श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

रामायणात हनुमंताची भूमिका फार मोलाची राहिली आहे. रामाच्या कार्यात अग्रभागी आणि अतितत्पर कोण असेल तर तो एकमेव  हनुमंत किंवा हनुमान. हनुमंताच्या अंगी अनेक गुण होते आणि त्याचा उपयोग त्याने कधीही स्वतःसाठी केला नाही तर तो केला फक्त एका रामासाठी. हनुमंताच्या रामभक्तीच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. बुद्धीवंतामध्ये वरिष्ठ, अतिचपल, कार्यतत्पर, कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, संभाषण चतुर, उत्तम सेवक, सर्व शक्तिमान, (बुद्धी आणि शक्ती एकत्र असणं अतिदुर्मिळ! ) असे हनुमंताचे अनेक गुण सांगितले जातात. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे हनुमंताची आणि रामाची भेट तशी उशिरा म्हणजे सिताहरण झाल्या नंतरची आहे. पण पहिल्या भेटीतच हनुमंताचे वाक्चातुर्य पाहून प्रभू श्रीराम प्रसन्न झाले तसेच प्रथमच रामाचे दर्शन होऊन हनुमंत रामाचा कायमचा दास झाला. जिवाशिवाचे मिलन झाल्याचा तो अमृतक्षण होता. पण एकदा रामाची भेट झाल्यावर मात्र हनुमंतानी कधीच रामास अंतर दिले नाही. तो रामाचा एकनिष्ठ सेवक बनला. आपल्या असामान्य आणि अतुलनीय भक्तीने हनुमंताने नुसते देवत्व ( रामतत्व) प्राप्त केले नाही तर जिथे जिथे रामाची पूजा केली जाते तिथे हनुमंताची पूजा व्हायला लागली. रामाचे अनंत भक्त आहेत पण राम पंचायतनात मात्र फक्त हनुमंताचा समावेश आहे. आज सुद्धा जिथे जिथे रामकथा ऐकली जाते, सांगितली जाते तिथे तिथे हनुमंतासाठी मानाचे आसन ठेवलेले असते.

पूर्वी आपल्याकडे अध्ययन आणि अध्यापन हे मौखिक पद्धतीने म्हणजे पाठांतर रूपानेही केले जात असे. लिखीत स्वरूपात अध्ययनाची पद्धती त्यामानाने अलीकडील आहे. याचा एक दुष्परिणाम असा झाला की बराचसा इतिहास आपल्याकडे लिहिला गेला नाही आणि जो लिहिला गेला तो परकीय प्रवाशांनी किंवा आक्रमकांनी. स्वाभाविकपणे तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. यातून एक गैरसमज पसरविला गेला की रामायणात जे वानर होते ते (व्वा!) नर  नसून ती फक्त ‘माकडं’ होती. ही आपल्या पराक्रमी आणि विजयी इतिहासाची जगाने केलेली क्रूर चेष्टा आहे, असेच म्हणावे लागेल. रामायणात असे वर्णन आहे की किष्किंधा राज्य हे सुग्रीवाच्या अधिपत्याखाली होते. त्या राज्याचा सेनापती होता केसरी. आणि ह्या केसरीचा पुत्र हनुमंत. सध्याची दक्षिणेकडील चार राज्यं म्हणजे त्याकाळातील किष्किंधानगरी. सात मजली सोन्याचे महाल असल्याचे वर्णन रामायणात आहे. आजच्या काळात एखाद्या राज्याच्या मंत्र्याची संपत्ती किती असते आपल्याला कल्पना आहे, मग या चार एकत्रित राज्याचा सेनापती किती श्रीमंत असेल. असा हा भावी सेनापती हनुमंत रामाचा दास होतो, नुसता कागदोपत्री दास न होता तो कायमचा रामदास होतो यातच त्याच्या भक्तीचे ‘मर्म’ सामावले आहे.

महारुद्र जे मारुती रामदास।

कलीमाजि जे जाहले रामदास।।

असे ज्याचे वर्णन करण्यात येते ते समर्थ रामदास यांना सुरुवातीपासूनच हनुमंताबद्दल तीव्र ओढ, श्रद्धा, भक्ती होती. प्रभुश्रीरामानी दृष्टांत दिल्यापासून समर्थानी ‘समर्थ’ होईपर्यंत आणि पुढे कार्यसमाप्तीपर्यंत हनुमंताची अखंडित साधना केली. त्याचे यथायोग्य परिणाम आपण शीवकाळात अनुभवले.

शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे | शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||”

समर्थ रामदास

यासमर्थ वचनाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तो काळ मोगलांच्या आक्रमणाचा होता. टोळधाड यायची, घरावर नांगर फिरवला जायचा, आपलीच माणसे क्षुल्लक ‘वतनां’साठी, जहागीरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान नष्ट झाला होता, समाजाला एक  प्रकारचे सामूहिक नपुंसकत्व प्राप्त झाले होते. समाज आपले शौर्य, वीर्य, धेर्य विसरला होता. कोणीतरी ह्या सर्वावर बसलेली काजळी झटकण्याची गरज होती. अशा अस्वस्थ मनाचा अभ्यास करून समर्थानी हनुमंताची मंदिरे स्थापन करून बलोपासनेस सुरुवात केली. तरुण बलवान  व्हायला लागले आणि विविध मठांतून शक्ती आणि बुद्धियुक्त असे नवीन तरुण घडू लागले आणि त्याचा उपयोग छत्रपतींना स्वराज्य स्थापनेसाठी झाला.

रामदास स्वामीनी पूर्ण विचार करून आपल्या आराध्य देवतेची निवड केली. आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा खुपच पुरातन आहे. शिष्य साधनेतून इतका ‘तयार’ होतो की शिष्याचे नुसते विचार बदलत नाहीत तर त्याची कुडी सुद्धा गुरुसारखी किंवा उपास्यदेवतेसारखी होते. आपला समाज हनुमंतासारखा बलवान, बुद्धिमान, सर्वगुंणसंपन्न व्हावा म्हणून हनुमंताची मंदिरे आणि मठ स्थापन करण्यात आले. उपास्य देवतेची निवड करतानाही समर्थांनी कोंदंडधारी रामाची निवड केलेली आहे. आपल्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यावर रामाने आयोध्येला निरोप पाठवून सैन्य मागविले नाही, तर स्वतः उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या आधारे, तेथील सामान्य मनुष्यांच्या (वानराच्या) साह्याने लंकेवर स्वारी करून आपल्या पत्नीला सोडवून आणले. ह्यासर्व कार्यात हनुमंत एकनिष्ठेने रामकार्यात कटिबद्ध होता. हनुमंताने जेंव्हा सिताशोधनासाठी लंकेत गेला, सितामाईला भेटला आणि म्हणाला की तुम्ही माझ्या सोबत चला, मी आपल्या मुलासमान आहे, आपण माझ्या माताच आहात. पण ती पतिव्रता म्हणाली की स्वतः प्रभू राम इथे येतील, ज्याने मला पळवून आणले त्याचा नाश करतील तेंव्हाच मी त्यांच्या सोबत येईन. ह्याला म्हणतात निष्ठा!.

अशा या हनुमंताची समर्थांनी उपासना केली आणि समाजाकडून कडून करवून घेतली. त्याकाळात रूढ झालेल्या क्षुद्र देवतांची पूजा, उपासना समर्थांनी बंद पाडली आणि तीही हनुमंताची उपासना सुरु करून. योग्य असा पर्याय उपलब्ध करून समर्थानी समाजाच्यातील भक्तीला आणि शक्तीला जागृत केले. ‘आधी केलं आणि मग सांगितले’ या उक्तीस जागून स्वतः समर्थ रोज एक हजार सूर्य नमस्कार घालायचे. त्या काळात आणि आज सुद्धा स्वतः व्यायाम करणारा संत पाहायला मिळणं हे दुर्मिळच!. समाजाची दुखरी नस काय आहे हे जाणून त्यानुसार उपचार करण्याचं काम समर्थानी केलं. एखाद्या मनुष्याला साधना करून मुक्ती मिळण्यापेक्षा संपूर्ण समाज एक पायरी उन्नत झाला तर ती प्रगती जास्त चांगली, हे सूत्र उरात ठेऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्थानी अवघे जीवन खर्च केले. स्वतः लौकिक अर्थाने कधीही प्रपंच न करणारा हा रामदासी संतपुरुष लोकांनी ‘प्रपंच नेटका करावा’ असे सांगत होता. प्रपंच नेटका करण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा त्यांनी सूत्रबद्ध रीतीने दासबोधात लिहून ठेवलेआहे.

सर्वसामान्य मनुष्य (समाजपुरुष ) हा लहान मुलाप्रमाणे वागतो. तो आदर्श जीवन जगायचं प्रयत्न करेलच असे नाही पण तो लहान मूलाप्रमाणे अनुकरणशील मात्र नक्कीच असतो. एखादया लहान मुलांचे वडील सैनिक असतील तर त्या लहान मुलास आपण सैनिक व्हावेसे वाटते, एखाद्याचे वडील डॉक्टर  असतील तर त्याला आपण डॉक्टर व्हावेसे वाटते. हे अगदी स्वाभाविक आहे. त्या मूलासमोर जो आदर्श प्रस्तुत केला जातो , तसे होण्याचा ते मूल प्रयत्न करतं, म्हणून समर्थांनी समाजापुढे हनुमंत हा आदर्शांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून प्रस्तुत केला. हनुमंताचा आणिक एक विशेष गुण आहे. हा हनुमंत उपजत देव म्हणून जन्माला आलेला नाही, तर आपल्या भक्तीने, नराचा नारायण व्हावा त्याप्रमाणे भगवंताची (रामाची ) नित्य सेवा करून देवत्वास पोचलेला आहे. हनुमंत कर्तव्यतत्पर, प्रयत्नवादी आहे. व.पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे मोटर सायकल वरून प्रभात फेरफटका (morning walk) करणाऱ्यांना हनुमंत कधीच उमगणार नाही. सर्व सैन्याला खांद्यावर बसवून लंकेत नेणं हनुमंताला अवघड नव्हतं, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत होण्यासाठी त्याला लढायला लावणं जास्त गरजेचं होतं आणि म्हणून सर्व वानरांच्या साह्याने रामसेतू बांधून लंकेत जाऊन युद्धात रावणांचा पराभव करून, त्याला मारून रामानी सितामाईला परत आणली.

आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती कोणी आपल्याला विचारली तर आपण फारतर तीन किंवा चार पिढ्यांची नावे सांगू, पण त्या आधीच्या पिढ्यांची नावे सांगता येतीलच असे नाही, पण आपण हनुमंताच्या कुळातले आहोत, रामकृष्णाच्या वंशातले आहोत, छत्रपतींच्या वंशातले आहोत, असं नुसतं म्हटलं तरी आपले रक्त तापते, छाती गर्वाने फुगते आणि आपल्या अंगात आपसूक वीरश्री संचारते. ज्यांना आपला इतिहास वैभवशाली होता हे माहित असतं त्यांचा भविष्यकाळ सुद्धा उज्ज्वल असतो अशा प्रकारचे एक  वचन आहे. आपल्या बाबतीत ते नितांत खरे आहे. जिजाबाईंनी शिवबाला रामायणातील, महाभारतातील विजयाचा इतिहास शिकविला, अन्याय सहन करायचा नसतो, तर त्याविरुद्ध लढून न्याय मिळवायचा असतो हे शिकविले आणि मग चार इस्लामी पातशाह्यांच्या छाताडावर उभे राहून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

आज आपण आपल्या मुलांना हिंदुस्थानच्या पराजयाच्या आणि युरोपीय देशांच्या विजयाचा इतिहास शिकवीत आहोत, त्यामुळे आपली तरुण पिढी परकीय देशांच्या विकासासाठी परदेशी जात आहे, आपण सर्वच बाबतीत त्याचे अंधानुकरण करीत आहोत. आपण जन्माने हिंदू आणि आचरणाने ख्रिश्चन/मुस्लिम बनत आहोत. ह्याला एकाच कारण आहे ते म्हणजे आपण आपलो ‘कुळवल्ली’ विसरलो आहोत किंवा जाणीवपुर्वक विसरले जावी म्हणून समाजात विविध दुष्ट शक्ती कार्यरत आहेत. आपण वेळीच सावधान होण्याची गरज आहे. लौकिक अर्थाने परंपरा न पाळता जरा जागरूक राहून , ‘धर्म’ सजगतेने समजावून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती जन्माला येतीलही पण त्याआधी मावळे मात्र आपल्याला आपल्या घरातच घडवावे लागतील. असे आपण करू शकलो किंवा प्रयत्न चालू केला  तर हनुमंत आमुची कुळवल्ली असे म्हणून घेण्यास आपण पात्र होऊ.

 जय जय रघुवीर समर्थ।

।श्रीराम।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments