श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पाहिले -. पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय, म्हणजे

नेमकं काय होतय? तो कशामुळे बिघडत चाललाय? त्याचे परिणाम काय होताहेत आणि तसं घडू नये, म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, हे सारे प्रश्न या चर्चेच्या अनुषंगाने चर्चिले जाताहेत.) – आता इथून पुढे — 

मुंबई हे रोजी रोटी देणारं शहर. त्यामुळे जो उठतो, तो काम मिळवण्यासाठी मुंबईकडे धाव घेतो. त्यामुळे तिथे लोकांची गर्दीच गर्दी. लोकसंख्या वाढली, म्हणून जमीन काही वाढत नाही. मग समुद्र हटवून, तिथल्या दलदलीचा निचरा करून जमीन तयार केली जाते. त्यात या तयार केलेल्या जमिनीवर बंगले, इमारती, बागा, तळी वगैरे तयार केली जातात. लोकांची राहायची सोय होते. उदाहरण द्यायचं झालं, तर अंधेरीच्या पश्चिमेस`स्वामी समर्थ नगराचे देता येईल. या भागाचं व्यवहारात परिचित असलेलं नाव म्हणजे लोखंडवाला कॉम्पेक्स. सुरुवातीला दलदल आणि खारफुटी जंगल असलेला भाग नंतर विकसित केला गेला. या भागात राहणार्‍या लोकांना आपण पॉश एरियात राहतो, याचा अभिमान आहे, पण हा एरिया पॉश होत असताना, दलदल नष्ट केली गेली. त्या प्रदेशातील कांदळी किंवा खारफुटीची जंगल नष्ट झाली. तिथलं शैवाल नष्ट झालं. खारफुटीच्या जंगलात भरपूर जीव जगतात. तिथे अंडी घालण्यासाठी मासे तसेच इतरही अनेक जलचर येत असतात. या खारफुटीच्या जंगलाची मोठ्या प्रमाणावर तोड झालेली आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे खारफुटीवर विपरित परिणाम होत असतो. समुद्राच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे प्रवाळांच्या वसाहती (कोरल्स) नष्ट होणे. या वसाहती असख्य जिवांना आसरा देतात. अन्न पुरवतात. पण त्या अतिशय संवेदनाशील असल्याने प्रदूषण वाढले, की त्या नष्ट होतात. या वसाहतींमध्ये जगातील सर्वाधिक जैव विविधता बघायला मिळते. त्या नष्ट होणे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. म्हणून इकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.

खारफुटी जंगलाचं आणखीही एका दृष्टीने महत्व आहे. त्यामुळे वादळ आणि मोठ्या सागरी लाटांची तीव्रता कमी होते. हे जंगल सागरी लाटा आणि वारे यांच्यामुळे होणारी किनार्‍याची धूप कमी करण्यास मदत करते. जमिनीवरून समुद्रात काही प्रदूषके मिसळत असतात. त्यातील गाळ आणि जड धातू खारफुटी जंगलांमुळे गाळले जातात आणि त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारते. किनार्‍यावरील प्रवाळांच्या अस्तित्वाकरताही कांदळ वनांची नितांत आवश्यकता आहे.

मुंबईत आणि ठाणे, बेलापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ इ. अनेक ठिकाणी आपल्याला खारफुटीची जंगलं नाहीशी करून त्या त्या भागाचा विकास करताना पर्यावरणाचा र्‍हास झालेला दिसेल. या भागात खूपच कारखाने आहेत. सागराजवळ कारखाना उभा राहतो. त्यातून गरम पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे तिथल्या पाण्याच्या नैसर्गिक तापमानात बदल होतो. यामुळे शैवाल कमी होते. त्यामुळे पूर्वीचे मासे, झिंगे, खेकडे स्थलांतर करतात. कारखान्यात तयार होणारे प्रदूषित घटक, प्रदूषित पाणी अखेर समुद्रात (जिथे समुद्र नसेल, तिथे नदीत) सोडले जाते. यामुळेही समुद्राचे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे जलजीवांची मोठ्या प्रमाणावरहानी झाली आहे. अजूनही होते आहे. समुद्रातील कचराकुंडीमुळे आणि तिथले पाणी प्रदूषित झाल्यामुळे त्या भागातील कासवं, मासे मृत झालेली आणि भरतीच्या पाण्याबरोबर किनारपट्टीवर येऊन पडलेली आपण सातत्याने वर्तमानपत्रातून वाचतो. टी. व्ही. वरही बघतो.

साधारण ७०च्या सुमाराला मला वरळीला १५-२० दिवस राहावे लागले. वरळीचा समुद्र किनारा खडकाळ. किनार्‍यावरून खडकावर जाऊन बसायचं. समोरचा मोकळा, निळाईचा समुद्र. दूरवर बोटी. समुद्रावरून येणारा गार वारा. मन प्रसन्न व्हायच़ पुढे दहा एक वर्षानंतर आणि नंतरही थोड्या थोड्या अंतराने जेव्हा जेव्हा तिथे गेले, तेव्हा तेव्हा पाण्याची निळाई काळिम्यात बदलत चाललेली जाणवली. त्यात कचरा वाढत चालल्याचं जाणवलं. वार्‍याबरोबर दुर्गंधही येऊ लागला. पाण्यात पाय बुडवणं, हात घालणं, या गोष्टी नकोशाच वाटू लागल्या.

वरळीला आता संरक्षक भिंत बांधलेली आहे. पण त्यावर बसलं, तर आधी दिसतो कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या. मोठेमोठे प्लॅस्टिक आणि कापड-किंतानांचे तुकडे, बाटल्या, अनेक प्रकारचं भंगार आणि असंच घाण-साण. या कचराकुंडीचं आधी दर्शन घ्यायचं आणि नंतर मान उचलून समुद्राकडे पाह्यचं. ही स्थिती काही केवळ वरळीच्या समुद्राचीच नाही, मुंबईतील अनेक समुद्र किनारे असे प्रदूषित आहेत. मुंबई, ठाणे कोणत्याही समुद्रावर गेलं, तर अलिकडे सगळीकडे समुद्राच्या स्वच्छ निळ्या पाण्याऐवजी काळे पडलेले व त्यात कचरा साठलेले पाणी दिसते. त्याचा घाण वासही येतो. पाण्याला हातही लावावासा वाटत नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे मुंबईसारख्या महानगरीत निर्माण होणारे सांडपाणी व मैलापाणी. या पाण्यापैकी काही पाण्यावर प्रक्रिया करून ते समुद्रात सोडले जाते, पण बाकीचे बरेचसे पाणी तसेच समुद्राला मिळते.

डॉ. प्रकाश जोशी यांचं रमणीय सागर किनारे हे पुस्तक २०११साली प्रकाशित झालं. त्याच्या आधी दोन-तीन वर्षाचं त्यांचं निरीक्षण. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, `लोकसंख्या वाढ, पर्यटक वाढ, सांडपाणी, रासायनिक कारखाने, खाणकाम, वाळू उत्खनन, नवी बंदरं अशा बाबी म्हणजे एकूणच`विकास प्रक्रिया, भारतीय सागर किनार्‍यांच्या पर्यावरण विनाशास कारणीभूत ठरल्या. सागरातील जीवसृष्टी मुख्यत: सूक्ष्म अशा प्लँट तसंच शैवाल जातीच्या वनस्पतींवर अवलंबून असते. रासायनिक प्रदूषणामुळे या वनस्पतींना पोषक अशा सोडियम, पोटॅशियम, कॅलशियम, हायड्रोकार्बन्स, हरित द्रव्य आदि घटकांचं संतुलन बिघडतं. ’

आपल्या कोकण आणि गुजराथच्या किनारपट्ट्या रासायनिक प्रदूषणाच्या बळी ठरल्या आहेत. खाणकाम आणि पर्यटनाच्या अतिरेकापुढे गोव्यानं पर्यावरणाची पर्वा केली नाही. नव्या बंदरांच्या हव्यासापायी गुजरातनं आपल्या किनार्‍यांचं स्वास्थ्य बिघडवलं. पूर्व किनार्‍याच्या काही भागाला डेझर्टेशनचा धोका आहे. पूर्व किनार्‍याला रासायनिक प्रदूषणाची फारशी बाधा पोचलेली नाही. आंध्र प्रदेशातील नेल्लोर तथा तामिळनाडूच्या तंजावूर आणि पुड्डुकोट्टाई जिल्ह्यांच्या किनारी भागात, किनार्‍याकाठी कृत्रीम तळी बनवून त्यात कोळंबीची पैदास केली जायची. त्यामुळे अनेक खेड्यातील विहिरी, नाले इ. जलस्त्रोत दूषित झाले. खारट झाले. अनेक खेड्यांचं टँकर्सच्या पाण्यावरचं अवलंबित्व वाढलं. अशा अनेक गोष्टी केवळ एका बदलामुळे घडू लागतात. यामुळेच पर्यावरणातील विविध घटकांचे संबंध फार महत्वाचे असतात. आपण आपल्या फायद्यासाठी बर्‍याचदा पर्यावरणातील एखाद्या घटकाची हानी करतो, पण त्यावेळी पर्यावरणातील इतर घटकांची आपल्या नकळत हानी होत असते.

या सार्‍या विवेचनाचा अर्थ विकासच नको. आपण गुहामानवाच्या काळातलं जीवन जगायला हवं, असा मुळीच नाही. विकास करताना पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल, हे बघायला हवं, एवढाच याचा अर्थ आहे. पर्यावरणातील एखाद्या घटकाची आपण हानी करतो, याची आपल्याला जाणीव असते, पण त्याचवेळी अजाणतेपणे इतर अनेक घटकांची हानी होते, याची आपल्याला कल्पना नसते. जमीन विकासासाठी खारफुटीचं जंगल तोडताना, त्यातील कांदळीसारख्या वनस्पती, लहान झाडं-झुडुपं नाहिशी होणार, हे माहीत असतं, पण त्याचबरोबर त्याच्या आश्रयाने राहणारी कासवं, झिंगे, बेडूक, खेकडे, पक्षी, त्याच्यापुढे असलेलं शैवाल, त्याच्यावर जगणारे बारीक-सारीक सूक्ष्म जीव, त्या जीवांवर जगणारे कीडे-मकोडे या सगळ्या जीवसृष्टीचीही हानी होते, हे आपल्याला माहीत नसतं. त्यांची प्रजनन स्थानं नाहिशी होतात. खोल पाण्यातले अनेक प्रकारचे मोठे मासे अंडी घालण्यासाठी इथे येतात. पिले लहान असेपर्यंत किनारपट्टी लगत वावरतात आणि मोठी झाली, की खोल समुद्रात जातात. खारफुटीचे जंगल तुटले, की माशांच्या अंड्यांचे आश्रय स्थान नाहिसे होते. ते अंडी घालायला येत नाहीत. मग किनारपट्टीवरील लहान मासेही कमी होतात. एवढे सगळे परिणाम समुद्र किनार्‍याकाठचे खारफुटीचे जंगल तोडल्याने होतात.

आता प्रश्न असा, की या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, तरी आपण सामान्य माणसे काय करू शकणार? एखाद्या योजनेत पर्यावरणाचा मोठ्या प्रमणावर र्‍हास होतोय, असं दिसलं, तर आपण एकत्रितपणे आवाज उठवू शकतो. तामीळनाडूमध्ये तंजावूर आणि पुड्डुकोट्टाई जिल्ह्यांच्या समुद्रकाठच्या गावातून कृत्रीम तळी तयार करून कोलंबीची शेती केली जायची. त्यामुळे गावातील विहिरी, ओढे, यांचं पाणी खारट झालं. जमिनीत मीठ फुटलं. एके ठिकाणचं सगळं गावच्या गाव उठून दुसर्‍या जागी स्थलांतरित झालं. तिथे लोकांनी आवाज उठवला आणि कोलंबीची कृत्रीम शेती बंद पाडली. अशाच प्रकारे गोव्यातील खाणकामाविरुद्ध आवाज उठवला गेला आणि गोव्यातील खाणकाम आता बंद करण्यात आले आहे.

सध्या मुंबईमध्येही खारफुटीवर होणारे अतिक्रमण लक्षात घेता, पर्यावरण तज्ज्ञांची मागणी आहे, की मुंबईच्या खाड्या, अभयारण्याची जागा म्हणून घोषित करावी. मुंबई पुरापासून वाचवण्यासाठी, भरतीचे पाणी मुंबईवर आघात करू नये, म्हणून खारफुटीची गरज आहे. खाड्यांना अभयारण्याचा दर्जा मिळाला, तर येथील खारफुटीचे रक्षण होईल, कारण तसा दर्जा प्राप्त झाला, तर कठोर नियमांचे पालन होईल. पाणथळ जागेत होणार्‍या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवता येईल. सध्या त्या संबंधी काही नियम असले, तरी त्यात शैथिल्य आले आहे. त्यामुळे पर्यावणात ढवळा-ढवळ होते आहे. अभयारण्य म्हणून तो भाग जाहीर केल्यास, नियमांचे काटेकोर पालन करणे भाग पडेल. न केल्यास मोठ्या प्रमाणात दंड, शिक्षा होऊ शकेल. मुंबईभोवती पसरलेल्या खारफुटीचे रक्षण होणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी १४ फेब्रुवारी २०१८ला निवेदन केलं, की येत्या काळात खारफुटी क्षेत्रावर पाहरा ठेवण्यासाठी १०८ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाईल.

सरकारी प्रयत्न आणि त्याला लोकांच्या इच्छाशक्तीची साथ यातून पर्यावरणाच्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालणे शक्य होईल.

– समाप्त –

(संदर्भ – १. रमणीय सागर किनारे – डॉ. प्रकाशजोशी, २. पर्यावरण प्रदूषण – श्री निरंजन घाटे ३. गाथा पर्यावरणाची – श्री अभिजित घोरपडे) 

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments