श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ मी रोज फक्त बटाटे उकडते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
पैसे कमवायला फार मोठ्ठ्या आयडियाची गरज नसते हे आता पुरतं लक्षात आलंय माझ्या..
झालं असं की पुण्याला मला एक ताई भेटल्या.
त्या म्हणाल्या “ तुम्ही रिटायर दिसताय.. “
मी म्हटलं “ हो, मी रिटायर झालेलो आहे “
मग मीही लगेच विचारलं “ तुम्ही काय करता? “
तर त्या म्हणाल्या “ मी रोज बटाटे उकडते! “
“बटाटे उकडणं हा काय व्यवसाय आहे? ”
“ हो, तोच तर व्यवसाय आहे माझा? “
“ म्हणजे नेमकं काय? “
त्या म्हणाल्या “ अहो, आमच्या पिंपरी -चिंचवड भागात ३५०/४०० वडापावच्या गाड्या आहेत. मी बटाटे उकडते आणि कुस्करून पुरवते आणि यातल्या बर्याचशा गाड्यांना पुरवते. माझा दिवसाला १५०० किलोचा सप्लाय आहे. चार बायका माझ्याकडे काम करतात. सकाळी ४ ते ७ आणि दुपारी २ ते ५ अशा दोन शिफ्ट आहेत. वडापाव वाल्यांना बटाटे आणून, स्वच्छ करून, उकडून, सालं काढून, कुस्करणं ही डोकेदुखी वाटते. रस्त्यावर हे काम सहज होत नाही. दोन माणसं त्यातच गुंतून राहतात. गॅसच्या टाक्या आणाव्या लागतात. मी एकाच वेळी दोन टन बटाटे आणते -त्यात माझं एक होलसेल मार्जिन असतंय.
आणि वडापाव वाल्यांना कुस्करलेला बटाटा पुरवते ते दुसरं सर्विस मार्जिन … “
असं म्हणून त्या बोलायच्या थांबल्या..
मी अंदाजाने त्यांना विचारलं “ म्हणजे आणखी काही मार्जिन आहे का? ”
त्या म्हणाल्या “ हो, आहे ना.. मी पुरवते तो बटाटा उकडलेला म्हणजे ओला असतो. त्यातल्या पाण्याचे पैसे … आणि तेही बटाट्याच्या भावानेच विकलं जातं! नाही का? ”
– – मला एका सेकंदात कळलं की मी चाळीस वर्षं नोकरी केली कारण माझ्या डोक्यातच बटाटे भरले आहेत.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com