डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ वेळीच दाद द्या। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
एका अतिशय चांगल्या Whats अप मेसेज वरून सहज सुचलं.
माणूस असतानाच, आपण त्याला, का चांगले म्हणत नाही?
तो दुर्दैवाने गेल्यावर, मग त्याचे चांगले गुण आपण गौरव करून सांगतो.
आपले मन एवढे मोठे का बरे नसावे, की आपण एखाद्याला, त्याच्यासमोरच, कौतुकाचे शब्द ऐकवावे.
विशेषे करून, आपण बायका, समोरच्या बाईंचे कौतुक, जरा हात राखूनच करतो ना?
काय हरकत आहे हो, की.. “ अग, किती सुंदर आहे ही तुझी साडी, अगदी मस्त दिसतेय तुला. ”
का नाही पटकन आपण म्हणत, “ किती ग मस्त केलेस तू वडे. अगदी अन्नपूर्णा आहेस बघ. ”
पण सहसा लोकांच्या हातून हे होत नाही.
हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही मला म्हणायचे, तर पुरुष मंडळीही याला अपवाद नाहीत.
ऑफिसमध्ये, जरा कनिष्ठ पदावरचा माणूस प्रमोशन मिळून वर गेला तर, खुल्या दिलाने त्याचे कौतुक किती सहकारी करत असतील?.. तर फार कमीच.
आणि ही वृत्ती लहान मुलांतही असतेच. पण पालकांनी त्याला खतपाणी घालता कामा नये.
पहिल्या आलेल्या मुलाचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला, मुलांना आई वडिलांनी शिकवले पाहिजे.
आपण सुंदर दिसणाऱ्या मुलीचे कित्ती तरी वेळा मनातून कौतुक करतो, पण मग तिला तसे जाऊन सांगत का नाही की “अग, किती छान दिसतेस तू. तुझा चॉईस खूप छान आहे, तुला कपड्यातले खूप छान कळते ग. माझ्या बरोबर येशील का खरेदीला? “ बघा किती आनंदच होईल ना तिला.
सुनेने एखादा पदार्थ खरोखरच सुंदर केला, तर द्यावी ना सासूबाईंनी दाद की “ किती चव आहे ग तुझ्या हाताला. मस्त केलेस हो हे. “ आनंद हा कौतुक केल्याने द्विगुणित होतो.
आम्ही पुण्याच्या प्रख्यात हुजूरपागेत शिकलो. मुख्याध्यापक बाईंच्या त्या ऑफिसमध्ये जायचीही भीती वाटायची तेव्हा इतका त्या खुर्चीचा दरारा होता.
फार वर्षांनी माझी मामे बहीण हुजूरपागेची मुख्याध्यापिका झाली. इतके कौतुक वाटले ना तिचे.
तिला न कळवता तिचे कौतुक करायला आम्ही बहिणी तिला भेटायला ऑफिसमध्ये गेलो.
तिला म्हटले, “ आमची बहीण कशी दिसते या खुर्चीत ते बघायला आलोय आम्ही. ”
तिचे डोळे आनंदाने भरून आलेले आजही आठवतात.
कौतुकाची थाप पाठीवर दिलेली तर आपल्या कुत्र्यालाही आवडते, मग आपण तर माणसे.
.. का नाही समोरच्याचे वेळीच कौतुक करू?
.. चार चांगले शब्द काय जड होतात का हो उच्चारायला?
– – – या वरून आपल्या लाडक्या सुधा मूर्ती आठवतात. तळागाळातील बायकांशी मैत्री करून, त्यांची सुखदुःख्खे जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधून, पुन्हा कुठेही मोठेपणाची हाव न धरणाऱ्या सुधाताईंचे किती कौतुक करावे ?
…. समाजाने वाळीत टाकलेल्या बायकांनी केलेल्या सुबक गोधड्या बघून त्यांचे मन भरून कौतुक करणाऱ्या सुधाताई तिथेच नुसत्या थांबल्या नाहीत, तर त्यांना त्या तयार करून विकायला त्यांनी
बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यांना मान खाली घालायला लावणारा व्यवसाय सोडायला लावून,
नवीन दिशा दिली… यातूनच ‘ तीन हजार टाके ‘ हे पुस्तक जन्माला आले.
‘ कौन बनेगा करोडपती ‘ मध्ये सुधाताईंनी साक्षात अमिताभ बच्चनना त्या बायकांनी केलेली सुबक गोधडी प्रेझेन्ट दिली… असे मोठे मन आपण किती लोकांकडे बघतो?
आपणही, खुल्या दिलाने कौतुक करायला शिकले पाहिजे.
.. मी मुलीकडे हॉंगकॉंगला गेले होते. तिकडे फिरत असताना आम्हाला बाबा गाडीत इतकी गोड बाळे दिसली ना.. मला लहान मुले अतिशय आवडतात. त्यातून ही जुळी मुले तर गुबगुबीत, मिचमिचे डोळे करून बघत होती. मी त्यांच्या आईला विचारले, “ मी बोलू का यांच्याशी? “ ती हसली आणि म्हणाली,
“ हो, पण ती चावतात बर का. जपूनच बोला. ”
मी गुढग्यावर बसले, आणि चक्क मराठीत बोलू लागले त्या गोड बाळांशी.
ती दोघेही जोरजोरात दंगा करायला लागली, आणि हात पसरून माझ्याकडे झेप घेऊ लागली.
त्यांच्या आईला खूप मजा वाटली. किती अभिमानाने ती आपल्या गोड बाळांकडे बघत होती !
प्रेमाला भाषा नसते हो, फक्त तुम्ही ते व्यक्त करा, ते समोर पोचते लगेच.
.. माणूस जिवंत असतानाच दाद द्या, चार शब्द कौतुकाचे बोला, तो माणूस शहरातून बदलून गेल्यावर,
किंवा दुर्दैवाने, या जगातूनच निघून गेल्यावर मग हळहळून काय उपयोग?
आपल्या भावना, लगेचच पोचवायला शिका. वेळ आणि वाट नका बघू. नंतर हळहळून, गेलेली वेळ परत येत नसते. मग आपल्या हातात, ‘अरेरे।’ असा पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.
मंडळी, तर मग करा सुरुवात दिलखुलास दाद द्यायला…. न कचरता.
…. आणि बघा, समोरचाही किती खुश होतो, आणि तुमचाही दिवस किती सुंदर जातो ते ।।।
© डॉ. ज्योती गोडबोले
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈