? इंद्रधनुष्य ?

☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी –  भाग-2 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी : …. नाना जगन्नाथ शंकरशेठ. 

आपण एतद्देशीय लोक जगन्नाथ शंकरशेठ यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण ज्ञानाचे बीज पेरण्यात ते अग्रेसर होते; इतकेच नव्हे तर सध्या त्याची जी जोमाने वाढ झाली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.

– दादाभाई नौरोजी

अन्य क्षेत्रातली नानांची कामगिरीही थक्क करणारी आहे. ‘ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग अँड विव्हिंग’ या मुंबई त सुरू झालेल्या पहिल्यावाहिल्या कापड गिरणीचे नाना प्रवर्तक डायरेक्टर होते. गुजरात व सिंधशी दळणवळणासाठी, सन १८४५ मध्ये त्यानी, ‘बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ स्थापन केली. ‘याग्रो हार्टिकल्चरल सोसायटी अॉफ वेस्टर्न इंडिया’, ‘जिअॉग्राफिकल सोसायटी’ आणि धान्य व्यापार्यांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी ‘जॉईंट स्टॉक ग्रेन कंपनी’ या महत्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेतही, त्यांचाच पुढाकार होता. तसेच १८४२ मध्ये स्थापन झालेल्या ‘बँक अॉफ वेस्टर्न इंडिया’चे ते प्रवर्तक संचालक होते. तर १८५७ मध्ये मुंबईत पहिले नाट्यगृहही बांधले ते नानांनीच.

नानांच्या कार्याची यादी इथेच संपत नाही. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी विहार लेकची निर्मिती तर त्यांनी केलीच, शिवाय पाणीटंचाईच्या काळात रेल्वेच्या डब्यांमधून पाणी आणून, ते विहीरी व तळ्यांमध्ये ओतण्याची व्यवस्थाही त्यांनी करविली.

मुंबईच्या रस्त्यांवर खोबरेल तेलाचे दिवे लावले जात. पण त्यांच्या अपु-या प्रकाशामुळे लोकांची गैरसोय होई, नि चोरचिलट्यांचं फावत असे. इंग्लंडमध्ये रस्त्यांवर ग्यासचे दिवे लावले जातात, ही गोष्ट कानावर येताच नानांनी, तशा प्रकारच्या दिवाबत्तीच्या सोयीसाठी, चिंचपोकळीला ग्यास कंपनी सुरू केली.मॉरिशसहून ऊसाचं बेणं आणून त्यांनी आपल्या बागेत त्याची लागवड केली.

अशा सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांचं जाळं नानांनी मुंबईत विणलं. त्यामुळेच आज मुंबईला आर्थिक राजधानीचा व आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महात्म्यामुळेच मुंबई ही प्रत्येक मराठी माणसाची स्वप्ननगरी बनली. आयुष्यात एकदा तरी या स्वप्ननगरीला भेट दिल्याशिवाय, त्याला आपलं जीवन असार्थक वाटू लागलं. त्यातूनच ‘जीवाची मुंबई करणे’ हा वाक्प्रचार रुढ झाला. मुंबईवर कवणं रचली गेली. अण्णाभाऊ साठेंनी मुंबईची लावणी लिहीली. तर हिंदी चित्रपटातही मुंबईवर अनेक गीतं लिहीली गेली. ती गाजली, लोकप्रिय झाली.

आज आम्ही ‘आमची मुंबई, आमची मुंबई’ असं अभिमानाने म्हणतो. पण त्यातून मंबईविषयीचं प्रेम कमी, आणि प्रांतिक अस्मिताच अधिक डोकावते. डोकवे का ना, पण मग मुंबईच्या विकासातही आमचा सहभाग असला पाहिजे, तरच आमची मुंबई म्हणण्याला अर्थ आहे. ज्या निर्जन मुंबईत एकेकाळी लोकांना यायची भीती वाटायची, त्या मुंबईचं नानांनी आपल्या परिसस्पर्शाने सोनं केलं. त्या सोन्याच्या मुंबईची आम्ही बकाल मुंबई करुन टाकली आहे.

सतीप्रथाबंदीसाठी राजा राममोहन राय यांच्यासोबत पुढाकार घेऊन नानांनी, नऊ वर्षे लढा दिला व सतीप्रथा प्रतिबंधक कायदा करवून घेतला. सतीबंदीसाठीच्या त्यांच्या कार्याची गव्हर्नर जॉन माल्कम यांनी मुक्त कंठाने स्तुती केली. नानांच्या लोकप्रियतेने प्रभावित झालेल्या सर फ्रेडरिक लिओपोल्ड यांनी आपल्या मुलाचं नाव ‘लिओनार्ड रॉबर्ट शंकरशेठ’ असं ठेवलं होतं.

सरकार दरबारी नानांच्या उत्तरोत्तर वाढत्या प्रभावामुळे, पोटशूळ उठलेल्या नानांच्या हितशत्रूंनी, नानांवर १८५७ च्या उठावकर्त्यांना अर्थसहाय्य केल्याचे व आपल्या धर्मशाळेत त्यांना आश्रय दिल्याची बालंटं आणून, नानांच्या नावे पकडवॉरंट जारी करायला सरकारला भाग पाडले होते. पण हितशत्रुंचे हे कट नानांनी उधळून लावले.

ज्या काळात भारताच्या राजकिय, सामाजिक व औद्योगिक क्षितिजावर समस्त राष्ट्रीय नेत्यांचा, संस्था-संघटनांचा, उद्योजकांचा उदयही झाला नव्हता, त्या घनतमी, नाना जगन्नाथ शंकरशेठ हा शुक्रतारा, आपल्या तेजाने तळपत होता. म्हणूनच त्यांचे एक चरित्रलेखक डॉ. माधव पोतदार हे नानांना, ‘आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रपुरुष’ संबोधतात, तर नानांच्या जीवनावर “प्रारंभ” ही कादंबरी लिहीणारे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ, नानांचा ‘आधुनिक भारताचा आद्य शिल्पकार’ असा सार्थ गौरव करतात. व्यक्तिगत पातळीवर नानांच्या कार्याचं महत्त्व जाणणारे अनेक आहेत. परंतु शासकीय पातळीवर मात्र नानांचं ऋण जाणणारा नि त्यातून उतराई होणारा कोणी नाही.

ज्यांचा शासनाने ‘भारतरत्न’ किताबाने गौरव केला पाहिजे, असे नाना जगन्नाथ शंकरशेठ उपेक्षेचे धनी ठरले आहेत. कारण नानांच्यामागे ना मतपेटीवर प्रभाव टाकू शकणारं ‘सामाजिक पाठबळ’ आहे, ना पुरस्कारासाठी आराडाओरडा करणारी ‘शाऊटिंग बटालियन’ आहे. परिणामी मुंबईवर जीवापाड प्रेम करणारा हा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईतही उपेक्षित आहे. मुंबईच्या विकासासाठी जातीनिरपेक्ष भावनेने, सढळ हातांनी आर्थिक मदत व भूमीदान करणा-या नानांच्या स्मारकासाठी मात्र मुंबईत जागा नाही, एवढी मुंबई कृपण नि कृतघ्न झाली आहे. हे पाहून नानांच्या आत्म्याला काय वाटत असेल…..

 डूबे हुओं को हमने बिठाया था,अपनी कश्ती में यारों।

और फिर कश्ती का बोझ कहकर, हमें ही उतारा गया॥

 हल्लीचे नेते राजकीय लाभाच्या शक्यतेखेरीज, कुणाचीच तळी उचलत नाहीत. आणि त्यांच्या राजकीय लाभाच्या गणितात, नाना मात्र नापास आहेत. शासनाची ही उदासिनता आणि ज्या दैवज्ञ सोनार जातीत नाना जन्माला आले, त्या ज्ञातीबांधवांची आत्ममग्नता खरोखर वेदनादायी आहे.

 सध्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करण्याचा धंदा जोरात सुरु आहे. ही मंडळी मुलांसमोर देशीविदेशी उद्योजकांचे आदर्श उभे करते, पण त्यांच्या आदर्शांच्या दोनशे वर्षं आधी, नाना जगन्नाथ शंकरशेट नामक, ‘फर्स्ट इंडियन आयकॉन’ होऊन गेला, हे त्यांच्या गावीही नाही. तर शालेय पाठ्यपुस्तक मंडळालाही त्याचं विस्मरण झालं आहे. इतकी प्रचंड अनास्था या युगपुरुषाच्या वाट्याला आली आहे. याला काय म्हणायचं.! वैचारिक दिवाळखोरी की भावी महासत्तेची मस्ती..! अपूज्यांची पूजा नि पूज्यांची अवहेलना करुन, भारत महासत्ता बनेल असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांचा ‘बनेलपणा’आहे, माझं अस्वस्थ मन मात्र म्हणते आहे.

या दिल की सूनो दुनियावालो,

या मुझको अभी चूप रहने दो।

मैं ग़म को खुशी कैसे कह दूं,

जो कहते हैं उनको कहने दो॥

समाप्त

लेखक : -सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments