श्री मेहबूब जमादार 

? जीवनरंग ❤️

☆ बिन पैशाचे दिवस… भाग – १ ☆ 🖋 मेहबूब जमादार

तो 1967 चा काळ असावा.  त्यावेळी आमच्या चिंचेच्या बनाशेजारी गुऱ्हाळ घर होतं.  दरवर्षी सुगी संपली की गुऱ्हाळ चालू व्हायचं.  गुऱ्हाळासाठी लागणारा ऊस आमच्या सगळ्या भाऊबंदांचा होता.  तर काही शेजारील शेतकरी तोडायला सांगत.  त्यावेळी तांबडा देशी ऊस असायचा.  तो खायला फारच गोड होता. 

दिवाळी संपली की गुऱ्हाळ चालू व्हायचं. ऊस तोडायला अन तो गाडीतून आणायला सात ते आठ मजूर लागत.  इंजिन वरती दोघं  असायचे. इंजिन चालू झालं की घाणा  चालू व्हायचा.  त्या घाण्यात ऊस घालण्यासाठी दोन मजूर लागायचे.  एक जण ऊस द्यायचा.  एक जण  प्रत्यक्ष घाण्यात ऊस घालायचा. त्याचा रस लोखंडी मांदाणं  होतं त्यात पडायचा.  ते भरलं की रस उंचावरच्या  लोखंडी टाकीत  इंजिनच्या मदतीने  लोखंडी पाईप मधून टाकला जायचा.  ती टाकी भरली की दुपारी चार वाजता काईल चुलवानावर ठेवायची.  त्यात तो रस टाकला जायचा.

गुऱ्हाळात सगळ्यात महत्त्वाचा कामगार म्हणजे गुळव्या. गुळव्या चांगला असला तर गुळ चांगला तयार व्हायचा. काईल  मध्ये रस टाकला की चुलवान उसाचं  वाळल चिपाडं टाकून पेटवलं जायचं.ते  पेटवायला दोन माणसं लागायची. त्यानां  चुलवाण्या  म्हणत. त्याचं काम चार वाजता चालू व्हायचं ते रात्री बारा एक वाजेपर्यंत जवळजवळ तीन आदनं  पूर्ण होईपर्यंत चालायचं. आगीमुळे ती बिचारी घामे घूम होत. त्यांचं  अंग काळ दिसे.  एकूण गुऱ्हाळाला जवळजवळ पंधरा ते सोळा माणसे लागत. त्यावेळी गुऱ्हाळ व्यवस्थित चाले.

गूळ तयार व्हायला लागला की त्याचा वास आमच्या वाडीत पसरत असे.  त्यावेळी लगेच आम्ही सारी मुलं गुऱ्हाळघरा शेजारी जमा होत असू.  पण तिथे एक राखणदार ठेवलेला होता.  तो आमच्या शेजारच्या गावातला होता.  तो काय आम्हाला तिथे येऊ देत नसे.  आम्ही सारी मुलं त्याला फार त्रास देत असू.  शेवटी तो म्हणायचा, गुळ तयार झाला की तुम्हाला थोडा थोडा गूळ खायला देतो तुम्ही चिपाड फक्त घेऊन या म्हणजे झालं.

तो  तयार झालेला मलईदार गुळ आमच्या चिपाडावर ठेवायचा.  तो फार गरम असे. पण त्याची चव इतकी लाजवाब असे की तो सारा गूळ आम्ही तिथेच फस्त करत असू.  ते दिवस मजेचे होते.  बिन पैशानं  हे  सारं आम्हाला मिळायचं. 

तो एखादी दिवशी लिंबू आणा म्हणायचा. आणि सगळ्यांना लिंबू पिळून रस शोधून जर्मन च्या मापातनं प्यायला द्यायचा. त्या उसाचा मालक म्हणायचा,

“घ्या रे पोरांनो रस!  अगदी पोटभर प्या ”

गूळ तयार झाला की काईल उतरायला लागायची. त्यावेळी काईलच्या  एका हूकातुन  समोरच्या दुसऱ्या हुकात एक गोल लाकूड बसवलेलं  असे. असे तीन हुक या बाजूला आणि तीन हुक समोरच्या बाजूला असत. प्रत्येक हूकाकडे दोन ते तीन माणसे लागायची.  प्रत्येक बाजूला सात ते आठ माणसे अशी पंधरा-सोळा माणसे लागायची. तरच ती काईल उचलत असे. ती काईल  उचलताना माणसं श्लोक म्हणायची,

“बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय”

असं म्हणत ती सारी काईल फरशीच्या तयार केलेल्या वाफ्यात पालथी केली जायची.  त्यावेळी गुळ पातळ असायचा.  फारच गरम असायचा.  वाफ्यात  टाकला की तो थंड व्हायचा.  हळूहळू तो घम्यात भरला जायचा. घम्यात पहिलंच धुतलेलं पांढरं कापड अंथरलेलं असे. 

गुळ इकडे तिकडे सारायला लांब दांड्याचे  हत्ये  असायचे.  तर भरायला लाकडी लहान हत्ये  असायचे.  एका काईल  मधून गुळाच्या जवळजवळ पाच सहा ढेपा तयार होत. त्या ढेपाच वजन जवळजवळ वीस  किलोच्या आसपास असायचं. प्रत्येक मालकाचा गुळ अलग ठेवला जायचा. काही वेळा गि-हाईक  तिथे येऊन गूळ घेऊन जायचा. समजा नाहीच खपला तर मालक ट्रक सांगून सांगलीच्या किंवा कोल्हापूरच्या बाजारपेठेत तो विकून येत. 

त्या काळात आमच्या ओढ्यात सीताफळ,  पेरू,  आंबा,  जांभळीची झाड होती. दिवाळी संपली की पेरू आणि सीताफळ पाडाला यायची.  पोपटाने झाडावर एखाद्या फळाला टोच मारली की आम्हा मुलांना कुठलं झाड पाडाला आलय  ते समजायचं. ओढा  आमच्या घरापासून हजार बाराशे फूट लांब होता.  तिकडे जाण्यासाठी माणसांना अन गुरानां  एकच वाट होती.

आम्ही चार पाच जण एका वर्गातच शिकत होतो. रविवारी सुट्टी असल्यावर ओढ्यात जाऊन सीताफळ  ठीकं  भरून आम्ही आणत असू.  ती  पिकायला कुणाच्यातरी गोठ्यात ठेवत असू. पिकली की रोज सायंकाळी शाळा सुटली की पोटभर सिताफळ खात असू.

आमच्यातला गण्या तर म्हणायचा,

“शंकरया लेका  थोडी खा ,नाहीतर पोटातच झाड उठल बघ सिताफळीच !”

यावर सारी हसायची. कोण जास्त सीताफळ खातय,   त्याची तर इर्षा लागायची. आम्हाला पोटासाठी या वस्तू केव्हा विकत घ्याव्या लागल्या नाहीत. सारे गणित आमचे बिन पैशाचं होतं. 

काही वेळेला कोकणातल्या बाया बिबे घेऊन यायच्या.  त्यांना मिरच्या दे ऊन ह्या बिब्या विकत घेतल्या जायच्या त्यावेळीही पैसा लागत नसे.  फक्त मालाची आदला बदल केली जायची. 

सुगी चालू असतानाच काही माणसं खळ्यावर धान्य मागायाला येत. त्यात पेठे चा नामदेव मामा दरवर्षी यायचा.  एरवी तो वरकी पाव व तंबाखूची पुडया विकायचा. पेठेत तंबाखू आणि तपकीर प्रसिद्ध होती.  तो खळ्यावर यायचा, त्यावेळी ज्वारीची मळणी चालू असायची. त्याला सूप  भरून धान्य दिलं की तो दहा-बारा वर्की पाव किंवा आठ दहा  तंबाखूच्या पुड्या त्या सुपातच  टाकायचा. त्यावेळी त्याचे पैसे किती होतात हे कोणच बोलत नसे. सार काहीं  अदलाबदलीवर चाले. गड्यांना पगार सुद्धा माणसं ज्वारी देत.  सुगीला दुप्पट ज्वारी मिळे.  त्यामुळे काम करण्यासाठी माणसं खुश असत.   कामावरचे  गडी दिवस मावळला तरी कामावरून घरी जात नसत. काही वेळेला रात्रीला जेवणाचा वकुत होई. तरीपण अर्ध काम सोडून कोण घरी जात नसे. त्यावेळी मालक सुद्धा दुप्पट धान्य गडयानां  मजुरी म्हणून देत असे.   

क्रमश : भाग पहिला 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments