श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचा पट आणि भारत… ☆ अनुवादक – श्री सुनील देशपांडे

सुमारे 63 वर्षांपूर्वीची घटना आज सगळ्यांच्या विस्मृतीत गेली आहे. अर्थात विस्मृतीत गेली असे म्हणणे सुद्धा अवघड आहे. कारण किती जणांना ती सविस्तर माहिती होती?

ॲडमिरल एन कृष्णन हे त्यावेळी भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. त्यांनी जर पुस्तक लिहिले नसते तर ही घटना नक्कीच विस्मृतीत गेली असती. 

१९७१ मध्ये त्यावेळी अमेरिकेने भारताला, पूर्व पाकिस्तान (म्हणजे आत्ताचे बांगलादेश) बरोबर सुरू केलेले युद्ध थांबवा नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील अशी इशारा वजा धमकीच दिली होती. या इशाऱ्याची दखल घेऊन भारताने रशियाकडे सहकार्याची मागणी केली होती. त्यावेळचा हा प्रसंग जवळपास इतिहासातून नामशेष झाला होता. परंतु वरील पुस्तकाने तो कायमचा करून ठेवला आहे.

डिसेंबर १९७१ मध्ये जगातील दोन बलाढ्य लोकशाहीवादी देशांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला धमकी दिलेली होती.

जेव्हा पाकिस्तानचा पराभव समोर दिसत होता त्यावेळी श्री हेनरी किसिंजर यांनी हे युद्ध संपविण्यासाठी आणि भारताला रोखण्यासाठी अमेरिकेचे सातवे आरमार पाठवण्याची शिफारस केली होती. 

हे सातवे आरमार म्हणजे काय होते?

जगातील सगळ्यात मोठे ७५ हजार टनाचे आणि अणुऊर्जेवर चालणारे, ७० युद्ध सज्ज विमानांना घेऊन जाऊ शकणारे त्या काळातील जगातील सर्वात मोठे आणि सर्वश्रेष्ठ असे आरमार होते. 

त्या मानाने भारताकडील सगळ्यात मोठे आयएनएस विक्रांत हे जहाज वीस हजार टनाचे आणि वीस हलकी युद्धविमाने घेऊन जाऊ शकणारे जहाज होते.

बांगलादेश मधील अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी हे आरमार पाठवले जात असल्याचे अमेरिकेकडून जरी वरकरणी सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाचा नायनाट करण्याच्या दृष्टीने आणि पाकिस्तान सरकारला मदत करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करण्याचा विचार होता.

तेवढ्यात आणखी एक भय वाढवणारी बातमी रशियन गुप्तचरांमार्फत भारत सरकारला मिळाली.

ब्रिटिश सरकारच्या नौदलातील काही जहाजांचा समूह अरबी समुद्राकडे येण्यास निघाला आहे. त्यामध्ये एच एम एस ईगल या विमानवाहू युद्धनौकेचा आणि एचएमएस अलबियन या खतरनाक युद्ध कमांडोज सह येणाऱ्या जहाजांसह आणखी काही प्रचंड संहारक अशा युद्ध नौकांचा  समावेश होता.

भारताला सगळ्या बाजूने कोंडीत पकडून भारतावर दबाव आणून पाकिस्तानला मदत करून बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध दडपून टाकण्याची योजना अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही देशांनी आखली होती.

खरोखरच हा प्रसंग आंतरराष्ट्रीय दडपणाखाली दडपून जाऊन  आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागण्याचा आणीबाणीचा प्रसंग होता. 

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे सातवे आरमार हिंदी महासागरात येऊन ठेपले सुद्धा.

दुसऱ्या बाजूने ब्रिटनचे आरमार वेगाने अरबी समुद्राकडे कूच करीत होते. 

अत्यंत कसोटीचा क्षण आणि सगळे जग श्वास रोखून परिस्थिती पाहत होते. आणि त्या निर्णायक क्षणाला सुरुवात झाली. अमेरिकेचे सातवे आरमार पूर्व पाकिस्तान कडे सरकू लागले आणि एवढ्यात अमेरिकन आरमाराला प्रचंड मोठा धक्का बसला.

रशियन पाणबुड्या तत्पूर्वीच पाण्याखालून भारताच्या किनाऱ्याच्या जवळपास पोहोचल्या होत्या. त्या एकदम समुद्रातून वर आल्या आणि अमेरिकन सातवे आरमार आणि भारताचा समुद्रकिनारा यामध्ये या पाणबुड्यांची साखळी उभी राहिली. याबाबत अनभिज्ञ असलेले अमेरिकन आरमार गोंधळून गेले. 

सातव्या आरमाराचा ॲडमिरल गोर्डन याने संदेश पाठवला “सर आपल्याला खूपच उशीर झाला आहे. सोविएत आपल्या आधीच येथे पोहोचले आहेत”

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि अशावेळी नाईलाजाने अमेरिकेच्या सातव्या आरमाराला व ब्रिटिश आरमाराला सुद्धा मागे फिरावे लागले. 

पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सरकारला पाठिंबा देण्यासाठी तिसरे महायुद्ध ओढवून घ्यायचे का? त्यापेक्षा अमेरिकन आरमाराने माघार स्वीकारली. 

भारतीय नौदल व लष्कर आणि त्याचे प्रमुख व सर्वात मुख्य म्हणजे निर्णय घेणाऱ्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, यांच्या धैर्याला आणि आंतरराष्ट्रीय डावपेचांना खरोखरच तोड नाही. 

 यानंतरचा भारताचा विजय आणि बांगलादेशी स्वातंत्र्य हे तर सगळ्यांनाच माहित आहे. परंतु त्यामागे केवढे जगड्व्याळ घटना क्रमांचे, चतुराईचे राजकारणाचे बुद्धिबळ खेळावे लागले हे समजल्यानंतर खरोखरच त्या सर्व घटना क्रमातील सर्वांचाच अभिमान वाटतो. 

— एका इंग्रजी लेखाचा केलेला स्वैर अनुवाद. 

अनुवादक – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments