सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ मातृ वंदना☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

तारखेने 14 जानेवारी, संक्रांत हा माझ्या आईचा जन्मदिन! यावर्षी संक्रांत 15 जानेवारीला आहे म्हणून आज तिचे स्मरण करून वंदन करत आहे…

माझी आई 92 वर्षापर्यंत छान जगली. तिला कोणताही मोठा आजार नव्हता. दोन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने तिचे निधन झाले- जसे झाडावरून पिकलेले पान गळून पडावे तसे- आत्ता होती, म्हणेपर्यंत ती शांतपणाने गेली… नाही औषध, नाही हॉस्पिटल, काही नाही… ज्या घरात ती 40 वर्षे राहत होती, ज्या कॉटवर झोपत होती, तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला.. त्याही गोष्टीला आता दोन वर्षे होऊन गेली!

संक्रांत आणि आईचा वाढदिवस! या दोन्ही गोष्टी लहानपणापासूनच अपूर्वाईच्या वाटायच्या! मध्यमवर्गीय स्तरातील कुटुंब होते आमचे.. वडील सरकारी नोकरीत शिक्षण खात्यात होते. आई शिवणकाम करायची, शिवण क्लास घ्यायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आमच्या हौशीमौजी  करायची! त्यामुळे कष्टाचे, वेळेचे महत्व आमच्यावर बालपणापासूनच बिंबवले गेले होते तिच्या कर्तृत्वाने! ती कधी वायफळ गप्पा मारत वेळ घालवत नसे. तिच्या हातात सतत काही ना काही काम असे. संक्रांतीच्या दरम्यान तिच्याकडे खूप शिवणकाम असे, पण त्यातूनच वेळ काढून ती हलवा बनवणे, गुळपोळी करणे, तिळगुळ वड्या करणे, हळदीकुंकू करणे हे सगळं साग्रसंगीत करत असे. वाणासाठी वस्तू घेताना सुध्दा त्याची उपयोगिता आणि किंमत बघून  वस्तू घेतली जाई. तिच्याबरोबर बाजार करायला जाणे म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असे. वस्तूचा दर कमी करून घेणे, भाजीपाला घेताना तोही पारखून घेणे, आहे त्या परिस्थितीत कालमानानुसार आमच्यासाठी फळे, भाज्या घेणे, आणि त्यांचे महत्त्व सांगून खायला लावणे हे ती करत असे.रोज दूध देणे जरी परवडणारे नव्हते तरी आम्हाला ती चहा देत नसे. त्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवत असे. गव्हाच्या चिकाची, रव्याची,सातूच्या पिठाची ,

तर कधी तरी खारकेची! ज्यामुळे मुलांना पौष्टिक मिळेल याकडे तिचे लक्ष असे. काजू खायला मिळत नसे, पण शेंगदाणे, हरभरा डाळ रात्री भिजत घालणे आणि सकाळी ते खायला देणे, व्यायाम करायला लावणे यासाठी आई आणि वडिलांचे  लक्ष असे.

ती पूर्वीचे मॅट्रिक होती. तिचे इंग्लिश, अल्जेब्रा- जॉमेट्री, फिजिओलॉजी हायजिन हे विषय चांगले होते.  ती आमचा  अभ्यासही करून घेत असे. वडील एज्युकेशन डिपार्टमेंटला असल्याने महिन्यातील वीस दिवस फिरतीवर असत, त्यामुळे आईच आमच्याकडे सर्वांगीण लक्ष देत असे. अर्थातच वडिलांना घराची काळजी नसे.ती नऊवारी नेसत असे. तिच्याकडे मोजक्याच साड्या असत पण तिचे नेसणे, वापरणे अगदी व्यवस्थित असे.धुतलेल्या साडीची घडी सुद्धा इस्त्री केल्यासारखी नीट करत असे.

माझे लग्न झाल्यावरही ती मला वेळोवेळी मदत करत असे. माझ्यासमोर तिचा चांगला आदर्श असल्यामुळे मी मुलीचे, सुनेचे करताना तिच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला… तिचे बोलणे सुविचारांनी युक्त असे .म्हणींचा वापर सहजगत्या होत असे. चांगला विचार करायला तिने आम्हा भावंडांना शिकवले .आता मी वयाची सत्तरी गाठली तरी अजूनही तिची मला नेहमीच सोबत वाटते. काही संकट, अडचण आली की आत्ता आई असती तर तिने काय केले असते असा विचार आपोआपच मनात येतो. आई हा घरातील नंदादीप असतो, तो आपल्या मनात नेहमीच तेवत राहतो!  ती कायमच आपल्या सोबत असते..संक्रांतीला तिचा वाढदिवस आम्ही  आनंदात साजरा करत असू..

तिळगुळातील तिळाची उष्णता(ऊब), गुळाचा गोडवा आणि तुपाची स्निग्धता तिच्या स्वभावामध्ये उतरली होती. आईचा हा जन्मदिवस संक्रांत सणाला येत असल्याने माझ्या कायमच स्मरणात राहतो!

प्रत्येकालाच आपली आई ही प्रिय असते… तिचे स्मरण व्यक्त करावे म्हणून हा छोटासा लेख लिहिला आहे ! धन्यवाद !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments