डॉ. तेजस्विनी वाळिंबे
मनमंजुषेतून
☆ सांभाळ बेटा स्वतःला… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆
☆
राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा मार्केटिंग हेतूने उभारलेला स्टॉल…
दिव्यांचा झगमगाट… मांडून ठेवलेली अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे. अशाच एका अत्याधुनिक दुर्बिणीजवळ डोळ्याची शस्त्रक्रिया करायला आवश्यक असलेल्या मायक्रोस्कोप जवळ मी थबकले. एका गुलाबावर फोकस केलेला तो प्रकाश गोल. क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर त्या गुलाबाच्या जागी माझ्या पेशंटचा डोळा दिसला…सफाईदारपणे ऑपरेशन करणारी माझी बोटं दिसली. नकळत मी त्या दुर्बिणीची किंमत विचारली.
७२ लाख… क्षणभर मी जागच्या जागी थबकले. फक्त दुर्बीण ७२ लाख, बाकी उपकरणे वेगळीच !! लुटतात या कंपन्या आम्हा डॉक्टरांना !
दुसरीही बाजू विचार करण्यासारखी आहेच. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या पेशंटना होतोच. आज पाश्चिमात्य देशात जे तंत्रज्ञान वापरले जाते, तेच आज आपण भारतीय डॉक्टर वापरतो हे किती अभिमानाने सांगतो आपण !
आपल्या रुग्णांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उत्कृष्ट उपचारांचा फायदा मिळतो, तोही पाश्चात्य देशांच्या तुलनेत फारच कमी खर्चात !!
पण मी या दुर्बिणीच्या खर्चाचं गणित कसं मांडणार ?
बँकेचे कर्ज, नको रे बाबा !! आतापर्यंत भरपूर कर्ज घेतलं आणि फेडलं. आता या वयात नक्कीच नको. रात्रंदिवस मेहनत करण्याचे दिवस गेले आता.
विचारचक्र चालू होतं, तोच मोबाईल मधून ‘बीप’ आवाज आला…मेसेजेस, व्हिडिओचा महापूर!
भिरभिरत्या डोळ्यांनी मी हपापल्यासारखे मेसेजेस वाचत होती. सभोवतालच्या झगमगाटातही माझ्या डोळ्यासमोर काळ्या ढगांनी गर्दी केली होती. तोंडाला कोरड पडली. हातपाय थरथरायला लागले. एक डॉक्टर -हत्यारा, खुनी, चोर, लुटारू, नालायक …. वाचवेना.
अभ्यासासाठी केलेल्या अनेक रात्रींची जागरणं, जीवघेण्या शिक्षणाचा तो लांबलचक प्रवास, मेसच्या डब्यातले तेलात पोहणारे पिवळे बटाटे, मेडिकल कॉलेजमध्ये अस्वच्छ टॉयलेट्स, सारं काही डोळ्यासमोर नाचत होतं.
चार गावाला खेडोपाडी ऑपरेशन करून थकून भागून रात्री अडीच वाजता घरी परतणारा डॉक्टर नवरा… बँकेचं कर्ज मिळवण्यासाठी केलेली धडपड… रक्ताचं पाणी करून वाढवलेलं माझं हॉस्पिटल, ज्याचा मला खूप अभिमान वाटतो असं…
चहूबाजूनी नराधम माझ्यावर आक्रमण करत आहेत असं काहीतरी मला भासलं.
जड पायांनी मी त्या गुबगुबीत सोफ्यावरून उठली.
” मॅडम, मॅडम, काय डिसिजन घेतलं तुम्ही ?कॉफी घेणार का ?”
“नको, बघू नेक्स्ट फायनान्शिअल इयर मध्ये. ” असं बोलून मी उठले.
चार पावलं जात नाही तर फोन खणखणला.
” हॅलो आई. “
” बोल बेटा, ठीक आहेस ना? तू जेवलास का?”
” जेवतो कशाचा? काल कॅम्पचे 70 पेशंट आले. रात्री अडीच वाजले रूमवर जायला. फक्त अडीच तास झोपलो. परत सकाळी साडेसहा वाजता हॉस्पिटल. ”
“अरे जेवत जा वेळेवर. कसं होणार असं ?
तुला कळली का रे बातमी?”
” अगं इथे तामिळनाडूत कशा पुण्याच्या बातम्या येणार?
पण मी बघतो ना मोबाईलवर पुण्याच्या बातम्या. तू विचार करू नकोस आता. “
” तुझ्या हॉस्पिटलमध्ये असं काही झालं तर? जमावाचं मानसशास्त्र फार भीतीदायक असतं. निष्पाप लोकांचा बळी घेतात हे नराधम. तू लहान आहेस, जगाचा अनुभव नाही तुला. आपलं शरीर आणि मन सांभाळ रे बेटा. “
” आई, तू माझी काळजी करू नकोस. चल ठेवतो मी. बाय”
हाच तो माझा मुलगा दोन वर्षांपूर्वी मला म्हणाला होता, आई सगळे मित्र
USMLE देत आहेत, ज्याला त्याला अमेरिकेत जायचं, पण मी मात्र भारतातच राहणार.
मीही म्हणाले होते, अरे योग्य निर्णय घेतलास, “जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी”
आता मात्र वाटतं योग्य सल्ला दिला का मी माझ्या मुलाला? बुद्धिवंत, बुद्धिजीवी लोकांसाठी नरक तर नाही ना होणार ही माझी मातृभूमी?
अशीच एकदा सायन हॉस्पिटलमध्ये भाचीच्या होस्टेलला गेले होते. संपूर्ण देशात लाखो विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या शंभरात नंबर पटकावणारी ही बुद्धिमान मुलगी…
कोंडवाड्यात ठेवाव्यात अशा या सहा डॉक्टर्स मुली एका खोलीत कोंबलेल्या !!आरोग्याला घातक वातावरण.
ढेकूण व झुरळांचे साम्राज्य.
रात्रंदिवस कामाचा बोजा.
मनात आलं आज आयआयटीत गेली असतीस, तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी घेऊन देशात किंवा परदेशात सुखात राहिली असतीस. काय डॉक्टर व्हायचं खुळ घेतलंय आपल्या घरातल्या मुलांनी? पोटातले हे शब्द ओठापर्यंत न आणता तशीच परतले.
प्रथमच एक अवघड ऑपरेशन बघून उत्साहीत झालेली माझी मुलगी म्हणाली, ‘आई सगळे हुशार टॉपर्स मुलं-मुली रेडिओलॉजी आणि डरमॅटॅालॉजी(क्ष- किरणशास्त्र आणि त्वचा रोगशास्त्र) अशा ब्रांचेस घेतात, मला मात्र सर्जन व्हायचंय. “
“हो ना, मलाही आश्चर्य वाटतं. खरंतर सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, इमर्जन्सी मेडिसिन अशा विषयांमध्ये निर्णयक्षमता, कार्यतत्परता, शल्य कौशल्य, शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता याची खरी परीक्षा होते ; हे विषय सोडून हुशार विद्यार्थी दुसऱ्या ब्रांचेस कशा घेतात? आमच्या वेळी असं नव्हतं. ” “आई, तुझा काळ गेला आता. हिंसक हल्ले होतात ना डॉक्टरांवर म्हणून घाबरतात सगळे. ”
“अग पण पेशंटचं काय? त्यांना चांगले डॅाक्टर कसे मिळणार असे झाले तर ?अर्धे हुशार डॉक्टर देशाबाहेर जातात. अर्धे हुशार डॉक्टर नॉन इमर्जन्सी ब्रांचेस घेतात. “
” हो, पण मला मात्र सर्जन व्हायचं आहे हं आई. “
त्या दिवशी आपल्या लेकीकडे बघून माझा ऊर अभिमानाने भरून आला होता, पण आता….
.. माझं मन काळजीने व्यापून गेलं आहे..
“बाळा, गिधाडं आहेत गं या समाजात. ते सुखाने आपल्याला जगू देणार नाहीत बेटा. माझं ऐकशील का?
आईचं काळीज आहे गं हे….. सांभाळ बेटा स्वतःला !!!”
☆
© डॉ. तेजस्विनी वाळिंबे
(नेत्रतज्ञ)
(एक डॅाक्टरची आई)
पुणे मो. ८८८८८३१९०५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈