श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(सैनिक बलिदानासाठीच तर निर्माण झालेला असतो.. इथं भावनांपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ !) – इथून पुढे —

आफ्रिकेतील मोहिम वाटते तितकी सोपी नाही… शांतता रक्षणासाठी प्रसंगी प्राणांचे बलिदानही द्यावे लागणार याची जाणीव प्रत्येक जवानाला होती!

८,राजपुताना रायफल्सचे जवान दक्षिण सुदान मध्ये उतरले. विशिष्ट गणवेश आणि डोक्यावर यु.एन. लिहिलेलं निळ्या रंगाचे हेल्मेट. भारतासह अनेक देशांचे सैन्य तिथे तैनात होते. हे संयुक्त सैन्य असते आणि या सैन्याचे नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघाने नेमलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या हाती असते.

भारतीय सैनिकांची संख्या अर्थातच लक्षणीय असते आणि कामगिरी तर अतुलनीय असतेच असते. कारण भारतीय सैनिक अत्यंत कणखर मनोवृत्तीचे, शिस्तबद्ध आणि नैतिकतेचे पालन करणारे, उच्च दर्जा प्रशिक्षित असतात. देशाने सोपवलेली कामगिरी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे हे कर्तव्य मानले जाते आणि हे कर्तव्य प्राणांच्याही पलीकडे जपले जाते. सैनिक आणि अधिकारी आपापल्या बटालियन, रेजिमेंट, तुकडी इत्यादींशी संबंधित व्यक्तींशी, चिन्हाशी, बलिदानाशी अगदी आत्मियतेच्या धाग्यांनी बांधले गेलेले असतात. हे सैनिक एकमेकांचे बंधू असतात. कुणीही कुणाला मागे एकट्याला सोडून पुढे निघून जात नाही. साथ जियेंगे, लडेंगे, मारेंगे और जरुरत पडी तो मरेंगे असा यांचा खाक्या असतो.

दक्षिण सुदानमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. डिंका आणि नुअर जमातीतले सर्वजण एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले होते. त्यांनी आजवर एकमेकांच्या टोळीतील लाखो लोकांचा जीव घेतलेला होता.

काहीच दिवसांपूर्वी तिथे एक मोठा सामुहिक नरसंहार घडून आला होता. एक फूटबॉलचे मोठे मैदान भरून जाईल इतके मृतदेह कित्येक दिवस सडत पडले होते. बऱ्याच दिवसांनी मोठ्या क्रेन्स आणून त्याच मैदानावर खड्डे घेऊन ही प्रेतं पुरली गेली!

आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमुळे या दोन्ही टोळ्यांमध्ये काहीकाळ युद्धविराम झाला होता. डिंका टोळीचा एक नेता अध्यक्ष आणि नुअर टोळीचा एक नेता उपाध्यक्ष अशी व्यवस्था निर्माण केली गेली होती. जागतिक संघटना औषधे, वैद्यकीय सहाय्य, अन्नधान्य इ. मदत करत होत्याच. पण अन्याय होत असल्याच्या आणि सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेतून नुअर लोकांनी अचानक डिंका जमातीचा अध्यक्ष असलेल्या सरकारविरुद्ध उठाव केला. हे बंडखोर आणि त्यावेळच्या सरकारी फौजांमध्ये तुफान धुमश्चक्री झाली. हजारो लोक बेघर झाले. जाळपोळ, लुटालुट माजली.

कॅप्टन समरपाल सिंग साहेबांनी गेल्या गेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या नेमणूकीच्या भागात एक तात्पुरते शरणार्थी शिबिर त्यांना उभारावे लागले. कारण मारले जाण्याच्या भीतीने डिंका जमातीचे छत्तीस लोक शांतिसेनेच्या आश्रयाला आले होते. त्यांच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी आता शांतिसेनेची होती.

बंडखोर आता या शांतिसेनेच्या सैनिकांवरही डूख धरून होते. समरपाल साहेबांनी आपल्या सैनिकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. संयुक्त सेना असल्याने समरपाल सिंग साहेबांच्या हाताखालील तुकडीत आपले छत्तीस भारतीय सैनिक होते. इतर राष्ट्रांतील काही ख्रिस्ती, मुस्लीम सैनिक होते इतर तुकड्यांमध्ये! पण असे असले तरी सच्चे सैनिक दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात धन्यता मानतात. ह्या सर्वांच्या धार्मिक भावना, आहार, विचार अगदी भिन्न असले तरी आता ते एकाच आदेशाखाली एकत्रित आलेले होते…. आणि मुख्य म्हणजे कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार होते.

डिसेंबर महिना. डिंका लोक शांतिसेनेच्या आश्रयाला आल्याची खबर नुअर टोळीला लागली! या डिंकाना ठार मारण्यासाठी या शरणार्थी शिबिरावर सुमारे दीड-दोन  हजार बंडखोर सशस्त्र आक्रमण करणार होते… अशी पक्की खबर मिळाली होती!

यावेळी या शिबिरात शांतिसेनेच्या अमेरिकन महिला वरिष्ठ लष्करी अधिकारी, आणखी काही तीन-चार महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. मुख्य शहरापासून हे शिबिर पाचशे किलोमीटर्सवर स्थित होते… अर्थातच दारूगोळ्याची कमतरता होती… लगेचच मदत मिळण्याची शक्यता धुसर होती….. आणि या ठिकाणी तैनात सैनिकांची संख्या अगदी तुटपुंजी! आणि शिबिराकडे दीड-दोन हजार सशस्त्र बंडखोर वेगाने झेपावत होते…. जंगली कुत्र्यांची भुकेलेली टोळीच जणू!

शिबिरात असलेला एक विदेशी अधिकारी समरपाल सिंग साहेबांकडे आला आणि म्हणाला, ”माझा फक्त भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास आहे… इतरांवर नाही! मी त्यांना पळून जाताना पाहिले आहे. तुमच्याकडे असलेल्या रायफल चालवण्याचे प्रशिक्षण मला द्या… मी मेलो तर तुमच्या खांद्याला खांदा लावून लढता लढता मरेन!”

वरिष्ठांची परवानगी घेऊन समरपाल साहेबांनी त्या अधिकाऱ्याला ती रायफल चालवायची कशी हे तिथल्या तिथे शिकवले….. आता आपल्या छत्तीस सैनिकांसोबत हा सदतिसावा सैनिक सज्ज होता!

शरणार्थी शिबिराच्या सभोवती आठ नऊ फूट उंचीचे गवत माजलेले होते. त्यामुळे शिबिराजवळ कुणी येत आहे हे दिसणे अशक्यप्राय होते.

सकाळचे सात वाजताहेत…. आज पहाटेपासूनच समरपाल सिंग साहेब अस्वस्थ आहेत. हल्ला होणार…! आपल्या ताब्यात असलेले शरणार्थी ही आपली जबाबदारी आहे!

समरपाल सिंग साहेब बाहेर आले. शिबिराच्या एका कोपऱ्यात दोन रिकामे कंटेनर एकमेकांवर असेच ठेवून दिले गेले होते. आणि त्यांच्या टोकापर्यंतची उंची आठ फुटांपेक्षा जास्त होती. साहेब त्या कंटेनर्सवर चढले आणि त्यांनी सभोवार नजर टाकली.

आफ्रिकेतील विल्डर बिस्ट्स नावाच्या प्राण्यांच्या लाखोंच्या झुंडी बेफाम पळत निघालेल्या आहेत, हे दृश्य आपण कित्येक वेळा डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर पहात असतो ना, तशी हजारो शस्त्रधारी बंडखोरांची एक अजस्र लाट शिबिराकडे झेपावत होती… त्यांची संख्या खरं तर याही पेक्षा अधिक असावी. पण छत्तीस जवानांच्या समोर हे म्हणजे अजस्र आव्हानच!

समरपाल सिंग साहेबांनी धाडकन खाली उडी घेतली. आपल्या सैनिकांना सावधनतेचा इशारा दिला. अगदी साधे बंकर्स… पत्र्यांचे…. आत फक्त वाळूने भरलेली काही पोती… गोळीबारापासून बचाव करण्यासाठी! त्यात मर्यादित शस्त्रसाठा. कुणी मदतीला येण्याची शक्यता नाहीच. जे मदत करू शकतील ते थोडेथोडके नव्हेत… पाचशे किलोमीटर्स अंतरावर होते… त्यांना येण्यास वेळ लागला असताच.

नाही म्हणायला आपल्या सैनिकांची आणखी एक छोटी तुकडी तिथून दीड किलोमीटर अंतरावर नदीच्या तीरावर तैनात होती. पण ते आणि शरणार्थी शिबिर यांच्यातल्या या दीड किलोमीटर्स अंतरामध्ये हे बंडखोर अचानकपणे उपटले होते. म्हणजे आपल्या त्या सैनिकांना आपल्या सैनिकांच्या मदतीला येण्याच्या मार्गात हे एवढ्या मोठ्या संख्येत असलेले बंडखोर होते. परिस्थिती बिकट होती!

बंडखोरांनी संधीचा फायदा उचलून शिबिरावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. आपल्या सुदैवाने त्या अप्रशिक्षित हल्लेखोरांना बंदुकीने नेमका नेम कसा साधायचा हे माहित नव्हते. प्रशिक्षण नसल्याने ते कसेही वेडेवाकडे फायरिंग करीत होते. अधूनमधून गोळीबार थांबायचा.

साहेब स्वत: एका बंकरमध्ये घुसले आणि त्यांनी रायफलचा ताबा घेतला… कारण तेथे तैनात असलेली एक परदेशी सैनिकांची तुकडी एवढा मोठा हल्ला बघून तिथून पळून चालली होती. साहेबांनी त्या पळपुट्यांकडे पाहून असे काही म्हटले की त्यापैकी दोन साधे शिपाई परतले आणि म्हणाले… “साब… अब हम आपके अंडर हैं… आप जो कहेंगे वो करेंगे!” त्यांचा अधिकारी मात्र तिथून पळून गेला तो गेलाच.

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments