डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य

(त्यांचा आशीर्वाद खरा ठरला. शंकराचार्यांना अद्वैत वेदांताचा प्रचार प्रसार करायला आणखी सोळा वर्षांचे आयुष्य मिळाले.) – इथून पुढे —

या सोळा वर्षांच्या काळात शंकराचार्यांनी संपुर्ण भारतभर भ्रमण केले. सहा दर्शनांपैकी वेगवेगळ्या विचारधारांना मानणाऱ्या विद्वानांशी त्यांनी शास्त्रार्थ केला. हे शास्त्रार्थ म्हणजे वादविवाद नव्हते. त्या काळी शास्त्रार्थात कोण बरोबर हे अजिबात महत्वाचे नसे. काय बरोबर आहे हे महत्वाचे असे. असे शास्त्रार्थ ऐकायला विद्वानांची प्रचंड गर्दी होई. या शास्त्रार्थाच्या माध्यमातून लोक आपल्या ज्ञानात भर घालत. शंकराचार्यांनी शास्त्रार्थ केलेल्या सर्व विद्वानांनी अद्वैत दर्शन हे श्रेष्ठ असल्याचे मान्य केले. अशा प्रकारे त्यांनी अद्वैत वेदांताला भारतभर प्रतिष्ठा मिळवून दिली. या सर्व शास्त्रार्थापैकी बिहारमधील महाज्ञानी पंडित मंडन मिश्रा आणि त्यांच्या पत्नीशी शंकराचार्यांचा झालेला शास्त्रार्थ अतिशय गाजला. मंडन मिश्रा मीमांसा आणि द्वैतवादाचे कट्टर समर्थक होते. मंडन मिश्रा आणि त्यांच्या पत्नी शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताने अतिशय प्रभावित झाले. दोघांनी शेवटी शंकराचार्यांचे शिष्यत्व स्वीकारले. यानंतर शंकराचार्यांचे नाव भारतभर झाले.

त्यांनी भारतभर केलेल्या प्रवासात धर्माचा दिग्विजय झाला. आपण सुरू केलेले धर्मकार्य पुढे असेच सतत चालू रहावे असे शंकराचार्यांची इच्छा झाली. म्हणून त्यांनी देशाच्या चार दिशांना चार पीठे निर्माण केली. दक्षिणेला कर्नाटकात शृंगेरीत शारदापीठ, पूर्वेला ओडिसात जगन्नाथपुरीला गोवर्धनपीठ, उत्तरेला बद्रीधामला जोतिर्मयपीठ आणि पश्चिमेला गुजरातमध्ये द्वारकेला द्वारकापीठ स्थापन केले. चार पीठांवर आपल्या चार प्रमुख शिष्यांना पिठाधिपती नेमले. या चार शिष्यांपैकी एक सुरेश्वर होते. हे सुरेश्वर दुसरे तिसरे कुणी नव्हते तर स्वतः मंडन मिश्रा होते. त्यांना शृंगेरीचे पीठाधिपती म्हणून नेमले गेले.

शंकराचार्यांची वयाची ३२ वर्षे पुर्ण होत आली होती. आपले जीवीतकार्य पूर्ण होत आल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. एव्हाना त्यांना टोकाचे वैराग्य प्राप्त झाले होते. आता ते केदारनाथला एका गुहेत सतत ध्यानस्थ असत. अशात एके दिवशी शंकराचार्य अचानक अंतर्धान पावले. त्यानंतर ते कुणालाही दिसले नाहीत.

शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय दर्शन शास्त्राविषयी थोडी माहिती घेऊ.

 

भारतीय दर्शनशास्राचे दोन प्रकार पडतात.

A) आस्तिक दर्शन

B) नास्तिक दर्शन

 

A) आस्तिक दर्शन हे वेदांना प्रमाण मानणारे दर्शनशास्र आहेत. त्यांचेही सहा प्रकार आहेत. दर्शनशास्रासमोर त्यांचे जनक लिहले आहेत.

१) सांख्य दर्शन – महर्षि कपिल

२) योग दर्शन – महर्षि पतांजली

३) मिमांसा / पुर्वमिमांसा दर्शन – महर्षि जैमिनी

४) न्याय दर्शन – महर्षि गौतम

५) वैशषिक दर्शन – महर्षि कणाद

६) वेदांत / उत्तर मिमांसा दर्शन – महर्षि व्यास

 

B) तीन नास्तिक दर्शन – वेदांना प्रमाण न मानणारे लोक दर्शनशास्त्रांना‘ नास्तिक दर्शन‘ म्हणतात. याचे तीन प्रमुख प्रकार आहेत.

१) बुद्ध दर्शन – गौतम बुद्ध

२) जैन दर्शन – महावीर

३) चार्वाक दर्शन / लोकायत दर्शन – ब्रहस्पती

 

आस्तिक दर्शनातील वेदांत दर्शनाचे पाच उपप्रकार आहेत.

१) द्वैत – मध्वाचार्य

२) अद्वैत – शंकराचार्य

३) विशिष्ट अद्वैत – रामानुजाचार्य

४) द्वैत अद्वैत – निम्बार्काचार्य

५) शुद्ध अद्वैत – वल्लभाचार्य

 

वेदांत दर्शनात तीन तत्वांच्या संबंधाबद्दल चर्चा केली आहे.

जगत – निर्जीव गोष्टी (शरीर / निर्जीव ब्रम्हांड) – जड – चालवले जाणारे

जीव – आत्मा – चैतन्यमय – चालवणारा

ब्रम्ह – ईश्वर – सच्चिदानंद परमेश्वर

१) द्वैत वेदांत दर्शन –

मध्वाचार्य –जीव, जगत आणि ब्रम्ह हे सगळे वेगळे वेगळे आहेत.

 २) अद्वैत वेदांत दर्शन –

शंकराचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह एकच आहेत. अविद्येमुळे माया निर्माण होते आणि मायेमुळे या तिघांमध्ये भेद असल्यासारखे वाटते.

 ३) विशिष्ट अद्वैत वेदांत दर्शन –

रामानुजाचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह हे एकच आहेत. पण मायेमुळे नव्हे तर ब्रह्मामध्ये स्वगत भेद (शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये भेद) असल्याने ते वेगळे वेगळे झाले आहेत. जीव आणि जगत ब्रह्मापासून जन्म घेतात.

४) द्वैताद्वैत / भेदाभेद वेदांत दर्शन –

निम्बार्काचार्य – जशी लाट आणि समुद्र वेगवेगळे आहेत आणि एक सुद्धा आहेत तसेच जीव, जगत आणि ब्रम्ह वेगवेगळेही आहेत आणि एक सुद्धा आहेत.

 ५) शुद्ध अद्वैत – वैष्णववाद –

वल्लभाचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह एकच आहेत. जीव आणि जगत हे सुद्धा केवळ ब्रम्ह आहेत. मायेमुळे जगत वेगळे वाटत असले तरी माया सुद्धा ब्रम्हाचाच भाग असल्याने ती सुद्धा ब्रम्हच आहे.

शंकराचार्यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन !

 – समाप्त – 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments