सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुतम कथा : मातृधर्म / रेस / अधिकार आणि कर्तव्य – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

(१) – मातृधर्म

“कोणाचा फोन होता हो? “

“संजयचा होता. थोड्या दिवसांसाठी आईंला घरी घेऊन जाईन, म्हणत होता. त्यांची कामवाली बाई काम सोडून गेलीय. मुलांना बघायला कोणी नाही. “

” म्हणजे आईंना आता कामवाल्या बाईच्या जागी आमंत्रण आलं आहे. यांची मुलं मोठी होतील, तेव्हा आईंची गरज संपेल. त्यानंतर काय? वृद्धाश्रम…! आई माझ्या सासूबाई असतील, पण मला त्या सख्ख्या आईपेक्षाही जवळच्या आहेत. जवळपास पंधरा वर्षं त्या आपल्याबरोबर आहेत. आतापर्यंत कुठच्याही दिराला त्यांची आठवण नाही झाली. माझी काही असहाय्यताही नाही, की मी आईंना कामवाल्या बाईच्या जागी काम करायला पाठवीन. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना आपल्याजवळच ठेवीन. “

“रंजन, तू जॉब करत नाहीस; पण त्या दोघी तर नोकरीवाल्या आहेत ना! त्याही अडलेल्या आहेत! तू कशाला कीस पाडत बसतेस? संजयच्या घरी जायचं की नाही, हा निर्णय आईने घ्यायचा आहे. शेवटी धाकटा मुलगा आणि सुनेच्या हक्काचाही प्रश्न आहे! “

“ठीक आहे. पण इतक्या वर्षांत कोणत्याही दिराने दोन-चार दिवसांसाठी म्हणूनही स्वतःच्या घरी नेलं नाही त्यांना. आज कामवाली बाई नाहीय, तेव्हा त्यांना आई हवी. बाई मिळाली की आईला परत पाठवणार. हे तर मलाही लागू पडतं ना..! उद्या माझी मुलं मोठी होतील, तेव्हा तर प्रोफेशनल सुनांचा जमाना आलेला असेल. जोपर्यंत गरज असेल, तोपर्यंत ठेवतील. त्यानंतर आमची रवानगी वृद्धाश्रमात होणार. आपल्या शरीरात बळ आहे, तोपर्यंत आपल्याकडे लोक आपला हक्क मागतात. पण त्यानंतर काय? याला विवशता म्हणायचं की फालतू विचार? “

दरवाजाआड उभी असलेली आई सगळं ऐकत होती. ‘या काळात सासूच्या बाबतीत असे विचार करणारी सून मिळणं, हे माझ्या सत्कर्मांचं फळ आहे. ‘ स्वतःच्या तन-मनाचा सन्मान झाल्यासारखं वाटलं तिला. बाहेर येऊन तिने मोठ्या सुनेला जवळ घेतलं. तिचा मुका घेतला.

“बेटी, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण हाताची सगळी बोटं सारखी नसतात. मी आई आहे ना…! “

आणि पाणावलेल्या डोळ्यांनी ती धाकट्या मुलाच्या-संजयच्या- घरी जायची तयारी करायला लागली.

मूळ हिंदी कथा : माँ का धर्म

♥ ♥ ♥ ♥ ♥

(२) – रेस – – – 

शाळेत स्पोर्ट्स डेचा शेवटचा दिवस होता. पुरस्कारवितरणही त्याच दिवशी होणार होतं. म्हणून काही पालकही तिथे उपस्थित होते.

नववीच्या रेसला सुरुवात झाली. सर्व स्पर्धक जीव तोडून धावत होते.

अंकित रेस जिंकला. तो जलद धावायचा. गरीब घरातून आला होता तो. तो जिंकल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला.

पण मंथन स्पर्धेत सहभागी असूनही धावलाच नाही. सगळ्यांनाच याचं आश्चर्य वाटलं.

“मंथन, यू आर बेस्ट रनर! धावला का नाहीस? काही प्रॉब्लेम आहे का? ” स्पोर्ट्स टीचरनी विचारलं.

” मी एकदम ठीक आहे, सर. रेसमध्ये भाग घ्यायची माझी मुळीच इच्छा नव्हती. मम्मी-पापांच्या दबावामुळे मी फिल्डमध्ये उभा राहिलो. बस्स…! “

” पण तू धावण्याचा प्रयत्नही केला नाहीस. इट्स व्हेरी बॅड! तुझे मम्मी-पापाही आले आहेत. किती वाईट वाटलं असेल त्यांना! मी खात्रीने सांगतो, तू धावला असतास, तर रेस जिंकला असतास. “

“जिंकलो असतो, तर काय झालं असतं? एक ट्रॉफी, प्रशस्तिपत्र किंवा पुरस्कार मिळाला असता. मला मानसिक शांती हवीय! चार वर्षांचा होतो, तेव्हापासून मी वेगवेगळ्या, अगदी कुठच्याही रेसमध्ये धावतोय. कधी गायन, कधी वादन, कधी स्विमर, ऍक्टर, क्रिकेट, ज्युडो-कराटे, चित्रकार, डॉक्टर, इंजिनिअर… आज हे, तर उद्या ते. रोज नवी स्वप्नं, नवी आव्हानं, नवे क्लास…! मम्मीच्या मैत्रिणींची मुलं जे जे करतात, ते सगळं मला करावं लागतं. माझी इच्छा आहे की नाही…. , नो वन केअर्स! ‘इट्स कॉम्पिटिशन टाईम’ म्हणत माझं बालपण माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं. आता मला काहीही बनायचं नाहीय. इट्स फायनल! ” छातीवर लावलेला स्पर्धकक्रमांकाचा बॅच काढून त्याने फेकून दिला आणि तो ग्राउंडवर आडवा पडला. त्याच्याकडे बघून वाटत होतं, ज्वालामुखीतून लाव्हारस उसळतोय.

चौदा वर्षांच्या मंथनच्या मुखातून निघालेलं ते गंभीर बोलणं ऐकून सगळे लोक अवाक झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.

अंकितने हात देऊन त्याला उठवलं आणि म्हटलं, “मंथन, मला माहीत आहे, तुला मला जिंकू द्यायचं होतं ना? “आणि त्याने आपल्या गळ्यातलं मेडल काढून त्याच्या गळ्यात घातलं.

“नाही दोस्ता, आंधळ्या स्पर्धेच्या या युगात वाट चुकलेल्या माझ्या मम्मी-पापांचे डोळे उघडण्याचा मी प्रयास करत होतो. आता मी तेच करणार, जे मला आवडतं, “असं म्हणत मंथनने जीवनातला नवा संरक्षक पवित्रा घेतला.

मूळ हिंदी कथा :रेस

♥ ♥ ♥ ♥ ♥

(३) – अधिकार आणि कर्तव्य

मुंबई सेंट्रलच्या बसस्टॉपवर खूप वेळ उन्हात उभी राहून ती तापली होती. अधूनमधून घाम पुसत मोबाईलवर मेसेजही पाठवत होती. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. ती चिडून बोलली, “एवढी काळजी आहे, तर गाडी घेऊन मला न्यायला का नाही आलास? मी उडत तर येऊ शकत नाही. बससाठी थांबलेय. बस कधी येणार, हे माझ्या हातात आहे का? “

तेवढ्यात समोरून बस आली. फोन बंद करून ती बसमध्ये चढली. खूप गर्दी होती. एकही सीट रिकामी नव्हती. त्या गर्दीतून वाट काढत ती पुढे गेली आणि तिने महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर नजर फिरवली. तिने बघितलं, की एका आरक्षित सीटवर एक वृद्ध महिला व एक वृद्ध पुरुष बसले होते. जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना एवढ्या प्रेमाने बोलताना पाहून बसमध्ये बसलेल्या अर्चनाला खूप छान वाटलं. नाहीतर वयाच्या या टप्प्यावर एकमेकांशी हसतखेळत मित्रत्वाने गुटर्रगू करणारी जोडपी कमीच असतात.

ती मुलगी पुढे गेली आणि म्हणाली, “अंकल, ही लेडीज सीट आहे. तुम्ही उठा. “

हे ऐकल्यावर दोघं चकित झाले. त्या तरुण मुलीच्या नजरेतला राग बघून ते वयस्क गृहस्थ म्हणाले, “होय बेटी. मला माहीत आहे. पण आम्ही चढलो, तेव्हा हीच सीट रिकामी होती. म्हणून एकत्र बसलो. हरकत नाही. मी उठतो. तू इथे बस. “

ते उठू लागले, तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली, “अहो, तुम्हाला बरं नाही. तुम्ही बसा, मी उठते. ” आणि त्या वृद्ध महिलेने आपली सीट त्या मुलीला दिली. सुरक्षित अंतर सोडून ती मुलगी सीटवर बसली. आता ती सतत फोनवर ‘त्याच्या’शी बोलत होती. तेव्हा समोरच्या सीटवर बसलेली अर्चना उठली आणि त्या वृद्ध महिलेला आपली सीट देत बोलली, “आई, तुम्ही इथे बसा. अतिजागृत महिला आता आपला आरक्षणाचा अधिकार बजावायला शिकल्या आहेत. ” शेजारी बसलेले लोक हसले. उगीच राईचा पर्वत व्हायला नको, म्हणून कंडक्टर पुढे गेला आणि ‘तिकीट-तिकीट’ म्हणून ओरडायला लागला.

या सगळ्याचा पत्ताच नसलेली ती मुलगी फोनवर आपल्या मित्राशी रोमान्सभऱ्या गप्पा मारण्यात गढली होती. ती साफ विसरून गेली होती, की आयुष्यात अधिकाराच्या जोडीने कर्तव्यंही बजावायची असतात!

मूळ हिंदी कथा : अधिकार और कर्तव्य

♥ ♥ ♥ ♥ ♥

मूळ तीन हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments