सुश्री गायत्री हेर्लेकर
विविधा
☆ हिसाब बराबर… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
टी. व्ही. वर अर्थमंत्री निर्मला सीतारामन–अतिशय आत्मविश्वासाने सादर करत असलेले बजेट मी दरवर्षीप्रमाणे ऊत्सुकतेने पहात होते. नोकरदार वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आयकर–त्यातील बदल. तसे तर नोकरीवर असतांना या वर्षी तरी काही कर कमी होईल का?
का जास्तच वाढेल? कोणत्या वस्तु स्वस्त होतील, कोणत्या महाग?
किती गुंतवणुक करावी लागेल म्हणुन माझाही तो जिव्हाळ्याचाच मुद्दा असायचा. कारण गुंतवणुकीचे, नविन खरेदीच्या खर्चाचे गणित त्यानुसार जमवावे लागे.. पण आता कापु देत किती कर कापतात ते., आता कशाला त्या गुंतवणुकीच्या भानगडीत पडायचे,. खर्चही तसा कमीच होतो. मुख्य औषधाचाच., म्हणुन मी दुर्लक्ष करत होते.
वयाचा विशिष्ठ टप्पा ओलांडला की आर्थिक बाबतीतले स्वारस्य कमी होणे स्वाभाविक आहे म्हणा. पण आता वेध लागतात ते दुसर्याच हिशोबाचे. अहो, कुठल्या म्हणुन काय विचारता? लक्षात नाही आले का? बरं तर “जरा ईस्कटुन” (टी. वी. वरील ग्रामीण सिरियलचा प्रभाव) सांगते.
आता हिशोब बघायचा तो आयुष्याच्या जमाखर्चाचा.
आपुलकी, प्रेम–द्वेषमत्सर,
कौतुक–टीकाटिप्पणी,
जोडलेली नाती—तुटलेली नाती, एकमेकांची ऊणीदेणी,
अपेक्षापुर्ती—निराशा, स्पर्धा -यशापयश,
आणि अशा अनेक गोष्टी. पण सर्वांची गोळाबेरीज —आपल्या भाषेत म्हणजे
सुख आणि दुःख
सुखाची मिळकत -जमा खाते
आणि दुःखाचे खर्च खाते.
आणि त्या दोन्हीतील तफावत —म्हणजेच नफातोटा. आणि ते समजल्याशिवाय * हिसाब बराबर–आहे का नाही हे कसे समजणार?
झाले, माझ्या डोक्यात एखादा विषय एकदा शिरला की तो पुर्ण केल्याशिवाय जीवाला स्वस्थता म्हणुन नसते.
सामान्य भाषेत केल्या कर्माचे फळ सुखदुःखाच्या रुपात प्राप्त होत असते.
मग काय, केल्या कर्मांची रोजकीर्द त्यानुसार ऊघडलेली वेगवेगळी खाती (accounts),
जमाखर्च पत्रक, नफातोटा पत्रक, आणि ताळेबंद —मनाच्या संगणकावर साठवलेल्या सर्व फाईल्स ओपन केल्या. आणि नोंदीचे ऑडिट सुरु केले. अकौंटसीत नेहमी टॉपला असणारी मी.
पण हा हिशोब तपासताना मात्र गोंधळल्यासारखे झाले.
कारण केल्या कर्माला आणि त्यामुळे मिळालेल्या फळाला सुखाच्या खात्यात जमा धरावे की दुःख म्हणून खर्ची टाकावे, हे ठरवतांना मनाची द्विधा स्थिती. हा निर्णय वाटला तेवढा सोपानव्हता. “कर्मण्येवाधिकारस्तेमा फलेशु कदाचन””हे अगदी पाठ असले तरी सामान्य प्रापंचिक लोक ते सोईस्कर रितीने विसरतात. म्हणुनच ते सामान्य असतात. मी ही तशीच एक सामान्य.
रोजकिर्दीतले मधलेच एक पान ऊघडले. दिवसभराच्या नोंदी अगदी सकाळपासून व्यवस्थित होत्या.
सकाळी सकाळीच अंथरुणात डोळे ऊघडले, आणि डोळे चुरचुरु लागले, कारण रात्री गोळी घेऊनही झोपच नाही,. रात्रभर बेजार करणारा खोकला, मधुनच ऊजवा गुडघा दुखणे, तर मधुनच डाव्या पायात क्रॅम्प. , तर मधुनच पाठीत कळ
तोंडाला कोरड, -‘-येणार येणार वाटते हार्ट ॲटॅक’ म्हणुन रात्रभर बेचैनी. —म्हणजे दुःखच ना? छान मऊ गादी असलेल्या बेडकडे “काय तुझा ऊपयोग? “म्हणत जरा रागाने बघितले.
पण ऊठुन बसल्यावर ना कुणाची मदत, ना काठीचा, वॉकरचाआधार, तरीही छान चालायला आले हे काय कमी सुख आहे का? –म्हणुन माझी माझ्याशीच खुदकन हसले.
बेसिन समोरच्या आरशात दिसणारा आपलाच सुरकुतलेला चेहरा, डोक्यावरचे विरळ पांढरे केस, —झाले आता म्हातारी, –दुःखाच्या खात्यात परत एक नोंद झाली.
पण सुनेने टेबलवर ठेवलेला भरपुर दुधाचा, माफक गोड मस्त चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेतांना
‘अरे वा, आपल्याला डायबेटिस नाही, हे किती छान’ म्हणुन मनात सुखाच्या खात्यावर जमेची मोठ्या खुशीत केली.
नाष्ट्याच्या वेळी, तर सर्वांच्या कुरकुरीत डोश्याकडे पहातांना आपल्या दातांच्या खिडक्यांनी, ‘तु नाही खाऊ शकणार ” ही दुःखाची नोंद झालीच. पण लोणी घातलेला मऊ लुसलुशीत ऊत्तप्पा, आणि तो खायला मिळतो, पचतो, मन तृप्त करतो-मुख्य म्हणजे घरातले आपल्या तब्येतीची काळजी घेऊन, आठवणीने आयते -करुन देतात. हे किती सुखदायक.
“आई, रात्री झोप लागली का?” -मुलगा.
“आई छान नाटक लागले आहे, मी बुकिंग केले, आज जाऊया”- सुन
“आई, किती दिवसात माझ्याकडे आली नाहीस, ये ईकडे. मी गाडी पाठवते. ८, १० दिवस जरा बदल होईल, ईथेच कुठेतरी जाऊ फिरायला”-मुलीचे फोनवर बोलणे.
“औषधे संपत आली की सांगा आणून देतो” मुलीकडे गेल्यावर जावयाचे विचारणे.
असे अनुभव म्हणजे सुखच-सुख. जमेच्या नोंदी.
रोजच घडत असलेल्या सर्व प्रसंगांची नोंद रोजकिर्दीत होतच असते.
तसेच प्रासंगिक कर्मांच्या, –प्रसंगाच्या – नोंदीही सुखदुःखाच्या जमाखर्च पत्रकात नोंद केल्या जातात.
डोळे, कान, हात पाय, पोट, –सगळेच अवयव अधूनमधून असहकार पुकारुन संपावर जातात यामुळे चिडचिड होते, दुःख होते. हसायला काय झाले?
अहो, घरात आमरस -पुरी, भजी याचा मस्त सुगंध दरवळत असतो आणि पोट अचानक संपावर गेले तर दुःख होणारच ना? शिवाय कॅसर तर नसेल? का कसले ऑपरेशन करावे लागेल? काहीतरी भयंकर दुखणे तर नाही? –ही मनाला त्रिकाळ भेडसावणारी घोर चिंता, म्हणजे काय दुःख असते ते सांगून समजणार नाही. अनुभवावे लागते.
पण, थोड्याफार गोळ्या औषधाने २, ४ दिवसात अवयव कामावर हजर झाले की, “चला, फारशा टेस्ट कराव्या लागल्या नाहीत “, किंवा केल्यातरी रिपोर्ट नॉर्मल आले -याचा आनंद, सुख म्हणजे जमेत लक्षणीय भर.
आणखी एक दुःख बरेच दिवस माझ्या मनात खदखदत होते. ते शिक्षणाबाबत. मेडिकल करायची मला लहानपणापासुन मनापासुन ईच्छा. ११वीला डिस्टिंक्शन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. पण, अनेक अडचणींमुळे ऐनवेळी ते शक्य झाले नाही तेंव्हा तर अर्धवट वयामुळे —आता आपले काही खरे नाही, आयुष्य वाया गेले, आता जगण्यात तरी काय अर्थ? –म्हणुन झालेले दुःख— मोठा तोटा म्हणुन नोंद केला. पण नंतर कॉमर्सला जाऊनही नेहमी
नंबरात येऊन M. Phil. करुन प्राचार्यपदापर्यंत पोहचले, विद्यापीठात सर्व समित्यांवर, अगदी सिनेटपर्यंत काम केले, M. B. Aच्या, ३०, ३२विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टरिपोर्टची गाईड म्हणुन काम केले हे सर्व सुखाची जमा वाढवणारे होते.
प्रपंचातील सुखदुःखांच्या नोंदी तर न संपणाऱ्या असतात,. माझाही तसाच अनुभव. सुरवातीला थोडी आर्थिक ओढाताण, मोठ्या कुटुंबामध्ये कुणाचे आजारपण, मृत्यु, अपघात, मनात असुन मैत्रिणींबरोबर ट्रीपला जाता आले नाही, जुन्या फ्लॅटची किंमत कमीच मिळाली, मुले लांब गेली, आजारपण, करोनाची साथ -राजकीय, सामाजिक असुरक्षिता यामुळे ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ तोंड द्यावे लागले. युध्द म्हटले की हारजीत आलीच. आणि अपयशामुळे येणारे दुःख तर सततच भोगावे लागले.
पण मुले अभ्यासात छान, त्यांची सहजपणे झालेली शिक्षणे, नोकरी, लग्ने, नाती यांचे यश, याचे सुख तर कशातच मोजता येत नाही पण जमेत भर पडली.
तरुण वयात नसेना पण निवृत्त झाल्यावर खुप फिरायला मिळाले, अगदी देशविदेशही.
लेखनाचा छंद जोपासता आला, -४, ५ पुस्तके छापली, रेडिओवर भाषणे, अध्यात्मिक अभ्यास यातून मिळालेले आत्मिक समाधानाचे भौतिक सुखासारखे मोजमाप करता येणार नाही.
जिवलग जोडीदाराने जरा लवकरच साथ सोडली हे कधीही विसरता न येणारे दुःख मात्र खर्च खात्यात कायमचे ठाण मांडून आहे कारण कोणतीही, कितीही मोठी जमेची नोंद झाली तरी त्याची भरपाई होऊच शकत नाही. अर्थात, मुलगा, सुन, मुलगी जावई, नाती आप्तेष्ट यांच्यामुळे दिलासा मिळतो ते सुखाची जमा आहे.
मित्रमैत्रिणी हा तर माझा विक पॉइंट. या ना त्या कारणाने जिवाभावाच्या काही मैत्रिणी नकळत दुरावल्या. लांब गेल्या. काहींनी अकालीच आपला खेळ आवरला. माझे फार मोठे नुकसान झाले असे नाही. पण मनात खेद मात्र आहे, रहाणारच. आणि त्याचेच दुःखही वाटते. अनेक दशके कोल्हापुरला राहिलेली मी निमित्ताने पुण्याला आले. नवख्या ठिकाणी या वयातही पण मैत्रिणींचे वेड कमी झाले नाही. आता विसंवादाची भिती नसल्याने, व एकटेपणामुळे हे वेड अधिकच वाढले. अनेक नवनव्या मैत्रिणी जोडल्या, नशिबानेच मिळाल्या. आपल्या समुहावरील मैत्रिणींचा सिंहाचा वाटा. माझ्या आधीच्या मैत्रिणींच्या पुंजीत पडलेली ही फार मोठी भर.
ज्याच्यावर चक्रवाढ दराने मिळणारे व्याज म्हणजे सुखात नित्य होणारी वाढच.
हिशोबपत्रकांवर नुसती नजर फिरवली तरी सुखदुःखाच्या कितीतरी नोंदी लक्षात आल्या. काटेकोरपणे ऑडिट करायचे ठरवले तर ऊरलेले आयुष्यही त्यातच सरुन जाईल. मग ताळेबंद केंव्हा मांडणार? आणि श्री शिल्लक किती ते केंव्हा पहाणार?
आता त्याची गरजही वाटत नाही. कारण झाल्या हिशोबावरुन एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात आली. परमेश्वर हा तज्ञ हिशोबतपासनीस आहे.
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, पात्रतेनुसार, कर्मानुसार देत असतो आणि घेत असतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा हिशोब तो त्याच क्षणी पुर्ण करतो. फक्त आपणच अज्ञ असल्याने आपल्याला ते समजत नाही. कारण त्याचे महत्वाचे सुत्र म्हणा तत्व म्हणा असते ते म्हणजे — —
हिसाब बराबर
त्यातुन माझ्यासारखीला मनातुन वाटते, “नाही, परमेश्वराने आपल्याला आपल्या पात्रतेपेक्षा जरा जास्तच दिले. आता तो हिशोब पुढच्या जन्मी पुर्ण करणार.”
पण, माझ्यामते हिशोबाची ही खाती पुढच्या जन्मापर्यंत पुढे पुढे कशाला कॅरी फॉरवर्ड करायची? त्यापेक्षाआयकर भरुन मोकळे व्हावे. आणि भगवंताला आवडणारा कर म्हणजे “भगवंतावर श्रध्दा, भक्ति. आणि तीच मनात ठेवुन भगवंत नामाचा जप.”
हा कर जर नित्यनेमाने भरत गेलो तर आपोआप या जन्मीचा याच जन्मी होईल– हिसाब बराबर!
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈