सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… अंजु.. – भाग – ४३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

अखेर तुझी झुंज संपली. आज तू अनंतात विलीन झालीस.

या चिरनिद्रेत तुझ्या सार्‍या यातना, वेदना मिटून गेल्या. तुला अखेरचा अश्रुपूर्ण निरोप देताना म्हणेन, ‘ जिथे असशील तिथे सुखात रहा. ’ 

आठवणी खूप आहेत. साठ पासष्ट वर्षांची आपली निखळ मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण एकत्र होतो. त्यात निरागस बालपण होतं, तारुण्यातलं उमलणं होतं. दोघींच्याही वैवाहिक जीवनातले असंख्य क्षण, अनुभव, भलं-बुरं-आनंदाचं-दु:ख्खाचं सारं सारं सतत अगदी या संध्यापर्वातही कालपर्यंत शेअर केलं.

मैत्रीतली पारदर्शकता आपण सतत जपली.

तू अमेरिकेला गेलीस पण हे साता समुद्राचे अंतर सुद्धा आपल्यात मात्र अंतर पाडू शकले नाही.

अगदी परवा परवाच तू म्हणालीस, “तुझी आणि माझी मैत्री” हाच माझा खरा आनंदाचा ठेवा..!! “

अंजु, मी सुद्धा हेच म्हणेन. आपल्या या मैत्रीनेच आपल्याला घडवलं.

तुझी जीवनाबद्दलची सकारात्मकता, सदैव आनंदातच राहण्याची वृत्ती, एखाद्या गुलाबदाणीसारखा, गुलाबपाणी शिंपडणारा तुझा सहवास मला लाभला. मी किती भाग्यवान!!

झुंजार वृत्तीने तू या असाध्य व्याधीशी हसतमुखाने, स्वीकृत भावनेने लढत होतीस. कायम प्रसन्न राहिलीस. तुझा खिलाडुपणा, सारं काही सहज आणि आनंदाने विनातक्रार स्वीकारण्याचा तुझा स्वभाव शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होता.

आजकाल तुझा, खूप दिवस फोन आला नाही, मेसेज आला नाही की काळीज धडधडायचं. तुला फोन करण्याचं धाडसही व्हायचं नाही. “नो न्यूज ईज अ गुड न्यूज” असं समजून शांत रहायचा मी प्रयत्न करायची. आणि मग एक दिवस तुझा फोन यायचा,

“मी अगदी बरी आहे. मस्त आहे. चिंता नको करुस. इतक्यात नाही जाणार. अगं! उरलेले दिवस फक्त आनंदच वेचणार. “

मग खूप गप्पा. काॅलेजचे दिवस. त्या टिंगल टवाळ्या, काही गंमतीदार लोकांच्या आठवणी आणि खूप काही. तेव्हां माझेही जडावलेले श्वास स्थिर व्हायचे. तू खूप चांगल्या मूडमध्ये होतीस.

म्हणालीस, “ऐक हं! तुला एक छान गाणं म्हणून दाखवते.. ” किती सुंदर, भावपूर्ण, मधुर आवाजात गायचीस!

ते सूर मी माझ्या मनात ठेवलेत.

अंजु, आता तुझे नसणे सोसणं कठीण असलं तरी मी ठरवलंय्, रडायचं नाही. तुझ्या आठवणीतच रमायचं मी ठरवलंय्. तुझ्या मैत्रीचं दान तू मला दिलंच आहेस. तू नसलीस तरी माझी झोळी रिकामी नाही.

शांता शेळकेंच्या शब्दात तूही हेच म्हणत असशील ना?

असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे…

बाय अंजु.. निजधामी या सुखी रहा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments