

या मे महिन्यात हमीदभाई आजाराने गेल्याचं कळालं होतं … आज विसर्जन आहे… काय करावं सुचत नाहीय… आज माझी स्वतःची गाडी आहे रे… पण त्यांच्या निरोपाशिवाय आमचा बाप्पा कधी गेलाच नाहीय रे… विसर्जनच करूच नये असं वाटतंय…

“आरती करून घ्या रे…” या माईंनी दिलेल्या आवाजाने नंतरची मधली कितीतरी वेळ शांतता मोडली…

आरती संपल्यावर ती सुरू असताना मघाशी जिन्यात अवघडून उभा असलेला माणूस दाराशी आला… सगळ्यांच्या हातात प्रसादाचा मोदक दिल्यावर माईंनी त्याच्याही हातावर मोदक ठेवला… त्यांने तो अदबीने घेत माईंना सांगितलं …  “बाप्पा विसर्जनाला न्यायचाय ना… गाडी लेके आया हूं… हमीद खान चा मी मोठा मुलगा.. अब्बानी सांगून ठेवलं होतं… ते नसले, तरी अप्पांचा गणपती आपल्याच गाडीतून न्यायचा… परंपरा आणि आपला मान आहे… म्हणून आलो होतो…”

माईंनी भरल्या डोळ्यांनी आणखी एक मोदक त्याच्या हाती दिला… जो कदाचित हमीदभाईंसाठी होता….

कसंय… शेवटी देव धर्माचा असला तरी उत्सव हा नात्यांचा असतो… त्यातल्या “माणसां”चा असतो.. इतकंच…!!

लेखक : अज्ञात…🙏 

संकलन : सुश्री नेहा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ झाडाची व्यथा… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ झाडाची व्यथा… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन

आपल्या वृक्षमित्राला उदास बसलेलं पाहून चिमणी चिवचिवू लागली, `काय झालं दोस्ता? तू इतका उदास का?

झाडानं व्यथित स्वरात उत्तर दिलं, `चिमणुताई मला या ठिकाणी खूप असहज आणि असहाय्य असल्यासारखं वाटतं.’ चिमणी हसत हसत पुन्हा चिवचिवली. `काय चेष्टा करतोयस दादा! तू तर किती नशीबवान आहेस. तुझ्या आस-पास रोज सफाई केली जाते. खत-पाणी सगळं कसं नियमितपणे आणि वेळेवर मिळतं. एकदम हिरवागार आणि स्वस्थ दिसतोस तू. तुझं एक पान तरी तोडायची कुणाची हिम्मत आहे का? चोवीस तास या बागेचा पहारेकरी लक्ष ठेवून असतो. मग तुला दु:ख कुठल्या गोष्टीचं? ‘

वृक्षाच्या डोळ्यातून अश्रू टपकले. भरल्या डोळ्याने तो म्हणाला, `पण माझे बहुतेक सगळे नातेवाईक या बागेच्या बाहेर राहतात ना? इथे मी एकटा…’

मूळ हिन्दी कथा – पेड़ की व्यथा – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुझ्यासारखा तूच… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तुझ्यासारखा तूच… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन 

समीता आणि सुमीरच्या प्रेमाला ळूहळू रंग चढू लागला होता. आपली प्रेमभावना त्यांनी एकमेकांना बोलून दाखवली होती,  असं काही नाही, पण त्या दोघांनाही आतून ते जाणवलं होतं. येत्या व्हॅलेंटाईनच्या दिवसाची खूप स्वप्ने रंगवली होती समीताने. या दिवशी तो आपल्या प्रेमाचा उच्चार करेल, आपल्याला मागणी घालेल, याबद्दल खात्रीच होती तिला. ती सारखी व्हॉट्स् अॅरप हातात घेऊन बसली होती. सुमीरच्या आमंत्रणाची वाट बघत होती. पण संध्याकाळ सरत आली, तरी कुठलाही मेसेज नव्हता. इच्छा असूनही ती स्वत: पुढाकार घेऊ शकत नव्हती. यापूर्वी ते एकटे असे कधीच कुठे भेटले नव्हते.

व्हॅलेंटाईनचा दिवस सरला. व्हॉट्स् अॅीपवर हाय-हॅलो वगैरे काही झालं नाही. समीता साशंक होऊन बसली होती. `आपल्याला उगीचच वाटतय, त्याचं आपल्यावर प्रेम असावं. पण तसं नसणार, नाही तर काल त्याने मला भेटायला बोलावलंच असतं. पण नाही… नक्कीच त्याचं दुसर्यात कुणावर तरी प्रेम असणार. आजपासून त्याचं आणि आपलं नातं संपलं.’ तिला वाटत राहीलं.

रात्री काहीसा उशिराच सुमीरचा व्हॉट्स् अॅ्पवर मेसेज आला. काहीशा उदासपणेच तिने तो वाचला. मेसेज वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मेसेज होता, `खूप इच्छा होती तुला भेटायची. मी माझ्या मनाला कसे काबूत ठेवले, ते माझे मला माहीत. जाणून-बुजूनच भेटलो नाही. तुझ्या- माझ्या विवाहात येणार्यात आडचणी आ वासून समोर उभ्या राहिल्या. वेगळे धर्म, आर्थिक स्थितील केवढी तरी तफावत या सगळ्यामुळे आपला विवाह नाही होऊ शकला तर?  मला वाटलं, निंदा-नालस्तीचा एकही डाग तुझं चारित्र्य कलंकित करू नये.’

सुमीताने, धर्म, आर्थिक स्तर भिन्न असतानाही सुमीरलाच जीवनसाथी म्हणून निवडले. कारण इतका पवित्र विचार दुसर्याआ कुणी क्वचितच केला असता.

मूळ हिन्दी कथा – ऩजरिया प्रेम का – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print