श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

किसनरावांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. वीस वर्षे तरी झाली असतील, त्या गोष्टीला. एका दसरा सणाला गावाकडचा वाडा मुलं, सुना, जावई आणि नातवंडं यांनी गजबजून गेला होता. गप्पागोष्टींना रंग चढला होता. हरिभाऊंच्या नातवंडांनी कल्ला करीत आजोबांना विचारलं होतं, “आजोबा, वडिलार्जित मिळालेलं चार एकराचं रान तुम्ही आपल्या हिंमतीवर बारा एकरापर्यंत वाढवलं आहे म्हणून ऐकलंय. आम्हाला सांगा ना त्याबद्दल.” 

हरिभाऊ मिशीतच हसत म्हणाले. “होय, मी हिंमत केली होती कारण मला फकस्त शेतीचाच नाद होता. काय झालं, त्या काळात शहरात कारखाने उभे राहायला लागले तेंव्हा गावाकडच्या शेतकऱ्यांचं लक्ष शहरातल्या रोजगाराकडे गेलं. कधी कधी वर्षभर राबूनदेखील हातात काहीच पडायचं नाही. दरमहा हमखास मिळणाऱ्या पैश्याच्या मोहापायी त्यांचं शेतीकडे दुर्लक्ष होत गेलं. शहरातच राहायचं असल्यानं त्यांना शेती विकावी लागली. मी मात्र मिळेल तेंव्हा पैसा गाठीला बांधत होतो. आजच्या तरूणांच्यासारखं आम्हाला बुलेट गाड्या मिळायच्या नाहीत. खिल्लारी बैलांची घुंगराची गाडी म्हणजेच आमच्यासाठी चैन होती.” 

इतक्यात आजीनं नातवांना जेवायला बोलावलं. सदरेवर फक्त सदाशिव, काशिनाथ आणि किसन बसले होते. हरिभाऊ म्हणाले, “तुम्ही भावंडं असंच गुण्यागोविंदाने राहा. बहिणीला कधी अंतर देऊ नका. ही बारा एकराची शेती चौघात वाटून घ्या. पंचांना कधी बोलवू नका. एवढंच माझं सांगणं आहे.” 

सदाशिव लगेच म्हणाले, “आबा, अशा निर्वाणीच्या गोष्टी आता कशाला करताय?” 

हरिभाऊ म्हणाले, “पिकलं पान कधी गळून पडंल सांगता यायचं नाही. आज तुम्ही एकत्र जमलात म्हणून मनातलं बोलून टाकलं.”

किसन म्हणाला, “आबा, शेतात भाऊच राबतात. मी कुठे शेती करतोय? तुम्ही मला शिकवलंत हेच खूप झालं. माझाही वाटा त्यांनाच द्या.”

“अरे, मी सगळ्यांनाच शाळेत पाठवलं होतं. ते शिकले नाहीत. किसन तू शिकलास. तुझ्या कर्तबगारीने आता हेडमास्तर झालास. त्यात तुझी मेहनत आहे. एक बाप म्हणून सगळ्या मुलांना समान वाटा देणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या माघारी तुझा हिस्सा कुठल्याही भावाला देऊन टाक. पण मिळालेली ही शेतजमीन मात्र बाहेरच्या कुणाला कधी विकू नकोस, एवढंच माझं कळकळीचं सांगणं आहे.”

किसनरावांना हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कालच जावई अविनाश आणि कन्या विशाखा त्यांना भेटायला आले होते. अविनाशने क्लिनिक उघडायचा विचार बोलून दाखवला. बॅंकेचे लोन मिळणार होते पण मार्जिनसाठी पांच लाख रूपये पाहिजे होते. सुपुत्र सुधीरनेही फ्लॅटच्या मार्जिनसाठी सात लाख रूपयांची मागणी केली होती. ‘आमच्या हातून कधी शेती होणारच नाही तर गावाकडे असलेली शेतजमीन विकून टाकावी’ असं सुधीर आणि विशाखा या दोघांचं मत पडलं होतं. 

गेल्या वीस वर्षात पुलाखालून किती पाणी वाहून गेलं आहे. आबा गेले, आई गेली. आपली मुलं सुधीर आणि विशाखा शिकून सवरून मोठी झाली. किसनरावांचे प्राव्हिडंट फंडाचे पैसे दोन्ही मुलांच्या लग्नांत संपले होते. मुलीचं अन मुलाचं लग्न पार पाडताच आपलं कर्तव्य संपलं असं समजून सुमन एकट्याला अर्ध्यावर सोडून अचानक निघून गेली. मुलगा सुधीर एका प्रायव्हेट फर्ममध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे. कन्या विशाखादेखील चांगल्या नोकरीत होती. पण तिच्या पहिल्या डिलीव्हरी नंतर जावयाने तिला नोकरी सोडायला लावली होती. प्रेमळ जावई लाभल्याने कन्येची चिंता नव्हती. मुलांच्या पुढे हात पसरायला लागू नयेत इतपत तुटपुंजी का होईना, पेन्शन मिळत होती. 

आता शेतजमीन विकायचं म्हटल्यावर किसनराव पेचात पडले. सकाळची बस पकडून ते गांवाकडे निघून गेले. 

गावात पाऊल टाकताच किसनराव भावाकुल झाले. इतकी वर्षे आपल्याला या मातीची कशी भूल पडली होती याची खंत वाटली. झपझप पावलं टाकीत वाड्याजवळ आले. अंगणात तुळशी वृंदावन पाहून त्यांना आईची आठवण आली. 

किसनरावांना असं अनपेक्षितपणे आलेलं पाहून दोन्ही भाऊ आनंदून गेले. दुपारची जेवणे झाल्यानंतर किसनरावांनी येण्याचे कारण सांगत सदाभाऊंच्या कानांवर सगळी हकिगत घातली. 

सदाभाऊंचा मुलगा प्रशांत एका महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. सदाभाऊ म्हणाले, “आज शनिवार आहे, सांजच्याला प्रशांत येईल तेव्हा त्याच्याशी बोलू. सध्या शेताचं काम प्रशांतच बघतो. अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे द्राक्ष पीक परवडेनासे झालं होतं म्हणून प्रशांतने गेल्या वर्षी द्राक्षबाग काढून टाकली होती.   

बाजारपेठेची मागणी आणि हंगामानुसार वेगवेगळ्या भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन करतो. आमच्या तिघांच्या हिश्श्यातल्या शेतीपैकी सहा एकर शेतजमीनीत चार एकर टोमॅटो, एक एकर वांगी, एका एकरात कांदा, घेवडा आणि चारापिकांची लागवड केलीय. 

गेल्या वर्षी टोमॅटोपासून एकरी पंचेचाळीस हजार तर वांग्यातून सत्तर हजाराचा नफा निघाला. याशिवाय हंगामानुसार कोबी, फ्लॉवर, ज्वारी पिकांची लागवड करतो. प्रशांत दर रविवारी येतो आणि पुढील आठवड्याचे नियोजन करून जातो. वेळोवेळी फोनवरूनदेखील आमच्याशी संपर्कात असतो, त्यामुळे वेळेवर निर्णय घेणे शक्य होते.” 

संध्याकाळी प्रशांत आला. किसनरावांना पुतण्याचा अभिमान वाटला. प्राध्यापक असूनदेखील त्याचं शेतीवरचं प्रेम कौतुकास्पद होतं. प्रशांतची पाठ थोपटत किसनराव म्हणाले, “प्रशांत तू ग्रेट आहेस. लोकांनी शेतीपुढे हात टेकले आहेत. तू मात्र चांगलीच प्रगती करतो आहेस.” 

“काका, शेतीपुढे हवामानातल्या बदलांचे मोठे आव्हान नेहमीच असते. बाजारभावात सातत्याने चढउतार होतच असतात. पिकांना अपेक्षित भाव मिळत नाही. हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे. या स्थितीत आम्ही बहुपीक पद्धतीकडे वळलो. कारण काही पिकांना जरी चांगला भाव मिळाला तरी इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन जाते. बाजाराचा अभ्यास करून लागवडीची वेळ ठरविण्यावर आणि आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर भर देतो. 

काका, शेतीत ताळेबंद महत्वाचा असतो. बाजारभावावर आपले नियंत्रण नसते हे जरी खरं असलं तरी मी प्रत्येक पिकाचं अंदाजपत्रक तयार करतो. 

पिकानुसार जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्‍यक खर्च टाळतो. शेतीत आर्थिक व्यवस्थापन महत्वाचे असते. शेतातून आलेल्या उत्पन्नाचा उपयोग उत्पादक कामांसाठीच खर्च करतो. 

काका, तुम्ही म्हणत असाल तर या वर्षी तुमचंही रान करायला घेतो. मी जमाखर्चाचा हिशेब ठेवीन. सगळा नफा तुम्हालाच देईन. सांगा, मी तयार आहे.” 

प्रशांतच्या म्हणण्यावर किसनराव अंतर्मुख झाले. ‘आपण शेतजमीन पडीक ठेवून, फक्त शाळा एके शाळा करत बसलो,’ याबद्दल त्यांना स्वत:चीच कीव वाटली. ते काही बोलले नाहीत. 

सदाभाऊंनी किसनरावांची खरी अडचण प्रशांतच्या कानांवर टाकली. सदाभाऊंनी रात्रीच फोन करून आक्काला, सुधीरला आणि विशाखाला गांवाकडे बोलवून घेतलं. वाड्यावर बैठक बसली. पीक नियोजन आणि योग्य तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधला तर शेती व्यवसाय कशी किफायतशीर ठरू शकते हे प्रशांतने सांगण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?  

— क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments