डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काही वेळा आपल्या बघण्यात येते, लोक तरी किती विविध प्रवृत्तीचे असतात ना. कोणी फक्त भविष्यात जगतात तर कोणी भूतकाळात.

वर्तमानात जगायचे, पण भविष्याची स्वप्ने बघायची,हा तर मानवी स्वभाव आहे. त्यात गैर काहीच नाही पण काही लोक असे बघण्यात येतात जे फक्त आणि फक्त भूतकाळातच रमलेले असतात.

मी डॉक्टर असल्याने आपोआपच माझा समाजाशी जास्त संबंध आला,येत असतोही. निरनिराळ्या वेळी माणसे कशी  वागतात, हेही मला चांगलेच अनुभवाला आलेले आहे.

काहीवेळा आडाखे चुकतात पण आपण बांधलेले अंदाज तंतोतंत खरे आले की मजा वाटते. माझ्या बघण्यात आलेले काही लोक खूप मजेशीर आहेत. 

माझी एक मैत्रीण आहे… ती कधीही भेटली तरी मी – माझे – मला, या पलीकडे जातच नाही. कधीही भेटली की “ अग ना, काय सांगू, आमचे हे ! इतके बिझी असतात.. इथपासून,आमची पिंकी कशी हुशार, हे आख्यान सुरू. लोकांना बोलायला मध्ये जागाच नाही. मग मी नुसती श्रोत्यांची भूमिका घेऊन “ हो का ? वावा, “ इतकेच म्हणू शकते.

दवाखान्यात  अप्पा बोडस यायचे. अतिशय सज्जन साधे मध्यमवर्गीय गृहस्थ. पण सतत भूतकाळातच रमलेले… “ काय सांगू  बाई तुम्हाला.. .काय ते वैभव होते आमचे. मोठा वाडा, पूर्वापार चालत आलेला,रोज १५-२० माणसे असत पंक्तीला. गेले ते दिवस.” .. मग मला विचारायचा मोह अनावर व्हायचा की “ अहो, मग ते राखले का नाही कोणी? तुम्ही का चाळीत रहाताय?” पण मी हे नुसते ऐकून घेते. त्यांचा विरस मी का करू? 

मग आठवतात इंदूबाई. सध्या करतात दहा घरी पोळ्या आणि स्वयंपाकाची कामे. पण आल्या की सुरूच करतात. “ काय सांगू बाई तुम्हाला ? किती श्रीमंत होतो आम्ही. काय सुरेख माझं माहेर. पण ही वेळ आली बघा. तुमच्यासारखी शिकले असते, तर हाती पोळपाट नसता आला.” .. मला हसायला येते. मी त्यांना विचारले, “ अहो,मग तेव्हा का नाही शिकलात?” .. उत्तर असे..  “ तेव्हा कंटाळाच यायचा बघा मग दिली शाळा सोडून.” — आता अशा इंदूताईंचे भविष्य सांगायला ज्योतिषी नको. पण त्या रमतात आपल्याच आठवणीत. माझा दवाखाना हे एक चावडीचे ठिकाण होते लोकांना.

निम्न वस्तीत माझा दवाखाना, त्यामुळे उच्चभ्रू लोकांचे नियम यांना लागू नाहीतच. मी जराशी रिकामी बसलेली दिसले की सरळ येऊन,  आपल्या मनीची उकल करायला सुरुवात.

लता एक कॉलेज कन्यका… बुद्धी अतिशय सामान्य, रूप बेताचेच. माना वेळावत दवाखान्यात यायची.     “ बाई,येरहोष्टेश व्हायला काय करावे लागते हो? “ मी कपाळावर हात मारून घेतला.

“लता, तो शब्द एअरहोस्टेस असा आहे. आणि अगं लता तुझे स्वप्न खूप छान आहे, पण त्याला डिग्री लागते. इंग्लिश लागते उत्तम. तू आधी बी ए तर हो, मग मी सांगते पुढचे.” 

मग कधीतरी यायचे एक कवी… “ बाई वेळ आहे का?” नसून कोणाला सांगते. पेशंट नाहीत हे बघूनच ते आलेले असत. “ बघा किती सुंदर कविता केलीय आत्ताच. तुम्हीच पहिल्या हं ऐकणाऱ्या.” – ती निसर्ग कविता,पाने फुले मुले प्रेम,– असली ती बाल कविता ऐकून मला  भयंकर वैताग यायचा. कवी आणि कविता दोन्हीही बालच..

मग आठवतात काळे आजी. या मात्र इतक्या गोड ना. “ बाई,तुमच्यासाठी ही बघा मी स्वतः पर्स विणली आहे.आवडेल का ?वापराल का? “ किती सुंदर विणायच्या त्या. पुन्हा जराही मी मी नाही. ती माझी पर्स बघून माझ्या बहिणीने त्यांना बारा पर्सेस करायची ऑर्डर दिली आणि नकळत त्यांचा तो छोटासा व्यवसाय सुरू झाला. त्यांना चांगले पैसे मिळायला लागले अगदी सहज. असेही उद्योगी लोक मला भेटले.

असेच मला काळेकाका आठवतात. आले की हातात स्मार्ट फोन आणि फेसबुक उघडून, मला त्या पोस्ट दाखवण्याची हौस ! वर,वावा किती छान म्हणावे ही अपेक्षा. सतत यांच्या पोस्ट्स फेसबुकवर. त्याही जुन्या,अगदी जपून ठेवलेल्या. हे फेसबुक प्रकरण माझ्या आकलनापलीकडले आहे.

— काय  ते  अहो रुपम् अहो ध्वनिम्… आपल्या कविता,आपल्या पाककृती लोक वेड्यासारखे टाकत असतात. बघणारे रिकामटेकडे, तयार असतातच, लाईक्स द्यायला,अंगठे वर करायला. काय हा वेळेचा अपव्यय… 

तर हेही  माझे असेच एक पेशंट !!—  मी  2000 साली गेलो होतो ना चीनला, ते बघा फोटो. ही माझी बायको. बघा,कशी दिसतेय चिनी ड्रेस घालून..  हे आम्ही,आफ्रिकेला गेलो होतो तेव्हाचे फोटो. हा माझा लेख बघा बाई..  २०११  साली आला होता .” —-  सतत जुन्या गोष्टींचा यांना नॉस्टॅल्जिया.  हे जपून तरी किती ठेवतात असले फुटकळ लेख , कोणत्यातरी  सदरात आलेले.  मग त्यांनी केलेल्या परदेशीच्या ट्रिप्स. पुन्हा,मी मी आणि मी… लोकांना काय असणार हो त्यात गम्य. नाईलाज म्हणून देतात आपले  भिडेखातर   लाईक्स. पण लोकांनी कौतुक करावे याची केवढी हो हौस. त्यातूनही  खरोखरच चांगले ध्येय  असणारे, काहीतरी करून दाखवायची जिद्द असणारे लोकही भेटले.

अशीच भेटली अबोली. अतिशय हुशार, गुणी, पण दारिद्र्य पाचवीला पुजलेले. बारावीला उत्तम मार्क्स

आणि आईवडील म्हणाले ‘ बस झालं शिक्षण.आता लग्न करून टाकू तुझं.’ बिचारी आली रडत माझ्याकडे. “ बाई,मला नाही लग्न करायचं इतक्यात. मी काय करू ते सांगा. मला पायावर उभं रहायचं आहे माझ्या.”  मी तिला ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करायला आवडेल का ते विचारलं. पहिली फी मी भरली तिची. तिने तो कोर्स मन लावून पूर्ण केला. छान मार्क्स मिळवून पास झाली आणि तिला एका चांगल्या ट्रॅव्हल कंपनीत नोकरीही मिळाली. तिच्या ऑफिसमध्ये मी मुद्दाम तिने बोलावले म्हणून भेटायला गेले होते. सुंदर युनिफॉर्म घातलेली अबोली किती छान दिसत होती ना. मला फार कौतुक वाटलं तिचं. असेही जिद्दी लोक भेटले मला माझ्या आयुष्यात.

असाच अभय अगदी गरीब कुटुंबातला. सहज आला होता भेटायला. तेव्हा माझा  मर्चंट नेव्ही मधला भाचा काही कामासाठी दवाखान्यात आला होता. मी अभयची त्याच्याशी ओळख करून दिली. अभय म्हणाला, “ दादा,मला माहिती सांगाल का मर्चंट नेव्हीची. अभय त्याच्या घरी गेला. माझ्या भाच्याने, अभयला सगळी माहिती नीट सांगितली.अभयकडे एवढी फी भरण्याइतके पैसे नव्हते. इतके  पैसे भरण्याची ऐपतच नव्हती त्यांची. पण मग त्याने माझ्या भाच्याच्या सल्ल्याने इंडियन नेव्हीची परीक्षा दिली. तो पास झाला,आणि आज इंडियन नेव्हीमध्ये छान ऑफिसर आहे तो… त्या मुलाने, मानेवर बसलेले दारिद्र्य मोठ्या जिद्दीने झटकून टाकले. आज त्याचा मोठा फ्लॅट,  छान बायको मुले बघून मला अभिमान वाटतो.

— असेही छान जिद्दी लोक मला भेटले आणि नकळत का होईना, हातून त्यांचे भलेही झाले.

तर लोकहो, असे जुन्या वेळेत सतत भूतकाळात गोठलेले राहू नका. इंग्लिशमध्ये छान शब्द आहे,

‘फ्रोझन  इन  टाईम.’  जुन्या स्मृती खूप रम्य असतात हे मान्य. पण त्या तुमच्या पुरत्याच ठेवा, नाही तर हसू होते  त्याचे. आपला आनंद आपल्या पुरताच असतो… असावा. लोकांना त्यात अजिबात रस नसतो.

म्हणून तर आपले रामदासस्वामी  सांगून गेलेत ना…

                                             आपली आपण करी जो स्तुती,

                                                         तो येक पढत मूर्ख.

आणि केशवसुत म्हणतात …… 

                                         जुने जाऊद्या, मरणा लागुनी

                                          जाळूनी किंवा पुरुनी टाका 

                                          सडत न एक्या ठायी ठाका 

                                           सावध ! ऐका पुढल्या हाका 

— आपणही हे नक्कीच शिकू या.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments