श्री अनिल वामोरकर
☆ मैत्रीमधील मंदी… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
‘मैत्रीमधील मंदी’
एक अत्यंत समर्पक आणि अंतर्मुख करणारा विषय…
मी अलीकडे हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या फेब्रुवारी अंकात एक अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचला आणि तो थेट हृदयाला जाऊन भिडला.
या लेखात ‘Friendship Recession’ म्हणजेच मैत्रीमधील मंदी कशी आपल्या दैनंदिन व्यवहारात शिरकाव करत आहे, हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
American Perspectives Survey नुसार, 1990 पासून अमेरिकन प्रौढांमध्ये “एकही जवळचा मित्र नाही” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण चारपट वाढून १२% वर गेले आहे, तर “१० किंवा अधिक जवळचे मित्र आहेत” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण एकतृतीयांशाने कमी झाले आहे.
माझं मत आहे की जर भारतातील शहरी भागात अशीच एखादी सर्व्हे केली, तर तसाच काहीसा कल दिसून येईल. आपल्याकडे ओळखी वाढत आहेत, पण खरे ‘मित्र’ कमी होत आहेत.
पूर्वी अशा वेळा होत्या की आपण नवीन शहरात असलो, तरी एखाद्या बारमध्ये गेले, काउंटरवर बसलो आणि ओळखीच्या, अनोळखी मित्रांशी सहज गप्पा रंगल्या असं सहज घडलं असतं.
पण आजकाल अनेकजण एकटे टेबलवर बसतात, गर्दीकडे पाठ करून.
अमेरिकेतील एका अलीकडच्या सर्व्हेप्रमाणे, एकटे जेवणं हे प्रकार मागील दोन वर्षांत २९% ने वाढले आहे.
Stanford University तर आता विद्यार्थ्यांना सामाजिक जीवन उद्देशपूर्वक रचायला शिकवण्यासाठी ‘Design for Healthy Friendships’ नावाचा अभ्यासक्रम चालवते.
हे सगळं फक्त एक सामाजिक बदल नाही, तर एक सांस्कृतिक संकट आहे.
मैत्रीसाठी वेळ काढणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही; ती आता एक प्राथमिकता असली पाहिजे.
आपण आपला वेळ कुठे घालवतो, कोणामध्ये गुंतवतो, हे सर्व झपाट्याने बदलतंय.
एकटेपणा हा आता निवड नाही, तर एक नवा नॉर्म बनत चाललाय.
आणि जर योग्य पद्धतीने वापरला गेला नाही, तर हा एकटेपणा मित्र न बनवण्याचीच नाही, तर मैत्री टिकवण्याचीही क्षमता गमावून बसण्याचं कारण बनतो.
जर आपण जागरूकपणे आपल्या प्राधान्यक्रमात मैत्रीला स्थान दिलं नाही, तर “संबंध” – हा आपल्या आनंदाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत – आपल्याला नकळत गमवावा लागेल.
पूर्वी जिथे नैसर्गिकरीत्या मैत्री फुलायची अशा संस्था – धार्मिक कार्यक्रम, क्लब्स, क्रीडा संघटना, रोटरीसारख्या स्वयंसेवी संस्था – या आता संख्येने आणि प्रभावाने दोन्ही प्रकारे कमी होत चालल्या आहेत.
आता आपण आधीपेक्षा अधिक स्वतःमध्ये गुंततोय – सोशल मीडिया, कुटुंबातील जबाबदाऱ्या, पालकत्व, पाळीव प्राणी यांच्यात.
हो, पाळीव प्राणी!
माझ्याच अनेक मित्रांनी भेटीला येणं केवळ पाळीव प्राण्यांच्या कारणास्तव टाळले आहे.
आज मैत्री ही आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेली नाही, ती आता इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर उरलेल्या वेळात जमली तर जमली, अशा स्वरूपात आली आहे.
हे सगळं असूनही, मैत्रीचे महत्व अधोरेखित करणारे भरपूर संशोधन उपलब्ध आहे.
Bonnie Ware या हॉस्पिस परिचारिकेच्या ‘The Top Five Regrets of the Dying’ या प्रसिद्ध पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी विधान आहे –
“I wish I had stayed in touch with my friends. ”
“मला वाटतं, मी माझ्या मित्रांशी संपर्कात राहिलो असतो तर बरं झालं असतं. ”
संशोधन सांगतं की –
“Social isolation म्हणजे सामाजिक एकटेपणा हा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. हे रोज १५ सिगारेट पिण्याइतकं धोकादायक असू शकतं. ”
मैत्री ही मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारते.
Harvard University च्या ८० वर्ष चाललेल्या प्रसिद्ध अभ्यासात हे स्पष्ट सांगितलं गेलं की,
“आपल्या आयुष्यातील आरोग्य व आनंद याचा सर्वात मोठा भविष्यवक्ता (predictor) म्हणजे तुमचं धन किंवा व्यावसायिक यश नव्हे, तर तुमचे निकटवर्तीय संबंध आणि मैत्री आहे. ”
Survey Centre on American Life च्या अहवालात एक मूलभूत सत्य आहे:
“More friends equals more life satisfaction. ”
“अधिक मित्र = अधिक आयुष्यात समाधान. ”
जसं गुंतवणूक वाढण्यासाठी वेळ लागतो, तसंच मैत्रीसुद्धा!
ती एक दिवसात होत नाही – तिच्यासाठी लागतो वेळ, प्रयत्न आणि मनापासूनचा सहभाग.
माफ करा, विसरून जा,
गरज वाटली तर माफी मागा,
फोन करा,
बिल भरा,
ट्रिप प्लॅन करा,
एखादं गिफ्ट द्या,
स्मृती निर्माण करा –
जरी ती आठवण केवळ स्वतःसाठीच असेल तरीही!
शेवटी मिर्झा गालिब यांचा हा शेर शेवटसाठी खास –
“दोस्तों के साथ जी लेने का मौका दे दे ऐ खुदा…
तेरे साथ तो मरने के बाद भी रह लेंगें…”
मित्र व्हा, आणि सदैव आशीर्वादित राहा. – 🙏
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री अनिल वामरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈