श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ आपली माती, आपली माणसं — ☆ श्री प्रदीप केळूसकर

 सतीश जनाबाईला सांगत होता “सुरेशचो फोन इल्लो, दहा तारखेक तो मुंबईत उतारतलो, दोन दिवस तेची मुंबईत कामा करून बारा तारखेक चिपी विमानतळावर उतरून हय येतलो, मग परत पंधरा तारखेक परत तुका घेऊन चिपी वरुन मुंबई आणि त्याच रात्री अमेरिकेक जाऊची तिकिटा काढल्यानं तेनी. ”

जनाबाईने डोक्याला हात लावला.

“आता या वयात माका अमेरिकेक न्हेता, माका प्रवास जमतलो रे.. माजी ऐशी सरली ‘

“पण तू हय एकटी रावतास, तेची काळजी वाटता तेका आते..

“अरे पण मी तुज्याकडे रवलंय असतंय, तुजा घर म्हणजे माजा माहेर न्हय… आणि माजो भाऊस म्हणजे तुजो बापूस अजून हयात आसा मा.

 “होय गे आते, पण सुरेश ऐकणा नाय.. मी आणि बाबांनी तेका किती सांगलंय, जनीआते हय रवात.. तेचा माहेर आसा ह्या.. आमच्याबरोबर पेजपाणी खायत.. पण तो ऐकणा नाय, तेचा म्हणणा माजी मुला आता एक आणि तीन वर्षाची आसत, तेंका आजी कशी गावतली आणि आईक पण नातवंडाचे लाड करुषे वाटतले नाय..

नातवंडाचा विषय निघताच जनीबाई गप्प झाली. कल्पनेने तिच्या डोळयांसमोर सुरेशची मुले आली… काय नाव ठेवली.. ती आठवू लागली.. जतीन आणि छोटी जुलिया. जुलियाचे फोटो सुनेने.. कल्पनाने सुरेशच्या मोबाईलवर पाठविलेले.. गोबऱ्या गालाची गोरी गोरी आपली नात.. तिला वाटतं होते.. तिला उचलून घ्यावे.. तिची पापी घ्यावी.. तिला मांडीवर झोपवावं.. तिच्यासाठी अंगाई म्हणावी आणि तीन वर्षाचा नातू.. बूट घालून खेळायला जातो.. त्याला जवळ घ्यावं.. त्याला रामाची, अर्जुनाची, शिवाजी महाराजांची गोष्ट सांगावी. एवढ्या एकाच कारणासाठी तिला अमेरिकेला जावे, असे वाटतं होते.

ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे सुरेश आला. मग ती दोघ तिच्या माहेरी भावाला, भावजयला, भाच्याना.. सुनेला.. त्यान्च्या छोटयाना भेटून आली. माहेरहून बाहेर पडताना जनीला रडू कोसळलं… आता कदाचित ही शेवटची भेट.. तिचे भाऊ, वहिनी, भाचा पण रडू लागला. जड पायानी तिने माहेरच्याना निरोप दिला.

दुसऱ्या दिवशी सुरेश आईला घेऊन प्रथम मुंबईला आणि रात्रीच्या विमानाने अमेरिकेस रवाना झाला.

जनीबाईने विमानाचा प्रवास प्रथमच केला, सुरवातीला ती घाबरली.. पण विमान उडू लागताच ती तिची श्रद्धा असलेल्या वेतोबाचे नाव घेत होती.. मग हळूहळू तिची भीती कमी झाली आणि मग तिला झोप लागली.

जनी अमेरिकेत पोहोचली. तिच्या मुलाचे सुरेशचे मोठे घर होते.. आजूबाजूला जमीन.. भरपूर पाणी. तिने नातवंडांना जवळ घेतले. छोटया जुलीयाला ती आंघोळ घालू लागली.. तिला पावडरकुंकू लावू लागली. तिला झोपवू लागली. जतीन थोडा मोठा. त्याला थोडंथोडं मराठी येत होतं.. ती नातवाला गाणी म्हूणन दाखवू लागली, शिवाजीमहाराजांच्या गोष्टी सांगू लागली. थोडया दिवसात मुलांना आजीचा लळा लागला. आता मुलं आजीसोबत झोपू लागली. तिची सून कल्पना पण प्रेमळ, ती पण खूष झाली. तिलापण आपले संस्कार करणारे हवे होते. एकांदरीत आई अमेरिकेत आल्याने कुटुंब आनंदित झाल्याचे सुरेशच्या लक्षात आले.

जनीबाईने मुलाला भाजीची बियाणी आणायला सांगितली. सुरेशने सुपरमार्केट मधून आणुन दिली. सासूसुनेने मिळून भाजी घातली, त्या सुपीक जमिनीत भाजी तरारून वर आली. जनीबाईने फुलझाडे लावली. काही दिवसात ती पण जगली.

 सुरेशची बायको कल्पना गुणी स्त्री होती, तशी ती त्यान्च्याच नात्यातील. ती नोकरीं करत नव्हती, त्यामुळे जेवण, भांडीकुंडी सर्व करत होती. मुलं थोडावेळ आईकडे पण जास्त आजीसोबत असायची.

सुट्टीच्या दिवशी सुरेश आई, बायकोमुलांना घेउंन लांब फिरायला न्यायचा. जनीबाई एवढ्या वर्षात फिरली नव्हती, तेवढी चार महिन्यात फिरली.

सुरेश आणि कल्पनाच्या लक्षात येत होते, आईला अमेरिकेची हवा मानवली, गावात ती सतत उन्हात कामात असायची किंवा एकटीच असल्याने जेवण करायला टाळाटाळ करायची. पण इथे नेहेमी थंडहवामान आणि पौष्टीक जेवण शिवाय नातवंडांची साय, त्यामुळे उजळली होती. सुरेश आणि कल्पना मनात म्हणत होती, आता आईला इथेच ठेवायचे, घरात कोणी मोठे असले की आपल्याला आणि मुलांना पण आनंद होतो.

जनीबाई पण खूष होती, मुलाच्या सुनेच्या घरात कसलाच त्रास नव्हता पण तिला आपल्या घरची आठवण येई, आपल्या नवऱ्याने स्वतः कष्ट करून बांधलेले घर, आजबाजूची झाडें, घरातील देव.. जोडलेली माणसे.. नातेवाईक.. भाऊ वहिनी भाचा, त्याची मुले आणि तिची श्रद्धा असलेला देव वेतोबा.. ती सकाळी जाग आली की डोळ्यसमोर वेतोबा आणि त्याला नमस्कार करी. पण आपले थोडे दिवस राहिलेत, याची तिला कल्पना होती, शेवटचे दिवस मुला-सुनेसोबत नातवंडासोबत काढावेत, असे मनाला बजावत ती जगत होती.

आणि एका दिवशी ती सकाळी उठली, तेंव्हा तिचा मुलगा सुरेश घराच्या काचेतून बाहेर पहात होता, कल्पना पण त्याच्यासमवेत होती. सुरेश कुणाबरोबर इंग्लिशमध्ये मोठ्याने बोलत होता. कल्पना काळजीत दिसत होती.

सुरेशचे फोनवरील बोलणे संपल्यावर जनीबाईने विचारले “काय झाला रे?

सुरेश म्हणाला “या शेजारच्या बंगल्यातील रुसेलची मम्मी वर गेली, रुसेल बाहेरगावी गेलोवा, तो रात्रीपर्यत येतोलो.

“अरे बापरे, म्हणजे तोपर्यत सगळ्यांका वाट बघुक होयी.

“छे, अमेरिकेत कोण कुणाची वाट बघणत नाय, रुशेलने म्युनिसिपलतिक फोन केल्यानं, तेंची ऍम्ब्युलन्स येतली आणि बॉडी घेऊन जातली ‘.

“अरे मग जाळतले खय?

“इकडे जाळनत नाय, पुरतत.. ता काम म्युनिसिपलटी करता.

“अरे मग आमच्या देशातील लोक या देशात वर गेलो तर?

“तर तेका विद्युतवाहिनी असता, म्हणजे आत ठेवला आणि बटन दाबला की शरीराची राख होता.

“मग ह्या देशात लाकडा मिलनात नाय जाळूक?

“तेची बंदी आसा. या देशात कोणी मेलो तर या देशाचे नियम पाळूक लागतात. आपल्या भारत देशासारख्या नाय..

जनीबाईच्या डोक्यात गोंधळ उडाला. तिने तिच्या जन्मापासून मेलेल्या माणसाला जाळताना पाहिले होते. या देशात हे सर्व नवीनच, तिच्या पदरी पडणारे नव्हते.

थोडयावेळाने तिने मुलाला विचारले “मग तेचे अस्थी कसे गावातले?

“इकडे अस्थी वगैरे काय नसता गे, अस्थी वगैरे आपल्या देशात. माणूस मेलो काय संपलो.

“मग तेचा पुढचा सुतक.. ?

“या देशात सुतक कोण नाय पाळणा. कोणाक वेळ नसता.. जो तो कामात.

“मग अकराव्या.. बाराव्या?

“ते विधी भारतात.. आपल्या देशात, या देशातील लोक असला काय मानीत नाय.. ”

“मग त्या रुशेलची बाकी नातलगा? भाऊ, बहीण, आते, मामा मामी भाचे ते येतले मा भेटुक?

“सगळे फक्त प्रार्थना करतले चर्चमध्ये. आणि मेसेज पाठवतले दुःखाचे..

एकएक गोष्टी ऐकून जनीबाई आश्चर्य करीत राहिली.

या देशातील काय ह्या पद्धती? आपल्या देशापेक्षा एकदम उलट?

मग तिने सुरेशला विचारले “तू त्या रुशेल, भेटाक जातलंस मा?

“छे, मी मेसेज पाठवलंय कंडोलन्स चो, म्हणजे आपण श्रद्धांजली म्हणतो तस. ”

“बस एवढाच. ?

हे म्हणत असताना शेजारी ऍम्ब्युलन्स आली, त्यातील चार माणसे खाली उतरली, त्यानी घरात जाऊन बॉडी उचलली, दरवाजा उघडून आत ठेवली आणि ऍम्ब्युलन्स आवाज करत निघून गेली.

जनाबाई हादरली, अमेरिकेत मरण आलं तर? आपलं वय झालेलं, कधीही वर जायची तयारी हवी आणि मी मेल्यानंतर मला म्युनि्सिपलटीचे लोक ऍम्ब्युलन्स मधून घेऊन जाणारं आणि मला त्या शेगडीत घालणार? आणि माझे अस्थी? त्याचा विसर्जन… काही नाही.. कोणी तरी गोणीत भरून नदीत टाकणार? माझा मुलगा तरी असेल काय अंतिम कार्याला? माझी सून.. नातवंडे.. कोणी नाही.. माझा भाऊ.. भावजय.. भाचा.. सून. शेजारीपाजारी? कोणी म्हणजे कोणी नाही? मी गेल्यानंतर कोण रडणार नाही.. कोण कोणाला भेटायला येणार नाही.. सांत्वन करायला कोण नाही? नुसते मेसेज दुःखाचे.. कसले मेले कोरडे मेसेज?

छे छे.. माझ्या अस्थी मी या देशात टाकणार नाही.. माझ्या अस्थी माझ्या मातीत.. माझ्या देशाच्या मातीत -माझ्या माणसात…”

जनीबाई अस्वस्थ होऊ लागली, तिला झोप येईना, जेवण गोड लागेना, नातवंडांना जवळ घेऊन ती शून्यात पाहू लागली, शेवटी तिने धीर करून सुरेशला सांगितले 

“सुरेश, माझा वय झाला, आता केव्हाय वर जाऊची तयारी करूंक व्हयी, पण ह्या देशात मराची माझी तयारी नाय.

“अगे आई, काय बोलतस तू? आमी आसवं मा तुझ्यासोबत?”

“जिता आसय तोपर्यत तुमी आसात, मी मेल्यावर तू म्युनि्सिपलटीक फोन करून सांगतलंस, ही बॉडी घेऊन जावा म्हणून… त्या रुशेलच्या आईक नेला तसा.. माका आसा बेवारशी मराचा नाय आसा.. माका माझ्या माणसात मराचा आसा.. माजे अस्थी भोगव्याच्या कोंडीत पडात होयेक.. थयसून देवबागच्या संगमात विरघळूक होयेत.. “

“आई, काय तरी तुजा? तू एवढ्यात कशाक वाईट गोष्टी बोलत? तुका मोठा आयुष्य आसा?”

“नाय बाबा, माजी खात्री नाय, तू माका माज्या भावाकडे पोचव… मी थय आनंदान रवान.. मग मेलंय तरी हरकत नाय.. माज्या देशात माज्या मातीत.. माज्या माणसात..

सुरेश आणि कल्पनाने खुप समजावण्याचा प्रयत्न केला, पण जनीबाई काही ऐकेना.

आई जेवायची पण बंद झाली हे पाहून सुरेशने मामांना फोन लाऊन सर्व सांगितले, त्यानी तिला आनंदाने इथे घेऊन ये म्हणून कळविले.

सुरेश आईला घेऊन मामाकडे आला. या घरातील सर्वांनी तिला खुप प्रेम दिले, सुरेशच्या मुलांना आजीची सवय झाली होती, त्यामुळे दरवर्षी ती चौघे भारतात येऊन राहू लागली.

जनीबाई पुढे पाच वर्षे जगली. लहानश्या आजाराचे निमित्त होऊन ती गेली. सर्वजण तिच्यासाठी रडली. तिच्या भाच्याने सतीशने तिला अग्नी दिला. अनेक नातेवाईक, शेजारी, गाववाले भेटून गेले. पाचव्या दिवशी सुरेश, कल्पना अमेरिकेहून आली, तिच्या अस्थी तिच्या इच्छेप्रमाणे भोगव्याच्या कोंडीत सुरेशने विसर्जित केल्या. तिचे अकरावे, बारावे सुरेशने केले…

आणि तिच्या पिंडाला कावळा पटकन शिवला…

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments