श्री सुनील देशपांडे
विविधा
☆ मी, पदयात्रा, फेडरेशन आणि प्रबोधन… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
बाबा आमटे यांचा ‘ज्वाला आणि फुले’ हा कवितासंग्रह कॉलेजच्या वयापासून अनेक वेळा वाचला आहे. परंतु २०१६ मध्ये ज्वाला आणि फुले मधील काव्यवाचनाचा कार्यक्रम मी करीत असताना त्यातील ‘संतांचे मृत्युपत्र’ या कवितेतील खालील ओळी सादर करीत असतानाच मी अस्वस्थ झालो.
देणार आहात का मेल्यावर,
तुम्ही तुमचे डोळे, हृदय
आणि शाबूत असेल ते ते?
शंकरावर लक्ष बेलपत्रे आपण वाहतो,
तसे लक्ष डोळे आणि लक्ष हृदये,
समाजपुरुषाला वाहण्याची शपथ
घेणार आहात का तुम्ही?
जाता जाता असे एक आंदोलन
उठलेले पाहण्याची इच्छा आहे.
१९६० ते ६४ या काळात लिहिलेल्या या कविता, अवयवदान देहदान हे शब्दही माहीत नसलेला तो काळ. परंतु या द्रष्ट्या विभूतीने त्या काळात पुरस्कार करून सुद्धा त्यांच्या हयातीत हे आंदोलन उभे राहिले नाही.
आतातरी कोणीतरी असे आंदोलन उभे केले पाहिजे. असा विचार करत असताना माझ्या अंतर्मनाने प्रश्न विचारला कोणीतरी म्हणजे कोण? मग तूच का नाही?
आणि मी निर्णय घेतला होय मीच! मग ठरवलेच. समाजाला लक्षावधी अवयवांचे दान व्हावे ही बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागायचं! प्रथम माझ्या पत्नीने मग माझ्या आईने व मुलांनी याला संमती दिली. ही संकल्पना मी माझ्या रोटरी क्लब पुढे मांडली. सर्वांनी एक मुखाने पाठिंबा दिला.
नाशिक ते गडचिरोली या रोटरीच्या विभागाचे प्रमुख म्हणजेच त्या वेळचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. महेश मोकाळकर व माजी प्रमुख रोटे. दादासाहेब देशमुख यांनीही ही कल्पना उचलून धरली. क्लब प्रेसिडेंट भास्कर पवार व इतर रोटरी सदस्य तसेच नाशिक येथील अवयवदान क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. भाऊसाहेब मोरे आणि इतर अनेक संस्थांनी आर्थिक सहकार्याचेही आश्वासन दिले आणि ‘अवयवदान वारी’ या नावाने हा समाज प्रबोधनासाठी पदयात्रा काढण्याचा पहिला प्रकल्प निश्चित करण्यात आला.
अवयवदानाचे प्रबोधन हा माझ्या अंतर्मनाचा हुंकार आहे!
गाडगे बाबा, तुकडोजी बाबा व आमटे बाबा ही माझी दैवते व त्यांचे विचार हे माझे आदर्श आहेत.
माझ्या दैवतांच्या विचारांच्या प्रेरणेतून व जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर हा संकल्प तडीस नेण्याचे ठरवले.
मी तसा साधासुधा मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला मध्यमवर्गीय माणूस. लहानपणापासून माझ्या आईने समाजसेवेचे काही संस्कार व वडिलांनी नकळत केलेले अंधश्रद्धाविरोधी संस्कार यातून मी मोठा झालो. कोयनानगर येथे जिल्हा परिषदे च्या जीवन शिक्षण विद्या मंदिर मध्ये ७वी पर्यंत प्राथमिक शिक्षण आणि तेथेच शिवाजी हायस्कूल मध्ये एसएससी पर्यंत शिक्षण घेतले. येथील शिक्षकांकडून वस्तुनिष्ठ विचारसरणीचे संस्कार माझ्यावर झाले. तसा मी फार हुशार असा नव्हतोच शिक्षणामध्येही मध्यम वर्ग सोडला नाही. जी काही बुद्धिमत्ता होती त्या बुद्धिमत्तेचा उपयोग सामाजिक विश्लेषण व स्वतःचे विचार निश्चित करण्यात झाला. त्यामुळे मी सतत विचार मग्नतेत बुडालेला असे.
पुढे कराड येथे सायन्स कॉलेज मधून बीएससी उत्तीर्ण झालो. त्यामुळे शास्त्रीय विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन यांची व्यक्तिमत्त्वात भर पडली.
हे सर्व संस्कार अगदी नकळत घडत होते. आता उतारवयात विचार करीत असताना या सर्वांची जाणीव होत आहे.
सोलापूर व पुणे या ठिकाणी सुरुवातीला नोकरी केली. त्याही वेळी १९७२ च्या दुष्काळात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी काही समविचारी विद्यार्थ्यांना एकत्र करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी साठी आणि काही आर्थिक मदतीसाठी निधी उभारला. साहित्य क्षेत्रातही आमचा एक समूह जमला होता आमच्या समूहातर्फे लघु अनियतकालिकांच्या चळवळी मध्ये ही सामील झालो होतो. नोकरी करून थोडेफार समाजकार्य करत होतो.
त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये लघुउद्योजक होण्यासाठी धडपडत होतो म्हणजे पडत पडत उभे राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्या वेळेला कुणीतरी सांगितलेला एक विचार ‘भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण भारताला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर तरुणांनी उद्योजक बनले पाहिजे’ हा विचार डोक्यात ठेवून विविध व्यवसाय करत नाशिकमध्ये येऊन स्थिरावलो. अंबड एमआयडीसी मध्ये सुरुवातीला प्रिंटिंगचा व्यवसाय आणि नंतर केटरिंग आणि रेस्टॉरंट व्यवसाय यामध्ये स्थिरावलो. व्यवसायात स्थिरावत असतानाच पुन्हा समाजकार्यासाठी रोटरी क्लब मध्ये दाखल झालो. रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून घेत असतानाच २००९ मध्ये माझी चार पुस्तके प्रकाशित झाली.
तत्पूर्वी २००७ मध्ये रीडर्स डायजेस्ट या मासिकात ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ या नावाचा एक लेख वाचनात आला. त्या लेखामुळे अवयव दान या क्षेत्राची माहिती झाली. या क्षेत्रामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते अगदीच तुरळक किंवा नगण्य आहेत हे लक्षात आलं. या बाबतीत मी जसजशी माहिती गोळा करायला लागलो तसतशी या माहितीची योग्य ती दारे उघडताना दिसत नव्हती. अनेक ठिकाणी ठोठावल्यानंतर थोडी थोडी माहिती, तसेच इंटरनेटच्या माध्यमातून झालेली माहिती, डोंबिवलीच्या दधीचि देहदान मंडळाकडून उपलब्ध झालेली माहिती आणि आमच्या रोटरी मध्येच नागपूर मध्ये अवयवदानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. वानखेडे यांचे कडून मिळालेली माहिती या माहितीद्वारे या विषयाचा अभ्यास आणि प्रबोधन चालू केलं. त्यातच नाशिक येथील संवाद या संस्थेचा मी सचिव झालो. त्यामुळे रोटरी आणि संवाद या दोन माध्यमातून समाजप्रबोधनाचं कार्य स्थानिक पातळीवर सुरू केलं. २०१२-१३ या वर्षामध्ये मी रोटरी क्लब चा प्रेसिडेंट झाल्यावर या अवयवदान प्रबोधनासाठी काही कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे रोटरी आणि संवाद या दोन संस्थांच्या माध्यमातून मी हे कार्यक्रम सुरू ठेवले होते. संवाद या साहित्य चळवळी मार्फत मी बाबा आमटे यांच्या :ज्वाला आणि फुले’ या संग्रहातील कवितांचे काव्य वाचन करीत असे. त्यातील एका काव्य वाचनानंतर सुरुवातीला उल्लेख केलेला विचार डोक्यात येऊन त्यातून अवयवदान वारी या अवयवदान प्रबोधनाच्या पदयात्रेचा प्रारंभ झाला.
अवयवदान वारी म्हणजे
नाशिक ते आनंदवन व्हाया नागपूर अशी पदयात्रा होती.
दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी नाशिक येथील गाडगे बाबांच्या आश्रमापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. मजल दर मजल करीत साधारण पणे दर दिवशी सरासरी २५ कि. मी. प्रमाणे अंतर पार करीत ही यात्रा दिनांक ५ जानेवारी २०१७ रोजी तुकडोजी बाबांच्या कर्मभूमीत मोझरी मार्गे नागपूर येथे पोहोचली.
७ व ८ जानेवारी २०१७ रोजी नागपूर येथे रोटरी प्रांत ३०३० च्या ‘प्रांत परिषदेत ‘ सहभागी होऊन ही वारी ९ जानेवारी रोजी नागपूर येथून निघून १४ जानेवारी २०१७ रोजी बाबा आमटे यांच्या आनंदवन या कर्मभूमीत पूर्ण झाली.
वाटेमध्ये प्रत्येक मुक्कामी अवयवदान व देहदान या विषयी प्रबोधनपर कार्यक्रम अनेक शाळा महाविद्यालये व ग्रामसभा तसेच रोटरी मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले..
या पदयात्रेचे प्रत्येक दिवसाचे नियोजन रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांचे सहाय्याने व द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन मुंबई यांचे सहकार्याने करण्यात आले होते.
अवयवदान वारीत बरोबर रोटे. प्रियदर्शन बापट व श्री शरद दाऊतखानी हे संपूर्ण सहभागी झाले होते. एका दिवसात सरासरी २५ कि. मी. ची चाल झाली.
माझी पत्नी सौ. रंजना देशपांडे पायलट कार चालवत आमची सर्वांची काळजीवाहक म्हणून संपूर्ण यात्रेत सहभागी होती.
नाशिक येथील शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कै(सौ) शारदा गायकवाड व त्यांचे पती श्री जालिंदर गायकवाड हे सुद्धा २० दिवस या पदयात्रेत सामील झाले होते.
या पहिल्या नाशिक नागपूर आनंदवन पदयात्रेच्या नियोजनातून एकूण प्रत्यक्ष चाल १३४० कि. मी. झाली. (नियोजित १०८६), जनजागृती कार्यक्रम १२६, कालावधी ५२ दिवस, गावे ४५.
या संपूर्ण पदयात्रेचा अनुभव खूपच उत्साहवर्धक ठरला अगदी छोट्यात छोट्या खेडेगावा पासून ते नागपूर सारख्या मोठ्या शहरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जनसमूहा समोर, शेतकरी, कामगार, शिकलेले, अशिक्षित, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, आशा वर्कर्स, अनेक हॉस्पिटल मधले पेशंट अशा अनेक विविध प्रकारच्या व्यक्तींशी संपर्क आला. त्यांना समजेल अशा भाषेमध्ये अवयवदानाचे महत्त्व कसं विशद करायचं याचा अनुभव सुद्धा मिळाला. विशेषतः शाळा कॉलेजमधील विद्यार्थी म्हणजेच आजची तरुण पिढी यांना या विषयाची ओळख करून देण्याचा आणि त्यांच्या मनात या विषयासंबंधी कोण कोणते विचार आहेत हे समजून घेण्याचं भाग्य लाभलं. हा अनुभव खरोखरच अवर्णनीय आहे चालणं महत्वाचं नाही, पण चालता चालता ज्या सर्वसामान्य माणसाशी आपल्याला आपल्या विचारांनी आणि कृतीने जोडून घेता आलं तो अनुभव हाच जास्त महत्त्वाचा आहे हे उमगलं.
तशातच महाराष्ट्र शासनातर्फे २०१७ साली, जी अवयवदानाची प्रतिज्ञा राजपत्रा मध्ये मान्यताप्राप्त झाली त्याचे शब्दांकन करण्याचा मान मला मिळाला.
या अद्वितीय अनुभवातून पार झाल्यानंतर मुंबई येथील दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन या संस्थेने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्या संस्थेशी जोडला गेलो आणि त्यांच्यातीलच एक झालो. दुसऱ्या पदयात्रेला फेडरेशनचे अनेक कार्यकर्ते सामील झाले आणि आम्ही दुसऱ्या पदयात्रेचे नियोजन केले. मुंबई ते गोवा या पदयात्रेमध्ये आम्ही दहा कार्यकर्ते सामील झालो आणि दुसरीही पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली.
पदयात्रेत १० जण सामील झाले. पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, प्रियदर्शन बापट, शरद दाऊतखानी, चंद्रशेखर देशपांडे, शैलेश देशपांडे, अविनाश कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, म्हसकर, रणजित उंद्रे. संपूर्ण पदयात्रेचे नियोजन फेडरेशनचे सचिव श्री बागाईतकर यांनी उत्तम पद्धतीने केले व दिनांक २३ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीत ही पदयात्रा संपन्न झाली
मुंबई (केईएम रुग्णालय ) ते गोवा (मडगाव ) पदयात्रा. एकूण चाल ८५० कि. मी. (नियोजित ८२६)
जनजागृती कार्यक्रम १४०,
कालावधी ५२ दिवस, गावे ५५
यानंतर कार्यकर्ते विचारू लागले आता यावर्षी कुठं आणि मग तिसऱ्या पदयात्रेचे नियोजन केलं पहिल्या पदयात्रे मध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ काबीज केला दुसऱ्या पदयात्रे मध्ये कोकण आणि गोवा पिंजून काढले. आता तिसऱ्या पदयात्रेचे नियोजन करताना आमच्या टार्गेटवर मराठवाडा होता औरंगाबाद हुन सुरू करून मराठवाड्यातले सातही जिल्हे पायाखालून घालून तुळजापूर येथे या पदयात्रेची सांगता झाली.
संपूर्ण मराठवाडा (औरंगाबाद – ते – तुळजापूर) या पदयात्रेसाठी
सप्टेंबर २०१८ पासून नियोजनास सुरुवात. दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या संपूर्ण सहकार्याने व सहभागाने आणि नियोजनातून ही सर्व पदयात्रा आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेत एकूण सात पदयात्री सामील झाले होते श्री सूनील देशपांडे श्री प्रियदर्शन बापट श्री अविनाश कुलकर्णी श्री चंद्रशेखर देशपांडे श्री शैलेश देशपांडे श्री वसंत चिकोडे आणि श्री दयानंद मठपती. या पदयात्रेचे नियोजनही फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार व सचिव सुधीर बागाईतकर यांनी उत्तम तऱ्हेने केले व दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2018 या कालावधीत ही पदयात्रा संपन्न झाली (औरंगाबाद – जालना – बीड – परभणी – हिंगोली – नांदेड – लातूर – उस्मानाबाद – तुळजापूर)
मराठवाडा अवयवदान पदयामी, पदयात्रा, फेडरेशन आणि प्रबोधन
आता महाराष्ट्रातील फक्त पश्चिम महाराष्ट्राचा भाग शिल्लक राहिला होता. त्यामुळे चौथ्या पदयात्रेचे नियोजन करताना नाशिक ते बेळगाव असं करण्यात आलं. नाशिक, शिर्डी, नगर, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि बेळगाव. या मार्गाने जास्तीत जास्त ग्रामीण भागातून वाटचाल करीत अंतिम दिवशी बेळगावी पाहुणचार घेऊन केएलई या प्रतिथयश शिक्षण संस्थेतील वैद्यकीय महाविद्यालयात या पदयात्रेची सांगता करण्यात आली.
या चारही पदयात्रा मिळून संपूर्ण महाराष्ट्र पायाखालून घातला.
चौथी पदयात्रा नाशिक ते बेळगाव
७५० कि. मी.
५ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२० या एकूण चार पदयात्रा- एकूण चाल ३६४० कि. मी.
एकूण जनजागृति कार्यक्रम १२६+१४०+८५ + १५९ = ५०१
अशा ५०० कार्यक्रमां मधून एकूण ५०००० व्यक्तींपर्यन्त प्रत्यक्ष अवयवदानाचा संदेश पोहोचला. ४५+५५+४३+४२ = १८५ गावांमध्ये या विषयाच्या चर्चेची सुरुवात झाली.
येथून पुढे त्या सर्व ठिकाणी प्रबोधनाचा विस्तार होईलच. अनेक कार्यकर्तेही त्यातून तयार होत आहेत, यातून या चळवळीला मोठे बळ मिळाले. इतरही संलग्न संस्था व कार्यकर्ते यांनी गावागावातून पदयात्रा काढून व आपल्या गावापासून बाजूच्या खेडेगावात जाऊन पदयात्रेच्या माध्यमातून या विषयाचे प्रबोधन करावे अशी अपेक्षा आहे. आपल्या शहरांमध्ये विविध कार्यक्रम, व्याख्याने, पथनाट्य व इतर कोणत्याही माध्यमातून सादरीकरण करून या मार्गाने या विषयाचे प्रबोधन करून जनतेमध्ये जागृती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न व्हावा असे वाटते.
प्रसिद्धी माध्यमांनी या विषयाचे विविध लेख लेखमाला आणि विविध घटनांविषयी विवेचन करून आपापल्या माध्यमाद्वारे प्रयत्न करावा.
संपूर्ण महाराष्ट्र पायाखालून घातल्यानंतर आलेल्या अनुभवातून आणि ज्ञानातून नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी आता दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन या संस्थेचा विस्तार जवळपासच्या राज्यातही करीत आहोत त्याच प्रमाणे या प्रबोधन कार्यक्रमासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतो आहोत. त्याचप्रमाणे मृत्युंजय ऑर्गन फौंडेशन या आमच्या नाशिक येथील सहयोगी संस्थेद्वारे विविध लोककलां मधून या अवयवदानाचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने लोक कलाकारांची एक स्पर्धा आयोजित केली होती. सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की ग्रामीण भागातील अनेक स्पर्धकांनी भाग घेऊन पारितोषिकेही प्राप्त केली आहेत. ग्रामीण भागात या विषयाच्या जागृती बाबत होत असलेला बदल स्वागतार्ह व कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी उत्साह व बळ देणारा ठरत आहे.
अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर आहे. परंतु आपल्याला आपला भारत देश जगामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये येईल इतपत तरी कार्य करायचे आहे. सध्या आपला देश अवयव दान करणाऱ्या देशांमध्ये शेवटच्या पाच क्रमांका मध्ये आहे खूप मोठा रस्ता पार करायचा आहे ही चाल फक्त पायाची नसून प्रबोधनाची आहे. पुढील पिढीला या विषयात जागृत करणे ही गोष्ट नजीकच्या भविष्यकाळात साध्य करायची आहे. ती होईल असा विश्वास धरायला हरकत नाही असे वाटते.
सुनील देशपांडे
१. संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक
२. उपाध्यक्ष, द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन, मुंबई.
३. सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन).
४. रोटरी प्रांत 3030 चे अवयव दान विषयावरील माजी समिती प्रमुख.
पुणे, मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈