सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆ 

सुवर्णा आणि सुशील कामत एक उच्च विद्या विभूषित आनंदी जोडपं. सुवर्णा बँकेत अधिकारी पदावर आणि सुशील एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी. तीनच वर्षांपूर्वी लग्न होऊन मुंबईच्या उपनगरात त्यांनी संसार थाटला होता. आणि आता त्यांच्या घरात लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन होणार होतं.

सुवर्णाची आई मुंबईतच होती. मागच्या वर्षी सुवर्णाच्या वडिलांचं निधन झाल्यापासून ती एकटीच राहात होती. सुवर्णा आणि साधना या दोन्ही लेकींकडे अधून-मधून यायची राहायला. सुशीलचे आई-वडील गोव्यात स्थायिक होते. धाकटी बहीण लग्न होऊन बेंगलोरला आणि मोठा भाऊ सुहास अमेरिकेत होता.

सुवर्णाचं बाळंतपण करायला तिची आई आणि सासूबाई घाटकोपरच्या तिच्या घरी येऊन राहणार होत्या. पण त्या काही कायम तिथे राहणार नव्हत्या. ऑफिसमधून घरी यायला दोघांना उशीर व्हायचा. त्यामुळे बाळाला सांभाळायला आणि घरकामात सुवर्णाला मदत करायला कोणी मिळेल का याचा ते शोध घेत होते. त्यांच्याकडे झाडू-पोछा आणि भांडी घासायला येणाऱ्या यमुनाबाईंनापण सुवर्णानं तसं सांगून ठेवलं होतं.

रविवारी सकाळी कामाला आल्यावर यमुनाबाईं सुवर्णाला म्हणाल्या, “ताई, गावाकडं माझ्या बहिणीची लेक आहे बघा करूणा. १९-२० वर्षाची हाय. गुणाची हाय पोरगी, कामात बी हुशार हाय. मागल्या वर्षी लगीन झालं, पण नवरा दारूपिऊन लय मारहाण करायचा, म्हणून तीन महिन्यांत घरला परत आली बघा. आता माझी बहिण आणि मेवणं तर जिंदा न्हाई. भाऊ-भावजयीच्या संसारात या पोरीची अडगळच होते भावजयीला. तर ती यायला तयार हाय, तुमच्याकडं बाळाला सांभाळायला.

तुमाला चालणार असंल तर मी बोलावून घेते तिला. दोघांचीबी नड भागंल.”

सुवर्णाला तर कोणीतरी हवंच होतं मदतीला. तिला आता सातवा महिना लागला होता. सासूबाई पुढच्या महिन्यात येणार होत्या. तसं काही गरज लागली तर आई तासाभराच्या अंतरावर चेंबूरला होतीच. 

पुढच्याच आठवड्यात करूणा आली गावाहून. सावळ्या रंगाची करूणा चटपटीत आणि स्वच्छ होती. बारावीपर्यंत शिकलेली होती. सुवर्णाची जागा मोठी होती. दोन वन बीएचके  फ्लॅट जोडून घेतलेले होते, त्यामुळे एकूण सहा खोल्या होत्या आणि दोन स्वतंत्र टाॅयलेट! शिवाय दोन गॅलऱ्या होत्या. एका खोलीत करूणाची  व्यवस्था करता येणार होती. बाळ तीन महिन्याचं होईपर्यंत करूणानं सुवर्णाकडेच मुक्काम करायचा असं ठरलं होतं. मधल्या काळात यमुनाबाई तिच्यासाठी रहायला भाड्याने एखादी खोली मिळते का ते बघणार होत्या. 

आल्या दिवसापासून करूणानं कामाचा झपाटाच लावला. किचनची साफसफाई, पडदे-चादरींची धुलाई, घर आणखीनच चकाचक झालं. सुवर्णाला काय हवं-नको ते विचारून ती नाश्ता, जेवण बनवायला शिकली. नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. 

थोड्याच दिवसात सुवर्णाच्या सासूबाई आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली करूणाने डिंकलाडू, आलेपाक, सुपारी असे खास बाळंतिणीसाठीचे पदार्थही बनवले. सुवर्णाच्या आईला शिवणकाम येत होतं. पण आता मशीनवर काम करणं त्यांना जमत नव्हतं. करूणानं त्यांच्याकडे  शिवणकाम शिकायला सुरुवात केली. त्यांची मशीन सुवर्णाकडेच आणली. मग दोघींनी मिळून बाळासाठी दुपटी, झबली-टोपरी असे कपडे शिवून तयार ठेवले. नवीन काही शिकण्याचा करूणाचा उत्साह नावाजण्यासारखा होता. आणि ते पटकन शिकण्याइतकी ती हुशारही होती.

नऊ महिने आणि चार दिवस झाले आणि सुवर्णाला दवाखान्यात अ‍ॅडमिट करायची वेळ आली. पण कळा सुरू होऊन नंतर पूर्णच थांबल्या. इंजेक्शन देऊनही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळाच्या ह्रदयाचे ठोके अनियमित झाले होते. सोनोग्राफीमध्ये, नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेल्याचं दिसलं आणि मग सुवर्णाचं सिझेरियन करावं लागलं. 

बाळाचं वजन साडेपाच पाउंड/अडीच किलो होतं. जन्मल्यावर थोडावेळ ते रडलंच नाही म्हणून जरा टेंशन होतं. पण नंतर हळू आवाजात का होईना ते रडलं आणि सगळ्यांना हुश्श झालं. मुलगा झाला होता. सगळे आनंदात होते. सुशीलही पंधरा दिवस रजा घेऊन घरी होता. 

दहा दिवसांनी बाळ-बाळंतीण घरी आले. दोन्ही आज्या आणि करूणा त्यांच्या सरबराईत गुंतल्या. सव्वा महिन्यानंतर बारसं झालं आणि बाळाचं नाव सुयश ठेवलं. बाळाचं कोडकौतुक करण्यात दोन महिने कसे संपले ते कळलंच नाही. सुशीलचं ऑफिस सुरू होतं. सुवर्णाच्या सासूबाईंना आता गोव्याला परतायला हवं होतं. घर-बागायत सांभाळायला सासरे तिकडे एकटेच होते. बारशाला येऊन लगेच ते परत गेले होते. 

दुसऱ्या महिन्यात सुयशला ट्रिपलचं इंजेक्शन द्यायला हाॅस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा इंजेक्शन देणाऱ्या नर्सला काही तरी वेगळं जाणवलं. तिनं सुवर्णाला बाळाला लहान मुलांच्या डाॅक्टरांना एकदा दाखवून घ्या, असं सुचवलं. कारण काही सांगितलं नाही. पण सुवर्णानं काही फारसं मनावर घेतलं नाही. आजकाल सगळे कटप्रॅक्टिसचे प्रकार चालतात, तसंच हे असणार अशी तिची समजूत झाली. पण तीन महिने झाले तरी सुयश कोणाकडे बघून असं हसत नव्हता, आवाजाच्या दिशेने त्याची नजर फिरत नव्हती, हे एकदोनदा तिची आई आणि सासूबाईंनी देखील म्हटलं. मग मात्र सुवर्णा आणि सुशील त्याला लहान मुलांच्या डाॅक्टरांकडे दाखवायला घेऊन गेले. करूणाही त्यांच्या सोबत होतीच. 

डाॅक्टरांनी सुयशला तपासलं. त्यांनी दोघांना विशेषतः सुवर्णाला बरेच प्रश्न विचारले. गरोदरपणात ती कधी आजारी पडली होती का? कोणती औषधं घेतली होती यासाठी त्यांनी तिची फाईलही नीट बघितली. पण साध्या सर्दी-खोकल्याखेरीज सुवर्णाला काही झालं नव्हतं आणि त्यासाठी कोणतीही वेगळी औषधं तिनं घेतली नव्हती. 

बाळ जन्मल्यावर लगेच रडलं नव्हतं, त्याला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तसं झालं असावं, असं डाॅक्टर म्हणाले. त्याचं वजन तसं व्यवस्थित वाटत होतं. पण तो बराच वेळ झोपून राहतो, भुकेची वेळ टळून गेली तरी न रडता नुसता पडून राहतो, हे त्यांनी सुवर्णाकडे चौकशी केल्यावर, तिलाही जाणवलं. तरी अजून थोडे दिवस जाऊ द्या, काही मुलांची प्रगती उशिरा होते, असंच डाॅक्टर म्हणाले. पण त्याच्या रोजच्या भुकेची, झोपेच्या वेळेची नोंद ठेवायला त्यांनी सांगितलं आणि एक महिन्यानंतर परत दाखवायला घेऊन या म्हणाले. म्हणून दोन्ही आज्यांना कोणी काही सांगितलं नाही. सुवर्णाच्या सासूबाई गोव्याला परत गेल्या. सुवर्णाच्या भाच्याचा हात फ्रॅक्चर झाला, म्हणून आई तिच्या बहिणीकडे गोरेगावला गेली. 

आत्तापर्यंत बाळ फारसं त्रास देत नाही म्हणून आनंद वाटत होता, त्याची जागा आता काळजीनं घेतली. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व नोंदी ठेवण्याचं काम करूणा इतकं व्यवस्थित करत होती, की डाॅक्टरांनीही तिचं कौतुक केलं. पुढचे दोन-तीन महिने सुयशला नियमितपणे डाॅक्टरांकडे नेत होते. पण म्हणावी तशी त्याची प्रगती होत नव्हती हातापायांची सहज हालचाल, कुशीवर वळणं, बसणं, कोणी बोललं तर हुंकार, प्रतिसाद देणं हे घडत नव्हतं. 

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments