??

☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

“पुढील महिन्यात माझ्याकडे वृद्ध आईबाबा येणार आहेत. तुम्ही तुमच्या आईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत होतात. आणि असं बरचं काही माझी आई नेहमीच सांगायची. तर काय करु?

जरा pl. टिप्स द्या..” सुलक्षणा विचारत होती.–

तेव्हा मी तिला बरेच पदार्थ लिहून दिलेच. आणि वृद्ध,आजारी व्यक्ती संभाळताना माझ्या हातून झालेल्या बऱ्याच चुका सांगितल्या — म्हणजे तिने सावध रहावे.. खूप खूप चुका झाल्या-

** *** अहमदाबादला आमच्या घरी माझे वृद्ध सासु..सासरे अगदी आनंदात असायचे .पण..

एकदा सासरे फिरायला गेले.. ” नीट सावकाश जा हं !काँलनीबाहेर जाऊ नका …” या सूचना मी दिल्या.

पण.. आमच्या घराचा  नंबर व पत्ता द्यायला विसरले, ते भटकतच राहिले .त्यांना वयोमानानुसार घरनंबर आठवलाच नाही. ते सैरभैर झाले. अर्थातच मी अर्ध्या तासात त्यांना शोधत गेलेच.. दाखवलेच नाही त्यांना काही…. पण.. वयोवृद्धांना आपला पत्ता बरोबर लिहून देणे, हे महत्त्वाचे..

वयोमानानुसार त्यांना पोथी वाचन अवघड होते. हे माझ्या बऱ्याच उशिरा ..आठदहा दिवसांनी लक्षात आले..मग चूक सुधारली..रोज सकाळी वृत्तपत्रे वाचून दाखवणे. व दुपारी.. माझ्या लेकीला मांडीवर घेऊन थोपटत..अंगाई ऐवजी..त्यांच्यासाठी पोथी वाचन केले.

माझ्या सासूबाई.. हाँस्पिटलमधे होत्या. मी रोज रात्रभर असायची. हाँस्पिटल  सुसज्ज होते. तरीही –.बेडपॅन देतात..  निघून जातात. असा अनुभव आला..शारीरिक स्वच्छता करत नाहीत.. हे मला दुसऱ्या दिवशी कळले. माझी चूक झाली… मग सेवेकरींवर अवलंबून रहायचे नाही. रुग्णांची आंतर्बाह्य शारीरिक स्वच्छता, शुश्रूषा आपल्यालाच करायची आहे. हे  लक्षात घेऊन .. रोज रात्री  कडूलिंब पाणी व सकाळी उठल्यावर गुलाबपाणी त्या जागेवर शिंपून..बेबी पावडर लावून ठेवणे.. हे केले. नारळपाणी हे तर अंतर्गत शुद्धीकरण करतेच. मी पुढे सर्व रुग्णांबाबत ते पाळले.

— ती चूक वेळेवर लक्षात आली म्हणून त्या जवळजवळ दोन महिने हाँस्पिटलमधे असूनही त्यांना bed sores झाले नाहीत. माझ्या सासूबाईनी त्यांच्या बहिणीला सांगितले —

 ” संपूर्ण शरीराची स्वच्छता किळस वा आळस न करता उन्नती सतत करत होती. म्हणून बोटभर सुद्धा जखम झाली नाही.”

पहिल्याच दिवशी मी नर्सवर भरोसा ठेवला ही चूक लक्षात आली, म्हणून  बरे झाले. धडा घेतला.. कुणावरही  अवलंबून रहायचे नाही, स्वतः रुग्णसेवा करायची.

**** माझी आई आजारी असताना..(स्मृती भ्रंशाने तिला बोलता येत नव्हते) अल्झायमर पराकोटीचा  होता. ती माझ्याकडे येऊन दोनच दिवस झाले होते. तिला आईस्क्रीम भरवताच… एकदम ती किंचाळली.. चवताळली..मला मारत सुटली..माझे केस उपटले. कडकडून चावली. चूक तिची नव्हती.(तिला स्मृती भ्रंश होता. या भयंकर आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर..रुग्ण हिंसक बनतो. चवताळतो, बेदम मारतो. नाते विसरतो. जवळच्या व्यक्तीला सहन करावेच लागते. व मार खाणे असह्य झाले तर दूर ठेवावेच लागते.नाईलाजाने. )

—  तिला तो गार स्पर्श  सहन झाला नाही. चूक माझी होती. मग लक्षात आले.. वार्धक्यात आईसक्रीम खूप खूप गार चालत नाही.. जरा वेळाने.. तिने आवडीने खाल्ले..आणि पुढे नंतरही मी ती चूक सुधारली..अति गार काही दिले नाही. व तिनेही आनंदाने चाटून पुसून खाल्ले…. प्रत्येक क्षण कसोटीचा होता.

**माझे वडील….  त्यांना नागीण झाली होती. त्यामुळे व वाढत्या वयानुसार थकल्याने हातात जोर नव्हता. त्यामुळे त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालणे, जेवताना.. पोळीचे तुकडे करून देणे, मुख्य म्हणजे पाठीला ,पायांना मालीश करणे हे सर्व मी करत होतेच…

*वडिलांना आंघोळ  घालून त्यांचे अंग पुसताना लक्षात आले की म्हातारपणात  कातडी नाजूक होते. म्हणून टर्कीश  टाँवेल, V.I.P. Shorts  वापरणे योग्य नाही. नाजूक कातडी दुखावते… आपले वडील हेच मुळात आपल्या साठी.. V.I.P. असतात. हे लक्षात आल्यावर पंचा, कोपऱ्या, लुंगी मागवून ती सुखद वस्त्रे  वापरली.

* कवळीची डबी उघडून कवळी घासण्यासाठी हातात घेतली तेव्हा लक्षात आले.. छी.. छी.. छी–

दात किती अस्वच्छ.. कवळीतील तीन दात तुटलेले.. काही दात झिजलेले.बघून मी स्वतःला लाखो दुषणे देऊ लागले. दर महिना वडील माझ्या घरी येतात. किमान पाचसहा दिवस राहतात. त्यांची कवळी वीस वर्षांपूर्वीची होती. बदलायला हवी, हे माझ्या लक्षात कसे आले नाही?

केवढी मोठी चूक झाली माझी !!!

मी लगेचच डेंटिस्टला फोन करुन.. ‘ ते रुग्ण आहेत. आपण येऊन  बघता का? नवी कवळी करुन देता का?’  विचारले. माझ्या विनंतीवरून  ते  बहुमल्य वेळ खर्चून आले. माप वगैरे घेऊन.. अर्ज़ंट कवळी बनवून दिली. माझे वडील जेव्हा जेव्हा आमच्या घरी येत, ..तेव्हा..त्यांना चष्मा पुसून देत होते..नखे कापून देत होते.. डोळ्यात औषध घालून देत होते. तेल लावून देत होते, तेव्हा दात/कवळी स्वच्छ आहे की नाही, हे पहाणे मी कशी विसरले बर? खरच मोठी चूक झाली होती–माझी !!!

आणि खरं म्हणजे मी अगदी माझ्या नवव्या वर्षीपासून माझ्या आजोबांची कवळी घासून पुसून लख्ख करणे, पायांना, पाठीला मालीश करणे.. हे संस्कार आमच्यावर बालपणापासून आहेतच…तरीही माझ्या लक्षात आले नाही? चुकलेच माझे !!! अस्वच्छ दात मुखात असताना.. मी काळजीपूर्वक केलेले पदार्थ पचणार कसे??? डॉ.नी माझी समजूत घातली.. तुम्ही रोज खीर/दुध,आणि सार/सूप्स /नारळ पाणी ,आणि मऊ पातळ खिचडी वगैरे देत होतात तेव्हा ते दात लावत नव्हते. खरं म्हणजे..तेव्हढेच पुरेसे असते.जास्त खायचेच नसते इतके आजार असणाऱ्यांनी !!!…. वगैरे. पण चूक ती चूकच होती.

ते पुण्यात गेल्यावर रोज फोनवर सांगायचे..

आंघोळ घालणे, कवळी साफ करणे, बूटसाफ करून  घालणे. गरमागरम पौष्टिक आहार वेळेवर देणे…प्रत्येक वेळी तुझी आठवण येते. येथे काही नीट कुणी करत नाही…  वगैरे.. मी हसत असे.

कारण  काही  व्यक्तींना सवय असते–प्रत्येकाला तोंडावर.. “तू किती माझी काळजी घेतेस,नाही तर ती.. 

हे प्रत्येकाला म्हणणे. हा मनुष्य स्वभाव असतो.त्यामुळे स्वतःच्याच मुलांच्यात भांडणे होतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही.

— हे मी पूर्णपणे लक्षात ठेऊन ती चूक आम्ही पुढे करणार नाही..असे मनाशी ठरवले आहे. 

****माझ्या मोठ्या नणंदताई  रूग्ण म्हणून माझेकडे होत्या. दोन्ही डोळ्यांना पट्टी होती.

सेवा करायला बाई ठेवली की नीट करत नाही.. हा अनुभव गाठी होता. म्हणून  त्यांचे सर्वकाही मी करत होते. दुखणे डोळ्यात होते. बाकी त्या हसून खेळून मजेत होत्या. गप्पा, टप्पा, गाणी-गोष्टी चालू असत.

त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे  म्हणून मी खरतर त्यांना आंघोळ घालणे, वगैरे सर्व काही करत होते.तरीही अनावधानाने..मी–एकदा..'””ताईवन्सं ,या लवकर ! तुमच्या आवडीचे गाणे लागले आहे. बघायला या””

असे बोलले. असेच एकदा..”‘ताई वन्सं, बेल वाजली. दार उघडता का? मी कणीक भिजवत आहे. आणि मला दुसऱ्या अधू हाताने दार उघडता येत नाही !” असे मी चुकून बोलले

त्यांना किती वाईट वाटले असेल ना..नंतर आम्ही दोघी खूप खूप हासलो..आंधळ्या–पांगळ्याची जोडी !

त्या समजून घेणाऱ्या होत्या म्हणून.. माझ्या चुकीवर हासून पांघरूण घातले.

— ते सर्व झाले. पण जी चूक झाली ती चूकच असते..

— आणि प्रत्येकावर अशी आबालवृद्धांचे संगोपन करण्याची वेळ येतेच. .. जागृत रहावे..

लेखिका : सुश्री उन्नती गाडगीळ

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments