श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ☆ श्री प्रसाद जोग

अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे — बलिदान दिवस १९ एप्रिल,१९१०

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे,कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या तिघांनी मिळून नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध दिनांक २१ डिसेंबर,१९०९ रोजी केला.

वध आणि खून दोन्हीचा शेवट मृत्यू असला तरी “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणून जी हत्या केली जाते तिला वध असे म्हटले जाते आणि वाईट प्रवृत्ती जेंव्हा हत्या करतात तेंव्हा खून केला असे म्हटले जाते.

तिघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक होते . १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत ‘ या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते . नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरूण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. फाशी दिली त्या वेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते.

गोल्फच्या बॉल ला हात लावला म्हणून जॅक्सनने नेटिव्ह माणसाला बेदम मारले त्या मध्ये त्यात त्याचा मृत्यू झाला,दुसऱ्या एका घटनेमध्ये वंदेमातरम म्हणणाऱ्या लोकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पकडले होते,त्यांची वकिली करण्यासाठी बाबासाहेब खरे यांनी वकीलपत्र घेतले ,तर त्यांची सनदच रद्द केली आणि त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांना कैदेत टाकले.

बाबाराव सावरकर सातत्याने इंग्रज सरकारच्या विरोधात लिखाण प्रसिद्ध करत होते कवी गोविंद यांच्या रचना असलेले पुस्तक बाबाराव सावरकरांनी छापले, जॅक्सनने त्यांना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला,आणि त्यांनासुद्धा कैदेत टाकून त्यांची अंदमानात रवानगी केली.या सर्व घटनांची चीड येऊन या तिघांनी जॅक्सनला संपवायचे नक्की केले.

सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याना कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अश्या समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिले , त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च, १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल, १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

“१९०९” या नावाने त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवला होता, तो २०१३ साली प्रदर्शित झाला. त्याचा टिझर मला यु ट्युब वर मिळाला, त्याची लिंक देत आहे

ठाण्याच्या तुरुंगात त्यांचे स्मारक केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील धगधगलेल्या यज्ञकुंडात तिघांची आहुती पडली आणि स्वातंत्र्य क्रांती पुढे वाट चालू लागली.

या तिन्ही थोर क्रांतिकारकांच्या स्मृतीला सादर प्रणाम … 

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments