सौ. मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?- लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
पहलगामच्या हिंदूंना टारगेट करणाऱ्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यामुळे गेले काही दिवस प्रचंड अस्वस्थ आहे. त्यातच काल रात्री मला स्वप्न पडलं—
पहलगामच्या त्या हिरव्यागार कुरणात मी उभी आहे आणि ती थंडगार बंदुकीची नळी माझ्या चेहऱ्यावर रोखलेली आहे. नळीच्या पलीकडे आहेत क्रूर, थिजलेले, थंड डोळे, कमालीच्या द्वेषाने भरलेले.
मी घामाघूम होऊन जागी झाले, पहाटेचे दोन वाजले होते. छातीत अजून धडधडत होतं, मनात एकच प्रश्न घोळत होता —
खरंच जर माझ्यासोबत असं काही घडलं असतं, तर मी काय केलं असतं?
मी जर त्या दिवशी, त्या वेळी पहलगामला असते तर मी काय केलं असतं?
जीव वाचवण्यासाठी मी माझी बिंदी काढून फेकली असती का?
माझा विश्वास, माझी श्रद्धा त्यागून मी कलमा उच्चारला असता का? ज्यांनी असं केलं त्यांना मी मुळीच दोष देत नाही. आपण साधी माणसे आहोत, सैनिक नाही. मृत्यूला धीरोदात्तपणे सामोरं जायला आपल्याला कोणीच शिकवलेलं नाही आणि जीव जायची भीती ही एक अतिशय प्रबळ नैसर्गिक भावना आहे.
त्या दिवशी पहलगामला मी तशी वागले असते का की कधीतरी मृत्यू येणारच आहे, आणि मी काहीही केलं तरी त्या इस्लामी हैवानांसाठी मी काफीरच आहे आणि मी काहीही बोलले तरी ते मला मारून टाकणारच आहेत हे जाणवून मी शक्य तितक्या धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरी गेले असते?
किंवा — सगळ्यात वाईट — काय करावं हे न उमजून मी थिजून गेले असते का? भीतीने माझी मनगटं आणि मेंदू एकदम गोठून गेला असता का?
त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?
प्रामाणिकपणे सांगायचं तर, ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही.
मला आशा आहे की असं काही दुर्दैवाने माझ्या बाबतीत घडलंच असतं तर देशासाठी एकविसाव्या वर्षी हातात शस्त्रे घेणाऱ्या माझ्या स्वातंत्र्यसेनानी वडिलांची मी लेक ठरेन, त्यांचा वारसा मी खाली पडू देणार नाही. मरायच्या आधी प्रतिकारासाठी एक दगड तरी उचलायचा मी प्रयत्न करेन.
पण ही फक्त माझी आशा आहे
जेव्हा आपण आपल्याच उबदार बिछान्यात सुरक्षीत झोपलेलो असतो आणि येणारा आवाज ही फक्त पंख्याची घरघर असते, गोळीबाराचा आवाज नाही, तेव्हा शौर्याच्या वल्गना करणं फार सोपं असतं.
सत्य हे आहे — की आपल्यापैकी कोणालाही नक्की माहिती नाही की आपण त्या दिवशी, त्या जागी असतो तर त्या क्षणाला कसे वागलो असतो.
धैर्य हा एक असा स्नायू आहे —जो संकटाच्या क्षणी वापरायची वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही.
त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं हे मी नक्की सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते.
आपण हिंदू एक समाज म्हणून फार काळ ह्या खोट्या समजुतीत जगतो आहोत की आपल्या बाबतीत हे कधीच घडणार नाही. धर्म की जीवन ह्यांपैकी एकच गोष्ट आपल्याला कधीच निवडावी लागणार नाही. आपल्याला माहिती आहे की भारतातल्या लाखो-करोडो हिंदूंना कधी ना कधी हा निर्णय घ्यावा लागला होता, कधी बंदुकीच्या भीतीने, कधी तलवारीच्या, कधी बलात्काराच्या.
आपण इतिहास वाचलाय, पण आपण सोईस्करपणे तो विसरून जातो कारण सत्य कटू असतं. म्हणून आपण आपल्या डोळ्यांवर धर्मनिरपेक्षतेची पट्टी बांधतो आणि सर्वधर्मसमभावाची अफूची गोळी घेऊन निवांत जगत असतो, अशी एखादी घटना घडेपर्यंत.
धर्म की जीव हा निर्णय हिंदूंना घ्यावा लागणं हे एक जिवंत, जळतं विदारक सत्य आहे. हा आपला इतिहास आहे, वर्तमान आहे आणि नीट डोळे उघडून पाहीलंत तर भविष्य तर आहेच आहे.
हे सत्य पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्या त्या २६ लोकांच्या कुटुंबांसाठी वास्तव आहे.
हे त्या नवविवाहित मुलीचं सत्य आहे जिने फक्त पाच दिवसांच्या अंतरामध्ये ज्या अग्नीला साक्षी ठेवून ज्याच्याशी विवाह केला, त्याच अग्नीच्या चीतेमध्ये त्याचे पार्थिव जळताना पाहिले.
हे वास्तव त्या लहान मुलाचं सत्य आहे — ज्याने आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलंय, इस्लामी दहशतवाद्यांनी त्यांची पॅंट उतरवलेल्या अवस्थेत.
हे सत्य उद्या तुमचं-माझंही वास्तव होऊ शकतं. कुठेही, कधीही, केव्हाही.
हे काळीज विदीर्ण करणारं वास्तव कोणताही हॅशटॅग, कोणताही मेणबत्ती मोर्चा, कोणतीही शांतता परिषद, कोणतेही सेक्यूलरिजमचे प्रदर्शन मिटवू शकणार नाही.
आणि कृपया भ्रमात राहू नका —
आपल्या शत्रूला सेक्युलरीजमशी काहीही घेणंदेणं नाही. ‘अमन का तमाशा’ मध्येही त्यांना काही स्वारस्य नाही.
त्यांच्यासाठी आपण फक्त ‘काफिर’ आहोत.
एक लक्ष्य. एक बळी. जन्नत मध्ये जायचा एक परवाना.
बस. इतकीच त्यांच्या लेखी आपली किंमत.
आपण कितीही गोंडस शब्द वापरले, कितीही भाईचारा च्या घोषणा दिल्या तरी हे वास्तव बदलणार नाही, कारण आपण त्यांना भाई मानलं तरी त्यांच्यालेखी आपण चाराच आहोत.
खूप काळ आपण भित्रेपणाला ‘सहिष्णुता’, आणि दुर्बलतेला ‘शांती‘ म्हणून गोंजारत राहिलो आहोत. आपल्याला वाटतं की आपण शांतीपूर्ण सहअस्तित्वाच्या घोषणा दिल्या, तर आपल्याला काही होणार नाही.
हा आपला गैरसमज आहे.
त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं ह्या प्रश्नाला ह्या घडीला माझ्याकडे उत्तर नाही. पण मला निदान हा प्रश्न तरी पडलाय.
तुम्ही हे कधी स्वतःला विचारलंत का?
कधी माझ्यावर अशी दुर्दैवी वेळ आलीच तर मी आई दुर्गेकडे प्रार्थना करते की जेव्हा तो क्षण येईल — (आणि तो येणारच आहे, आज नाही तरी अजून तीसेक वर्षांनी) — तेव्हा मला मान ताठ ठेवून मृत्यूला उघड्या डोळ्यांनी सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळो, प्रतिकार करण्याचे मनगटात बळ मिळो.
ज्या शूर हिंदू पूर्वजांच्या प्रतिकारामुळे मी आज हिंदू नाव लावतेय त्यांच्या उष्ण रक्ताची उकळी माझ्याही नसांमधून अशीच वाहो.
मरायचंच असेल तर गांडूळ म्हणून नाही, तर फणा काढणारा नाग म्हणून मृत्यू येवो!
#NeverForgetPahalgam #NeverForgetNeverForgive #उद्या_ते_तुमच्यासोबत_होऊ_शकते
☆
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈