डॉ. जयंत गुजराती

??

☆ डाह्याकाका ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

खरंतर डाह्याकाका हे माझे सख्खे काका नव्हते. सुरतेला माझ्या मावस भाऊबहिणींचे ते काका होते. माझ्या मावशीचे दीर. आम्ही लहानपणी सुट्टीत मावशीकडे जाऊन रहायचो. मग ते आमचेही काका झाले. छोट्या चणीचे. थोडेसेच जाडगेलेसे, विशेषतः त्यांचा खालचा ओठ खूपच जाड. फारसे चपळ नसलेले त्याला कारण होतं, दुर्दैवाने ते थोडेसे मंदबुद्धी होते. याचा अर्थ त्यांना कळत नसे असं नाही. सगळं कळत असे. पण स्वतःची हुशारी कमी. कोण्या विद्वानाने त्यांचं नाव डाह्याकाका ठेवलं होतं कुणास ठाऊक!! डाह्यो म्हणजे गुजरातीत शहाणा. डाह्यो मारो छोकरो वा डाही मारी छोकरी हे म्हटलं जातं, शहाणं माझं बाळ या अर्थाने. मात्र डाह्याकाकांना ते चपखल बसत नव्हतं. त्यांचं खरं नाव हसमुखराय होतं. ते मात्र त्यांना शोभून दिसणारं. ते सदा हसतमुख असायचे. इतकं चांगलं नाव असूनही सगळे त्यांना डाह्याकाकाच म्हणायचे. 

सुरतेला मावश्यांकडे भिक्षुकी होती. खत्री (क्षत्रियो) जातीचे ते गुरूजी लागत. बहुतेक तालेवार घराणी. कुणाची कापडाची मिल, कुणाचा मसाल्याचा व्यापार. व्यापार उदीम बरोबर नोकरी वा छोटेमोठे धंदे करणारे सर्वसामान्य ही खूप. सगळे देवभोळे. साधी घराच्या खिडकीची चौकट बदलायची असेल तरी त्यांना ग्रह नक्षत्र, मुहूर्त लागायचा. माहेरी चार दिवस रहायला आलेल्या मुलीला सासरी  पाठवायची असेल तरी गुरूजींना विचारायला यायचे की कोणत्या दिवशी पाठवू. मग मावशे म्हणायचे, की, तुला मुलगी जड झालीय का?राहू दे दोन दिवस अधिक, परवाचा मुहूर्त चांगला आहे तेव्हा पाठव. यजमान त्यालाही मान डोलवायचे.पत्रिका बघणे व त्यातून यजमानांची कामे मार्गी लावणे. हा व्यवसाय. म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात. मात्र खत्री समाजात लग्नाच्या गाठी मात्र मावशेच पत्रिकेवरून लावून द्यायचे.  एक आषाढ महिना सोडला तर मावशेंना कामाची धामधूम असायची सदैव. कुणाकडे सत्यनारायण वा चंडीपाठ, कुणाकडे वास्तुशांती, क्रियाकर्म, लग्नसराईत तर एका दिवसात चौदा चौदा लग्न लावलेली मी पाहिली आहेत. महिना दीड महिन्यात तर शेकड्यांनी. मग दीडेक वर्षात तिच मंडळी परत यायची. मुलगी वा सुनेचं खोळा भरण कार्यक्रमासाठी. मग मावश्यांना आठवायचं. ह्यांच्याकडे मुलगी दिलीय तेच ना. मग सासर माहेर दोन्ही घरांकडून दक्षिणा मिळायची. भिक्षुकी म्हटली की पूजापाठ  झाले की घरी यायचा तो शिधा. त्यात सप्तधान्य, गुळ खोबरं, साजूक तूप, सुकामेवा यांच्या झोळ्या असायच्या.  फळफळावळ, मिठाईचे बॉक्स वेगळे. मग डाह्याकाकांकडे या झोळ्या सुट्या करून त्यातील सामान व्यवस्थित डब्यांमधे भरणे हा उद्योग असायचा. कधीकधी तर त्यांना ते करताना दिवस पुरायचा.  शिधा सुटा करताना त्यात गुप्त दान म्हणून सुटे पैसे असायचे. ते मात्र डाह्याकाका खिशात घालायचे. हे सर्वांना ठाऊक होतं. मग ते त्या पैशांतून दाढी, कटिंग करून घ्यायचे. ते नेहेमी क्लीन शेव करूनच यायचे. शिधा सुटा करताना सुकामेव्यातील, काजू बदाम, बेदाणे थोडेफार फस्तही करत. मिठाई वरही ताव मारत. सगळे त्याकडे काणाडोळा करत. बऱ्याच वेळा त्यावरून कसं पकडलं वगैरे चेष्टा करत मग हसमुखराय छानपैकी हसत. 

माझे मावसभाऊबहिणी, चार भावंडं, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळूनच मोठे झालेत. त्यांना तर त्यांचा विशेष लळा होता व आदराचे स्थानही. दिवसातून कुणी ना कुणी सारखं त्यांची दखल घ्यायचं. डाह्याकाकांना तितकंच बरं वाटे. ते फारसं कधी बोलत नसे. आपण काही विचारलं तर पच म्हणजे हो, वा पचपच म्हणजे नाही. असं मोजकंच बोलणं होई. मात्र घरात सगळे एकत्र बसून चर्चा करत असतील तर लक्षपूर्वक ऐकत व मधून एखादं वाक्य बोलून जात. ते तितकं महत्वाचं नसायचं पण आपली उपस्थिती नोंदवायची त्यांची तऱ्हा होती. काम नसलं की ते ओट्यावर जाऊन बसायचे. ओटा पुरूषभर ऊंच होता. त्यावरून ते वाहती वर्दळ बघत बसायचे. आपण अवचित गेलो की छानपैकी हसून स्वागत करायचे. 

डाह्याकाकांकडे देवपूजेचा मान होता. सकाळीस आंघोळ झाली की गंध उगाळून देवपूजेला बसायचे. मावशीकडे देवघर मोठे असलेले. फळ्यांची चढणच. त्यावर तितकेच देव. ते सर्व देव ताम्हणात घेऊन त्यांना आंघोळ घालून, स्वच्छ पुसून, गंध हळदीकुंकू लावून फळ्यांवर ठेवायची. मग फुलं वाहून, धूप, दीप, आरती गुळखोबरं फळं याचा नैवेद्य सगळं साग्रसंगीत करायचे.  सर्वात वरच्या फळीवर, गणपती, देवी व लंगडा बाळकृष्णाचा मान. बहुतेकदा ते रंगनाथ वर ठेवताना गडगडून खाली यायचा. मग मावशे म्हणायचे, बघ देवाला आज तुझ्या बरोबर खेळायचंय त्यावरही हसमुखराय हसायचे. 

डाह्याकाका व मावशीचं एक अनोखं नातं होतं. ते दीर असले तरी मावशींनी त्यांना आपलं मुलच मानलं होतं. ती नेहेमी त्यांना जपायची. त्यांना लागलं खुपलं ते लगेच द्यायची. डाह्याभई अशी हाक मारली की डाह्याकाका कुठेही असले तर लगेच हजर व्हायचे. मावशीचं, घरातलं कोणतंही काम विनातक्रार करायचे. पण ते सांगकामे नव्हते. मावशींनी त्यांचा तेवढा आब राखला होता. घरात काही चांगला पदार्थ बनवला तर तो चाखण्याचा मान डाह्याकाकांचा असायचा. जेवण वाढतानाही मावशी त्यांच्या पोळीवर जास्त तूप लावून द्यायची. ते त्यांच्या लक्षात यायचं. तितकेच ते खुश होऊन जायचे. 

डाह्याकाकांनी कधीच काही मागण्या केल्या नाहीत ना कुठलाही हट्ट. कापडचोपड यजमानांकडून यायचं त्यातून सदरा व लेंघा शिवून घ्यायचे. गरजा कमीच. चार गोड शब्द बोलले की गडी खुश. चार भिंतीमधलं आयुष्य ते आनंदाने जगले. भाचे मंडळींनी देवदर्शनाला वा बागेत नेले तर जायचे. वर्षातून एकदा लांब आजोळी महिनाभर राहून यायचे. तेव्हा ताप्ती रेल्वेलाईनची मजा अनुभवायचे. असं सगळं असलं तरी त्यांना रागलोभ ही होताच. कधी काही मनाप्रमाणे नाही झालं की रूसायचे. मग एका कोपऱ्यात बसून राहायचे. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच डोळे पुसायचे. हे मावशीच्या लक्षात यायचे. मग त्या, “ काय डाह्याभई? ” म्हटलं की घळाघळा रडायचे पण ते तेवढ्यापुरतंच. मग आभाळभर हसायचे. २००५साली सुरतेत तापीला महापूर आला होता. मोठं नुकसान झालं. बरीच रोगराई पसरून बरीच माणसं मेली होती. डाह्याकाका वार्धक्यामुळे वारले तर त्यांना सोवळ्यात नेले होते. खांदेकरी ही सोवळ्यात. स्मशानात बरीच गर्दी होती. डाह्याकाकांना नेलं तेव्हा सगळी गर्दी बाजूला झाली. ब्राह्मणाचं आलेलं दिसतंय म्हणत. स्मशानातही त्यांना मान मिळाला. असं मानाचं जगणं जगले व गेले तेही मानाने. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments