श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ जीवन एक नाटक… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

नुकतीच माझी बदली कोयंबत्तूरहून नवी दिल्लीला झाली होती. मी कुणाशी तरी फोनवर मराठीत बोलत होतो. आधीच केबिनमध्ये येऊन बसलेला आकाश व्यास माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. संभाषण संपताच त्याने मला विचारलं, “सर, अभी आप मराठी में बोल रहे थे ना?” 

मी होकारार्थी मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक आनंद दिसला. “सर, आज शामको आप मेरे घर दस मिनिट के लिए आएंगे तो बडी कृपा होगी। मेरा घर यहाँ से बहुत नजदीक है।” त्याच्या आवाजात कणव भासली. 

“सर, आपने कभी रघुवीरप्रसाद धीरजजी का नाम सुना है?” आकाशनं विचारलं. 

“क्यूं नही? वे हिंदी के बडे साहित्यकार है.” असं म्हणताच आकाश शांतपणे म्हणाला, “सर, वे मेरे ताऊजी है, मैं आपको उनसे मिलवाना चाहता हूं। वे बहुत साल मुंबई में रह चुके है, मेरी बडी मम्मी भी महाराष्ट्रीयन थी।”         

संध्याकाळी आकाशच्या घरी गेलो. वरच्या मजल्यावरच्या एका छोट्याशा खोलीत कोपऱ्यातल्या सोफ्यावर अंग दुमडून, पुस्तकात डोकं खुपसून एक वृद्ध गृहस्थ बसले होते. 

“ताऊजी, ये हमारे बडे साहब श्रीकांतजी है। वे पूना के रहनेवाले है।” असं आकाशने सांगताच धीरजजींनी हलकेच पुस्तकातून डोकं वर काढत मला पाहिलं. मी समोरच्या खुर्चीवर बसलो. 

“आप मराठी जानते ही होंगे?” मी होकारार्थी मान डोलावताच धीरजजींच्या चेहऱ्यावरच्या भावना हळूहळू बदलत गेल्या. 

रघुवीरप्रसाद म्हणजे हिंदी साहित्यातले एक बडे प्रस्थ होते. त्यांच्या नांवावर गाजलेली चार नाटके, दोन कादंबऱ्या, कित्येक कथासंग्रह होते. 

चहा आणण्यासाठी आकाश खाली गेला. प्रश्न विचारल्याखेरीज संवाद सुरू होऊ शकत नाही म्हणून मी धीरजजीना विचारलं, “तुम्ही मुंबईत कधी होता? कशी वाटली मुंबई?”

धीरजजी क्षीण आवाजात अस्खलित मराठीत म्हणाले, “मुंबईवर माझं प्रेम जडलं होतं. माझी पत्नी मुंबईचीच होती आणि……” त्यांच्या तोंडातून पुढचे शब्द बाहेर पडले नाहीत. त्यांचा आवाज घोगरा झाला. मी त्यांच्या वर्मावर बोट ठेवल्यासारखं झालं.  

“तुम्ही लिहिलेलं ‘बहुत याद आओगे’ हे नाटक मी वाचलं आहे. मला खूप आवडलं.” असं सांगताच धीरजजी स्वत:ला सावरत म्हणाले, “हे पाहा, आधे अधूरे, आषाढ का एक दिन, म्हटलं की लोकांना मोहन राकेश आठवतात. हयवदन, तुघलक म्हटलं की गिरीश कर्नाड आठवतात. हिंदी नाटकांच्यासारखं मराठी नाटकांचं नाही. 

मराठी नाटकांच्या लेखकाची नावे पटकन आठवत नाहीत. त्याच लेखकाच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून उतरलेल्या संवादाला आपल्या अभिनयाच्या कोंदणात बसवून सादर करणारा अभिनेता किंवा अभिनेत्री आठवतात. गारंबीचा बापू म्हटलं की तो घाऱ्या डोळ्यांचा, लालबुंद चेहऱ्याचा डॉ. काशिनाथ घाणेकर समोर उभा ठाकतो. संभाजीराजे म्हणजे उंच, धिप्पाड शरीरयष्टी असलेले व्यक्तिमत्व. पण ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकात साधारणच अंगकाठी असलेले डॉ. काशिनाथ संभाजीची भूमिका वठवायचे. केवळ जरब बसवणारे भेदक डोळे, उत्कट अभिनय आणि प्रभावशाली संवादफेक या हुकमी अस्त्रांवर अक्षरश: ते रंगमंच उजळून टाकायचे. त्यांचा संभाजी बघताना अंगावर शहारे यायचे. ‘परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार’ असं म्हणताना कासावीस झालेला संभाजी अजूनही माझ्या डोळ्यांपुढून जात नाही. मी पाहिलेला मराठी रंगभूमीचा तो पहिला सुपरस्टार होता. त्यांच्या पहिल्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दणाणून जायचे. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या नांवावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत असत.” धीरजजी भरभरून बोलत होते. धरण फुटावं, तसं त्यांच्या मुखांतून धो धो शब्द वाहत होते. 

चहाचा ट्रे घेऊन आकाश किती तरी वेळ तसाच ताटकळत उभा होता. मी धीरजजींच्या सोबत चहा घेतला. मराठी नाटकांच्याविषयी आणि नटांच्याविषयी इतक्या आत्मीयतेने बोलणाऱ्या एका उत्तर भारतीयाला पाहून मी भारावून गेलो. परत भेटायला नक्की येईन असं आश्वासन देऊन बाहेर पडलो तर आकाशने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन घट्ट दाबले आणि एवढंच म्हणाला, “थॅन्क यू सो मच सर.” 

मी म्हटलं, “अरे, खरे तर मीच तुझे आभार मानायला हवेत एवढ्या मोठ्या साहित्यिकाची माझी भेट घडवून आणलीस.”      

दुपारी लंचनंतर आकाश माझ्या केबिनमध्ये शिरला. मी आकाशला म्हटलं, “आकाश, धीरजजी मराठी रंगभूमीविषयी किती भरभरून बोलत होते. गैरसमज करून घेऊ नकोस, पण धीरजजींना मुलं नाहीयेत काय, ते तुमच्याकडे राहतात म्हणून विचारलं. त्यांची प्रकृती देखील खंगल्यासारखी दिसत होती.” 

आकाशनं सांगायला सुरूवात केली, “धीरजजी माझ्या वडिलांचे सख्खे वडील बंधू आहेत. मुंबईत असताना ते एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापक होते. मुंबईच्या वास्तव्यातच त्यांनी महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न केलं. दोन वर्षापूर्वी ते रिटायर होऊन दिल्लीला परतले. इथे त्यांनी दुमजली घर बांधून ठेवलेलं होतं. दोन्ही मुलांच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मुलगा मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. मुलगी अमेरिकेत सेटल झाली आहे. 

अचानक एका छोट्याशा आजाराचं निमित्त झालं आणि एक आठवड्याच्या आत माझी बडी मम्मी (काकू) वारली. पत्नीच्या मृत्युनंतर ताऊजींचं जीवन एकदम कोलमडून गेल्यासारखे झाले. तिच्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही. त्यांचं मन कुठंच रमत नव्हतं. त्यांचं लिहिणंही खुंटलं म्हणून अधूनमधून येऊन जाणाऱ्या मित्रांचंही येणं बंद झालं. त्यांच्या शिस्तबध्द जीवनाचं वेळापत्रकच कोसळलं. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडायचे आणि सकाळचा चहा बाहेरच घेऊन यायचे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments