सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆ 

मोबाईल शाप की वरदान हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. अतिरेक झाला तर तो शाप ठरतो .पण सदूपयोग केला तर ते वरदानच असतं. नाशिकचे माजी सैनिक श्री. मेघश्याम सोनवणे सर, ह्यांच्या उत्तम उपक्रमाच्या कथा -विश्वात माझं पाऊल पडलं आणि व्हाट्सअपतर्फे अनेक हितचिंतकांच्या  ओळखी झाल्या. माणसे जोडण्याच्या छंदाला बळकटी आली. आणि माझ्यासाठी मोबाईल वरदानच ठरलं. माझ्या धाकट्या मुलानी  चि.प्रसादनी   मला  वाढदिवसाचा मोबाईल भेट दिला आणि माझ्यापुढे एक नवीन विश्व उभ केलं. ह्या विश्वात खूप चांगली माणसं मला भेटली.आणि मैत्रीचं नातं घट्ट झालं .

त्यातूनच भेट झाली रमेश साळुंखेची. माझ्या कथांवर त्याचं अभिप्रायाचं,प्रतिक्रियांचं आदान-प्रदान झालं. आणि एक दिवस त्याचा फोन आला ” ताई मला तुमच्याशी मोकळेपणी बोलावसं वाटतंय .तुम्ही बोलाल का माझ्याशी?” शब्दातला प्रामाणिकपणा, वाक्यातलं   आर्जव  आणि आवाजातलं मार्दव मनाला भिडल.कां कोण जाणे मनांत आलं काहीतरी संघर्षमय आहे, ह्या वयानी लहान असलेल्या  मुलांत . अशा ह्या आशावादी विचारांनी सम्राट असलेल्या तरुणाची आत्मकथा नक्कीच आदर्शवादी असेल असं मला वाटलं मी म्हणाले “रमेश अगदी खुल्या दिल्याने बोल.काही प्रॉब्लेम आहे का तुला?त्या स्वाभिमानी तरुणाचं रमेशचं  लगेच उत्तर आलं, ” नाही ताई प्रॉब्लेम होता. पण परमेश्वर, माझी आई सुभद्राई, माझे बाबा शिवाजीराव, माझे बंधू विक्रम आणि हितचिंतक यांच्यामुळे मी संघर्षाच्या परीक्षेत पास झालो.”  

त्याच्या बोलण्याने माझी उत्कंठा  शिगेला पोहोचली. आणि मी विचारलं, “आयुष्याच्या कुठल्या परीक्षेत  तु पास झालास? सविस्तर आणि खुल्या दिल्याने सांगशील का मला तु तुझी कहाणी ?   तुझा आदर्श मी नक्कीच जगापुढे मांडीन. मग निराश  तरुणांनाही  आशेचा किरण सापडेल. आणि तुझ्यामुळे त्यांना स्फूर्ती  मिळेल “…..  रमेशच्या आवाजात मोकळेपणा आला. त्याची कहाणी ऐकून मी  स्तंभित  झाले. परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य ह्या इतक्या लहान वयातल्या मुलामध्ये आलं कुठून ? त्यानीच सांगितलेली त्याची ही कहाणी काळजाला हात घालणारी आहे.

ता. खटाव जि.सातारा गिरीजाशंकरवाडी येथे रमेशचं बालपण गेलं. बालपण कसलं !  हसा खेळायच्या दिवसातच त्याला लढाई द्यावी लागली . कारण तो म्हणाला,” मी अपंग आहे “ 

खटाव तालुक्यातील पश्चिमेकडच शेवटच्या डोंगर माथ्यावर वसलेलं गांव म्हणजे रमेशचं जन्मगांव. चौथीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं.  वडील शिवाजीराव त्याचे  सारथी झाले. दैवाला दोष न देता रमेशच्या आई-वडिलांनी हे अवघड शिवधनुष्य पेललं.   शिवाजीरावांनी आणि त्या माऊलीने परिस्थितीवर मात करून आपल्या बाळाला वाढवलं. वडील रोज खांद्यावर बसवून आपल्या लेकराला शाळेत पोहोचवायचे. परिस्थितीशी सामना करण्याचं आयुष्याच्या शाळेतलं असे हे प्राथमिक शिक्षण घरातूनच रमेशला मिळालं होत. त्याच्या ह्या घरच्या  गुरूंना सादर प्रणाम.

रमेश पुढे म्हणाला,” मी चौथी पास झालो  खरा.,पण आता पुढे काय? पुढचं शिक्षण कसं घ्यायचं? हायस्कूल सहा कि. मी. लांब. रोज डोंगरावरून उतरून खाली  यायचं. पुन्हा डोंगर चढून घरचा परतीच्या प्रवास . पण तो करणार कसा? अक्राळ विक्राळ प्रश्नचिन्ह आ वासून समोर उभं होतं. शिक्षणाला पूर्णविराम द्यायची वेळ आली .. “ पण हा वाघाचा बच्चा लहान असूनही डगमगला नाही. मनात एकच विचार  शिक्षणाशिवाय आपल्याला गती नाही. आता थांबणे नाही. रमेशला त्रास होऊ नये म्हणून घरचे  कासाविस होऊन  त्याला विरोध करीत होते. पण म्हणतात ना, ‘आंधळ्याच्या गाई देव राखतो ‘ अगदी खरं आहे हे. कारण गावात सकाळी सातला दुधाची गाडी यायची . गाडीतली माणसं देवासारखी  मदतीला धावली. आणि त्यांच्या मदतीने रमेशचा हायस्कूल  प्रवास सुरू झाला.  रमेशच्या विस्तृत विचारांची कक्षा पाहून मी डोळे  विस्फारले.   

तो म्हणाला ” मला अपंगावर  मात करून पुढे जायचं होतं. त्यासाठी मनातल्या आशेची पावलं पुढे आणि पुढेच पडत होती. आई-वडिलांनी व इतरांनी पण खूप केलं माझ्यासाठी.  त्यांना त्रास न देता मला स्वावलंबनाचा मार्ग शोधायचा होता.  प्रयत्नांच्या अंतापर्यंतचा  आणि मनाच्या गाभाऱ्यात वसलेला परमेश्वर,मला प्रेरणा देत होता. आणि म्हणत होता ‘मी आहे  ना तुझ्या पाठीशी ! मी चालवीन तुला, आणि तुझ्या जिद्दीला, पुढे अन पुढे जाण्यासाठी.” आणि ह्या जिद्दीने दहावी ते  B. A. मुक्तविद्यापीठातून रमेश पास झाला. आणि मग  काय त्याच्या आशेला धुमारेच फुटले की हो !

भूतकाळात  डोकावतांना रमेश सांगू लागला, ” हायस्कूलच्या गावी जाताना दूध गाडीच्या लोकांचे माझ्यावर खूप खूप उपकार झाले आहेत. सकाळी सात वाजता दूध गाडी यायची. ते लोक मला गाडीत बसवायचे.  हायस्कूलची वेळ तर ११ ते ५:३० होती. पण  बरं का,राधिका ताई   माझी शाळा  मात्र सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत असायची. कारण सकाळी माझ्या गावाकडून मला आणणारी गाडी सातला सुटायची .आणि रात्री साडेनऊला परतायची. शाळा सुटल्यावर संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊ पर्यंत मी गाडीची प्रतीक्षा कऱीत बसून राहायचो. वाचन, होमवर्क, नोट्स काढणे यात वेळ  काढायचो. बसचा आवाज आला रे आला की आवराआवरीची धांदल उडायची माझी.” रमेश ची मिस्कील वृत्ती मला आवडली.

सत्कर्म करणाऱ्याला सत्पुरुष भेटतातच. माणसं मदतीला धावायची आणि बसमध्ये बसवायची. फार मोठ्ठ शिवधनुष्य पेललंय त्यानी. आणि तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणाची मशाल त्याच्या मनात धगधगत होतीच. पण आता तर पुढे आणखी खरी सत्वपरीक्षा होती. पुढची पायरी गाठण्यासाठी  25 की. मी.कराड गावी जाणं भाग होतं. हा तर मोठा संघर्ष ! पण डोंगराएवढे आव्हान त्याला तिळाएवढं वाटलं. ‘कुणालाही त्रास न देता आयुष्य जगायचय मला.  आनंदाने आहे त्या परिस्थितीत आनंद मानूनच जगायचं’  हे सूत्र, आणि ही उमेदच त्याचं अंतिम ध्येय होतं.आणि आजही आहे .आणि ते त्यानी जिद्दीने चिकाटीने गाठलं. 

आज रमेश साळुंखे, महाराष्ट्रात एकमेव असलेल्या अशा शास्त्रीय महाविद्यालयात कराड कॉलेजमध्ये नोकरीला आहे. गेली आठ वर्षे प्रामाणिकपणे तो आपली ड्युटी बजावतोय. .   कुठल्याही परिस्थितीत समाधान मानण्याचे बाळकडू आई-वडिलांनी त्याला लहानपणीच पाजलय. आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं कसब रमेशच्याही अंगात आहे. ह्याचे सगळे श्रेय, वडील शिवाजीराव आणि आई सुभद्रा यांनाच तो देतो. सुभद्रा नाव ऐकल्यावर, मला  महाभारतातील अर्जुन पत्नी व श्रीकृष्ण भगिनी,सुभद्रा आठवली. तिचा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहविद्या आईच्या गर्भातच शिकला. तसंच ह्या सुभद्रापुत्राने संघर्षातून उत्कर्ष गाठण्याची कला आईकडून, जन्माआधीच शिकून घेतली असावी नाही का? 

भावनाप्रधान रमेश म्हणतो, ” मला अभिमान नक्कीच आहे की, असे आई-वडील मला लाभले.. माझे ध्येय गाठण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने आपले पाय आणि मदतीचे हात मला पुरवलेत. रमेश गर्वाने सांगतोय, “आज मी घडलो आहे ते माझ्या घरच्यांमुळेच माझे वडील श्री शिवाजीराव  माझी आई सौ.सुभद्रा आणि भाऊ विक्रम यांचा माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मला वाढवलं. पुढील शिक्षणाचा त्यांचा नकार मायेपोटी  होता. मला त्रास होऊ नये म्हणून त्यांची तडफड,आणि माझ्यामुळे त्यांना म्हातारपणी त्रास होऊ नये म्हणून माझी धडपड.. या मायेतूनच मला प्रेरणा मिळाली. आणि आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्यांच्यापुढे मी कायम नतमस्तक आहे, आयुष्याच्या या लढाईत अनेक हितचिंतक मला मिळाले. त्यांचे आभार . जीवाला जीव देणारे  परममित्र श्री.गोरख रा, थोरवे, श्री सचिन भि.शेडगे ,आणि सागर भि शेडगे यांच्यासारखे अजूनही साथ देणारे जिवलग मित्र मला लाभले, या सगळ्यांच्या मी कायम ऋणात आहे.”

रमेश मनापासून बोलत होता.

तर मंडळी अशी आहे ही खंबीर  रमेश साळुंखे याची कथा. तुमच्या दृष्टीनेही ती स्फूर्तीदायक ठरेल.अशी आशा आहे.  सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय की, रमेशने यशाची परिसीमा आणि सुखाचा कळस गाठलाय . कारण त्याच्या आयुष्यात एका सौ.तेजस्वी नावाच्या गुणी मुलीने प्रवेश केला आहे.अर्थात                16 – 2 -2023  या शुभ दिनी त्याचे शुभमंगल झाले आहे .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Yadnyasen Joshi

👏👏👏