सौ राधिका भांडारकर

??

☆ “कविता आणि मी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

कळत नकळत आपल्या जीवनाची जडणघडण होत असताना कुणाकुणाच्या आपल्या आयुष्यातील जागा  ठळकपणे ठरत जातात. आपले कुटुंबीय, आपले गुरुजन, आपले सखे सोबती,अफाट निसर्ग, इतकेच नव्हे तर आपले प्रतिस्पर्धी, विरोधक यांना सुद्धा आपल्या जीवनात कोणते ना कोणते स्थान असतेच.

माझेही जीवन  यापेक्षा वेगळे नाही. पण जेव्हा जेव्हा मी सखोलपणे माझ्या वर्तमान आणि गतायुष्याचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की  मला आयुष्यात खूप काही मिळालं ते भाषिक साहित्यातून. कथा, कादंबऱ्या, कविता,चरित्रं, ललित साहित्याचा हात धरूनच मी वाढले आणि गद्य आयुष्य जगत असताना पद्यांनी माझ्या भोवती सदैव एक हिरवळ जपून ठेवली.

या माझ्या जीवनात कवितांचे स्थान काय याचा विचार करत असताना मनात आलं ही कविता तर माझ्यासोबत जन्मानंतरच नव्हे तर जन्मापूर्वीही होतीच की! मातेच्या उदरात वाढत असताना

। ये ग ये ग विठाबाई।

। दहीभाताची उंडी घालीन तुझ्या तोंडी।

 ।कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।

हले हा नंदाघरी पाळणा।। 

किंवा 

कन्हैया बजाव बजाव मुरली।  

…. अशी अनेक गाणी माझ्या आईने तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाला गोंजारून म्हटलीच असणार आणि ते नाद ते शब्द माझ्यात, गर्भात असतानाच झिरपले नाही का?

त्याच माझ्या मातेने मांडीवर थोपटत “निज निज रे लडिवाळा” किंवा “ये ग गाई गोठ्यामध्ये बाळाला दूध दे वाटीमध्ये”  “आडगूळ मडगुळ सोन्याचं कडगुळं” अशी कितीतरी बडबड गीतं गाऊन मला जोजवलं, वाढवलं.

“ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही”

असेच म्हणत मला झोपेतून जागं केलं. त्यावेळच्या या बाल कवितेने जीवनातला केवढा तरी मोठा आशय नंतर दाखवलाही.

जेवू घालताना तिने

“ चांदोमामा चांदोमामा भागलास का?” म्हणत माझ्या मुखी अमृततुल्य वरण भाताचे घास भरवले.

कधी रडले, कधी रुसले तर,

“ रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसू तिकडून आला बाई कोणीतरी खुदकन हसू” शिवाय “लहान माझी बाहुली मोठी तिची सावली”

“ पाऊस आला मोठ्ठा पैसा झाला खोटा”

“ ये ग ये ग सरी माझे मडके भरी” अशा अनेक गीतांनी माझं बालपण बहरलं. मला सदैव हसवलं, आनंदी ठेवलं आणि संस्कारितही केलं.

केव्हातरी रात्र उलटून गेली…  बालपण सरलं  पण कवितांनी कधीच सोबत सोडली नाही. त्यावेळी अंकुरलेल्या   कोवळ्या प्रीतीच्या भावना जाणवणारे उद्गार मीही कागदावर  उतरवले असतील.त्या कविता मात्र फक्त माझ्या आणि माझ्या अंतर्मनात घुमणारी स्पंदने होती.

त्यावेळी 

“जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते” या काव्य शब्दांनी माझ्याही मनातली अव्यक्त, अनामिक हुरहुर जाणवून दिली होती.

आयुष्याचे कितीतरी टप्पे ओलांडले. तळपत्या उन्हात रस्त्यावरचे वृक्ष जसे सावली देतात ना तशी शितल छाया मला केशवसुत, पाडगावकर, विंदा, बोरकर, ग्रेस, वसंत बापट, शांताबाई, बहिणाबाई, इंदिरा संत आणि कितीतरी…. यांच्या कवितांनी दिली.

 विमनस्कपणे स्वपदे उचलीत

 रस्त्यातुन मी होतो हिंडत 

एका खिडकीतून सूर तदा पडले 

दिड दा दिड दा दिड दा…

केशवसुतांच्या या सतारीच्या बोलांनी तर कित्येक वेळा माझ्या आयुष्यात दाटलेला काळोख दूर केलेला आहे.

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा..”

या काव्यांने तर जादूच केली म्हणा ना! सकारात्मक जीवन जगण्यासाठी जणूं काही मजबूत दरवाजे उघडून दिले..

 झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे

 लाटांवर

 पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालिचे 

हरित तृणांच्या मखमलीचे 

त्या सुंदर मखमाली वरती 

फुलराणी खेळत होती…

बालकवींच्या या कवितांनी तर निसर्गाशी मैत्रीच घडवली. वृक्षवेलींशी संवाद साधला.

 “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते”

या बहिणाबाईंच्या रसाळ काव्यपंक्तींतून तर जीवनातल्या तत्त्वज्ञानाचे कोडे अगदी सहजपणे सोडवले. काळ्या मातीशी नातं जोडलं.

कवी ग्रेस संपूर्णपणे नाही उमगले. पण

 “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

 मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवत होता…”

 या ओळींनी मन अक्षरशः घनव्याकुळ झाले.

 हा रस्ता अटळ आहे 

अन्नाशिवाय कपड्याशिवाय 

ज्ञानाशिवाय मानाशिवाय

 कुडकुडणारे हे जीव 

पाहू नको, डोळे शिव!

 नको पाहू जिणे भकास

 ऐन रात्री होतील भास 

छातीमध्ये अडेल श्वास

 विसर यांना, दाब कढ

 माझ्या मना बन दगड…

 विंदांनी तर खिळे ठोकावे तसे शब्द आणि विचार मनावर अक्षरशः ठोकले. आणि दमदारपणे जगण्याची कणखर प्रेरणा दिली.

 “माझी मैना गावाकडे राहिली

 माझ्या जीवाची होतीया काहिली” शाहीर अण्णाभाऊंच्या या कवितांनी तर अनेक वेदनांना उघडं केलं.

 “होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा

 देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे …

गुरु ठाकूर यांचे हे गीत खरोखरच मनातले अंधारलेले कप्पे क्षणात उजळून टाकतात. आधार देतात.

अशा कितीतरी कविता …

आयुष्यात उचललेल्या प्रत्येक पावला सोबत येत गेल्या. कविता माझ्या जीवनात सदैव सावली सारख्या सोबत असतात. 

“तेरी आवाज मे कोई ना आये

 तो फिर चल अकेला रे, 

यदि सभी मुख मोड रहे सब डरा करे 

 तब डरे बिना ओ तू मुक्तकंठ

 अपनी बात बोल अकेला रे

 तेरे आवाज पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे 

रवींद्रनाथ टागोरांच्या या कवितेने जीवन वाटेवरचे काटे अगदी सहजपणे वेचायला शिकवले, नव्हे त्या काट्यांनाच बोथट केले.

कवितांचे आपल्या जीवनात  स्थान काय याविषयी काही भाष्य करताना मी वर्ड्सवर्थच्याच  शब्दात म्हणेन

FOR OFT WHEN ON MY COUCH I LIE

IN VACCANT OR IN PENSIVE MOOD 

THEY FLASH UPON THAT INWARD EYE

WHICH IS THE BLISS OF MY SOLITUDE

AND THEN MY HEART WITH PLEASURE FILLS

AND DANCES WITH THE DAFFODILS….

जेव्हां मी एकटी असते, उदास लेटलेली असते तेव्हां खरोखरच —रेताड, रुक्ष  वाळवंटात ठिकठिकाणी उगवलेली सोनेरी डॅफोडील ची फुले जशी मनाला प्रसन्न करतात तसं कवितांनी माझं मन टवटवीत ठेवलं.

 अंगणात प्राजक्ताचा सडा बरसावा  तसे कवितांनी माझ्या आयुष्यात आनंदाचे शिंपण केले.

 कवितांच्या अथांग सागराने माझी जीवन नौका  डुबु  दिली नाही. तिला पैल तीरावर सांभाळून नेले.

 जोडीदाराच्या हातात हात घालून पैल तीर गाठतानाही सुहास पंडितांच्या या काव्यपंक्तीच मनावर रेंगाळतात.

धकाधकीच्या जीवनातले 

क्षण शांतीचे वेचून घेऊ 

तुडुंब भरले कुंभ सुखाचे

 हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता

 जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता

 गाठू विश्रांतीचा पार जुना….

मातीतून मातीकडे जाताना, मातीत पेरलेल्या या  महान कवींच्या कवितांनी आयुष्यभर दीपस्तंभ सारखी सोबत केली. बेडा पार किया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments