श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली ! ☆ श्री मनोज मेहता 

डोंबिवली जुन्या जमान्यातली,

डोंबिवली गर्द हिरव्या झाडीत लपलेली !

इवलुशा लाल लाल मातीच्या रस्त्यांची ! टुमदार बंगल्यांची, सुंदर,

चिकनी -चिकनी, डोंबिवली !! 

माझी फोटोग्राफी १५ मे १९७२ पासून, माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुरु झाली. भावाने सांगितले की इथे जाऊन अमुक अमुक यांना भेट, लग्नाचे इतकेच फोटो काढायचेत. हो, त्या जमान्यात ३६ ते ४८ म्हणजे ३ / ४ रोलची छायाचित्रं, म्हणजे भरपूर मोठा अल्बम. बारा फोटो एका रोल मध्ये. मग माझी स्वारी कॅमेऱ्याची बॅग घेऊन इच्छित स्थळी, म्हणजे त्यांच्या घरी पोचायची. ‘अरे वा वा, ‘ये मनोज ! अगं, मनोज आलाय, आटपा गं लवकर, अशा आरोळीनं माझं स्वागत व्हायचं. कारण त्याकाळी घरी देवाला नमस्कार करताना, हातावर दही देताना, मनांत असेल तर एक समूह फोटो असा शुभकार्याच्या फोटोंचा क्रम असायचा.

नंतर छान कौलारू घराच्या बाहेरील मंडपात किंवा आफळे राम मंदिरात अथवा मोजक्या मंगल कार्यालयात ही कार्य होत असत. सुरूवातीला  गुरुजींच्या पाया पडून, माझा छायाचित्रणाचा प्रवास सुरु व्हायचा.

मी लग्नाचे सर्व ब्राम्हण -विधी अन् जेवणावळींचे फोटो काढून, माझ्या घरी दुपारी १२ पर्यंत परतायचो.

त्यात सीकेपींचं लग्न असेल तर  अर्धा तास अगोदरच घरी ! मग सायंकाळी ६ ते ८ स्वागत समारंभ असायचा. तेव्हा आलेल्या प्रत्येकाला प्रचंड प्रसिद्ध असा गोल्डस्पॉट, व्हॅनिला / तिरंगी / टूटी-फ्रूटी आईस्क्रीम किंवा जॉय आईस्क्रीमचे कप, अशाप्रकारे हे डोंबिवलीतील स्वागत समारंभाला असायचं हं ! नो जेवण भानगड ! आणि या स्वागत समारंभाचे फोटू काढून मी अन नवरा नवरी साडेआठला आपापल्या घरी असायचो बरं !

तर मंडळी सत्तर ते ऐंशीच्या दशकात फोटोग्राफर, गुरुजी, वाजंत्रीवाले व मंगल कार्यालयं यांची संख्या अगदीच तुटपुंजी असायची. आणि मुख्य म्हणजे ज्यांना बोलावलं जायचं ते वेळेच्या आधी हजर असायचे. माझ्या छायाचित्रणाच्या सुरवातीच्या, म्हणजे १९७२ पासूनच्या कार्रकिर्दीत, साखरपुडा, लग्न- समारंभ इ. साठी, श्री. धामणकर, दीक्षित वा भातखंडे गुरुजी असायचे. त्यात प्रामुख्याने मला गुरु म्हणून लाभले ते ‘धामणकर गुरुजी’. मी इतक्या लहान वयात फोटो काढतो, म्हणून कौतुक आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेमही होतं. शिस्तबद्ध पण शांत स्वभाव हे त्यांचं वैशिष्ट्य ! प्रत्येक विधीचा अर्थ वधू -वरास समजावून, मगच त्यांच्याकडून कृती करून घ्यायचे. त्यात अजून एकाची भर पडली तो म्हणजे मी ! ‘मनोज, आता या विधीचा फोटो काढ. नीट काढ हो, पुन्हा मी फोटो काढायला देणार नाही. ‘ ते अर्थ सांगत असताना, माझंही लक्ष असायचं. धामणकर गुरुजींच्या ‘गुरुकृपेने’ मी  हळूहळू का होईना पण सर्व आवश्यक विधींचे फोटू काढण्यात तरबेज होऊ लागलो होतो.

सुमारे ४८ वर्षांपूर्वीची घडलेली गोष्ट आहे ही ! मला नक्की आठवत नाही १९७५ की ७६, पण डोंबिवली पश्चिमेला नाख्ये यांच्या एव्हरेस्ट मंगल कार्यालयात लग्न होते. त्या मंडळीचं नावही आता लक्षात नाही. कार्यालयाच्या चौफेर फेरी मारून, कुठं क्लोजअप फोटो घेता येतील, याचा मी आधी अंदाज घ्यायचो. मग पुढचा प्रवास सुरु व्हायचा.

तर मंडळी, त्यादिवशी या लग्नकार्यात गुरुजींचा पत्ताच नाही, कुजबुज सुरु झाली. काही मंडळी गुरुजींच्या घरी जाऊन आली, अजून कोण गुरुजी उपलब्ध आहेत का ते ही पाहून झालं. दोन्हीकडची मंडळी चिंतेत ! बरं गंमत म्हणजे, मला याचा काहीच थांगपत्ता नाही. काही वेळाने मी विचारायला गेलो की एवढा का उशीर होतोय, तेव्हा मला हे कारण समजलं. मी भाबडेपणाने विचारलं, ‘ मी करु का विधी ? मला मंत्र येत नाहीत, पण सगळे विधी व्यवस्थित करून घेईन आणि हो, मंगलाष्टका मात्र म्हणा कोणीतरी, हे सांगताच ते उडालेच की ! एकतर मी अर्ध्या चड्डीत फोटो काढायला आलेलो आणि हा एवढासा मुलगा हे काय सांगतोय ?

नंतर कोणीतरी आजोबा आले व त्यांनी माझी नीट चौकशी करून, खात्री करून, होकार दिला.

मग मी सीमांतपूजन करून, मुलीला गौरीहाराजवळ बसून पूजन करायला सांगितलं. नंतर कार्यालयाच्या मुख्य दारात वराकडच्या मंडळींना उभं करून, वधूच्या आईने वराचे पाय धुवून, तिलक लावून ओवाळायला सांगितलं. वधूच्या बाबांनी वराच्या हातात नारळ देऊन त्याला मंडपापाशी आणलं. माझ्या नशिबाने दोघा तिघांनी मंगलाष्टका म्हटल्या. बरोबर मुहूर्तावर, ‘आता वधू-वरांनी एकमेकांना हार घाला, ‘ अशी मी जोरात आरोळी ठोकली, मी दोघांचे फोटो काढले अन् वाजंत्रीही वाजली. ‘वधूवरांना करवल्यांनी ओवाळा हो !’ ते झाल्यानंतर नवरा-नवरीला मी पाटावर बसण्यास सांगितलं. नंतर कन्यादान, सप्तपदी इ. झालं. इतकं सारं, मी फोटो काढत -काढत (आजच्या जमान्यातील 20-20 की. ) पार पाडलं. लक्ष्मीपूजनाला नवऱ्यामुलाला मी विचारलं, ‘तुझ्या बायकोचं नाव काय ?  तेच लिहायचं हं, ताटातल्या तांदुळात !  हे सारे विधी मी प्रत्येक विधीचा फोटो काढून व पुढच्या विधीला काय करायचं ते सांगत, असं एक तासात आटोपलं. आता हे सर्व पाहायला, दर्दी ज्येष्ठांची गर्दी होतीच. सर्व विधी झाल्यावर, त्या ज्येष्ठांपैकी कोणी आजी होत्या, त्यांनी वधुवराला माझ्या पाया पडायला लावलं. ‘अहो, ते नवरा नवरी माझ्यापेक्षा मोठे आहेत, मीच त्यांच्या पाया पडतो ! असं मी म्हटल्यावर तुफानी हास्यकल्लोळ झाला !  पण मला काही कळेना, हे माझ्या का पाया पडतायत ? आणि वरती हातात पाकिट देऊन, मला आजींनी जवळ घेऊन माझी पापी घेतली, मला त्यांच्या जवळ बसवून प्रेमानं जेवायला घातलं.

ते पाकिट न उघडता, मी घरी आल्यावर वहिनीच्या हातात दिलं. तिने विचारलं, ‘ काय आहे यात ?’ मी म्हटलं, ‘मला काय माहित ? लग्नात दिलं मला. ‘ तिनं उघडल्यावर कळलं, त्यात २१ रू. होते.

नंतर फोटोचा अल्बम घ्यायला, ती मंडळी घरी आल्यावर, मी केलेले प्रताप भावाला व माझ्या वडिलांना कळले. ‘मनोजनेच आमच्याकडच्या लग्नात सर्व विधी पार पाडले !’ ‌’काहीतरी काय सांगताय ? आम्हाला काही बोलला नाही, ‘ असं म्हणत, भावानी मला हाक मारली. त्यांच्या समोर आल्यावर मी सांगितलं, यांच्याच आजीनं नवरा -नवरीला माझ्या पाया पडायला लावलं !’ हे ऐकताच सगळे खो खो हसायला लागले.

पण त्यादिवशी गुरुजी न आल्यामुळे हे सुंदर लग्न- रामायण घडलं. या प्रसंगातील प्रेमळ आज्जी, नवरा -नवरी, माझी चौकशी करून मला विधी करायला परवानगी देणारे आजोबा अन् सारी मंडळी… आजही हे आठवलं की मला गुदगुल्या झाल्याशिवाय रहात नाहीत.

यानंतर असा प्रसंग कधीही परत माझ्या वाट्याला आला नाही.

हां, कधी बारशाला तर कधी साखरपुड्याला मला समोरून कधीतरी कोणी विचारतं, ‘तुम्हीच सांगा हो मेहताजी, आता पुढे काय ते !’ मग मी त्या त्या प्रसंगी, कोणी काय करायचं ते व्यवस्थित सांगतो.

पण पण मी लग्नात कुण्या मुलीचा भाऊ तर कधी मामाचं पात्र, आयत्यावेळी अजूनही वठवतोय अन् कार्य सुरळीत पार पडतं. ते ही फोटोग्राफी करता करता हं.

हे घडून आलं ते फक्त अन फक्त माझ्या कारकिर्दीला वळण देणाऱ्या, गोविंद धामणकर गुरुजींच्या गुरुकृपेमुळेच, अन तेही बाल वयात !

त्यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments