श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “हे दान देऊ कसं ?” – भाग – २ श्री संभाजी बबन गायके 

(पण भिकारी? नको रे देवा ! पण आयुष्य थांबलं नाही…वीस वर्षे निघून गेली.) इथून पुढे —

“आत ये!” तिने त्याला विनवलं. “नाही येता यायचं…घरात!” त्याने निर्धारानं सांगितलं. “तु फक्त भिक्षा दे झोळीत…निघायचं आहे पुढच्या गावाला.” त्याच्या आवाजात कोरडेपणा होता कमालीचा. संन्यस्त धर्म स्विकारल्यावर जन्माचं नाव आणि गाव,घर त्यागावं लागतं.

“मी नाही देणार तुला भिक्षा तु घरात आल्याशिवाय.!” ती म्हणत राहिली. त्याच्यामागे उभा असलेला म्हातारा संन्यासी पुढे झाला आणि म्हणाला,”माई,आईनं भिक्षा दिल्याशिवाय संन्यासदीक्षा पूर्ण होत नाही संन्याशाची! नको अडवू याची वाट!” “आमच्या मेळ्यात कसा पोहोचला माहित नाही हा पोरगा…पण म्हणाला बैरागी व्हायचंय तुमच्यासारखं!” “आम्ही म्हणालो, विचार कर. सोपा नाही हा मार्ग. सारंकाही सोडावं लागेल. तर म्हणाला, सोडण्यासारखं सोबत नाहीच आहे काही!” मग आमचाही नाईलाज झाला. आला तेंव्हा मिसरूडही फुटलं नव्हतं नीटसं. आमच्यासोबत राहिला,सेवा केली आमची. पण नाव,गाव सांगत नव्हता. आठवत नाही म्हणाला” म्हातारा बैरागी सांगत होता.

तो तरूण आणि तो म्हातारा मग घरासमोरच्या पारावर जाऊन बसले. शेजारच्या गावात खबर पोहोचली आणि त्याची मोठी बहिणही धावत आली…भावाला पाहायला. ती त्याच्या गळ्यात पडली तसं त्याने तिला दूर सारलं…”दूर रहा,माई!” तो म्हणाला! बघणा-या महिलांनी डोळ्यांना पदर लावले. पुरूषांनी सुस्कारे सोडले आणि ते स्तब्ध उभे राहून नुसते पहात राहिले. त्यांना माहित होते की आता उशीर झालाय…हा आता परत येणार नाही संसारात.

आई म्हणत राहिली…इथंच रहा…तुला हवं ते कर देवाचं. मी आडवी येणार नाही…फक्त माझ्या नजरेसमोर रहा….माझे डोळे मिटून जाईपर्यंत !

त्याने हातातलं सारंगी वाद्य पुढे घेतलं आणि तारा छेडल्या…एक दीर्घ आलाप घेतला. तिनेही हे गाणं शेकडोवेळा ऐकलं होतंच…पण आज त्यातला अर्थ तिला उमगता उमगता टोचणी लावून जात होता. राजा गोपीचंद…विशाल स्नानकक्षात प्रात:स्नानासाठी सोन्याच्या चौरंगावर बसलेला आहे. त्याच्या अनेक पत्नी,दासी मंगलस्नानाची तयारी करताहेत. तरूण,सुंदर,रूबाबदार गोपीचंद…त्याची आई मैनावती राजप्रासादाच्या एक मजल्यावरून खालचे हे दृश्य पहात उभी होती. तिचा पती अगदी असाच दिसायचा…पण अकाली मृत्यूने त्याला खाल्लं होतं. गोपीचंदही असाच संसारसुखात रममाण होत होत एकेदिवशी मरणाचा उंबरठा ओलांडून जाईल…काही अर्थ नाही या उपभोगांमध्ये! त्यापेक्षा यातून लवकरात लवकर विरक्त झालेलं बरं. मैनावती गुरू गोरखनाथांचा उपदेश आठवत आठवत गोपीचंदाकडे पहात होती. तिच्या डोळ्यांतून टपकलेले गरम अश्रू तिच्या गालांवरून ओघळून नेमके खाली पडले ते गोपीचंदाच्या अंगावर. तो चमकला. त्याने मैनावतीचे मनोगत जाणून घेतले. आणि संन्यासधर्म स्विकारण्याचा पक्का निर्धार केला. हे इतरांसाठी प्रचंड धक्कादायक असंच होतं. गुरू गोरक्षनाथांनी गोपीचंदला दीक्षा देताना अट घातली की स्वत:च्या घरून भिक्षा मागून आण तरच तु संन्यासी होऊ शकशील….त्याने ती अट पाळली आणि वैराग्याची वाट चालू लागला!

पण मी तर मैनावती नाहीये ना? मला माझा मुलगा हवाय…त्याचा संसार बघायचाय…नातवंडं मांडीवर खेळवायचीयेत…मी नाही ना याला भिक्षा देऊन संन्यासी होऊ देणार! गाण्यातल्या भर्तृहरी आणि गोपीचंदाच्या कथा ऐकता ऐकता ती मनाशी झुंजत होती….पण ती जिंकू शकली नाही!

“माई,तु नाही भिक्षा घातलीस तर माझं जीवन अपुरं राहील. मी आधी तुझ्या एकटीचाच मुलगा होता..आता हे सारं जगच माझं आई झालं आहे..नको अडवूस मला” तो म्हणत राहिला…गर्दी वाढत गेली..वेळ पुढे सरकत राहिली. “उशीर होईल पुढच्या मुक्कामाला पोहोचायला…आणि अजून झोळी रिकामीच आहे..माई!” त्याने निर्वाणीचं सांगितलं!

तिने थरथरत्या हातांनी त्याच्या झोळी दाणे घातले आणि त्याच्या पायांवर कोसळली…”पुन्हा या स्वामीजी…यापुढे भिक्षेला नाही म्हणणार नाही!” ती म्हणाली. त्याने उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला आणि तो पुढे निघाला….ती त्याच्या मागे चार पावलं चालून थबकली…आपण तर काही या मार्गावर जाऊ शकणार नाही!…तो वळणावर दृष्टीआड होईपर्यंत ती हात जोडून उभी होती…तिला तिच्या संसारात पुन्हा परतावंच लागणार होतं!

(ही नुकतीच घडलेली सत्यकथा. वीस वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असा अचानक आईसमोर संन्यासी बनून उभा राहिला तेंव्हा त्या आईच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल? पण असे झाले खरे. आणि असे अनेकवेळा घडलेलेही आहे. खाऊन, पिऊन घ्या, मजा करा कारण आपण उद्या मरणार आहोत! असा काहीसा पाश्चात्य विचार. तर हे खाणं, पिणं, मजा एक ना एक दिवस संपून जाणार आहे, यात गुंतून राहून कल्याणाचा मार्ग विसरून जाऊ नका…आपण कधीही मरून जाऊ शकतो.. त्याआधी अध्यात्माचा विचार करा,वैराग्याचा विचार करा असं काहीसं सांगू पाहणारी आपली संस्कृती. अर्थात हा ज्याचा त्याचा विचार. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असणारे जैन तरूण तरूणी का बरं सर्वसंगपरित्याग करून साधुत्वाचा मार्ग अनुसरत असतील? का बरं सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून काहीजण वैराग्याचा मार्ग जवळ करत असतील? जगाला मायाजाळ म्हणावे की मायाजळ? असो. जे भावलं ते मांडलं शब्दांत. 

– समाप्त  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments