सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवा बाजारात गेले होते••• आणि घरच्या उपयोगासाठी, किंवा नित्योपयोगी, काही वस्तू मिळत आहेत का ते पहात होते••• एका छोट्याशा दुकानासमोर, आपोआप पावले थबकलीच••• दुकान होते वेगवेगळ्या पिशव्यांचे••• मग त्यात अगदी पारंपारिक असलेला आजीबाईचा बटवा••• फॅशन म्हणून आलेला •••ते अगदी छोटी अशी मोबाईल बॅग म्हणून खांद्याला अडकवायची मोठा बंद असलेली साधीच पण मोहक अशी पिशवी•••

मग भाजी आणण्याकरता वेगळ्या पिशव्या••• किराणा आणण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• प्रवासाला जाण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• शाळेत न्यायच्या••• डब्बा ठेवायच्या •••कॉलेज कुमारांसाठी •••लॅपटॉप साठी••• सामान ने-आण करण्यासाठी•••टिकल्या ठेवण्यासाठी••• हातातच पर्स म्हणून वापरण्यासाठी••• महिलांचे दागिने ठेवण्यासाठी••• साड्या ठेवण्यासाठी••• रुमाल, ब्लाउज ठेवण्यासाठी••• उगीचच शो म्हणून वापरण्यासाठी••• लॉन्ड्रीचे कपडे देण्यासाठी •••अरे बापरे!•••

अजून खूप मोठी यादी••• लांबतच जाईल••• इतक्या तऱ्हेच्या पिशव्या त्या दुकानात होत्या••• दुकानाचे नाव पण कलात्मक ठेवलेले होते••• “BAG THE BAG”••• आणि सेक्शनला त्या त्या पिशव्यांची नावे दिली होती•••

दुकानात जाऊन हरखून जायला जायला झाले••• दुकानात गेल्यावर पिशव्यांचे एवढे प्रकार पाहून लक्षात आले ••• व्यवसाय करायचा म्हटल्यावर कोणताही करता येतो •••फक्त थोडा अभ्यास आणि लोकांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी••• बघा साधी पिशवी, पण त्याचे एवढे प्रकार •••एवढी रुपे••• एकदम समोर आल्यावर••• गरज नसतानाही, एखादी तरी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडतच नव्हते कोणी •••

पिशवीची व्याख्या काय हो? पिशवी म्हणजे कोणतेही सामान, वस्तू, सहजपणे ने-आण करता येण्यासाठी, त्याला धरायला बंद असलेली, पण बंद नसलेली, किंवा बंद करता येण्याजोगी, वस्तू••• पूर्वी या सगळ्या पिशव्या जुन्या कापडापासून, कपड्या पासून, बनवल्या जायच्या••• पण आता फक्त कापडाच्या नाहीत तर कागदाच्या, प्लास्टिकच्या, ऍक्रॅलिक पदार्थांपासून, नवीनच बनवलेल्या पिशव्या मिळतात••• म्हणूनच खूप आकर्षक दिसून त्या घेण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही•••

यावरुनच आठवली ती स्पंजची पिशवी••• सध्या ती पाहायला मिळत नाही ••• पण काही वर्षांपूर्वी अशा बऱ्याच पिशव्या लोक वापरत होते •••दिसायला अगदी छोटी पिशवी••• पण त्यात सामान भरायला सुरुवात केल्यावर, कधी पोत्यासारखे रूप घ्यायची••• कळायचे पण नाही••• आपण अशा वस्तू त्यात भरू लागतो••• तसतसा स्पंज ताणून ती पिशवी मोठी मोठी होत जायची ••• त्यामुळे कुठेही सहज ने-आण करता येण्यासाठी ही पिशवी सगळ्याकडे असायची•••

 मग लक्षात आले •••आपल्या शरीरात सुद्धा किती पिशव्या आहेत ना ? पोट, किडन्या, हृदय, जठर, मेंदू, स्त्रियांना गर्भाशय, अगदी शरीरातील शिरा धमन्या या पेप्सी मिळणाऱ्या पिशव्या सारख्याच नाहीत का?

म्हणजे काहीही असो••• कुठेही असो •••कसेही असो••• पिशव्यांची गरज ही पदोपदी लागते ••• आणि ती आपण वापरतच असतो••• पण पिशवी ही अशी वस्तू आहे, जी वापरायची •••पण परत रिकामी पण करायची असते •••जर रिकाम्या न करता पिशव्यांचा फक्त वापर केला तर काय होईल हो? घरातली जागा निष्कारण व्यापली जाणार •••कितीही मोठे घर असले तरी; एक दिवस जागा कमी पडू लागणार ••• हो ना? म्हणूनच आपण त्या त्या पिशवीचा उपयोग तेवढ्यापुरता करत असतो •••पुन्हा पुन्हा वापरली तरी ती काढ घाल करून त्या पिशवीचा वापर करत असतो•••

पिशवी ची व्याख्या, पिशवीचा उपयोग, पिशव्यांचे प्रकार पाहून वाटले••• आपले मन हे पण एक पिशवी आहे ना? नक्कीच आहे••• आणि तिचे रूप •••त्या स्पंजच्या पिशवी सारखे आहे••• काहीही••• कितीही •••कसे पण कोंबा••• ती पिशवी सगळे धारण करते•••

मग लक्षात आले •••पण पिशवीतून काढ घाल ही नेहमी होत राहिली पाहिजे •••नाहीतर एक दिवस जागा कमी पडणार••• पण मग त्याचा वापर तसा करायला हवा••• पण कोणी तसा करत नाहीये••• या मनामध्ये मिळेल ते••• दिसेल ते •••फक्त कोंबत आलो आहोत••• विशेषत: नको त्या वस्तूच •••पहिल्यापासून जास्त प्रमाणात भरल्या गेल्याने, त्यात हव्या त्या वस्तू ठेवायला जागा कमी पडत आहे•••

कोण केव्हा रागवले•••कोण केव्हा   भांडले••• कोण कोणाला काय बोलले••• हे सगळं बारकाव्यानिशी आपण आपल्या मनात ठेवत असतो••• म्हणून तेवढेच लक्षात राहते••• मग चांगल्या घटना, चांगले बोलणे, चांगले वागणे, याला मनात साठवायला जागा कमी पडते••• म्हणून आपण त्या वस्तू वापरून टाकून देतो•••

यामुळे प्रत्येकाचे मन हे नकारात्मक  गोष्टींनी भरले गेले आहे •••एक दिवस सुट्टीच्या दिवशी •••किंवा निवांत वेळी •••ही सगळी नकारात्मकता काढून फेकून दिली पाहिजे •••षड्रिपूंचे  जाळे काढून टाकले पाहिजे••• म्हणजे सकारात्मकतेला ठेवायला मनाच्या पिशवीत जागा होईल••• आत्मविश्वास त्यामध्ये भरता येईल ••• सगळ्यांचे चांगले गुण पाहण्याची दृष्टी त्यात जपता येईल••• या मनाच्या पिशवीला, अंतर्मनाचा बंद लावला की, किती छान या पिशवीचा वापर होईल ना?•••

कोणत्याही दुकानात न मिळणारी, पिशवी तुमची तुम्ही कलात्मकतेने सजवू शकता••• कधी त्याला चांगल्या वर्तणुकीची झालर  किंवा  लेस लावू शकता••• तर कधी चांगल्या विचारांच्या टिकल्या, आरसे लावून, आकर्षक करू शकता••• मग नकारात्मकता काढून, सकारात्मकतेला थारा दिलेली ही मनाची पिशवी, आजीबाईंच्या बटव्याची सारखी कधीच आऊटडेटेड न होणारी •••अशी असेल••• त्यातूनच कोणत्याही प्रसंगी••• कोणतीही ••• आवश्यक वस्तू तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा दूर करायला मदत करेल••• बघा प्रत्येकाने आपली मनाची पिशवी साफ करून ठेवा•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments