डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “Training and Employment Centre : एक आढावा…!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
याचना करणाऱ्या मंडळींसाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र सुरू करत आहोत. तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
पण तयारी झाली झाली, म्हणता म्हणता, एक एक गोष्ट आठवत आहे, आणि त्या तयारीत दिवस निघून जात आहेत.
काहीही असो, अक्षय तृतीयेपासून हे सेंटर पूर्ण जोमाने काम करायला सुरुवात करेल.
दुसऱ्यांचे काही “शुभ” होत असेल तर “चिंता” करणारे अनेक शुभ(?)चिंतक आपल्या सर्वांच्या आसपास असतात.
अशापैकी अनेकांचे अनेक सवाल…
‘डॉक्टर हे लोक खरंच काम करणार का ???
ते सेंटरवर येणार का ???
बसचा पास काढून दिला तरी सुद्धा हे लोक बस मधून येऊ शकतील का ???’
अगदी मनापासून सांगायचं तर आमच्या या एम्प्लॉयमेंट सेंटरची बातमी जेव्हा आमच्या भिक्षेकरी समाजात सांगितली, तेव्हापासूनच इथे कामाला येण्यासाठी, आमच्या लोकांची चढा ओढ सुरुवात सुरू झाली.
साडेतीनशेच्या वर माझ्याकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. आणि अजूनही दिवसागणिक ते वाढत आहे.
कामाला येणाऱ्या लोकांची संख्या पाहून माझे डोळे दिपले…!
पण इथे मात्र मी कमी पडलो….!
रोज 200 रुपये प्रमाणे एका महिन्याच्या चार सुट्ट्या सोडून 5200 रुपये होतात.
सुरुवातीला 30 लोकांना जरी आपण कामावर घेतले, तरी दर महिन्याला मला रुपये 1,56,000 (एक लाख छप्पन्न हजार रुपये) इतका पगार वाटावा लागणार आहे.
कच्चा माल आणि इतर अनेक खर्च वेगळे…
इतका निधी दर महिन्याला माझ्याकडे जमा होणार का ?
ज्या विश्वासाने माझ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून कामासाठी नोंदणी केली आहे, त्यांचा विश्वास माझ्याकडून तुटला तर जाणार नाही ना ? या विचाराने रात्र रात्र झोप येत नाही…!
असो…
सुरुवातीला वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींवर फोकस केला आहे.
कोणती बस पकडायची, कुठे उतरायचे, कसे जायचे याची काल आम्ही रंगीत तालीम केली.
कामासाठी ज्यांची निवड केली आहे, अशा सर्वांना PMT बसमधून घेऊन आलो.
या सर्वांची भीक मागणे सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची, स्वयं प्रकाशित होऊन “मध्यरात्रीचे सूर्य” होण्याची मनापासून असलेली “मनीषा” पाहून भारावून गेलो…!
All is well…. All is well…. असं सतत स्वतःशी म्हणत पुढे पुढे सरकत आहे…
जे करतो आहे ते आपणा सर्वांच्या साथीने…. 🙏 🙏
पुढे जे होईल ते कळवित राहीनच….
आपले स्नेहांकित,
डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे
11 एप्रिल 2025
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈