? इंद्रधनुष्य ? 

☆ केकी मूस — लेखक : श्री योगेश शुक्ल ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

आज ३१ डिसेंबर कलामहर्षी केकी मूस यांचा स्मृतीदिन. केकी मूस या अवलियाची ही दुनिया! कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकाराने आपले सारे आयुष्य तिच्या साधनेत घालवले. ‘केकी मूस’ हे नाव प्रथम ऐकणाऱ्याला गूढ-कुतूहलाचे वाटते. या नावामागे मोठे विश्व दडल्याची भावना होते. या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला, की मग या गूढ अंतरंगाची खोली किती खोल-रुंद आहे याचाही साक्षात्कार होतो. कलेच्या प्रांतातील या गंधर्वाचा शोध घेतच अनेकांची पावले चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगतच्या त्या दगडी बंगलीत शिरतात आणि या दंतकथेचा भाग बनून जातात.कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस या अवलियाची ही दुनिया! मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत २ ऑक्टोबर १९१२ रोजी हा कलायोगी जन्माला आला.

 केकी मूस यांना त्यांचे निकटवर्तीय बाबुजी म्हणत असत. केकी मूस  हे पारशी समाजात जन्मले, ते तहहयात अविवाहित राहिले. त्यांची आई पिरोजाबाई सात्त्विक, प्रेमळ अन् दयाळू होत्या. वडील माणेकजी शांत, संयमी, सुशील व हिशोबीदेखील होते. केकी मूस यांचे बालपण  मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत मलबार हिल येथे त्यांच्या मामांच्या घरी गेले. मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. त्यांचे नाव आर.सी. नरिमन. मुंबईतील समुद्रकाठच्या एका टोकाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे – नरिमन पॉर्इंट. मामांनी केकींचे शिक्षण- प्राथमिकपासून तर महाविद्यालयापर्यंत मुंबईत केले. केकींनी १९३३ साली पदवी प्राप्त केली. त्याचे मामा अविवाहित होते. त्यांनी केकीला त्यांचा मुलगा मानले होते.

केकीने पदवी प्राप्त होताच लंडनला जाऊन कलाशिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली. परंतु मामाला त्यांचा उद्योग व्यवसाय केकीने सांभाळावा असे वाटत होते. केकी हट्टी होते. ते म्हणाले, “मामा कोठलेही ऐश्वर्य मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही.” ते ऐकल्यावर मामा भडकले. त्यांनी केकींना त्यांच्या आईबाबांकडे पाठवून दिले. केकींनी त्यांची बॅग भरली व त्याच मिनिटाला मामांचा बंगला सोडला व रात्रीची कलकत्ता मेल धरली. केकींचे यांचे वडील, माणेकजी मूस हे १९३४ साली कालवश झाले. त्यांच्या आईचा आधार गेला. पण १९३३-१९३४ सालामध्ये केकींनी पाटणादेवी, तीर्थक्षेत्र बालझिरी, खुलताबाद, वेरूळ या ठिकाणी कित्येकदा जाऊन फोटोग्राफी केली, पेंटिंग्ज केली. केकींनाही वडिलांच्या निधनाने हादरा बसला. केकी त्यांच्या आईला तिच्या हॉटेल व्यवसायात मदत करू लागले. केकींनी लंडनला जाण्याचा विषय आईकडे कधीही काढला नाही.

कैकुश्रु माणेकजी मूस हे केकींचे नाव, परंतु पिरोजाबाई लाडाने त्यांना केकी म्हणू लागल्या. त्याच नावाने ते जगप्रसिद्ध झाले. केकींच्या मनातील घालमेल आईला कळली बहुधा, आई एक दिवस त्यांना म्हणाली, “केकी, बाळा, मी तुला उद्या पैसे देणार आहे, तू लंडनला जाण्याची तयारी कर!”. केकी त्यांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत कधीही आईचे ते ‘देणे’ विसरू शकले नाहीत. आईची आठवण आल्यावर केकी देवालाही रागावायचे आणि म्हणायचे, ‘कसला देव बीव काय नाय! देव असता तर माज्या आईला त्याने नेला नसता.’ आईने परवानगी दिल्याने केकी जाम खूश झाले. केकींनी १९३५ ला लंडनला प्रयाण केले व तेथील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा ‘कमर्शियल आर्ट’चा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्ज्याच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. त्यांनी जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल केले. लंडनचे नागरिक केकींना ‘गोल्ड मेडलिस्ट, गोल्डन मॅन केकी’ म्हणू लागले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. केकींनी त्या त्या राष्ट्रातील कला जाणून घेतल्या. तेथील नामवंत प्रसिद्ध कलावंतांना सदिच्छा भेटी दिल्या.

केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले. ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला स्वेच्छेने आत्मकैद केले.  या चक्रावणाऱ्या आत्मकैदेत जगरहाटी विसरलेल्या या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’! मूस यांना या विश्वात जी जी म्हणून कला आहे, त्या साऱ्यांची आस होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्रण, मूर्तिकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन..काय काय म्हणून नव्हते. यातूनच चाळीसगावातील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयघन अशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातच या सर्व कलाकृतींचे एक संग्रहालय थाटण्यात आले. एका सर्जनशील कलाकाराच्या या स्मृती जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’तर्फे केले जात आहे.

रेम्ब्रा रीट्रीट! केकी मूस यांच्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे हे नाव आत शिरताच कलेशी नाते जोडते. विश्वाविख्यात कलाकार रेम्ब्रा हा केकी मूस यांचा आदर्श! कलेच्या प्रांतातील त्याचे अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू आपला जन्म झाला, ही मूस यांची धारणा होती. आत शिरताच भोवतीने सर्वत्र शिल्पं, चित्रे, छायाचित्रे आदी कलाकृती दिसू लागतात. चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंगे! या साऱ्या दालनात तीच अधिक भरून राहिलेली आहेत. हे सुंदर जग आणि चराचरात सामावलेले सौंदर्य चित्रातून रेखाटावे आणि छायाचित्रातून प्रकट करावे, या ध्यासातून त्यांनी आयुष्यभर त्यांचा कुंचला आणि कॅमेरा चालवला. या दोन प्रतिभांनीच मूस यांना जगविख्यात केले.

कल्पनाचित्रांचा खेळ असलेली ‘टेबल टॉप फोटोग्राफी’ हा त्यांचा एक अफलातून प्रकार! मनातले एखादे चित्र उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने उभे करावे, त्याला प्रकाशयोजना, त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या साऱ्या दृश्याचे छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावे!

केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काडय़ा यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला. या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. झाले, भल्याभल्यांना या चित्रातून जागोजागीचा ‘विंटर’ दिसू लागला. यात खुद्द पंडित नेहरूदेखील होते. हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढेच म्हणाले, ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मि. मूस, टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर?’  ‘ऑफ डय़ूटी’ आणि ‘अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर’ ही दोन छायाचित्रेही अशीच मूस यांच्यातील सर्जनशील मन दाखवणारी. ‘ऑफ डय़ूटी’मध्ये जवानाचा एक बूट दाखवला असून, त्याच्यात एक हसरी बाहुली खोचलेली आहे. बाहुलीतून जणू तो बूटच हसत आहे. दिवसभर त्या जवानाबरोबर ‘डय़ूटी’ करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसे वाटते, आनंद होतो. पहिल्यात हा आनंद, तर दुसऱ्यात ती भीती! ‘मृत्यूचे भय’ दाखवणारे हे छायाचित्र! आजारी आईला मोसंबीचा ज्यूस देताना मूस यांना ही जाणीव स्पर्शून गेली. एक मोसंबी कापून त्याचा ज्यूस (अंत) होत असताना बाजूच्या मोसंब्यांच्या मनात काय भाव उमटत असतील, याचेच भय त्यांनी या फळांवर चित्रित केले. ..क्षुल्लक फळांमधून चराचरांतील प्रत्येकाच्या जीवन-मरणाचे दर्शन घडविणाऱ्या या छायाचित्राने मूस यांना पुढे जागतिक कीर्ती मिळवून दिली.

मूस यांच्या संग्रहालयात व्यक्तिचित्रेही आहेत. त्यांच्या स्टुडिओला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवराचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडित महादेवशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, ना. ह. आपटे, ना. सी. फडके, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, बाबा आमटे अशी इथे एक मोठी शंृखलाच उभी राहते. यात काही ‘असामान्य’ असे सामान्य चेहरेही आहेत. एका फासेपारधी स्त्रीचा चेहरा असाच सतत लक्ष वेधत असतो. या वृद्ध, कृश महिलेच्या चेहऱ्यात त्यांना साऱ्या जगाचे दु:ख जसे दिसले, तसेच त्या शेकडो सुरकुत्यांमधून जगण्याची दुर्दम्य इच्छाही जाणवली. या वृद्धेच्या काढलेल्या छायाचित्रांना पुढे जगभर प्रसिद्धी मिळाली.

मूस यांनी शिल्प, मूर्ती, माती, काष्ठशिल्प, ओरिगामी आदी कलाप्रकारही हाताळले. यांच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयात आहेत.  मूस यांच्या नजरेत आलेल्या अनेक लाकूड-फांद्यांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्व बहाल केले. त्यांच्या बंगल्याच्या आवारातील सुकलेल्या एका बोरीच्या खोडात त्यांना असाच एक चेहरा दिसला. मूळ खोडातून वर निघालेल्या या चार फांद्यांना त्यांनी हव्या त्या आकारात छाटले आणि त्यांच्यात साखळय़ा अडकवल्या; यातूनच तयार झाली ती ‘इटर्नल बाँडेज’ नावाची एक अफलातून कलाकृती! स्त्री-पुरुष ही एकाच सृष्टीची एकमेकांना बांधून ठेवणारी निर्मिती, इथपासून ते ‘त्या’ हातांकडून परमेश्वराच्या होणाऱ्या प्रार्थनेपर्यंत असे अनेक अर्थ या कलाकृतीतून ध्वनित होत गेले.  पंडित नेहरू या कलाकृतींच्या ओढीने इथपर्यंत आले आणि सारे कार्यक्रम रद्द करत दिवसभर रमले. तर इथे सतत येणारे बाबा आमटे जाताना ‘इथे मी माझा आत्मा ठेवून जात आहे’ असे म्हणाले. संग्रहालयाची इमारत असलेले मूस यांचे ब्रिटीशकालीन घर 109 वर्षांचे वृध्द झालेले आहे. 31 डिसेंबर 1989 रोजी कलामहर्षि केकी मूस यांनी या जगाचा निरोप घेतला.केकी मूस यांनी आयुष्यभर कलानिर्मितीशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्यांची कला सातासमुद्रापार गेली. तिला अनेक मानसन्मानही मिळाले, पण या मान, सन्मान, पुरस्कार, नाव, प्रसिद्धी, पैसा आणि मुख्य म्हणजे बाजार या साऱ्यांपासून ते दूर राहिले. कुंचला आणि कॅमेऱ्यातून वेळ मिळताच ते सतारीवर बसायचे. या संवेदनशील कलाकाराचा सहवास सर्वानाच हवाहवासा वाटायचा. तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून असंख्य कलाकारही रोज चाळीसगावचा पत्ता शोधत इथपर्यंत येतात. आजही आपल्या कलादालनाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती खान्देशातील या मातीला अधिक समृध्द करीत आहेत.

लेखक : श्री योगेश शुक्ला 

प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments