सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ ए मॅट्रिक परीक्षेचा निssकाल!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆
1975 पूर्वी ज्यांनी एसएससी परीक्षा दिली ते अकरावीत होते त्याला मॅट्रिक ची परीक्षा असं म्हणत. ती परीक्षा अवघड पहिला तो एक टप्पा पार करणार विद्यार्थी त्यामुळे एसएससी परीक्षेला क्लास कुठला मिळाला? मार्क किती पडले? असले प्रश्न कोणीही विचारत नव्हते मॅट्रिक पास झालास, वा! वा! अभिनंदन!!! … कारण खरोखरच ते तितके अवघड होते. कॉपी प्रकरण अजिबातच नव्हते. शाळेचे मार्क हा विषयाच नव्हता, म्हणजे एकूण बाह्य परिस्थितीवर पास होण्यावर अजिबात अवलंबून नव्हते त्या विद्यार्थ्यांची स्वतःची गुणवत्ता असेल तरच विद्यार्थी पास होत असे. त्यामुळे मॅट्रिक पास झाला म्हणजे त्यांनी खूप काही मिळवले असे समजले जाई. लोक अभिनंदन करत… आई-वडील आनंदाने पेढे वाटत.. आईला तर अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटे, “झाला बाई पोरगा एकदाची मॅट्रिक”ही भावना. त्यानंतर कुठेतरी नोकरीही लागत असे. अगदी सरकारी सुद्धा. एसएससी म्हणजे अकरावीच्या वर्गात येईपर्यंत फारशा शिड्या त्या विद्यार्थ्याला लागत नव्हत्या स्वगुणावर पास होऊन त्याला पहिली ते अकरावी पर्यंतचा प्रवास करावा लागे. अगदी एखाद दुसऱ्या मार्काने कुठेतरी तो वर ढकलला जाई अन्यथा एक मार्काने सहावी सातवीत नापास झालेले विद्यार्थी मी पाहिले आहेत. मग एसएससी ला आल्यानंतर अभ्यासाची फार गंभीरता नव्हती पण एकदा घरातून सांगितले जाई यंदा मॅट्रिकला आहेस तू जबाबदारीने अभ्यास कर वेळ घालवू नकोस. उन्हाळ्यात कोणतेही वर्ग नव्हते. शाळा कोणताही जादा तास घेत नव्हत्या. शिकवण्या लावल्या जात नव्हत्या. मुलाने स्वतःच्या स्वतः अभ्यास करायचा. गाईड वगैरे फारसा प्रचार नव्हता पाठ्यपुस्तका शिवाय कुठला आधार नव्हता आणि शिक्षकांशिवाय दुसरे मार्गदर्शन नव्हते. एखाद्या घरातून यापूर्वी शिकलेली जर पिढी असेल तर कुणीतरी अडल्या नडल्या वेळी मार्गदर्शन करीत असे इतकेच. काही घरातून तर शिकणारी ती पहिलीच पिढी होती एसएससी ला आहे म्हणून आया काही वेगळं करत नसत घरात पाहुणेरावळ्यांचा सुकाळ असायचा मुलगा अकरावीचा आहे हो म्हणून कोणी येऊ नका असे कोणालाही सांगितले जात नव्हते. आया फरशा काम करत नसल्यामुळे(बाहेर जाऊन)रजा वगैरेचा प्रश्न नव्हता नाहीतर आजकाल मुलगा मुलगी दहावीला म्हणलं की आईची एक महिना रजा ठरलेली जणू काही बाईच अभ्यास करणार आहे असो आईचं काम एवढेच वेळेवरती जेवायला खायला. घरातला जो कोणी मोठा करता माणूस असे तो फक्त अभ्यासाला बसा किंवा काही कमतरता आहे का एवढे बघत असे. यापेक्षा पालक सभा वृत्तपत्रातून मार्गदर्शन ऑनलाईनच नव्हते त्यामुळे तो भागच नव्हता, बरे होते ते. त्यामुळे विद्यार्थ्याला येणारे अतिरिक्त टेन्शन अजिबात नव्हते मुळात घरातून कोणाच्याही अपेक्षा नव्हत्या आपलं दुकान चालवावं म्हणून त्याने तेच काहीतरी केले पाहिजे असंही काही नव्हतं त्यामुळे त्या वेळचे विद्यार्थी भयमुक्त आणि तणावमुक्त शिक्षण घेऊ शकले त्यामुळे ते सखोल असावेत. वर्षभर अशाप्रकारे विद्यार्थी नियमित अभ्यास करत असे एखादा विद्यार्थी हुशार असेल विशेषतः संस्कृत मध्ये तर शंकर शेठ शिष्यवृत्तीचे आकर्षण असायचे त्या विद्यार्थ्यावर शाळेत थोडे अधिक खटपट करीत असत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला शंकर शेठ स्कॉलरशिप मिळत असे आणि आयुष्यभर तो विद्यार्थी हा शंकरशेठ मिळवणारा बर का… म्हणून मिरवत असे आता संस्कृत आज शंभर पैकी 100 मार्क मिळवणारे अनेक विद्यार्थी मी पाहिले आणि मला शंका निर्माण झाली की शिक्षकांनाच काही संस्कृत येते की नाही. या सगळ्या मध्ये आपल्या एका पिढीच्या रिझल्टच्या आठवणी फार रम्य आहेत
मॅट्रिक चा निकाल साधारण जूनच्या तोंडावरती लागत असे वर्तमानपत्राच्या प्रेस मध्ये हा निकाल आदल्या दिवशी छपाईसाठी येत होता पूर्वी पूर्ण नावाची छपाई होत होती अगदी सुरुवातीच्या काळाला पण त्यानंतर नंबर यायला लागले मग ज्यांची ओळख प्रेस मध्ये असेल ती मंडळी प्रेस च्या आजूबाजूच्या खिडक्यातून चिठ्ठ्या पाठवून पाठवून संध्याकाळपर्यंत रिझल्ट मिळ वित असत मग भल्या पहाटे वर्तमानपत्राला सायकलवरून एसएससी परीक्षेचा निकाल असे ओरडत जायचा वाड्यात घरात एसएससी ची मुलं असतील तर बरीच मंडळी जागी असायची मग तो पेपर विकत घ्यायचा आणि त्यामध्ये नंबर पाहणे सुरू… झालास का पास वगैरे एका मिनिटात 100 जण चौकशी करायची आणि एकदाचे नंबर समोर यायचा.. झालो पास म्हणून तो मुलगा ओरडायचा.. सगळ्या वाड्याला आनंद.. आई म्हणायची देवापुढे साखर ठेव बरं देवाजवळ दिवा लावून साखर ठेवली जायची पोरग पटापटा सगळ्या वाड्यातल्यांच्या पाया पडायचे दुसऱ्या दिवशी स्नान संध्या वगैरे सगळं आटोपून वडील आणि मुलगा पेढे आणायला पेढ्याच्या दुकानावर मग पेढे वाला विचारायचं का झाला वाटतं मुलगा मॅट्रिक? वडील अभिमानाने सांगायचे हो ना 50 टक्के मार्क पडले… अरे वा! छान!! असे म्हणत दुकानदार एखादा पेढा जास्त टाकायचा मग घरोघरी पेढे देण्याचा कार्यक्रम घरामध्ये त्या दिवशी काहीतरी गोड धोड केले जायचे मग दुसऱ्या दिवशी पासून मुलाच्या नोकरीचा किंवा कॉलेजचा शोध सुरू व्हायचा
मॅट्रिक परीक्षेच्या निकालात बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला एक किस्सा मला अजून आठवतो ते माझ्या नापासांच्या शाळेत मुलांशी गप्पा मारायला आले होते. त्यानी सांगितलेली हकीगत फारच रंजक आहे. ते म्हणाले, ” एसएससी चा निकाल लागणार ते आदल्या दिवशी पासून अंतःकरणात धडधडत होती कारण गणित विषय मला नेहमीच अवघड जात होता त्यामुळे मी नापास होतो की काय अशी मला भीती वाटत होती पहाटे आईने मला दोन आणे देऊन पेपर आणायला पिटाळले पेपर विकत घेताना मला धडधडत होते पेपर उघडला त्यावर बलवंत मोरेश्वर पुरंदरे हे नाव वाचले आणि मला प्रचंड आनंद झाला छापून आलेले हे पहिले माझे नाव मी तडक घर गाठले घरातील सर्वांना पास झाल्याचे सांगितले आईला नमस्कार केला तिने एक रुपया ठेवला आणि सांगितले पेढे घेऊन ये मी पेढे घ्यायला जाताना गणिताचे पुस्तक एका पिशवीत गुंडाळून घेतले त्याला घट्ट दोरी बांधली आणि सायकलवर बसून खडकवासला गाठले तिथे जाऊन त्या बंडलला दोन-तीन दगड मांडले आणि ते पुस्तक पाण्यात फेकून टाकले पुन्हा याच्या वाटेला जाणार नाही. आणि मग तडक पेढे घेऊन घरी. गणिताचे सर्वात मोठे ओझे होते माझ्या डोक्यावरून उतरले होते बरे मुलांनो पुढे जरी गणित लागलं नाही तरी दहावी तो अभ्यास करावाच लागतो तेव्हा तुम्ही तो छान करा आणि उत्तम गुणांनी पास व्हा असा आशीर्वाद देतो “असे म्हणून त्यांनी भाषण संपले जेव्हा जेव्हा एसएससी परीक्षेचा निकाल असतो त्या त्यावेळी मला बाबासाहेबांच्या या गोष्टीची आठवण येते.
काल परवा दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला बोर्डाचे पर्सेंटेज 92 टक्के च्या पुढे अनेक शाळांचे निकाल शंभर टक्के.. शंभर टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी.. सगळेच आकडे अचंबित करणारे होते त्या काळात 40-45% निकाल लागत असे 70 72% चा विद्यार्थी बोर्डात यायचा आता शंभर टक्केच अनेक विद्यार्थी.. हुशारी वाढली गुणवत्ता वाढले का परीक्षा सोपी झाली काहीच कळत नाही. 100 ही मार्काची मर्यादा आहे म्हणून नाहीतर किती मार्क विद्यार्थ्यांनी घेतले असते कोण जाणे एसएससी निकालानंतर शंभर टक्केवाल्या मुलांचे काय होते याचे आम्ही कधी मूल्यांकन केले नाही विद्यार्थी पुढे काही घडतात काय हे पाहिले नाही जे चाललंय ते चालू दे असं म्हणण्याची आपली पद्धत झाली आहे. परवा निकाल लागल्यानंतर माझ्याकडे शिकवणीला येणाऱ्या एका विद्यार्थिनीची तयारी मी अ ब क ड पासून करून घेत होते तिला एसएससीची काहीच पात्रता नव्हती हे मला ठाऊक त्यांच्या शाळेने तिचा फॉर्म भरला होत.. चार वर्षे शिक्षणाचा गॅप होता तिला काना मात्राचे एकही शब्द आजही लिहिता येत नाहीत. इंग्रजी गणित विज्ञान हे विषयआकलनाच्यापलीकडे… मराठी वाचता येत नाही अशी विद्यार्थिनी 42% गुणांनी पास झाली आहे आणि मी गेले चार वर्षे जिच्यावर खूप मेहनत घेऊन शिकवले प्रत्येक विषयाचे पाच पाच पेपर बसून सोडवून घेतले त्या मुलीला 58% मार्क पडले त्याचे मला खूप समाधान वाटले पण या 42% च्या मार्काने मात्र मी अजून शुद्धीवर नाही असे मला वाटते एसएससी बोर्ड कुणाला फसवत आहे यात आपण फसतो आहे हे जाणून सुद्धा गप्प असणारा कोणता वर्ग आहे पालक शिक्षक शाळा शिक्षण विभाग एसएससी बोर्ड यावरच खरे एक मोठा लेख तयार होईल आणि मी तो लिहिणार आहे असो.
पण आमच्या वेळच्या मॅट्रिकच्या आठवणी अर्थात 75 च्या आधी असणाऱ्या पिढीच्याआठवणी अत्यंत रम्य आहेत सुंदर आहेत एवढे मात्र खरे… आणि प्रत्येक एस एस सी परीक्षेच्या निकाला दिवशी ती रात्रीची जागरण ए मॅट्रिक परीक्षेचा निssकाल असे ओरडणारा वर्तमानपत्र वाला… कौतुकाने एक पेढा जास्त टाकणार स्वस्तिक पेढेवाला ही सगळी मंडळी डोळ्यासमोर येतात गुणवत्तेचा फक्त गुणवत्तेशी संबंध होता परिस्थितीशी नव्हता त्यामुळे कौतुकाच्या बातम्या फारशा येत नसत वाड्यातला पोरगा मॅट्रिक झाला तर सगळ्या वाड्याला आनंद त्या दिवशी तो हिरो असायचा निकालाची ती मजा आता नाही एवढे मात्र खरे काही वेळेला एखादा रिझल्ट चुकलेला असायचा.. मला आठवते तशी तार सुद्धा बोर्डाकडून येत असे आणि ती दुरुस्ती व्हायची एसएससी बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांनाही आदल्या दिवशी तार येत असे वृत्तपत्र वाले त्यांच्या मुलाखती घेत दुसऱ्या दिवशी फोटोसह पेपर मध्ये मुलाखत येत असे नापास झालेल्या मुलांना आई-वडील दिलासा द्यायचे अरे चुकलं असेल येईल कळेल दोन दिवसात.. पण हे फारदा घडत नव्हतं क्वचित असे होत असे त्यामुळे रडणाऱ्या पोरांना पोरींना आई-वडील समजूत घालत ‘अरे चुकीच्या दुरुस्तीमध्ये उद्या बघू आपण ‘. ती सुद्धा एक मजाच होती.
मॅट्रिकच्या परीक्षेच्या अनेक आठवणीत या लेखाच्या निमित्ताने 75 पूर्वी मॅट्रिक झालेल्या सगळ्यांना या आठवणीत पुन्हा एकदा रमता येईल आणि मग घरामध्ये आपल्याला ते सांगतील अरे आमच्या वेळच्या मॅट्रिक परीक्षेचा निकाल म्हणजे काय…. वगैरे वगैरे सांगा आणि जरा कंपल्सरी बसून ऐकायला पण लावा आनंद घ्या…!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈