श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “तिळगूळ घ्या…अन…” ☆ श्री मंगेश मधुकर

“तिळगूळ घ्या….”

“नमस्कार” हऱ्यानं हात जोडले.

“हाय” उजव्या हाताचा पंजा हलवत नाऱ्यानं प्रतिसाद दिला.  

“आज एकदम इंग्लिश”

“आपलं असंच असतं”

“रात्रीची उतरली नाही वाटतं”

“काहीही समज.फरक पडत नाही.”

“तिळगूळ घ्या ..”हऱ्या

“पुढचं नको”

“का?”

“मी नेहमीच गोड बोलतो.”

“ते माहितीये.आधी काय म्हणतोय ते ऐकून तर घे”

“बरं,बोल” 

“तिळगूळ घ्या अन खरं बोला.”

“हे अवघड आहे. त्यापेक्षा तिळगूळ परत घे .”

“सपशेल माघार”

“तुझी अपेक्षाच चुकीची आहे”

“काहीही काय”हऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?

“बाकी काहीही सांग पण खरं बोलायचं म्हणजे.. नको रे बाबा” 

“एवढं अवघड आहे.”

“अवघड नव्हे अशक्य”

“का?”

“खरं बोला.तुला सांगायला काय जातं पण बोललेलं समोरच्याला खरं वाटेल याची खात्री नाही आणि इथंच सगळा घोळयं. प्रत्येकजण सोयीनं बोलतो ”

“म्हणजे नाटकी.दिखाव्याची दुनिया..”हऱ्या

“कटू असलं तरी हेच वास्तव आहे”

“मग गोड बोला..”

“खरं सांगू.गोड बोलणाऱ्यांची तर भीतीच वाटते.कामापुरतं गोड बोलणार आणि नंतर….हम आपके हैं कौन ”

“खरा कोण?खोटा कोण?समजत नाही.”हऱ्या

“मी राजकारण्यांविषयी बोलत नाही.त्यांच्याशी आपल्याला काही देणं-घेणं नाही.आपण औट घटकेचे राजे.मत दिल्यावर आपली अवस्था टिश्यू पेपर सारखी.”

“पण याच लोकांच्या हातात आपलं भविष्य आहे ना.नक्की कोणावर विश्वास ठेवायचा.” हऱ्या

“कोणावरच नाही.नशिबावर सोडून द्यायचं.सब घोडे बारा टक्के.नेतेमंडळी म्हणजे एकापेक्षा एक नटसम्राट..त्यांच्या  खेळातली आपण प्यादी. त्यांच्याविषयी जास्त बोलायला नको. कधी,कोठे अन कोणाला राग येईल आणि भावना दुखावतील याचा नेम राहिलेला नाही.”

“विषय भरकटला ना राव.आपण खरं बोलण्याविषयी  चाललं होतं .” हऱ्या

“हो,सध्या अशी परिस्थिती आहे की,घरी दारी सगळीकडे मुखवटा लावलेला.सारखं मुखवट्याआड लपल्यानं खरा चेहरा लक्षात येत नाही.” 

“हंsssम ”

“एकूणच काय तर एकमेकांवरचा विश्वास कमी होतोय.”

“झपाट्यानं”

“आपल्या मनमोकळं बोलण्याचा गैरफायदा तर घेणार नाही ना ही भीती सतत वाटते.”

“असं का पण..”हऱ्या 

“मी,मला,माझं याला आलेलं महत्व आणि जगण्यातली वाढती अनिश्चितता त्यामुळे ठायी ठायी आलेला तात्पुरतेपणा”

“हे काय नवीन..”

“नवीन नाही जुनंच आहे.जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की सगळ्या गोष्टी उदा.आनंद,दु:ख,राग,संताप हे फार वरवर आणि उथळ झालंय तर ईगो स्ट्रॉंग आणि नाती भुसभुशीत झालीय.”

“त्यामुळचं माणसं सतत सैरभैर असतात.” हऱ्या

“कोणत्याच गोष्टीत जास्त वेळ रमत नाहीत.लगेच बोर होतात.कोणत्याही कारणानं रागवतात अन लगेच शांतही होतात.बऱ्याचदा विचार न करता रिऍक्ट होण्याचं प्रमाण फार वाढलंय.तासनतास चॅटिंग करतील पण समोरासमोर बोलणार नाहीत.”

“डिजिटल संवाद वाढला पण सुसंवाद हरवला” हऱ्या 

“आहाहाहा,काय तर बोलालास.एकदम पुस्तकी वाक्य ..”

“माणूस कितीही आधुनिक झाला तरी अजूनही भावना तशाच आहेत.परस्परांविषयी प्रेम,माया,ममत्व वाटतचं आणि त्यात कधीच बदल होणार नाही.वाईट एवढंच की व्यवहाराला महत्व दिल्यानं नात्याची घट्ट वीण उसवायला सुरवात झाली”

“हो याचा अनुभव घेतलाय.आईबापांना आपल्याच मुलांशी बोलायला भीती वाटते”

“नवीन जमान्याची नवीन दुखणी”

“असो…माणसानं स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.”

 हऱ्या तिळाची वडी नाऱ्याच्या हातात ठेवत म्हणाला “आपण परंपरा मोडायची नाही. तिळगूळ घ्या…..”लगेच नाऱ्या ओरडला “अन  चांगलं बोला …. “

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !! तिळगूळ घ्या .. छान छान वाचत रहा

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments