तात्या टोपे
इंद्रधनुष्य
☆ इतिहासातील चिरंजीवाची पूर्णाहुती… लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆
☆
१८५७ च्या क्रांति युद्धातील शूर सेनानी तात्या टोपे यांचे देशासाठी बलिदान करून अमर झाले ते आजच्याच दिवशी.
रामचंद्र पांडुरंग भट हे तात्या टोपे यांचे मूळ नाव. ते नाशिक जिल्ह्यातील येवले या गावचे. तात्यांचे वडील पेशव्यांच्या पदरी चाकरीला होते. नानासाहेब आणि तात्या बालपणी एकत्र खेळले, एकत्र मोठे झाले. लहानपणापासूनच तात्या टोपे अत्यंत स्वाभिमान साहसी वृत्तीचे होते. त्यांचे शौर्य पाहून बाजीराव पेशवे त्यांच्यावर खुश असताना एकदा तात्यांचे कौतुक करताना नवरत्नांनी मढवलेली एक मोठी टोपी तात्यांच्या मस्तकावर ठेवली आणि तेव्हापासून तात्या टोपे म्हणू लागले.
१८५७ च्या काळात तात्या टोपे नानासाहेबांच्या दरबारात लेखनिक म्हणून कामाला होते. उठावाच्या वेळी इंग्रजांनी कानपूरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले. नानासाहेबांचा पराभव झाला. तेव्हा मात्र तात्या टोपे यांनी आपल्या हातातील लेखणी खाली ठेवली आणि हाती तलवार घेतली.
नानासाहेब पेशव्यांना बिठुरहून फत्तेपूरला पाठवून स्वतः इंग्रजांशी लढत तात्या टोपे बिठुरलाच राहिले. इंग्रजांबरोबर त्यांची प्रचंड लढाई झाली त्यात तात्या टोपेंचा पराभव झाला. निवडक सैन्यासह दुथडी भरलेल्या गंगेत तात्यांनी उडी टाकून पैलतीरावरील फत्तेपुरला पोहोचले. तेथे नानासाहेब व तात्या टोपे यांनी मिळून कानपूर जिंकून घेतले. या सुमारास झाशीवर सर ह्यू रोज याने हल्ला चढवला. राणी लक्ष्मीबाईंनी तात्या ंची मदत मागितली. राणीच्या साहाय्यासाठी आपल्या सैन्यासह तात्या टोपे झाशीला गेले.
तात्या टोपे जवळ उत्तम संघटन चातुर्य होते. त्यांना हिंदी, उर्दू, मराठी, संस्कृत आणि सही पुरते इंग्रजी इत्यादी भाषा अवगत होत्या. इंग्रजांशी समोरासमोर न लढता गनिमी पद्धतीने लढण्याचे युद्ध पद्धती त्यांनी ठरवली. प्रचंड मोठा झंजावात केला. तात्या टोपे यांना पकडण्यासाठी इंग्रजी सैन्य धडपडत होते. त्यांना तिन्ही बाजूंनी घेरले. नर्मदा ओलांडून तात्या टोपे यांनी इंग्रजांना हुलकावणी दिली. ते इंग्रजांच्या दृष्टीने धोकेबाज ठरले होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जिवाचे रान केले. रिचर्ड मीड ने तात्या टोपे यांना पकडण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. तात्या टोपे यांचे मित्र मानसिंग हा फितूर झाला. मानसिंगने तात्यांचा विश्वासघात केला. त्यांने मीडच्या ताब्यात तात्या टोपे यांना स्वाधीन केले.
१८ एप्रिल १८५९ ग्वाल्हेर जवळील शिवपुरी येथे दुपारी चार वाजता फाशी देण्यासाठी तात्या टोपे यांना आणले. फाशीचा दोर स्वतःच्या हाताने गळ्यात भोवती अडकवला. मानेचा दोर आवळला गेला आणि क्षणार्धात…. सहस्रावधी देश बांधवांच्या डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले. सारा देश दुःख सागरात बुडाला. इंग्रजी सत्तेला आव्हान देणारा हा भारताचा स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्याचा झेंडा हाती घेऊन फाशी गेला. त्याचा मृतदेह सायंकाळपर्यंत तसाच लटकत होता.
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाततील होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. स्वातंत्र्यवीर सावरकर “१८५७ च्या स्वातंत्र्यसमर” ग्रंथात म्हणतात…
तो फास रक्ताने भिजला आणि देश अश्रूंनी ओलाचिंब झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत कष्ट सोसले हाच त्याचा अपराध होता. देशद्रोही विश्वासघाताच्या दुतोंडी चालीचे हे बक्षीस त्यांना मिळाले आणि त्यांचा शेवट एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फासावर लटकविला. तात्या, तात्या ह्या असल्या दुर्दैवी देशात तुम्ही कशाला जन्म घेतला? ह्या दुर्बळांच्या अश्रूंसाठी आपण रक्त सांडावे खरोखर कसला हा महागडा सौदा!!
गनिमी काव्याच्या रणपंडिताला शतशः प्रणाम.
☆
लेखक : श्री संतोष भोसेकर
प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈