श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ मोगऱ्याची वेणी — ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
सुमती चाळीतील आपल्या बिऱ्हाडी आली.. दार बंद करताना तिची नजर समोरील अलिशान बंगल्यातील स्त्रीवर पडली. चेहेऱ्यावर हलकस हसू आणत सुमतीने आपल्या चाळीतील घराचा पुढचा दरवाजा बंद केला.
समोरच्या बंगल्यातील ती सुंदर बाई तिला बऱ्याचवेळा दिसायची. या कॉलनीत एका रस्त्याच्या एका बाजूला चाळी होत्या आणि विरुद्ध बाजूला अलिशान बंगले होते. सुमतीची तळमजल्या वरची जागा, तिच्या बरोबर समोर हा मुजुमदार यांचा बंगला. बंगल्याच्या पोर्च मध्ये त्यान्च्या पाच सहा अलिशान गाड्या दिसायच्या. चार पाच नोकर घरात दिसायचे.. शिवाय ड्रायव्हर होतेच. मुजुमदार हे मोठे उद्योगपती. त्त्यांचे मीरा भाईंदर भागात मोठे रेडिमेड कपडाचे युनिट होते आणि बांद्रा दादर मध्ये शोरूम्स.
अर्थात हे तिला तिच्या नवऱ्याने अमितने सांगितलेले. तिचे लहानपण कोकणात गेलेले, माहेरी गरिबी, मोन्टेसरिचा कोर्स केल्याने मुंबईत लग्नानंतर तिला मोन्टेसरीत नोकरीं लागलेली. नवरा अमित ठाण्याला वागळे इस्टेट मध्ये एका औषध कंपनीत. ती सकाळी सातला घराबाहेर पडायची, त्याच्या आधी जेवणाचे डबे करुंन जाई.. नवरा अमित नऊ वाजता डबा घेऊन बाहेर पडे. तिची शाळा सुटली म्हणजे ती बारापर्यत घरी येई.
दुपारी बारानंतर ती एकटीच असायची. जेऊन झाले की रेडिओ लावायची.. बातम्या.. हिंदी गाणी ऐकायची. आजूबाजूला बऱ्याच जणांनी टीव्ही घेतले होते पण त्यानी अजून घेतला नव्हता.. तसे दोघांचे पगार कमी होते आणि अमितच्या घरी पैसे पाठविणे आवश्यक होते.
सुमतीला आपल्या समोरच्या बंगल्यातील स्त्रीचे कौतुक वाटे. सकाळी ती शॉर्टपॅन्ट घालून खेळायला जाई.. कधी ड्रायव्हरसह बाहेर जाई किंवा मस्त कपडे घालून गार्डनमध्ये बसलेली असे. आजूबाजूला नोकरवर्ग फिरत असे. मुजुमदार कवचितच दिसत. बऱ्याचवेळा रात्रीची ती दोघे बहुतेक पार्ट्याना जात. उशिरा घरी येत.
अशीच एका सोमवारी ती नेहेमीप्रमाणे शाळेतून आली आणि खोलीचा दरवाजा उघडता उघडता समोरच्या बंगल्यातील कुत्री मागाहून तिची साडी ओढू लागली, दचकून तिने मागे पाहिले तर कुत्री आणि तिच्यापाठोपाठ एक नोकर धावत आला.. त्या नोकराने ती कुत्री उचलली एव्हड्यात समोरची मालकीण पण गेटकडे आली. तिच्याकडे पहात म्हणाली
“कुछ तक्लीफ नही हुई ना..
“नही तो..
“आवो ना.. घर. शरबत लेते हॆ..
“नहीं.. नही..
“आवो ना.. हमेशा देखती हूं सामने.
मगर पहचान नही..
तिच्या परतपरतच्या आग्रहाने सुमती त्या बंगल्याच्या गेटमधून आत गेली. तिने सुमतीला हॉलमध्ये नेलं.. त्या हॉलमधील श्रीमंती पाहून ती चाट पडली.. महागडे झुंबर.. गालीचे.. फार्निचर.. पेंटिंग्स. नोकर..
“बैठो.. क्या नाम तुम्हारा..
“सुमती..
” मै साधना.. साधना मुजुमदार.. हमारे गारमेंट्स के युनिट्स है और शो रूम्स है.
“हा.. मेरे पतीने बोला है मुझे..
“क्या करते है तेरे पती? नौकरी करते है क्या?
“हा.. ठाणामे एक कारखानामे..
“और तुम?
“मै टीचर हूं.
“मै देखती हूं, तुम पुरा दिन काम करती हूं.. कोई नौकरांनी नही है क्या?
“नही.. हमारे इतमी कम सॅलरी मे..
” कितना कमाते हो तुम दोनो मिलके?
“पचीस हजार..
“बस.. इतनही.. कैसा मॅनेज कर लेते हो तुमलोग..
“नौकरीमे कितना मिलेगा.. नया नया नौकरी है.. और गाव भेजना पडता है… इनके घर..
“मेरे हजबन्ट मुझे पाच लाख देते है.. लेकिन वो भी मुझे कम लगते हैं.. हर चार दिन पार्टी होती हैं.. पिकनिक्स हॆ.. मॉल पर्चेसे है..
“तुम्हारे बच्चे..
“हमने डून के स्कुल रखें है उन्हे..
“ठीक आहे.. मी जाते..
“ऐसी कैसी जायेगी.. कुछ लेना पडेगा.. क्या लेगी.. चाय कॉफी.. कोल्ड..
“नको. जाते मी.. जेवायचय..
“लेकिन लेना तो पडेगा.. पहली मुलाकतं तुम्हारी..
“कुछ कोल्ड.. औरंज ज्युस..
बाजूलाच उभा असलेला नोकर चटकन आत गेला आणि मस्त ग्लासात ज्यूस घेऊन आला. ज्युस पिता पिता साधना म्हणाली
“ये देखो सुमती.. थोडे पैसे मे कभी खूष नही होनेका.. खूशीके लिये पैसा चाहिये.. और वो आस्मानसे नही गिरेगा.. हजबंटको बोलो पैसा कमावो.. ये वीस तीस हजारमे कुछ नही होता..
“चलते मी..
म्हणत सुमती आपल्या घरी आली.
सुमतीने जेवण गरम केल आणि जेवायला बसली.. पण आज तिच्या डोक्यात साधना होती.. तिची वाक्ये परत परत तिला ऐकू येत होती..
“तुम्हारे घरमे नौकरांनी नही हॆ क्या? अकेली कितना काम करेगी.
“ये देखो सुमती,.. हजबंटको बोलो पैसा कमावो.. ये वीसतीस हजार मे कुछ नही होता ‘…..
तिच्या मनाची कुतरओढ होत होती… जन्मापासून कोकणात लहान गावात.. वडिलांचे लहानसे हॉटेल.. त्यात काय होणार? पेज घेऊन दिवस काढले. लग्नानंतर या चाळीत.. आज श्रीमंती काय असते आणि वैभव काय असते ते पाहिले. असले वैभव आपल्या नशिबात नाही.. साधना नशीबवान.. किती गाड्या त्यापण परदेशी.. नोकरचाकर.. क्लब्स, पार्ट्या.. पिकनिक्स.. परदेशी ट्रिप्स.. मुले डूनच्या शाळेत..
साधना म्हणते ते खरे, अमित कसली नोकरीं करतो? असली नोकरीं करून कधी सुखसोयी मिळतील काय? अजून घरात टीव्ही नाही.. कोण कामाला ठेवलं तर परवडत नाही.. अमितने धडपड करायला हवी.. धंदा करायला हवा..
विचार करता करता पाच वाजले.. आता सहा वाजता अमित यायची वेळ झाली.. त्याआधी रात्रीचे जेवण.. उद्याच्या डब्याची तयारी.. भाजी मोडून ठेवायला हवी.. दळण चक्कीवार द्यायला हवं.. कपडे धुवायला हवेत.. एक का दोन.. हजार कामे.
साडेसहा वाजता अमित आला. रोज अमित आला की ती चहा करायची… मग चहा घेताघेता गप्पा दिवस भराच्या.. तो कंपनीतील गमतीजमती सांगे.. ती ऐके.. मग ती शाळेतील गोष्टी सांगे.. हा वेळ त्त्यांचा छान जायचा.
आज अमित आला तरी सुमतीने लक्ष दिले नाही.. ती पीठ चाळीत बसली. ती गप्प आणि दमलेली पाहून अमित म्हणाला..
“आज दमलीस की काय?
चिडून सुमती म्हणाली..
” एकटे माणूस दमणार नाही काय? अमितच्या लक्षात आले.. सुमती खरेच दमली आहे नाहीतर ती चिडणारी नाही..
“खरे आहे.. तुला एकटीला खुप काम पडते.. नोकरीं करून घरातील सर्व.. आपण एखादी बाई बघू तूझ्या मदतीला… “
“बाई परवडणार आहे का आपल्याला? आपले पगार ते किती?
अमितच्या लक्षात आले, सुमती खरोखर चिडली आहे आज.. नाहीतर या आधी ती अशी कधी बोललेली नाही..
“होय.. खरे आहे.. पगार काय एकदम वाढत नाही.. पण खर्च कमी करू शकतो आपण.. मी माझे खर्च कमी करतो.. म्हणजे कंपनीतील चहा बंद.. कपडे बाहेर इस्त्रीला देणे बंद.. रिक्षा बंद.. दाढी बाहेर करणे बंद.. कधी कधी मित्रासमवेत एखादी बिअर व्हायची ती बंद.. नवीन कपडे बंद. असे पैसे वाचवले की घरकामला बाई ठेऊ शकतो आपण.. नव्हे ठेऊयाच.. तू आजूबाजूला येणाऱ्या बाईकडे लक्ष ठेव आणि तिला यायला सांग.
सुमतीच्या मनात आले.. आपल्या साठी आपले छोटे मोठे खर्च बंद करू शकणारा आपला नवरा साधा आहे बिचारा.. कधी आवाज वाढवून बोलणार नाही… आपण त्याच्यावर उगाच चिडलो.
रात्री जेवताना तिने नवऱ्याला मुजुमदार यांच्या घरी गेल्याचे सांगितले आणि त्यान्च्या वैभवाचे आणि साधनाचे वर्णन केले
रोज सारखी तिला झोप येईना.. तिच्या डोळ्यासमोर मुजुमदरांचा बंगला.. गाड्या.. उंची फार्निचर येत राहिले. हिऱ्याच्या अंगठ्या घातलेली आणि फलांचा ज्युस पिणारी साधना दिसत राहिली.. मॅसिडिझ गाडीतून फिरणारे मुजुमदार दिसू लागले..
दुसऱ्या दिवशी तिचे शाळेत लक्ष लागेना.. जेवण गोड लागेना.. कसले काम करावेसे वाटेना.
अमितच्या लक्षात आले.. सुमतीने मुजुमदरांचा बंगला पाहिला त्या पासून ती अस्वस्थ आहे.. कदाचित तशी श्रीमंती तिला हवी असेल.. पण आपल्या पगारात तिला कसली सुखे देणार?
शनिवारी अमित लवकर घरी आला.. तिला म्हणाला
“चल, आज थोडे फिरून येऊ.. नवीन पार्क झाला आहे.. तो पाहू.. बाहेरच जेऊ.
ती पण खूष झाली… किती दिवसात गाडीने नाहीच पण पायी पण फिरायला गेलो नाही.. तिने तयारी केली आणि दोघे फुटपाथवरुन हातात हात घेऊन चालू लागली.. काळोख पडू लागला होता आणि रस्ते गाड्यानी.. माणसानी भरून वहात होते.. वाटेल कपड्याची, दागिन्याची दुकानें दिसली की तिचे आसूसलेले डोळे पुढे जात नव्हते.
पार्क मध्ये जाण्यासाठी त्याना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे होते.. म्हणून ती सिग्नलजवळ थांबली.. सिग्नल लागला म्हणून अनेक गाड्या थांबल्या होत्या.. सिग्नल मिळण्याची वाट पहात होत्या.. एवढ्यात तिचे लक्ष एका मार्सिंडीज कडे गेले.. ती गाडी तिला ओळखीची वाटली.. वाकून पाहिले तर मुजुमदारसाहेब मागील सीटवर होते आणि त्यान्च्या अंगाला खेटून एक टंच तरुणी त्यान्च्या खांद्यावर डोके टेकून होती..
तिने अमितला हाताने गाडीतील मुजुमदार आणि तरुणी दाखवली.
“तो बघ मुजुमदार त्या पोरीसोबत.. मजा मारतोय.. बिचारी साधना.. घरात त्याची वाट पहात असेल..
“साधना काही वाट पहात नाही त्याची.. ती एखाद्या तरुण मित्राच्या मिठीत असेल यावेळी..
‘काय? सुमती किंचाळली..
“होय.. हॆ हायफाय जीवन असेच असते.. परत कधीतरी तुला साधना पण दिसेल अशीच..
सिग्नल लागला तशी दोघे पलीकडे गेली.. पार्कच्या कोपऱ्यावर एक फुल वाला गजरे, वेण्या घेऊन बसला होता. अमितने त्या गजरेवाल्या कडून एक मोगरीची वेणी विकत घेतली आणि तिथेच सुमतीच्या केसात माळली.
दोघे पार्क मध्ये गेली.. हिरवळीवर बसली.. भेळवाल्या कडून भेळ घेऊन खाल्ली.. बर्फचा गोळा संपवीला.
काळोख पडू लागला तशी दोघे निघाली. आता सुमती गप्प गप्प होती.. मुजुमदरांचे अंतरंग तिला कळले होते.. त्या मानाने आपण किती नशीबवान.. आपला नवरा आपल्यासोबत आहे.. घरात कामाला बाई ठेवायची म्हणून आपली काटकसर करू लागलाय… चहा बाहेर पिणे बंद केले.. दाढी, इस्त्री बाहेरचे बंद..
रात्री ती नेहेमीसारखी गप्पा मारत जेवली. अमितने तिला भांडी घासायला, ओटा पुसायला मदत केली.. भांडी स्टॅन्ड वर लावली.
रात्री झोपायला गेली.. तेंव्हा तिच्या मनात परत साधनाचे विचार येत राहिले.. कसले सुख आणि कसले काय? नवरा दुसऱ्याबाई बरोबर.. आपण?
त्यापेक्षा आपण सुखी.. पैसे कमी असले तरी एकमेकाबद्दल विश्वास आहे.. प्रेम आहे.. आज पार्क मध्ये जाताना मोगऱ्याची वेणी घेऊन दिली.. एवढेच नाही सर्व लोकांसमोर केसात माळली.
बाजूला झोपलेल्या अमितबद्दल तिच्या मनात प्रेम दाटून आले.. तिने केसातील मोगऱ्याची वेणी छातीशी धरली आणि ती शांत झोपी गेली.
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈