कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

चाय गरम , ‘चिनी’ कम ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९८८-९० या काळात मी तेझपूर येथे पोस्टिंगवर होतो. तेझपूरपासून चीन सीमेपर्यंत टेलिफोन व संदेश सेवा पुरवण्याचे आमचे काम होते. अत्यंत दुर्गम अश्या पर्वतराजीतून, टेंगा, बोमडी-ला, शांग्री-ला, से-ला, नूरानांग, अशी ठिकाणे जोडत तवांगपर्यंत जाणारा भक्कम रस्ता, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अभियंत्यांनी व कामगारांनी अक्षरशः खपून बनवलेला होता. वाटेत ठराविक अंतरावर एकेका उंच टेकाडावर माझ्या ५-६ जवानांची एकेक तुकडी पत्र्याच्या शेडमधून राहायची. हमरस्त्यापासून वरपर्यंत चढण्यासाठी मात्र रस्ते नव्हते, आणि पायवाटाही अत्यंत अरुंद व धोकादायक होत्या. अशा दुर्गम ठिकाणी दोन-दोन उन्हाळे, पावसाळे, हिवाळे काढणे आणि बारा महिने, २४ तास तेथील रेडिओ सेट चालू ठेवणे  म्हणजे चेष्टा नव्हती!

रेडिओ सेट, बॅटरी, जनरेटर वगैरेची देखभाल तर त्या जवानांना अहोरात्र करावी लागेच. पण, संपूर्ण तुकडीसाठी स्वयंपाक करणे, टेकडीवरून उतरून पाणी भरणे, सप्लाय ट्रकमधून भाजीपाला उतरवून टेकडीवर नेणे, अशी कामे त्या ५-६ जणांमध्येच वाटून घेतलेली असत. तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, दूध भुकटी, मसाले, असे रेशन आणि शेगडीसाठी केरोसीन त्या जवानांना महिन्यातून एकदा पोहोचवले जात असे. भाजीपाला आठवड्यातून एकदाच मिळू शकायचा पण, अत्यधिक बर्फ आणि खराब हवामान असल्यास कित्येकदा महिना-महिना डबेबंद वस्तूंवर गुजराण करावी लागे.

तेथील संचारव्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि त्या निमित्ताने माझ्या जवानांची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्या मार्गावर माझे वरचेवर जाणे-येणे होते. त्यांच्या घरून आलेली पत्रे, त्यांच्यासाठी युनिटतर्फे थोडी मिठाई, अश्या गोष्टीही मी आवर्जून सोबत नेत असे. इतक्या कठीण परिस्थितीतही चोख सेवा बजावणाऱ्या त्या जवानांपैकी एकाच्याही चेहऱ्यावर मला एकदाही त्रासिक किंवा दुःखी भाव दिसला नाही हे विशेष! त्याउलट, मी गेल्यावर “सर, गरम-गरम चहा घ्या. भुकटीचा असला तरी त्यात सुंठ घालून फक्कड बनवलाय” हे वर असायचे !  

१९९०च्या मे महिन्यात, मी व स्वाती, आमची दीड वर्षांची मुलगी असिलता, माझे व स्वातीचे आई-वडील, आणि तिचे दोन भाऊ, असे त्या मार्गाने तवांगपर्यंत गेलो होतो. माझ्यासाठी ती नेहमीसारखी ड्यूटीच होती, माझ्या कुटुंबियांसाठी मात्र पर्यटन! तो डोंगराळ, बर्फाळ प्रदेश पाहून, आणि आमच्या रेडिओ तुकड्यांमधील जवानांच्या दैनंदिन जीवनाचे मी केलेले धावते वर्णन ऐकून सर्व कुटुंबीय अचंबित झाले होते.

समुद्रसपाटीपासून १३७०० फुटांवर असलेल्या से-ला खिंडीत आमची गाडी थांबली. त्या क्षणी माझा एक मेहुणा, (ऍडव्होकेट वैभव जोगळेकर), जवळ-जवळ ओरडलाच, “अरे, त्या टेकडीवरून कोणीतरी बर्फातून पळत-पळत येतोय.” आम्ही आधी पार केलेल्या चौकीकडून आमच्या येण्याची खबर रेडिओवर मिळाल्यामुळे, मला भेटायला आमचा एखादा जवान येत असेल हे मी ताडले. 

काही क्षणातच एक जवान सॅल्यूट ठोकून धापा टाकत माझ्यासमोर उभा राहिला. आपल्या कोटाच्या खालून त्याने ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेली किटली काढली. कुणाला काही कळायच्या आत, कागदी कपांमध्ये गरम-गरम चहा ओतून त्यांने प्रत्येकासमोर धरला.

डोळ्यात पाणी तरारलेल्या अवस्थेत माझ्या मेहुण्याने त्याला “हे काय?” असे विचारताच तो कसनुसं हसून म्हणाला, “हमारे साहब तो हमेशा उपर चढके आते हैं लेकिन परिवार को पोस्टपर आना मना है, इसलिये आप सबको चाय सडकपर ही पिलाना पडा सर। सॉरी सर।”

माझ्या मेहुण्याने प्रयत्नपूर्वक रोखलेले अश्रू त्याला फार काळ थोपवता आले नाहीत!

मुंबईला परत गेल्यानंतर त्याने पत्रात मला लिहिले होते, “…आर्मीच्या  जवानांच्या डोळ्यात, साहेब आल्याचा आनंद व आत्मीयता ठळकपणे दिसत असे. बरेचदा चुकून आम्हालाही सलाम झडले. तेंव्हा खरोखरच अगदी लाज वाटत असे. एकतर, आमची सॅल्यूट स्वीकारण्याची लायकी नाही, आणि दुसरे म्हणजे, जवान करत असलेले कष्ट व त्याग इतके उत्तुंग आहेत की त्यांना आम्हीच त्रिवार सलाम करावा.

मिलिटरीतल्या लोकांचे कष्ट व त्याग यांची कल्पना मला होती. पण, प्रत्यक्षात वास्तव हे कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने ठसठशीत आहे हे या प्रवासात उमगले. दुर्दैवाने, कितीतरी लोकांना तुमची नीटशी माहिती नसते. त्यामुळे तुम्हा लोकांबद्दल रास्त अभिमान असणे वगैरे गोष्टी तर दूरच्याच असतात…”

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments