श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “माध्यमांचे वर्तन योग्य आहे का?☆ श्री जगदीश काबरे ☆

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या निर्घृण हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले, आणि देशभरात संतापाची लाट उसळली. अशावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ करून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करून दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होतेच. पण या पार्श्वभूमीवर जनतेला सत्य माहिती, संयम आणि वस्तुनिष्ठतेची गरज असताना, अनेक इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांनी मात्र केवळ भावनांवर स्वार होऊन चुकीच्या, अतिरंजीत आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांचा मारा सुरू केला. ही केवळ पत्रकारितेची चूक नाही, तर सरळसरळ राष्ट्रीय सुरक्षेला सुरुंग लावणारी घोर बेजबाबदार कृती आहे.

हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच अनेक वाहिन्यांनी भारतीय ‘नौदलाकडून कराची उध्वस्त. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीर मुनीर तुर्कीला पळून गेले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी राजीनामा दिला. इस्लामाबाद, लाहोर, कराची, रावळपिंडी, सियालकोट ही शहरे बघताबघता भारताच्या हाती पडली. लष्कर, हवाई दल, नौदल अशा तिन्ही दलांनी पाकिस्तानला नेस्तनाभूत केले’, अशा प्रकारच्या उत्तेजक मथळ्यांनी प्रेक्षकांना तापवायला सुरुवात केली. प्रत्यक्षात सरकारकडून, संरक्षण मंत्रालयाकडून किंवा लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसताना अशा अफवांना खतपाणी घालण्यात काही वाहिन्या आघाडीवर होत्या. शेवटी संरक्षण मंत्रालयाला एक निवेदन प्रसिद्ध करावे लागले की, अशा अफवा पसरवणाऱ्या वावदूक बातम्या देऊ नयेत. कारण युद्धासारख्या गंभीर विषयावर चुकीची माहिती देणे हे केवळ असंवेदनशीलच नव्हे तर अतिशय धोकादायक आहे. कोणत्याही देशाच्या लष्करी कारवाईच्या गुप्त माहितीचा बिनबुडाच्या चर्चांनी उघडपणे उल्लेख करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या यंत्रणांना अडचणीत आणणे होय. यातून जनतेत अनाठायी उत्साह, द्वेष आणि परस्परद्वेष्ट्या भावनांना खतपाणी घातले जाते. म्हणून युद्धसदृश वातावरणात वाहिन्यांनी संयमित, तथ्याधारित आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे अपेक्षित असते. पण येथे टीआरपीच्या हव्यासापोटी माध्यमांनी संयम न राखता पत्रकारितेच्या नीतीला बगल दिली. स्टुडिओंमध्ये तथाकथित ‘सुरक्षा तज्ज्ञ’ बोलावून अर्धवट माहितीच्या आधारे ‘थरारक’ चर्चा रंगवण्यात आल्या. या चर्चांचा उद्देश लोकांच्या भावना भडकवणे आणि व्यूहात्मक माहितीचा बाजार मांडणे इतकाच होता. अशा चर्चांमध्ये शिस्तबद्ध लष्करी कारवाईचे खरे स्वरूप व गुप्तता यांचा पुरता विसर पडला.

सामान्य नागरिक हा अशा घटनांमध्ये भावनिकदृष्ट्या कमकुवत असतो. देशभक्तीच्या उर्मीत तो माध्यमांवर विश्वास ठेवतो. त्याचाच गैरफायदा घेऊन युद्धखोर वृत्तवाहिन्या जनतेची दिशाभूल करतात. यामुळे सीमा भागातील जनतेमध्ये घबराट, तर शहरी भागात असंतोष आणि उथळ राष्ट्रवादाचा प्रक्षोभ वाढतो. चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांमुळे केवळ देशांतर्गत गोंधळच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या नीतीला हानी पोहोचते. लष्करी कारवाईचे अनुमान, युद्धाच्या तयारीचे सूतोवाच किंवा पाकिस्तानवर तात्काळ कारवाईचे खोटे दावे हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही भारताला अडचणीत आणू शकतात. या वाहिन्यांनी हे जाणूनबुजून केले की अज्ञानातून हा प्रश्न न पडताही, परिणाम मात्र गंभीरच असतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना केवळ माईक, कॅमेरा आणि स्टुडिओपुरता नव्हे तर राष्ट्रहिताचा व्यापक विचार करणे भाग आहे. अन्यथा माध्यमे ही जनतेचे मार्गदर्शक न राहता अफवांचे आगार बनण्याचा धोका वाढेल.

युद्धाचा निर्णय सरकार व लष्कर घेते, वाहिन्या नाहीत. युद्ध हे राजकारण, भावनांचे किंवा टीआरपीचे साधन नसून राष्ट्राच्या सुरक्षेचा गंभीर विषय आहे. त्यामुळे अशा काळात माध्यमांनी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी. भडक मथळे टाळावेत. अफवा आणि गुप्त माहितीचा बेजबाबदार उल्लेख टाळावा. लष्करी गुप्ततेचा आदर करावा. संयमित भाषा आणि राष्ट्रहिताचा विचार करावा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहिन्यांनी दाखवलेल्या बेजबाबदार वर्तनाने हे स्पष्ट झाले आहे की, आज पत्रकारितेत नीतीमत्ता आणि जबाबदारी यांचा गंभीर अभाव आहे. युद्धाच्या नावाखाली भावनांचे राजकारण करणे आणि टीआरपीचा हव्यास हा लोकशाही व राष्ट्रीय सुरक्षा या दोन्ही पातळ्यांवर घातक आहे. यामुळे यावर कठोर कायदेशीर निर्बंध आणि प्रसारमाध्यमांची जबाबदारी ठरवणे आता अत्यावश्यक झाले आहे. सरकारला स्पष्टपणे प्रश्न विचारणारे यूट्यूब चैनल तात्काळ बंद करणारे केंद्रशासन आता अशा खोट्या बातम्या देणाऱ्या न्यूज चैनलवर तेवढ्यात तात्परतेने बंदी आणेल काय?

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments