सुश्री शोभना आगाशे
🌸 विविधा 🌸
☆ संत मुक्ताबाई व ज्ञानबोध ग्रंथ… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
(दि. २२ मे हा दिवस संत मुक्ताबाई यांचा पुण्यस्मरण दिन होता. त्यानिमित्त लेख)
☆
संत मुक्ताबाई म्हटलं की ताटीचे अभंग आठवतात. याव्यतिरिक्त ही त्यांचे कांही अभंग प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या अध्यात्मिक उंचीची कल्पना देणारा त्यांचा ‘ज्ञानबोध’ ग्रंथ फारच कमी लोकांना ठाऊक आहे. हा ग्रंथ सहजासहजी कुठे उपलब्ध नाही, हे याचं एक कारण असू शकते. या ग्रंथात संत निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्यातील संवाद अभंग रूपात येतो. हा ग्रंथ ‘नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय’ प्रकाशनाने १९७६ साली प्रथम प्रकाशित केला. याचे मूळ हस्तलिखित देखिल येथे उपलब्ध आहे. या ग्रंथाची निर्मिती संत ज्ञानेश्वर, सोपानदेव व चांगदेव यांच्या समाधीनंतर झाली असावी. या ग्रंथनिर्मिती नंतर कांही दिवसातच मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्या.
या ग्रंथाचे तीन विभाग करता येतील. पहिल्या भागात १२६ अभंगांतून निवृत्तीनाथांनी मुक्ता बाईंना बोलत्या करण्यासाठी केलेल्या विनवण्या आहेत व विचारलेले प्रश्न आहेत.
दुसऱ्या भागात या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५६ अभंगांतून दिलेली उत्तरे आहेत. ही प्रश्नोत्तरे संत नामदेव व इतर शिष्य गणांच्या उपस्थितीत झालेली आहेत.
तर तिसऱ्या भागात निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्यातील खाजगी संवाद आहे. एका अभंगातून निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारावा तर पुढच्या अभंगातून मुक्ताबाईंनी त्याला उत्तर द्यावे. असे २१ अभंग आहेत.
प्रत्यक्ष गोरक्षनाथांची भेट झाल्यापासून मुक्ताबाई आत्ममग्न स्थितीत असल्यामुळे अबोल झाल्या होत्या. म्हणून निवृत्तीनाथांनी वारंवार विनवण्या करून त्यांना बोलते केले आहे. कारण अध्यात्मिक दृष्ट्या मुक्ताबाई आपल्या पेक्षाही प्रगत आहेत याची निवृत्तीनाथांना खात्री पटली होती. एक गुरू आपल्या शिष्याची महती जाणून, त्याच्या चरणी कसा लीन होतो याचे हृद्य दर्शन पहिल्या भागात होते.
संत निवृत्तीनाथ येथे मुक्ताबाईंकडे आपली लहान बहीण किंवा आपली शिष्या म्हणून पहात नाहीत तर साक्षात् आदिमाया म्हणून बघतात.
प्रत्यक्ष आदिमायेने स्वमुखाने ब्रम्ह आणि माया यांच्या स्वरूपाची चिकित्सा करावी असा विलक्षण योग येथे जुळून आला आहे.
गोरक्षनाथांकडून प्राप्त ज्ञाना बद्दल मुक्ताबाईंनी बोलावं व आपल्याला मार्गदर्शन करावे अशी निवृत्तीनाथांची इच्छा आहे. म्हणून इथे गुरू शिष्याची तीच जोडी, परंतु गुरू व शिष्य यांच्या स्थानांची अदलाबदल झालेली दिसते. आणि स्वतःच्या सद्गुरूंनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणारी, त्यांनासुद्धा अधिकारवाणीने चार शब्द सांगू पाहणारी मुक्ताबाई येथे आपल्याला भेटते.
(संदर्भ:- ‘कडकडून वीज निघाली ठायी चे ठायी’ संत मुक्ताबाई – व्यक्ती आणि वाङ्मय – डाॅ. केतकी मोडक – द्वितीय आवृत्ती).
संत मुक्ताबाईंचा जीवनपट, त्यांच्या या अलौकिक पण सामान्य साधकापर्यंत न पोहोचलेल्या ‘ज्ञानबोध’ ग्रंथाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच मी माझ्या खाली उद्धृत केलेल्या मुक्ता बाईंच्या चरित्रात्मक कवितेत या ग्रंथाचा उल्लेख खास करून केला आहे.
☆ संत मुक्ताबाई ☆
*
आदिमाया अवतरली जगती
अश्विन शुद्ध प्रतिपदेसि
*
बोल बोबडे बोलत असता
अंतरली ती मायपित्यासि
*
बालपणाला त्वरे लंघुनि
माता बनली वडील बंधुंसि
*
दिधली दीक्षा निवृत्तीनाथे
गुरूभगिनी हो ज्ञानयासि
*
प्रवास अवघड अध्यात्माचा
शंका ती पुसते ज्ञानेशासि
*
अनुभवा येता समाधी निर्गुण
शून्याकार पाही जगतासि
*
आत्ममग्न ती राही एकली
अनुभवी सदा तुर्यावस्थेसि
*
पोकळ पंडिती शाब्दिक शस्त्रे,
जंव जखमी करिती ज्ञानोबांसि
*
आत्ममग्न ते होऊन चिंतित
मिटुनि घेती ज्ञान कवाडांसि
*
रुष्ट ज्ञानेशा, ती करि उपदेशा
रचुनि ताटीच्या अभंगांसि
*
कार्यप्रवण होती तंव ज्ञानेश्वर
रचती भावार्थ – दीपिकेसि
*
पैठण क्षेत्री भिंत चालविती
चांगदेव येता भेटीसि
*
पत्र पाहुनि कोरे त्यांचे
धाडिती त्यां पासष्टीसि
*
अर्थ न उमगे परंतु त्यांसि
येती शरण मग ज्ञानोबांसि
*
मुक्ताईचे शिष्यत्व पत्करी चांगा,
निजबोध प्राप्त मग होई त्यांसि
*
परमभक्त परि, अहंकारी नामदेव
गुरूविण ना मोक्ष, सांगे ती त्यासि
*
तीर्थाटना जाती बंधु नि संत, परि
मागे राहुनि उपदेशी ती शिष्यांसि
*
आळंदीस घेती ज्ञानेश समाधी
सोपान समाधिस्थ सासवडासि
*
उदास, अलिप्त होई मुक्ताबाई
त्यागुनि देई ती अन्नपाण्यासि
*
स्वरूपी निमग्न, अंगिकारी मौन
विनवी निवृत्ती उपदेशासि
*
अदलाबदली गुरू नि शिष्याची
निर्मि ‘ज्ञानबोध’ ग्रंथासि
*
तापी तीरी करिता भजन कीर्तन
ऐकिती सारे अगम्य घंटानादासि
*
पंचमहाभूते बेभान होऊनि
भेटती तेथे आदिमायेसि
*
मेघांची दाटी, विजेचा कल्लोळ
तुफान वारा, उडवी धुरळ्यासि
*
गगन धरा जणु होती एकरूप
पाऊस करी तांडवनृत्यासि
*
मुक्ताबाई गुप्त होताच
अवचित पसरे सर्वत्र शांतीसी
*
स्वरूपाकार मुक्ताई होता
मुखावर निवृत्तीच्या पसरे उदासी
☆
(मुक्ताबाईंना भेटण्यास आलेली पंचमहाभूते 👉 मेघांची दाटी = आकाश, विजेचा कल्लोळ = तेज, तुफान वारा = वायु, उडवी धुरळ्यासि = पृथ्वी, पाऊस करी तांडव = आप)
☆
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈