श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆

(सत्य आणि गैरसमज)

भारतीय सौर 9 चैत्र 1946

गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक महत्त्व :-

येणाऱ्या वर्ष अमावस्येला कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२५ वर्ष पूर्ण होत आहेत.

“चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे हनी |

शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||”

महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे’, असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. “द्वादशमासै: संवत्सर:” असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का ? याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक कारणे आहेत.

नैसर्गिक :-

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक :-

या दिवशी

अ. श्रीरामांनी वालीचा वध केला तो हाच दिवस.

आ. सत्ययुगाचा प्रारंभ झाला तो हाच दिवस.

इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला. या दिवसापासूनच `शालिवाहन शक’ सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

ई. इंद्राने वृत्रासूरावर विजय मिळवला तोच हा दिवस.

उ. श्री विष्णूने मत्स्यावतार घेतला तोच हा दिवस ( स्मृती कौस्तुभ ग्रंथात याचा उल्लेख आहे.)

सृष्टीची निर्मिती :-

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.

गुढी उभारण्याची पद्धत :-

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !

गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.

गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.

पद्धत :

अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.

आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.

इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.

आंब्याच्या पानांचे महत्त्व:-

इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.

कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व:-

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.

गुढी उभारण्यामागची वैज्ञानिक किरणे :

१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात?

तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्‍तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्‍त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते.

तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असणे! गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्‍ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.

तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.

कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून निर्माण होणार्‍या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्‍या शिव-शक्‍तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध आणि चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.

तांब्याचे तोंड जमिनीच्या दिशेला असूनही उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींची गती ही उसळणार्‍या कारंजाप्रमाणे आणि ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते.

गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.

श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो. याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात.

सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -‘ब्रह्मध्वजाय नम:|’ असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे.

☺️ गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील ‘मी कोणीतरी फार मोठा आहे,’ हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते.

गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो. म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा ! यावरून लक्षात येते की, सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.

गुडीपाडवा हा सण आधी पासून सुरु आहे याचा आणखी एक पुरावा म्हणजेच खालील चोखामेळांचा अभंग

“टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥”

विसर्जन:-

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करुन गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी

अ. गुढीची पूजा करताना करावयाची प्रार्थना : “हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे”.

हीच आपल्याचरणी प्रार्थना !!

आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना :

“हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, आज दिवसभरात या गुढीत जी शक्‍ती सामावली असेल, ती मला मिळू दे , हीच आपल्या चरणी प्रार्थना!!

अशा रीतीने आपण येत्या वर्षात प्रत्येक सण समजून आणि उमजून साजरा करू म्हणजे देश विघातक आणि धर्म विघातक शक्तींचे मनसुबे पूर्णत्वास जाणार नाहीत.

जगातील सर्वात प्राचीन आणि विज्ञानाधिष्ठित धर्मात जन्म मिळाल्याबद्दल आपण त्या परमनियतीचे निरंतर ऋणी असायला हवे आणि याचा सार्थ अभिमान (दुराभिमान नव्हे!)

बाळगायला हवा. चला आपण सर्व सनातन हिंदू धर्माचा जयजयकार करू.

भारत माता की जय।

© दासचैतन्य

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments