सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆ 

(पण म्हणावी तशी त्याची प्रगती होत नव्हती हातापायांची सहज हालचाल, कुशीवर वळणं, बसणं, कोणी बोललं तर हुंकार, प्रतिसाद देणं हे घडत नव्हतं.) — इथून पुढे —

त्याला पेज, खिमट असं भरवताना बऱ्याचदा ते बाहेर सांडतं, म्हणजे त्याला ते नीटपणे गिळता येत नाही, त्याची लाळ इतरही वेळा गळत असते, असंही करूणानं केलेल्या नोंदीत लिहिलं होतं. 

ही सगळी लक्षणं गंभीर होती. डाॅक्टरांनी त्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितल्या. MRI आणि इतर मनोवैज्ञानिक चाचण्यांनंतर cerebral palsy with multiple disorders म्हणजेच मेंदूचा पक्षाघात आणि बहुविकलांगता असं निदान झालं.

सुयशचा IQ – भावनिक बुद्ध्यांक ३० पेक्षा कमी होता. त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विकास होऊ शकत नव्हता. तो कायम परावलंबीच राहणार होता. आपल्या नैसर्गिक विधींवरही त्याचं नियंत्रण राहणं कठीण होतं. 

सुवर्णा आणि सुशीलवर हा फार मोठा आघात होता. सुवर्णाला तर नैराश्याचा झटका आला. त्यासाठी तिला मानसोपचार आणि औषधांची मदत घ्यावी लागली. पुढचे सहा महिने ती रजेवरच होती. हळूहळू ती या धक्क्यातून बाहेर आली. नंतर तिच्यावर ओढवलेल्या एकंदर परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करून, तिला बँकेच्या घाटकोपर येथील शाखेत बदली देण्यात आली.  

सुशीलने ही परिस्थिती खूपच संयमाने हाताळली. या सगळ्या घडामोडींच्या काळात करूणाने सुयशची खूप व्यवस्थित काळजी घेतली. ती त्याचं सर्व काही अगदी निगुतीने करत राहिली. शिवाय घरकामाची जबाबदारीही सांभाळत होती. 

काळ पुढे सरकत राहिला. यमुनाबाईंच्या खटपटीमुळे करूणाचं परत लग्न ठरलं. तिचा होणारा नवरा आणि सासू सायनला राहात होते. आतापर्यंत करूणाचा मुक्काम सुवर्णाच्या घरी होता. पण लग्नानंतर तिला इथे राहणं शक्य नव्हतं. सकाळी लवकर येऊन, संध्याकाळी सातनंतर घरी जायची तयारी तिनं दर्शवली. गरज पडली तर एखाद्या दिवशी उशिरापर्यंत ती थांबणार होती. सायन तसं फार लांब नव्हतं.तिचा नवरा टॅक्सी ड्रायव्हर होता, त्यामुळे येण्या-जाण्याची सोय होती. तिच्या सासरच्यांनीही हे मान्य केलं. करूणाला जेवण-खाण्याशिवाय महिन्याला दहा हजार मिळत होते, हेही त्यांच्या होकाराचं एक कारण होतंच.

सुयशला आणि सुशील- सुवर्णालाही करूणावर अवलंबून राहायची सवय झाली होती. सुयश आता या तिघांचा स्पर्श ओळखत होता. आपली रोजची अंघोळ वगैरे नित्यकर्म या तिघांकडूनच  शांतपणे करून घ्यायला लागला होता. इतर कोणाला मात्र तो जवळपास फिरकू देत नसे. कोणी तसा प्रयत्न केलाच तर आरडाओरडा करून घर डोक्यावर घ्यायचा तो. त्याच्यासाठी चारीकडून उंच कडा असलेला खास बेड बनवून घेतला होता. त्यावरच खेळत काहीतरी करत बसायचा तो. 

करूणाचा सुयशवर जीव होता. तिचंच बाळ होता जणू. त्याच्या कलानं घेत ती त्याचं सगळं करायची. त्याला स्वच्छ ठेवणं, जेऊ घालणं, व्हीलचेअरवर घालून फिरवणं, त्याच्याशी सतत बोलत राहणं सारंच ती ममतेनं करत होती. त्याच्या हावभावांवरून, अस्पष्ट ओरडण्यावरून त्याला काय हवंय, काय होतंय, हे तिला बरोब्बर कळायचं. एक अबोल सांकेतिक भाषा तयार झाली होती त्यांच्यात. 

बारा वर्षे उलटली. त्या दरम्यान करूणाला दोन मुलंही झाली. एक मुलगा आणि मुलगी, तिची सासू दिवसभर नातवंडांची देखभाल करत होती. मुलं शाळेत शिकत होती. नवरा निर्व्यसनी होता, त्यामुळे करूणाचा संसार सुखाचा होता. 

एक दिवस अचानक सुयशला फीट आली. अंगही तापलं होतं त्याचं! करूणानं फोन करून सुवर्णाला सांगितलं आणि टॅक्सी घेऊन नवऱ्याला बोलावलं. मग तिघेजण सुयशला घेऊन घाटकोपरच्या हाॅस्पिटलमध्ये गेली. तिथे ़सुयशचा उपचार होण्यासारखा नाही, त्याला परेलला लहान मुलांच्या हाॅस्पिटलमध्ये न्यायला तिथल्या डाॅक्टरांनी सांगितलं. त्याप्रमाणे हे तिकडे गेले आणि सुशीलला फोन करून  तिकडेच यायला सांगितलं. परेलला सुयशला अ‍ॅडमिट करून घेतलं.तो कोमात गेला होता. पंधरवडाभर त्याच्यावर उपचार चालू होते. पण उपयोग झाला नाही. सुयश वाचला नाही. 

कामतांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. कसंही असलं तरी आपलं मूल आई-बापांना प्यारंच असतं. करूणालाही आपलं मूल गमावल्यागत दुःख झालं. त्याच्या जन्मापासून त्याला  सांभाळलं होतं तिनं! नियतीपुढे माणसाचं काही चालत नाही हेच खरं! 

त्याच आठवड्यात सुशीलचं प्रमोशन झालं. त्याला दोन वर्षे फ्रान्सला राहावं लागणार होतं. सुयशच्या जाण्यानं सुवर्णा आणि सुशील सैरभैर झाले होते. त्यामुळे त्यानं हे पोस्टिंग स्वीकारून सुवर्णासह फ्रान्सला जावं, असं सगळ्या आप्तेष्टांना वाटत होतं. नव्या ठिकाणी दुःखाचा थोडा विसर पडेल हा विचार होता. दोन महिन्यांनंतर फ्रान्सला जाॅईन व्हायचं होतं. सुवर्णाची नोकरी तेवीस वर्षे झाली होती. तिला पेंशन मिळणार होती. तिने स्वेच्छा निवृत्ती घेऊन सुशीलसोबत जायचं ठरवलं. तोपर्यंत करूणा त्यांच्याकडे कामाला येणार होती. घाटकोपरच्या फ्लॅटचा विक्रीचा व्यवहार त्यांनी पूर्ण केला होता. 

सर्व सोपस्कार पूर्ण झाले, चार दिवसांनी ती दोघं फ्रान्सला प्रयाण करणार होती. त्याआधी सुवर्णा आणि सुशीलने करूणाचा पगार चुकता केला. तिच्या मदतीचं मोल पैशात होणार नव्हतंच. फूल ना फुलाची पाकळी म्हणून, त्यांनी तिच्यासाठी एकरकमी पाच लाख रुपये गुंतवून आयुर्विम्याची पेंशन पाॅलिसी घेतली. त्यायोगे तिला आयुष्यभर दरमहा २१००रूपये मिळणार होते आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसाला पाच लाख रूपये एकरकमी मिळणार होते. ती पाॅलिसी त्यांनी करूणाच्या हवाली केली. 

निरोप घेताना करूणाला आणि त्या दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. सुयश सोबत काढलेले फोटो करूणानं सुवर्णाकडे मागून घेतले होते. तिचा पाय या घरातून निघत नव्हता, पण आता जायला हवे होते. एवढ्यात सुशीलचा फोन वाजला. बोलता बोलता त्याने हाताने खूण करून करूणाला थांबायची खूण केली. 

फोन परेलच्या लहान मुलांच्या हाॅस्पिटलमधून होता. त्या हाॅस्पिटलमध्ये दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी एक विशेष विभाग उघडण्यात येणार होता. त्यांना अशा मुलांना सांभाळण्याचा अनुभव असलेली मदतनीस हवी होती. सुयश तिथे अ‍ॅडमिट असताना तिथल्या डाॅक्टरांनी करूणाला बघितलं होतं, ती किती आस्थेवाईकपणे आणि निगुतीनं त्याचं सगळं करत होती. 

परेलचं हाॅस्पिटल खूप मोठं आणि नामांकित होतं. करूणाला चांगला पगार आणि इतर सवलती व लाभही मिळणार होते. तिची तयारी असेल तर येत्या एक तारखेपासून तिची नियुक्ती तिथे केली जाणार होती. आर्थिक दृष्ट्या तिची चांगली सोय होईल याचं सुवर्णा आणि सुशीलला समाधान वाटत होतं. सुयशचा फोटो छातीशी धरून ओक्साबोक्शी रडणार्‍या करूणाला मात्र आजवर सगळं आपल्याला सुयशमुळेच मिळालं आणि तो गेल्यावरही हे मिळतंय याची जाणीव तीव्रतेने होत होती. सुयश बाळाच्या या ऋणातून ती कशी मुक्त होणार होती? 

— समाप्त — 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments