डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ स्पेस… ☆ डॉ. शैलजा करोडे

“अनघा, माझा चहा झाला काय ? ” माझ्या सासरे बुवांची हाक कानी पडली. ते डायबेटीस पेशंट, त्यांच्यासाठी विना साखरेचा शुगर फ्रि चहा तर कल्पेशला जास्त गोड नाही पण जास्त चहापत्ती टाकलेला कडक चहा हवा असतो. आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना पाणी न टाकता दूधात बनवलेला बासुंदी चहा लागतो. ” आणतेय बाबा चहा ” मी चहा नेऊन दिला. एव्हाना माझा कुकर झाला होता. त्यातील वरण काढून गार व्हायला ठेवलं. तोपर्यंत पटकन पोळ्यांसाठी कणीक मळली. थंड झालेल्या डाळीत ब्लेंडर फिरवलं व वरणाला लसूण, जिरे, हिंग, आमसूलाची फोडणी दिली. घरभर छान सुगंध दरवळला.

सकाळच्या वेळी माझी अशी दमछाक असतांना कल्पेशला टाय हवा असतो तर विवेक चौथीतील माझ्या मोठा मुलाला गणिताची नोटबुक सापडत नसते, धाकट्या शिवांगीला पायमोजे व बूट घालून हवे असतात. बाबांना इन्सुलीनचं इंजेक्शन हवं असतं, ते फ्रिजमधून काढून त्यांना द्यायचं, आईंना बी पी ची गोळी हवी, सगळीच माझ्यावर अवलंबून.

इतक्यात मोलकरणीचा फोन. माझ्या मुलाला रात्रीपासून खूप ताप आहे, आज मी कामावर येऊ शकत नाही. झालं आणखी माझ्या डोक्याला ताण, कसं मॅनेज करायचं वेळेचं गणित. वाॅशिंग मशिनला कपडे टाकले, किचन सिंकमध्ये थोडे भांडे विसळले आणि कसाबसा पोळी भाजीने माझा डबा भरला. आणि धावत पळत शाळा गाठली. एवढं बरं मला शाळेची दुपारची म्हणजे साडेअकरा वाजेची शिफ्ट मिळाली होती. त्यामुळे मला घरातली बरीच कामं आवरता येत होती. पण धावपळ मात्र माझीच.

आज दुपारी एक वाजेचा पीरेड आँफ होता. टिचर्स रुममध्ये मी डोळे मिटून निवांत बसले होते. ” काय अनघा, तब्येत बरी नाही कि काय ? चेहराही खूप ओढवल्यासारखा वाटतोय ” माझी कलिग मीना बोलत होती. ” तसं नाही ग, पण हल्ली मला खूप दमायला होतं. घरातल्या व बाहेरच्या कामाची कसरत आता पेलवत नाही. सगळ्यांना आयतं हवं असतं, हातात हवं असतं, जणू मी एक यंत्र आहे. जादूच्या दिव्यासारखं पाहिजे ते हातात देणारी. मी ही माणूस आहे, मलाही त्रास होऊ शकतो हा विचार यांच्या गावीही नसतो. सगळे मला गृहितच धरतात.”

” होतं हे असं. बर्‍याच कुटुंबातील हीच रडकथा असते. या गोष्टीला आपल्या कुटुंबियांसोबत काही प्रमाणात आपणही जवाबदार असतो. आपणच यांना या सवयी लावलेल्या असतात आणि त्या यांच्या अंगवळणी पडतात. “

” म्हणजे ? मी नाही समजले ” ” अग तुझे सासरे सकाळी माॅर्निंग वाॅकला जातात. तब्येतीने चांगले आहेत. स्वतःची कामे करू शकतात. इन्शुलीन घेणं, स्वतःची औषधे घेणं, गिझर लावून स्वतःचं स्नान उरकणं, बाजारातून भाजी आणून देणं, तुझ्या सासूबाईंनी भाजी निवडून ठेवणं,

तुझ्या पतीराजांनी घरातील किराणा व तत्सम वस्तू आॅनलाईन मागवून तुझी मदत करणं, गिरणीतून पीठ दळून आणणं, मुलांच्या शाळेच्या तयारीला मदत करणं. मुलांनाही हळूहळू शिस्त लावणं. स्वतःच्या स्कूल बॅग भरणं, शाळेतून आल्यावर युनिफाॅर्म स्वतः बदलणं, बूट काढून शू रॅकमध्ये ठेवणं, थोडक्यात काय तर स्वतःच्या वस्तू स्वतः नीट नेटक्या ठेवणं, हे सगळं आपणचं शिकवायला पाहिजे ज्याला पूर्वीच्या काळी वळण लावणं म्हणायचे.

अग अनघा आपणच यांच्या पुढे पुढे करुन ढिल देत असतो, नंतर आपल्यालाच पश्चाताप होतो. आपणच आपली स्पेस निर्माण करायची असते बघ.

” मला पटतंय ग सगळं. पण हा प्राॅब्लेम आता कसा टॅकल करायचा. आजपासून ही कामं तुम्ही करा, मी नाही करणार, असं तर मी म्हणू शकत नाही. “

” तसं म्हणूही नकोस. हा, एक काम करू शकतेस. तुझ्या भावाचं लग्न आहे ना आता. मग जा की माहेरी पंधरा दिवस. , लग्नाघरी मदतीचा हात म्हणून. इथे करु दे तुझ्या कुटुंबियांना त्यांच काम स्वतःलाच. बघ मग करा चमत्कार घडतो. आपली स्पेस आपणच निर्माण करायची असते अनघा.

रात्री डायनिंग टेबलवर मी पानं घेतली जेवायला. विवेक, शिवांगीच्या पसंतीचं पालक पनीर, सासूबाईंना पालक मात्र मूगडाळ व शेंगदाणे घालूनच हवा. सासर्‍यांच्या पसंतीचं भोकराचं लोणचं, जिरा आलू, बाजरीची भाकरी. सगळे अगदी जेवून तृप्त झाले. आणि हा क्षण सुवर्णक्षण समजून मी विषय काढला.

” मला तुम्हांला सगळ्यांना काही सांगायचं आहे. ” आता काय बोलणार ही, हाच सगळ्यांच्या चेहर्‍यावर त्रासिक भाव. मी उद्या माझ्या भावाच्या लग्नासाठी माहेरी जाणार आहे. ” अग अनघा, लग्न अजून आठ दिवसांनी आहे. मी घेऊन जाईन ना तुला लग्नाला एक दिवस आधी. आतापासून काय करायचं जाऊन. कल्पेश बोलत होता. ” ” माझ्या आईबाबांची धावपळ होईल एकट्यांची. प्रमोदला ही चारच दिवस रजा मिळाली आहे. आणि नवरदेव स्वतःच किती तयारी करणार आहे ?”

आता सासुबाई मागे हटणार्‍या नव्हत्या. अशी कितीशी तयारी असते ग ? सगळ्या गोष्टींचा काॅन्ट्रक्ट द्यायचा. सगळं तयार मिळतं आजकाल. ” ” सगळं तयार मिळतं. मान्य आहे. पण प्रेम, माया, कौतुकासाठीही भाड्याची माणसं आणायची काय ? “नव्या नवरीच्या कौतुकासाठी मी नको ?. गृहप्रवेश व इतर विधी आणि त्यानंतर नवदांपत्याचं देवदर्शन यासाठी घरात कोणी मार्गदर्शक नको? “एकटी माझी आई काय काय करेल ?” 

आता कल्पेशला माझं बोलणं झोंबलं. ” अनघा किती बोलतेस ? आईचा काही सन्मान आहे कि नाही ? आणि इकडच्या जवाबदार्‍या टाळून जाणार काय तू ?” ” इकडच्या कोणत्या जवाबदार्‍या ?” ” म्हणजे तुला समजत नाही काय ? कि न समजण्याचं नाटक करतेस ?” ” नाटक ? भलतंच काही बोलू नका. मी कोणत्याही जवाबदार्‍या टाळलेल्या नाहीत. ” ” विवेक व शिवांगीच्या शाळा, त्यांची तयारी व डबा देणं. आई बाबांची काळजी. माझं आॅफिसला जाणं. ” ” हे बघा कल्पेश, विवेक व शिवांगी स्वतः स्कूलबॅग भरणं, शाळेसाठी तयार होणं करू शकतात. तुमचं तुम्ही स्वतः आवरू शकतात. सकाळचा चहा तुम्ही करा ? आई नाश्त्याचं बघतील. बाबा बाजारातून भाजी आणू शकतात. आई बाबा दोघेही स्वतःची औषधं व काळजी घेऊ शकतात. आणि समोर कुळकर्णीकडे स्वयंपाकाला येणार्‍या सुमित्रा काकू आपलाही स्वयंपाक करणार आहे. तुमची सगळी व्यवस्था लावली आहे मी. आता अजिबात खोडा घालू नका. एकुलता एक भाऊ माझा, मी जाणार म्हणजे जाणारच. “

माझा निर्धार पाहून सगळेच वरमले. खरंच म्हणत होती मीना आपला मान आपणच जपला पाहिजे. स्वतःची स्पेस स्वतःच निर्माण करायला पाहिजे.

लग्नासाठी आठ दिवसासाठी आलेली मी नंतर आजारपणामुळे आणखी पंधरा दिवस गेले.

“खरंच आपण अनघाला खूप गृहीत धरतो. तिलाही मन आहे, भावना आहेत, इच्छा आकांक्षा असतात याचा आपण विचारच करीत नाही. घरातील बाहेरील सगळी कामं, जवाबदार्‍या सांभाळून तिने सतत हसमुख राहावं ही आपली अपेक्षा. पण तिचंही शरीर आहे, तिलाही थकवा येणारच. तिचेही मूड असू शकतात. राग, आळस, आनंद असू शकतो. हे आपण जाणतच नाही. या पंधरा दिवसात किती त्रेधा तिरपीट उडतेय आपली. किती क्षणा क्षणाला अनघाची कमतरता भासतेय. साॅरी अनघा, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. तुझ्यामुळे या घराला घरपण आहे. लवकर ये सखी म्हणत कल्पेशने मोबाईलवर अनघाचा नंबर डायल केला. ” हॅलो, पलिकडून अनघाचा आवाज ऐकताच कल्पेशची कळी खुलली. ” कशी आहेस अनघा, तब्येत काय म्हणते. विवेक व शिवांगी दुर्मुखलेली झाली आहेत. आम्ही सगळेच तुझी वाट पाहात आहोत. आणि सखी स्त्री पुरूष समानता आता आपल्याही घरात असेल, कामाचा समान वाटा मी सुद्धा उचलेन. मुलांनाही स्वावलंबन कळलंय. “

” कल्पेश, आता माझी तब्येत बरी आहे. शाळेतही बरीच रजा झाली. मुलांचा पोर्शन पूर्ण करायचा आहे. परीक्षा तोंडावर आल्या आहेत. ” 

“होय होय, पण तू काळजी करु नकोस.

होईल सगळं नीट. टेक केअर “

आज मला माझी स्पेस मिळाली होती. नव्हे, ती मला मिळवावी लागली होती.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments