?  मनमंजुषेतून ? 

☆ 🥀 जास्वंदीच्या कळ्या ! ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

जास्वंद : “अगं, मी वीतभर असताना, मला किती प्रेमाने लावलं होतस तुझ्या अंगणात. तुझ्या बाळांप्रमाणे तू माझी काळजी घेतलीस. अजूनही घेतेस…आता  माझं वय दोन वर्षे असेल ना? माझी मुळं मातीत घट्ट रुजेपर्यन्त तुझ्या प्रेमळ स्पर्शाने मी आनंदी होत होते. आणि मनाची खात्री झाली की, ही मला छान घडवणार!रोज पाणी घालण, वरचेवर माती बदलणं,  तू घरी केलेलं खत घालण, माझ्या फुटलेल्या कोवळ्या पालवीवर धुळ जरी पडली तरीही कससं होणारी तू, माझ्या आजूबाजूला किडही लागू देत नव्हतीस. 

नव्या उमेदीने मला एकेक फांदी नवीन फुटत गेली, मी बहरत गेले. कधीतरी एखादी कळी जणू त्या एकसारख्या कापलेल्या पानातून वर डोकवायची! दोन-तीन दिवसात फुलायची! लालभडक ….पहिलं फुल देवाला घातलंस. आता माझा विस्तार आणि वंशावळ वाढलीय! हळूहळू करत लहान मोठ्या भरपूर कळ्या वर डोकावू लागल्या. आपलं आकाश शोधू लागल्या!

तुझ्या मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर नाजूक उपदेश देताना पाहिलय मी! माझ्या अपत्यानाही  मी हलकेच गोंजारत तसे उपदेश देऊ लागले. कोवळ्या कळ्यांच्या वरील आवरणाच्या हिरवळीतून हलकेच उठून दिसणारा त्यांचा आतला लालसर रंग! त्या कळीच सौंदर्य अधिकच वाढवत असे. कळीच फुल होतानाच तीच सौन्दर्य आणि टप्पे काय वर्णू! मला वाटत होतं माझीच दृष्ट लागेल की काय ह्या माझ्याच बाळांना. 

लालभडक फुलं हसताना…मी समाधानी होत असे ! खूप फुलं फुलू लागली…लाल पताक्यांसारखी उंच हलु लागली आणि आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवू लागली. 

अशातच…तू एकदा पाहिलंस, शेजारच्या,रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी लाल फुल तोडायला सुरुवात केली. तुला कसतरी वाटायचं.. इतकं देखणं झाड आपलं आहे, फक्त आपलं आणि इतर लोकं याची फुल तोडतात. पण तू एकदा माझ्याशी गप्पा मारताना हे बोलून दाखवलस आणि मला आणि स्वतःलाही समजावलस की आपला काय आणि लोकांचा काय… देव एकच! त्या देवाच्याच चरणी जातील ही फुल! ह्या विचाराने तू थोडी शांत झालीस आणि मीही.

पण तुला सांगावं की नाही? न राहवून सांगते आता…आताशा, आजूबाजूचे लोक, रस्त्यावरचे लोक कळ्याच काढून न्हेत आहेत. अगदी ओरबाडून, काठीला आकडा लावून, उड्या मारून फांद्या तोडून मुक्या कळ्या तोडत आहेत ग. माझ्याच न फुललेल्या बाळांची ही अवस्था…लोक जवळ आले तरी पोटात गोळा येतो आता…माझ्यापासून माझ्या तारुण्याचा उंबरठा ओलांडत असलेल्या माझ्या पोटच्या कळ्यांची ही अवस्था बघवत नाही मला…त्यांचा रंग आता कुठे खुलणार असतो…त्यांना पूर्ण आकारणार  असतात…पण, त्यांच्या अवयवांचा रेखीवपणा आहे त्या अवस्थेत ओरबाडून घेऊन, स्वतःच्या घरात नेऊन ठेऊन, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवाला वाहण्यात काय आनंद मिळतो त्यांना ? आणि कोणत्याही देवाला हे आवडेल का? एकीकडे म्हणतात, निसर्ग ही देवता आहे म्हणतात ना, मग आम्हाला त्रास देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त देवाच नाव घेऊन समाधान का मानतात? आमचं समाधान त्यांनी जाणलेय कधी?

माझं रडू, माझं रक्त नाही दिसत त्यांना…माझ्या भावना नाही समजू शकत ते…आईपासून त्यांना अकाली पोरकं करणं…संवेदनाहीन झालीत का ही माणसं?

पोटच्या गोळ्याला गर्भातच खुडणारी माणसं ऐकली होती.. अत्याचार करून ‘ती’ ला संपवणारी माणसं ऐकली होती. पण आता आमच्याही तरुण कलीका अशा खुडून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांचं जगणं संपवणारे..रांगोळ्या घालण्यासाठी एकेक पाकळी वेगळी करणारे…आम्हाला ओरबडणारे…तुम्ही ‘नराधम’ म्हणता तुमच्या भाषेत अशा लोकांना,  मी काय म्हणू?

सगळेच तुझ्यासारखे दुसऱ्याचं काळीज जाणारे नसतात ग! “

मी : पाणावल्या डोळ्यांनी निशब्द…

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments