श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग

अण्णासाहेब किर्लोस्कर

( जन्मदिन ३१ मार्च,१८४३ — स्मृतीदिन २ नोव्हेंबर,१८८५ ) 

मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम, खर्‍या अर्थाने रुजवण्याचे श्रेय  बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांकडेच जाते.

१८७३ साली अण्णासाहेबांनी ‘शांकरदिग्विजय’ या नावाचे एक गद्य नाटक प्रसिद्ध केले. १८८० साली पुणे मुक्कामी किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी एका बैठकीत  ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.

१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतला’च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाट्यशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं.

भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात.जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. त्यालाच आपण आज नांदी म्हणतो .

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत अचानकपणे बदलून गेला.

संगीत, नृत्य, नाट्य यांच्या अपूर्व संगमातून निर्माण झालेली संस्कृती म्हणजे रंगभूमी. याच रंगभूमीचं तेजस्वी रुप म्हणजे आपली मराठी संगीत नाट्य परंपरा. रंगमंदिरातील निःशब्द शांतता, भारावून टाकणारं वातावरण, मंद होत जाणारे दिवे, मखमली पडदा, धुपाचा गंध आणि ऑर्गनच्या साथीनं येणारे नांदीचे सूर. सगळच भव्यदिव्य.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाद्वारे ही देदीप्यमान परंपरा सुरू केली.

पंचतुंड नररुंडमाल घर, पार्वतीश आधी नमितो।

विघ्नवर्ग नग भग्न कराया,विघ्नेश्वर गणपती मग तो॥

 

कालिदास कवी काव्य रचित हे गानी शाकुंतल रचितो I

जाणूनिया अवसान नसोनी हे महत्कृत्यभर शिरी घेतो II

 

ईशवराचा लेश मिळे तरी  मूढयत्न शेवटी जातो I

या न्याय बलत्कवि निज वाकपुष्पी रसिकार्चन करितो II

नांदी आणि नाटकातील इतरही पदे निरनिराळ्या राग-रागिण्यांवर आधारित असत. यमन, भूप, ललत, जोगिया, पिलू, आसावरी, भैरवी यांसारखे प्रचलित आणि लोकप्रिय राग तर वापरले गेले.

शाकुंतल नाटकांमधील पदे आजही आवडीने ऐकली जातात त्या पैकी थोडी

१)मना तळमळसी ,

२)लाविली थंड उटी

संगीत सौभद्र मधल्या पदांची यादी फारच मोठी आहे म्हणून नमुन्या दाखल काही गाणी .

१) नच सुंदरी करू कोपा

२) नभ मेघांनी आक्रमिले

३) पाण्डुनृपती जनक जया

४) राधाधर मधू मिलिंद

५) लग्नाला जातो मी

६) प्रिये पहा ( पूर्वीच्या काळी ह्या गाण्याच्या वेळी खरोखर पहाट होत असे)

१५० वर्षांपूर्वी लोकरंजन करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या स्मृतीला  विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments