? इंद्रधनुष्य ?

☆ याला तिळही नाही पहिला इतिहास… लेखिका : अॅड. सीमंतिनी नूलकर ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडचा शुष्क काटेरी वनांनी वेढलेला आणि कमी पावसाचा लिंब, बाभळीचं रुई-घाणेरीचं प्राबल्य असलेला प्रदेश म्हणजे माण तालुका. हा भाग दुष्काळी म्हटला जातो पण तो दुष्काळी नसून कमी पावसाचा प्रदेश आहे. पाणथळी गवताळ प्रदेश आहे.

खरंतर माण नावाचं गाव जगाच्या नकाशावर कुठेच नाही. या तालुक्यातील महत्त्वाची गाव आहेत दहिवडी, म्हसवड. मात्र माण नावाची नदी आहे. माणची जीवनदायिनी गंगा म्हणून तिला म्हणतात ‘माणगंगा’ आणि या परिसरात एक विशिष्ट चिकण माती आढळते. तिलाही ‘माण’ असं म्हटलं जातं. माणचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला शंभू महादेव इथं डोंगरी नांदतो. शिखर शिंगणापूरला! शिखर शिंगणापूरची स्थापना केली शिंगणराजे यादवांनी. १२१० ते १२४७ च्या दरम्यान. म्हणून या स्थानाचे नाव शिखरशिंगणापूर. माणच्या डोंगरावर माणच्या मुकुटातला मानाचा तुरा असलेलं हे स्थान आहे.

ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकरांची ही जन्मभूमी. या परिसराचं अतिशय चपखल वर्णन गदिमांनी केलेलं आहे.

“नजीक नाझरे श्रीधर कवींचे, नदी माणगंगा 

नित्य नांदते खेडे माझे धरुनी संतसंगा 

तिळही नाही खेड्याला या पहिला इतिहास

शिल्पकलेची, ताम्रपटाची कशास मग आस 

निळा जलाशय नाही येथे, नाही उद्यान 

अन्नासाठी मात्र हिरवळे भोवती वन l 

या अशा “तिळही नाही पहिला इतिहास” अशा प्रदेशात एक अजूबा आहे. किरकसाल! त्याला नळीचा माळ असंही म्हटलं जातं. किरकसाल, भोजलिंग, कुरण, डांबी डोंगर, अम्भेरी घाट, वर्धनगड, महिमानगड, कुळकजाई, कुक्कुडवाड असा हा विस्तीर्ण प्रदेश, विस्तीर्ण माळरान आहे. उन्हाळ्यात या विस्तीर्ण माळराना वरच्या गवताचं पार वाळवण होऊन गेलेलं असतं.

या माण देशाचं काव्यमय वर्णन गदिमांनी केलय तसं चित्रमय वर्णन, व्यंकटेश माडगूळकरांनी केलेलं आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी बनगरवाडीचं केलेलं वर्णन म्हणजे माण देशाचे व्यक्तीचित्रणच आहे. ते म्हणतात, “माळरानावर वाळून पडलेलं गवत सूर्याच्या पहिल्या किरणांनी उबदारत जातं आणि अगदी थोड्या पावसाच्या शिडकाव्याने गवत, अगदी नको नको तिथं उगवतं. सर्वत्र हिरवा झगझगीत रंग दिसू लागतो. ”

हिमयुगानंतर पृथ्वी हळूहळू उबदार होऊ लागली. त्या वेळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी गवताळ प्रदेश जन्माला आले. अंटार्टिका सोडता, सर्वत्र हे गवताळ प्रदेश आहेत. आफ्रिकेत सवाना, उत्तर अमेरिकेत प्रेअरी, दक्षिण अमेरिकेमध्ये पंपा, मध्य आशियात स्टेपे, ऑस्ट्रेलियातील रेंजलँडस अशा वेगवेगळी नावं या गवताळ प्रदेशांना आहेत. या गवताळ प्रदेशांनीच माणसाला शेतीसाठी सुपीक माती दिली. कार्बन संचयनाची निसर्गाने दिलेली जबाबदारी ही गवताळ माळरानं नेकीनं पार पाडतात. अनेक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पतींचे अधिवास म्हणजे ही गवताळ कुरणं. खरं म्हणजे हे गवताळ प्रदेश म्हणजे सर्वात श्रीमंत परिसंस्था! स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचा, फुलपाखरांचा, लांडग्या तरसांसारख्या गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचा अधिवास. या प्रदेशातले निसर्गप्रेमींसाठीचे खास हॉटस्पॉट म्हणजे डांबीचे खोरे, जांभळहेळ, नळीचा माळ आणि किरकसालची पाणथळ. या परिसरात ‘निळे जलाशय’ नसले तरी येराळवाडी, पिंगळी, रानंद, देवापुर धरण, दर्जाई तलाव असे पाणसाठे आहेत. पाणथळ जागा आहेत.

जैवविविधतेने संपन्न अशी विस्तीर्ण माळराने आणि पाणथळींमुळे या भागाचं जैवविविधतेच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढलं आहे. या हॉटस्पॉटचे, दिशादर्शक फलक काही ठिकाणी आहेत. त्यांची स्थानिक नावं लांडग्याचं बिळ, ससे होलन. नावातूनच तिथं कोण असतं ते कळत.

किरकसाल संवर्धन प्रकल्प आता अंगापिंडानी भरलाय. किरकसालच्या रहिवाशांनी, त्यांचं गाव ‘आदर्श गाव’ बनवण्याचा विडा तर उचलला आहेत पण इथल्या जैवविविधतेच्या संवर्धनाचा, संरक्षणाचा गावकऱ्यांनी वसा घेतला आहे. या परिसरातील वनखात्याचे लोक, चिन्मय सावंत, विशाल काटकर यांच्यासारखे निसर्गप्रेमी यांना, आणि खुद्द गावक-याना लोकसहभागातून या श्रीमंतीची जपणूक करायची आहे.

माण देशाची स्वतःची म्हणून एक गोडवा असलेली भाषा आहे. भिगपाऊस, तिरकसतुंबा, हेळ अशा विशिष्ट शब्दांनी ही भाषा सजली आहे. तसाच इथल्या पक्षी-पाखरांच्याही स्थानिक नावात एक वेगळाच गोडवा आहे. इथं झोकांड्या “खात जाणारी” म्हणण्यापेक्षा “झोकांड्या खात उडणारी” झोकांडी चिमणी दिसते. माळरानावर भांडण मांडून बसलेले सातभाई दिसतात. ते सारखे कोकाटतात म्हणून “कोकाटे”. माळटिटवी तर बस्तान बसवूनच आहे. मोठी लालसरी, रेखांकित भारीट, मॉन्टेग्युचा भोवत्या, खडकी लावा, धाविक एक न दोन! बेलन्सची फटाकडी आहे. 200 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद या परिसरात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील प्राच्यचंडोलची पहिली नोंद इथेच झाली. स्थलांतरित पक्ष्यांत कवड्या गप्पीदास, सायबेरियन गप्पीदास, सामान्य खरूची, रिचर्डची तिरचिमणी आहे. मोठ्या टपोर डोळ्याचा करनावक आहे.

साधारण 30-35 किंवा कदाचित जास्त वर्षांपूर्वी, या भागात, मायणीच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरित रोहित पक्ष्यांना पहायला मी पहिल्यांदा गेले होते. आता अगदी शिवडी पासून अनेक ठिकाणी रोहित येत असतात. खानपान आटपून संध्याकाळी ते रोहित पक्षी जेव्हा जलाशयावर उतरण्या आधी आकाशात गोलाकार फिरत असतात तेव्हा एकत्र उडताना, त्यांच्या पंखांनी वारा कापल्यावर येणारा एक विशिष्ट आवाज, केवळ अनुभवण्यासारखा असतो. त्यांच्या पंखाखालून दिसणारा लाल केशरी रंग अजूनही माझ्या डोळ्यापुढून हलत नाही. तेव्हा नुकते नुकते रोहीत पक्ष्यांच्या मागावर जाण्याचं वेड रुजत होतं. शोधत शोधत गेलो. इथे ‘रोहित पक्षी’ कुठे दिसतील, असं शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या गुराख्यांना विचारलं. त्यांना काही उमगलेलं दिसेना. मग विचारलं, “अग्निपंख पक्षी आहेत का इथं? ” तरीही चेहऱ्यावर भाव नाही. मग आमचं आपसातच बोलणं झालं कि कुठे दिसायचे हे फ्लेमिंगो? तर त्या गुराख्यातल्या एकजण म्हणाला, ” असं म्हना की. फिलिंमेंगो बघाय जायचं हाय. ” ही माझी या परिसराची पहिली भेट. नंतर या मायणीच्या जलाशयात रोहित पक्षांना आवडणाऱ्या खाद्य वनस्पतीचे प्रमाण कमी होत गेलं. वर्दळ वाढली. त्यांचा रहिवास डिस्टर्ब झाला तो झालाच. आता तिकडे रोहित फारसे येत नाहीत. आले तरी येराळवाडी, राजापूरच्या जलाशयावरती त्यांचा मुक्काम असतो. पूर्वी माळढोक, तणमोरही खूप दिसायचे. या गवताळ प्रदेशात पक्षी पूर्वी होते याचा एक पुरावा म्हणजे महादेवाच्या मंदिरात असलेले मोर, बदक यांचे कोरीव शिल्प.

हा प्रदेश पक्ष्यांचा कॉरिडॉर आहे. सात, आठ प्रकारची स्थलांतर करून येणारी बदकं इथल्या पाणथळी जागांवर दिसतात. भुवई बदक, थापट्या बदक, तलवार बदक अशी कितीतरी बदकं. दुर्दैवाने यातली काही एनडेंजर्ड लिस्ट मध्ये आहेत.

हा काही फक्त पक्ष्यांचा देश नव्हे.. चतुरांचाही आहे. हिरवे झगझगीत चतुर मुरमुटीची तुरट पानं खाताना दिसतात. फुलपाखरांचाही आहे. गदिमांच्या शब्दात सांगायचं तर, ‘कळी कळीवर डंख मारत, गंध पोखरणाऱ्या’ फुलपाखरांचा हा देश. फुलपाखरांच्या ११० प्रजातींची नोंद इथं झाली आहे. मोठा चांदवा नळीच्या माळावर थिरकत उडतो. गदिमा म्हणतात,

“एक पाखरू बाग थिरकवी 

पिडा देतच फुले हरखवी” 

‘चट्टेरी भटक्या’ रानोमाळ भटकत असतो. उन्हाचे कवडसे गवतावर पडावे तसा “कवडस” दिसतात. पण ते स्थिर नसतात. उडत असतात. अधून मधून “खंडित रूपरेखा” दिसतेच. ‘मयूर भिरभिरी’ रानोमाळ भिरभिरते. महाराष्ट्र राज्याचे राज्यफुलपाखरू आहे “नीलवंत” ब्ल्यू मरमॉन. जवळजवळ तळ हाताएव्हढे, आकाशाच्या निळाईत, मोरपीशी निळा मिसळलेला, अशी स्वतःची म्हणून एक निळीछटा मिरवणारं आहे हे फुलपाखरू!

सरपटणारे साप, जमिनीलगत राहणारे, सरडे, ससे, घोरपडी हे प्राणी आहेतच. तरस खोकड आहेत. गवत्या, मांज-या, रसेल कुकरी अशा निम विषारी, बिनविषारी सर्पांपासून फुरसे, घोणस अशा अव्वल विषारी सर्पांचाही, हा अधिवास आहे.

दिवस चढत जातो तसं माणदेशातलं ऊन निबर होत जातं. थोडक्या पावसावर समाधान मांडणारा हा प्रदेश. माणदेशी माणसांना ढगही मेंढरा सारखेच भासतात. तेवढ्यानेही जनावरांना हिरवं बाटूक चघळायला मिळतं. तेवढ्याच थोडक्या पावसावर गवत फुलांचं सूक्ष्म सौंदर्य बहरून येत.

या प्रदेशाचं गवताळ प्रदेश म्हणून स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान आहे. एक संस्कृती आहे. इथं गजी नृत्याची कित्येक वर्षांची परंपरा आहे. यात्रा-जत्रा, सणउत्सव, समारंभ जोशपूर्ण, ढोल आणि गजी नृत्या शिवाय पार पडतच नाहीत. किरकसालच्या ग्रामस्थांना याची मनोमन जाणीव आहे. त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी किरकसाल आदर्श गाव बनवलं आहे. किरकसाल संवर्धन प्रकल्पाचे काम जोमानं सुरू आहे. “गाव पक्षी” असलेलं कदाचित हे एकमेव गाव. स्वच्छता राखणारा खाटिक किरकसालचा “गाव पक्षी” आहे. लांडगे इथल्या माळरानाचे सम्राट. पण ही प्रजातीही धोक्यात आली आहे. जाणीव जागृती म्हणून आवर्जून “लांडगा दिन” ही इथं साजरा केला जातो. या प्रदेशात पर्यटक यावे, पर्यटन वाढावे म्हणून अनेकजण प्रयत्नशील आहेत. पक्षी निरीक्षणासाठी, लांडग्यांच्या सायटिंग साठी इथं जावं. इथं येणाऱ्यानी आवर्जून गावरान ज्वारी-बाजरीची भाकरी, हुलग्याची आमटी खावी.

या प्रदेशात मेंढ्यांच्या लोकरी पासून ‘जेन’ बनवलं जातं. ब्रॅण्डेड गालीचे त्यापुढे ते काय? बाळ लोकरी पासून बनवलेलं जेन तर अगदी मुलायम. जमिनीवर अंथरून, पाठदुखी वगैरे विसरून निर्घोर झोपावं. बचत गटांच्या माध्यमातून आणि श्रीमती चेतना सिन्हा यांच्या मार्गदर्शनातून गोधड्या करून त्यांची विक्री होते.

माण देशाला फारसा इतिहास नसेल पण उज्ज्वल भविष्य नक्कीच आहे.

व्यंकटेश माडगुळकरांनी अजरामर केलेल्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे श्री राम देशमुख यांनी इंग्लिश मध्ये भाषांतर केलं आहे… ”The village had no walls “. कोणताही आड पडदा न ठेवणारा, कोणत्याही भिंती नसलेला माण देश सगळ्यांचं खुल्या दिलानं स्वागत करायला आसुसला आहे..

लेखिका : Adv. सीमंतिनी नूलकर

 ssnoolkar@gmail. com

प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments